उत्सव तेजाचा, उत्सव आरोग्याचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव तेजाचा, उत्सव आरोग्याचा!

उत्सव तेजाचा, उत्सव आरोग्याचा!

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

दीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. त्यामुळे कण न्् कण प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करायची असेल, तिला साजेशी आंतरिक तेजस्विता अनुभवायची असेल, तर अग्नीची व्यवस्थित काळजी घ्यायला लागेल.

दीपावली हा दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव, तेजाचा उत्सव, अग्नीचा उत्सव. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आरोग्यही तसेच असावे लागते. किंबहुना ज्यावेळी मनुष्याचे आरोग्य उत्तम असते तो दिवस दीपावलीचा, उत्सवाचा होऊन जातो. आरोग्य म्हणजे काय? सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत जाणे, सर्व जग प्रकाशमय वाटणे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश दिसू शकणे किंवा एकूणच जीवन उत्सवासारखे जगण्याची संकल्पना प्रत्यक्ष होणे हे ज्यामुळे घडते ते आरोग्य. आरोग्याचा अनुभव कसा असतो हे कुणी विचारले तर त्याची तुलना दीपावलीशी होऊ शकते. दीपावली येते ती आरोग्यपूर्ण ऋतुकालात. पावसाचा जोर कमी होत होतकोजागरी पौर्णिमेच्या आसपास रात्रीचे वातावरण थंड, शीतल व्हायला सुरुवात झालेली असते. पावसाळ्यात मंद झालेला अग्नी पुन्हा हळूहळू प्रदीप्त व्हायला सुरुवात होते. आणि उत्साहाने, प्रकाशाने जीवन अंतर्बाह्य उजळवून टाकणारा दीपावलीचा महोत्सव येतो. जणू पावसाळ्यामुळे अंधारलेल्या, सुस्तावलेल्या चराचराला प्रकाशाने, चैतन्याने प्रफुल्लित करण्यासाठी दीपावली येते. दीपावली हा प्रकाशाचा, तेजाचा उत्सव आणि सतेजता हे उत्तम आरोग्याचेही एक लक्षण होय. सतेजता शरीरस्थित अग्नीच्या आश्रयाने राहते.

आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यम्‌ उत्साहः उपयचौ प्रभा ।

ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्चोक्ता देहाग्निहेतुकाः॥ ...चरक चिकित्सास्थान

दीर्घायुष्य, सतेज कांती, उत्तम बल, निरामयता, उत्साह, दृढ शरीरयष्टी, प्रभा म्हणजे एकंदर तेजस्विता आणि ओज या सर्व गोष्टी शरीरातील अग्नीवर अवलंबून असतात. त्यामुळे कण न कण प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करायची असेल, तिला साजेशी आंतरिक तेजस्विता अनुभवायची असेल तर अग्नीची व्यवस्थित काळजी घ्यायला लागेल. शरद ऋतूत स्फुल्लिंग पावलेल्या अग्नीने दीपावलीच्या काळात जणू काही आकाशात जाऊन आतषबाजी करणाऱ्या ठिणग्यांप्रमाणे अनुभव द्यायला सुरुवात केलेली असते. या अग्नीचा चेतवण्यासाठी आणि तो कार्यक्षम झाला की त्यायोगे अधिक शक्ती मिळविण्यासाठी दीपावलीत चकली, कडबोळी, शेव, चिवडा तसेच अनारसा, करंजी, शंकरपाळी वगैरे फराळाचे पदार्थ सेवन केले जातात. अग्नी प्रदीप्त असला तर सेवन केलेल्या अन्नाचे शरीरशक्तीत रूपांतर होऊन दीपावलीचा अनुभव येऊ शकतो. म्हणून दीपावली हा बाहेर दिव्यांचा उत्सव तर आत अग्नीचा उत्सव. प्रदीप्त अग्नी अनेक मार्गांनी प्रकट होत असतो, त्वचेच्या सतेजतेतून, मनाच्या उत्साहातून, बुद्धीच्या कल्पकतेतून, डोळ्यांमधील चमकीतून, एकंदर प्रभावी व्यक्तिमत्वातून! दीपावलीचा उत्सव सुद्धा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैसर्गिक वगैरे सर्व स्तरांवर मदत करणारा असतो.

