esakal | डोळ्यांची काळजी...
sakal

बोलून बातमी शोधा

Eye

डोळ्यांची काळजी...

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत, डिजिटल युगात डोळ्यांच्या समस्या अनेकांना प्रकर्षाने जाणवतात. त्याच्या उपायांचा उहापोह आपण आजच्या लेखात करणार आहोत...

जीवनात डोळ्यांचे स्थान अतिशय मोलाचे असते हे आपण सर्वच जण जाणतो. सध्याच्या संगणकीय युगात मात्र डोळ्यांवर कळत-नकळत खूप ताण येत असतो. संगणक, टीव्ही वगैरे अति तेजस्वी स्क्रीनकडे तास न्‌ तास पाहणे, नैसर्गिक प्रकाशाऐवजी अति प्रखर प्रकाशात राहणे, रात्रीची जागरणे, कमी झोप, चमचमीत आहार वगैरे सध्याच्या जीवनशैलीचे अविभाज्य भाग डोळ्यांचे नुकसान करत असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे आपण पाहणार आहोतच, पण तत्पूर्वी डोळा ह्या अवयवाची थोडी माहिती करून घेऊ. '' नेत्रे श्लेष्मणः प्रसादात्‌ ।... सुश्रुत शारीरस्थान मज्ज्ञः प्रसादात्‌ अपि नेत्रयोरुत्पत्तिरनुमीयते ॥ ''...सुश्रुत सूत्रस्थान. डोळे संतुलित कफाच्या सारभागापासून आणि मज्जाधातूच्या प्रसादभागापासून तयार झालेले असतात. '' चक्षुस्तेजोमयं तस्य विशेषात्‌ श्‍लेष्मणो भयम्‌ ।'' - अष्टांगहृदय सूत्रस्थान. डोळ्यांवर तेजाचा, पित्ताचा प्रभाव असतो आणि त्यांना कफदोष वाढलेला घातकारक असते. यावरून असे समजते की डोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही याकडे लक्ष ठेवायला हवे. डोळ्यांचे, दृष्टीचे कफदोषापासून रक्षण होण्यासाठी खालील उपाय योजता येतात.

* रोज सकाळी डोळे त्रिफळा-जलाने धुणे. यासाठी पाव चमचा त्रिफळा चूर्ण कपभर पाण्यात भिजत घालता येते, सकाळी चौपदरी सुती कापडातून गाळून घेऊन डोळे धुण्यासाठी मिळणाऱ्या खास कपात घेऊन डोळे धुता येतात. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये, एकंदर डोळे निरोगी राहावेत, दृष्टी चांगली राहावी यासाठी हा उपाय नियमित करणे फायद्याचे ठरते.

* डोळ्यांतील अतिरिक्त कफदोष अश्रूंमार्फत निघून जावा यासाठी डोळ्यात अंजन घालणे उत्तम असते. यासाठी त्रिफळा, कापूर वगैरे कफशामक द्रव्यांपासून बनविलेले सॅन अंजनसारखे आयुर्वेदिक अंजन वापरता येते.

* मध हे कफावरचे परमौषध समजला जाते. शुद्ध मध डोळ्यात अंजनासारखे घालणे उपयोगी असते. यामुळे दृष्टी सुधारायलाही मदत मिळते.

* कफशामक द्रव्यांचे नस्य करणे. सुंठ, वेखंड, भारंगमूळ, बेहडा वगैरे द्रव्यांनी संस्कारित केलेल्या तेल वा तुपाचे थेंब नाकात टाकल्याने मस्तक, डोळे वगैरे भागातील कफदोषाचे शमन होते, अणु तेल, गंधर्व नस्यासारखे नस्य घृत यासाठी वापरता येते. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा-मध-तुपाचे सेवन करणे. चमचाभर त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा मध व पाव चमचा तूप यांचे मिश्रण घेण्याने डोळ्यांचे तसेच केसांचे आरोग्य चांगले राहते.

* नियमित पादाभ्यंग करणे. पायाचे तळवे व डोळे यांचा निकटचा संबंध असतो. तळव्यांना शतधौतघृत किंवा त्रिफळा घृत किंवा ह्या दोघांच्या मिश्रणापासून तयार

केलेले पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने घासल्याने शरीरातील उष्णता कमी होते, डोळे शांत होतात, दृष्टी सुधारते.

* डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची आग होणे, लाल होणे वगैरे तक्रारींवर रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांमध्ये सुनयन तेल टाकण्याचा उपयोग होतो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य नीट राहण्यास, सुधारण्यासही हातभार लागतो.

डोळ्याची ताकद नीट राहावी यासाठी कफ व मज्जा ह्यांचे पोषण व्यवस्थित होणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने दूध, लोणी, तूप, पंचामृत, बदाम, अक्रोड, जरदाळू वगैरे आहारद्रव्ये उपयोगी असतात. सुनयन घृतासारखे डोळ्यांना हितकर द्रव्यांसह संस्कारित तूप डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी व्यवस्थित राहण्यासाठी उत्कृष्ट असते. दृष्टिदोष दूर होण्यासाठी तसेच विविध नेत्ररोग बरे होण्यासाठीसुद्धा या घृताचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. डोळे निरोगी राहावेत, प्रसन्न व तेजस्वी राहावेत यासाठी तसेच नेत्ररोग झाले असल्यास बरे होण्यासाठी नेत्रबस्ती हा उपचार अतिशय प्रभावी असतो. यात उडदाच्या पिठाच्या साहाय्याने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते आणि त्यात औषधांनी संस्कारित तूप, तेल, दूध घालून काही वेळासाठी तसेच ठेवले जाते. डोळ्यांवर ताण येणाऱ्या व्यक्तींनी, संगणक किंवा तत्सम प्रखर स्क्रीनकडे फार वेळ राहावे लागणाऱ्या व्यक्तींनी, प्रखर प्रकाशात काम करणाऱ्या व्यक्तींनी तर नेत्रबस्ती अधून मधून करून घेणे उत्तम होय.

loading image
go to top