esakal | एकादशी आणि आरोग्य...
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal

एकादशी आणि आरोग्य...

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

एकादशीला आरोग्याच्या जाणिवेची खास सुरुवात करून दिलेली असते. पावसाळ्यात काय खावे, काय खाऊ नये याचे निर्बंध अशासाठी असतात, की पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असताना जास्त खाणे, जडान्न खाणे इष्ट नाही. म्हणून या काळात उपवासांची योजना केलेली दिसते.

आषाढस्य प्रथम दिवसे ..... वगैरे सर्व काव्यात चांगले दिसते. परंतु आता पावसाळा सुरू होणार असतो. चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू असला तरी आषाढ महिना पावसाळ्याची सुरुवात करतो असे म्हणायला हरकत नाही. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्र्विन या चार महिन्यात भारतभर पावसाळा असतो. पावसाळ्यात काय काय होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पावसाळ्यात काही नियम पाळणे आवश्यक असते, परंतु मंडळी पावसाळ्यात भिजायला व गरम गरम कांद्याची भजी खायला बाहेर पडतात असे दिसते. पावसाळ्याच्या सुरुवाती सुरुवातीला आषाढी एकादशी येते. हिला भागवत एकादशी असेही म्हटले जाते.

श्रीज्ञानेश्र्वर माउलींनी जवळजवळ भागवत धर्माची पुनःस्थापना केली. सनातनधर्म व भागवतधर्म यात फार फरक दिसत नाही. या दोन्हींत सर्वसामान्यांना एकत्र घेऊन केलेली परमेश्र्वराची उपासना याला महत्त्व दिसते. कुठलाही भेदभाव न ठेवता समाज धारण करणे या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अनादी कालापासून प्रयत्न केलेले दिसतात. आषाढी एकादशी ही एका उपासनेशी जोडलेली आहे. संत ज्ञानेश्र्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई अशा सर्व संतांनी या एकादशीच्या दिवशी व यानंतर येणाऱ्या श्रावणात उपवास महत्त्वाचा असतो असे सांगितले. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असते, पावसामुळे घराबाहेर पडणे कमी झालेले असते (अपवाद शेतात काम करायला जाणाऱ्या शेतकऱ्यांचा) त्यामुळेही उपवास किंवा खाण्यावर ताबा ठेवणे महत्त्वाचे ठरते.

डोक्यावर छत्री असली तरी पावसाळ्यात भिजणे आरोग्यासाठी चांगले नाही. रोज नेमाने चालणाऱ्या मंडळींची पावसाळ्यात मोठी अडचण होते. बाहेर पाऊस पडत असला तर बाहेर पडता येत नाही. घर मोठे असले, घरात मोठा पॅसेज असला तर चालता येऊ शकते, परंतु या दिवसांत एकूण चालणे कमी होते. आरोग्यासाठी कंबर कसून कामाला लागावे हा संदेश कंबरेवर हात ठेवून उभे असलेले विठ्ठल रखुमाई देत असावेत. वर्षभरच चालण्याचे महत्त्व विशद करण्यासाठी, छत्री घेऊन, रेनकोट घालून का,होईना पण चालावे याची आठवण ठेवण्यासाठी भागवत धर्मात वारीची योजना केलेली दिसते. वारीची जोड परमेश्र्वराशी, श्रद्धेशीही लावलेली दिसते. असंख्य मंडळी वारीतून पंढरपूराकडे कूच करतात. वारकऱ्यांना वाटेत मुक्काम करण्यासाठी जागा देणे, अन्न-पाणी पुरवणे वगैरेंतून इतरांना मदत करण्याची, समाजात एकोपा वाढविण्याचे कामही आपोआप सिद्ध होते, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली दिसते. मंडळी आपापल्या श्रद्धेनुसार विठ्ठलासमोर नतमस्तक होतात. एकंदरीत या एकादशीला आरोग्याच्या जाणिवेची खास सुरुवात करून दिलेली असते.

पावसाळ्यात काय खावे, काय खाऊ नये याचे निर्बंध अशासाठी असतात, की पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असताना जास्त खाणे, जडान्न खाणे इष्ट नाही. म्हणून या काळात उपवासांची योजना केलेली दिसते. वर्षभर नेमाने उपवास केले नाहीत, तरी चातुर्मासात उपवास नक्की करावेत. मग, हा उपवास स्वतःच्या श्रद्धेनुसार केलेला शनिवार, गुरुवार, सोमवार असेल किंवा आषाढी एकादशी, जन्माष्टमी असे उपवास असतील. स्वतःच्या प्रकृतीनुसार दिवसातून एकदाच खाणे, दोन्ही वेळा उपवासाचे सहज पचणारे खाणे, काही न खाता नुसत्या पाण्यावर राहणे अशा वेगवेगळ्या प्रकारे उपवास करता येतो. परंतु या काळात उपवास करणे आवश्यक आहे, हे वारीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचविलेले असावे. मांसाहार मुळीच करू नये. ओलावा असलेल्या ठिकाणी, थंड वारा असलेल्या ठिकाणी न जाण्याची काळजी पावसाळ्यात घ्यावीच लागते, अन्यथा लगेच सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या त्रासांना दूर ठेवणे अधिकच आवश्यक आहे. सध्याच्या महामारीच्या काळात सर्दी-खोकला होणे जराही परवडणारे नाही. असा त्रास कोरोनाला आमंत्रण देणारा ठरू शकतो. गर्दी न करणे, मास्क वापरणे अवश्य लक्षात ठेवावे. पावसाळ्यात तब्येतीची अधिक काळजी घेणे आवश्यक असते, मुख्यतः केस कोरडे ठेवणे आवश्यक ठरते.

पावसाळ्यात जीव-जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस जास्त तयार होतात. निमित्त एकादशीचे असो, चतुर्थीचे असो, या उपासनेच्या दृष्टीने दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने स्नान केले तर पावसाळ्याच्या दमट हवेमुळे मंदावलेले रक्ताभिसरण वाढायला मदत होते. या दिवसात शांत बसणे, जप-जाप, देवपूजा, ध्यान-धारणा, योग करण्यासाठी भरपूर वेळ मिळू शकतो. हे करण्याचा मूळ उद्देश आरोग्याचाच असतो. यातून मन शांत झाल्यामुळे मेंदू जास्त कार्यरत होतो, मेंदू जेवढा जास्त कार्यरत होईल तेवढा इंद्रियांवर मनोविजय मिळविणे सोपे होते. मनावर विजय मिळवणे ही स्वतंत्रतेकडे, मोक्षाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. तेव्हा ध्यान-धारणा, योगादी उपायांचाही फायदा या चार महिन्यांत करून घ्यावा. ‘रामकृष्ण हरी’ किंवा ‘जय जय पांडुरंग हरी’ हा सोपा मंत्र म्हणावा. कंबरेवर हात ठेवून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ म्हणण्याने पचनसंस्थेस व हृदयास ताकद मिळते. आज सर्वांनी सांभाळून राहण्याची गरज आहे. तिसरी लाट येते आहे असे म्हणतात. तिसरी लाट येवो, न येवो, आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहेच. गेल्या वर्ष-दीड वर्षात शरीराची, मनाची जी अवस्था झालेली आहे त्याला उत्तर म्हणून या वर्षी चातुर्मासाची खास व्रते करावीत, जेणेकरून आरोग्य चांगले राहील, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

loading image