esakal | अन्नाने बदला स्वभाव !
sakal

बोलून बातमी शोधा

Food

अन्नाने बदला स्वभाव !

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

खाल्लेले अन्न ही शरीरातील कुंडात प्रज्ज्वलित झालेल्या अग्नीत दिलेली आहुती असावी. एकदम खूप अन्न या अग्नीवर टाकले किंवा अजिबात अन्न दिले नाही तर तो शरीरातील अग्नी विझून जाईल. तेव्हा पोटातील जाठराग्नी तेवत राहील अशा बेताने अन्न सेवन करणे आवश्यक.

आयुर्वेद हा वेदांचा उपवेद आहे. माणसाने वागावे कसे, काय खावे,

जीवनमान कसे ठेवावे, एकूण आपले जीवन सुखी कसे ठेवावे, परमानंद या आपल्या लक्ष्यापर्तंत कसे पोहोचावे याचे ज्ञानही आयुर्वेदात दिलेले आढळते. आपले आरोग्य नीट ठेवण्यासाठी आयुर्वेदातील मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यायलाच हवा. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् असे म्हटले आहे, म्हणजे शरीर हा आपल्या सुखाचा पाया आहे. शारीरिक इंद्रियांचे सुख क्षणभंगुर असते, परंतु कायमच्या सुखापर्यंत पोहोचण्यासाठी शरीर हा पाया मजबूत असावाच लागतो. शरीराचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी आपल्याला अन्न, योग, व्यायाम या सगळ्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. ‘अन्नाद् भवन्ति भूतानि’ असे भवगंतांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ आपण सर्व अन्नामुळेच तयार झालेलो आहोत. अन्नातच दोष असला तर शरीर आरोग्यवान नसेलच परंतु विचारही चांगले नसतील, मिळणारा आनंद क्षणभंगुर असेल हे सहज लक्षात येते. श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वेद-उपनिषदांचे सार त्यावेळी प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेत सांगितले. यावर सखोल चर्चा होण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्र्वरमाउलींनी ७००० ओव्यांची ज्ञानेश्र्वरी लिहिली. अनेक संतानी अभंग, काव्य, ओव्या अशा प्रकारात वेदांतील ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अन्न भौतिक आहे, तसेच शरीर ही भौतिक आहे. मानसिक व आत्मिक आनंद मिळण्यासाठी सात्त्विक आहाराची प्रशंसा केलेली दिसते.

संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे, ़‘भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, ऐसीयासी नारायणे उपेक्षिले सर्वदा’ ! अन्न हे भीक मागून आणलेले नसावे, तर ते स्वकष्टार्जित असावे. स्वकष्टार्जित अन्न सेवन करणाऱ्याला एक प्रकारचा स्वाभिमान असतो. चोरी करून आणलेले, दुसऱ्याला फसवून मिळविलेले, लांडी लबाडी करून मिळविलेले पैसे देऊन खरेदी केलेले अन्न कधीच आरोग्यदायी होऊ शकत नाही, त्यामुळे आजारपण येते. एखाद्या गरजवंताला, भुकेलेल्याला, ज्याला काही अपरिहार्य कारणामुळे जेवण मिळत नाही अशा व्यक्तीला अन्न दिल्यास ते त्याने चोरी करून मिळविले आहे असे म्हणता येत नाही. पंढरपूरला वारीबरोबर पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना वाटेत स्वतः अन्न शिजवून खाणे शक्य नसते. अशा वेळी त्यांच्या अन्नपाण्याची सोय केली तर तो देणाऱ्याचे सात्त्विक दान असते व घेणाऱ्याचा सात्त्विक प्रसाद असतो. वेद सर्वांच्या सुखासाठी कार्य करतात. ज्ञानेश्र्वरमाउलींनी पसायदान सर्वांसाठी मागितले. सर्वांना बरोबर घेऊन अन्नग्रहण करावे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यासाठी ‘सह ना भवतु, सह नौ भनक्तु, सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै’ नुसार भाव असणे आवश्यक आहे. म्हणजे सर्वांना बरोबर घेऊनन अन्नसेवन करण्यामागे सर्वांना ताकद मिळावी, आनंद मिळावा, सर्व तेजस्वी व्हावेत, कुणीही कुणाचाही द्वेष करू नये असा भाव असतो.

समर्थ रामदासस्वामींनीही म्हटलेले आहे, ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या श्र्लोकात यज्ञाची प्रशंसा केलेली आहे. खाल्लेले अन्न ही शरीरातील कुंडात प्रज्ज्वलित झालेल्या अग्नीत दिलेली आहुती असावी. एकदम खूप अन्न या अग्नीवर टाकले किंवा अजिबात अन्न दिले नाही तर तो शरीरातील अग्नी विझून जाईल. तेव्हा पोटातील जाठराग्नी तेवत राहील अशा बेताने अन्न सेवन करणे आवश्यक. सर्वांनी एकत्र बसून, पार्थना करून स्वकष्टार्जित अन्न सेवन करावे हे महत्त्वाचे. ही गोष्ट लक्षात ठेवून पुढे काय खावे, काय खाऊ नये हे ठरविणे आवश्यक ठरते. जिभेला आवडणारे अन्न खाण्याआधी वरील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते.

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अन्नाविषयी सांगितलेले आहे.

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।

यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं श्रृणु ॥ गी. १७-७।।

जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता ।

पावोनिया त्रिविधता । चेष्टे त्रिधा ।। ज्ञा. १२२।।

म्हणौनि त्रिविध आहारु । यज्ञुहि करित त्रिप्रकारु ।

तप, गान, हन, व्यापारु । त्रिविधचि ते ।। ज्ञा. १२३।।

आपल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे अन्न प्रिय असते. तसेच यज्ञ, तप दान यांचेही तीन भेद असतात. सात्त्विक, राजसिक, तामसिक असे दानाचे भेद समजावले. हे भगवंतांनी अशासाठी सांगतिले की वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाल्ल्यावर प्रवृत्तीही वेगवेगळ्या प्रकारची तयार होते. प्रत्येकाने सात्त्विक अन्न खावे हा श्र्लोकाचा उद्देश. हेच माउलींनी १२२,१२३ या श्र्लोकांत असे मांडलेले आहे,

आयुःसत्त्वबलारोग्य-सुखप्रीतिविवर्धनाः ।

रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥गी.१७-८।।

आहार हा आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य व प्रीती वाढविणारा असावा. आहार रसयुक्त, स्निग्ध, स्थिर (ज्या अन्नाचे सत्त्व शरीरात दीर्घकाल टिकते त्याला स्थिर आहार म्हणतात) मनाला प्रिय असणारा आहार सात्त्विक व्यक्तीला प्रिय असतो. म्हणजे सात्त्विक आहार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये वर सांगितलेले गुण तयार होतात.

क्रमशः

loading image
go to top