esakal | लहान मुलांची प्रतिकारशती !
sakal

बोलून बातमी शोधा

Children

लहान मुलांची प्रतिकारशती !

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि संसर्गापासून रक्षण होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करून घेता येतो. सुवर्णसिद्ध जल हे घरातील सर्वांसाठी विशेषत: लहान मुलांच्या दृष्टीने उत्तम. साधारण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सुवर्ण या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी स्टीलच्या पातेल्यात सुवर्णासह २० मिनिटे उकळून सुवर्णसिद्ध जल तयार करता येते.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवावी हा प्रश्र्न सध्या अनेक जणांकडून विचारला जातो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यापूर्वी प्रतिकारशक्तीची कवचकुंडले कोणती आहेत व ती कशी मिळवावीत हे माहिती असायला हवे. रोग होऊ नये यासाठी शरीरातील त्रिदोष, सप्तधातू, पचन करणारा अग्नी हे सर्व घटक संतुलनात असावे लागतात. यासाठी प्रकृती, वय, ऋतुमान, भौगोलिक परिस्थिती वगैरे गोष्टींचा विचार करून आहार-आचरणाची योजना करावी लागते. प्रतिकारशक्तीचा विचार करताना याच्या बरोबरीने ‘रसायनसेवन’ सुद्धा महत्त्वाचे असते. लहान मुले नाजूक असतात, संवेदनशील असतात. त्यांच्या शरीरात कफदोषाचे प्राधान्य असल्याने त्यांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्ती असते. पचनसंस्थेचा विचार करता त्यांच्या पोटात जंत होण्याची शक्यता अधिक असते. प्रतिकारशक्ती उत्तम राहावी, मुलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करणे अनिवार्य असते. लहान मुलांना कोणती रसायने द्यावीत हे आपण सर्वप्रथम पाहू या. नवजात बालकाला रोज सुवर्णप्राशन करणे, म्हणजे सहाणेवर १-२ थेंब शुद्ध मध घेऊन त्यात २४ कॅरट शुद्ध सोने उगाळून बाळाला चाटवणे, आवश्यक असते.

जन्माच्या दिवसापासून ते बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत रोज एकदा या प्रकारे सुवर्णप्राशन करायचे असते. यामुळे बालकाला जिवाणू-विषाणूशी संबंधित रोग होत नाहीत असा संदर्भ आयुर्वेदात दिलेला आहे, प्रत्यक्षातही असंख्य कुटुंबांनी हा अनुभव घेतलेला आहे. संतुलन बालामृत हे सुवर्ण, केशर वगैरेंनी युक्त खास बालकांसाठी तयार केलेले रसायन. बालक पाच वर्षांचे होईपर्यंत रोज एकदा चिमूटभर बालामृत मधासह चाटवण्याने बालकांची प्रतिकारशक्ती सुधारते, त्यांचा एकंदर विकास उत्तम होतो, मेंदू-हृदय-फुप्फुसे या महत्त्वाच्या अवयवांची शक्ती वाढते असा अनुभव आहे. बालक वर्ष-सव्वा वर्षांचे होईपर्यंत त्याला बाळगुटी देण्यानेही प्रतिकारशक्ती वाढविता येते. संतुलनची तयार बाळगुटी द्यायला सोपी पण सर्व संस्कार करून तयार केलेली असल्याने अतिशय गुणकारी सिद्ध झालेली आहे. यातील पिंपळी, बेहडा, सुंठ, काकडशिंगी, ज्येष्ठमध वगैरे द्रव्ये बालकाचे सर्दी-खोकल्यापासून रक्षण करतात; अतिविषा, सागरगोटा, नागरमोथा तापाला प्रतिबंध करतात; वावडिंग, डिकेमाली वगैरे द्रव्ये जंत होऊ देत नाहीत आणि अशा प्रकारे बालकाचे आरोग्य सर्व बाजूंनी उत्तम राहण्यास मदत मिळते. सुवर्ण हे आयुर्वेदात विषनाशक, ग्रह बाधानाशक (ग्रह म्हणजे न दिसणारे सूक्ष्म जिवाणू-विषाणू) आणि उत्तम रसायन म्हणून गौरविलेले आहे. या दृष्टीने लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि संसर्गापासून रक्षण होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करून घेता येतो. सुवर्णसिद्ध जल हे घरातील सर्वांसाठी या दृष्टीने उत्तम. साधारण एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सुवर्ण या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी स्टीलच्या पातेल्यात सुवर्णासह २० मिनिटे उकळून सुवर्णसिद्ध जल तयार करता येते. दिवसभर हेच पाणी पिणे सर्वांत चांगले. सितोपलादी चूर्ण हा आयुर्वेदातील प्रसिद्ध चूर्ण. यातील वंशलोचन शुद्ध असले आणि इतर द्रव्ये उत्तम प्रतीची असली तर ते रसायनासारखे प्रभावी असते, लहान मुलांच्या फुप्फुसांची शक्ती वाढावी, सर्दी-खोकला-ताप यांना प्रतिबंध व्हावा, प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी पाच वर्षाखालील मुलांना पाव चमचा, पुढे अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधात मिसळून घेणे उत्तम. ज्या मुलांना दूध पचत नाही किंवा दुधामुळे सर्दी-खोकला होतो त्यांना कपभर दुधात पाव चमचा सितोपलादी चूर्ण मिसळून देता येते.

पावसाळ्यात व हिवाळ्यात कपभर दुधात एक चिमूट हळद, बोटाच्या पेराएवढा सुंठीचा तुकडा व दोन चमचे प्यायचे पाणी असे पाच मिनिटांसाठी उकळावे व गाळून घेऊन त्यात संतुलन चैतन्य कल्प किंवा शतावरी कल्प टाकून घेतल्यासही प्रतिकारशक्ती उत्तम राहते. सकाळ-संध्याकाळ वयानुसार अर्धा ते एक चमचा च्यवनप्राश देणे हे सुद्धा उत्तम. मुलांमध्ये वयानुसार कफदोषाचा प्रभाव अधिक असला तरी त्याचे पर्यवसान आजारपणात होऊ नये यासाठी आहाराकडे लक्ष गरजेचे असते. थंडगार पाणी, शीतपेये, आइस्क्रीम, चीज, अंडी, अति प्रमाणात पनीर, दही, केळी, सीताफळ, पेरू, फणस, चिकू यांच्या अतिसेवनाने कफदोष तयार होतो. सकाळी उशिरा उठणे, दिवसा झोपणे (पाच-सहा वर्षांखालील मुलांचा अपवाद वगळता) यामुळेही कफदोष वाढतो. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे, साय खाणे हे सुद्धा कफदोषाला कारण ठरणारे असते.

(क्रमशः)