दीपावलीच्या आधी पावसामुळे निर्माण झालेले कीटक किंवा मनुष्यवस्तीच्या जवळपास आलेल्या सर्प वगैरे प्राण्यांना आपल्या राहत्या वस्तीपासून पुन्हा त्यांच्या मूळच्या जागी पाठवण्यासाठी फटाक्यांच्या आतषबाजीचाही उपयोग होतो. थोडासा धूर झाला की वातावरणातले व्हायरस कमी होतात. थोडासा आवाज आला की त्याच्या कंपनांमुळे मनुष्यमात्राच्या सहवासाला योग्य नसलेले साप वगैरे प्राणी थोडे दूर जायला मदत मिळते. अर्थात आवाज एवढा मोठा नसावा की त्याने कानाचे पडदे फाटतील किंवा फटाक्यांचा अतिरेक होऊ नये की ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल. भुईनळे किंवा जमिनीवर फिरणाऱ्या चक्रांमुळे गणेशोत्सवापासून केलेल्या उपासनेचे फळ म्हणून कुंडलिनी जागृत होण्यासाठी मेंदूला आवाहनात्मक संवेदना मिळते. अशा प्रकारची आतषबाजी पाहिल्यानंतर खालून (मूलाधारातून) निघालेला ऊर्जाप्रवाह वर किंवा मस्तकाकडे जाण्यासाठी मदत मिळते. प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला उपयोगी पडेल अशा तऱ्हेने कुंडलिनी शक्तीचा अनुभव घेता येतो. आनंद सर्वांबरोबर वाटावा ही आपली भारतीय संस्कृती. दीपावलीमध्ये आपला आनंद द्विगुणित व्हावा, आपल्याबरोबर आपल्या प्रियजनांनाही बरे वाटावे यासाठी भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात, नातेसंबंधांना उजाळा दिला जातो. लोकांकडून खरेदी झाल्याने व्यापारी वर्गही खूष होतो, प्रवासाला गेल्याने पर्यटनक्षेत्राची भरभराट होते. शेतीतील कापण्या जवळ आलेल्या असल्याने किंवा नुकत्याच झालेल्या असल्याने शेतकरी बांधवही आनंदात असतात. दीपावलीनंतर येणारे हेमंत-शिशिर ऋतू आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असतात. अशा प्रकारे सर्वच बाजूंनी दीपावलीचे दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. नवीन वर्षात आपणास अधिक आनंदाने, अधिक उत्साहाने, अधिक उमेदीने पुढे जायचे आहे हे सुचविणारे असतात. ज्या शरीराकडून आपण रोजच्या रोज काम करून घेतो, त्या शरीराकडे लक्ष देणेही आवश्‍यक आहे. प्रत्येक मशीनचे सर्व्हिसिंग करावे लागते, त्याचप्रमाणे शरीराचीही काळजी घेणे आवश्‍यक असते. त्यासाठी पंचकर्मासारखे अंतर्स्नेहन, अंतर्शुद्धी, विरेचन वगैरे विधी करून शरीरातील अग्नीला तेजःपुंज करण्याचा काही प्रयत्न करणे आवश्‍यक असते. दीपावलीच्या आधी किंवा नंतर जर हे उपाय योजले तर आरोग्याचा उत्सव साजरा करता येईल, आतल्या दीपावलीचा अनुभव घेता येईल.

आपणा सर्वांना दीपावली आरोग्यपूर्ण, उत्सवपूर्ण, मैत्रीपूर्ण व आनंदाची जावो हीच शुभेच्छा!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top