इम्युनिटीसाठी दुधा-तुपाला पर्याय नाही !

दुग्धदिनाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत आईच्या दुधाचा विसर पडलेला दिसतो. दूध व्हेजिटेरियन (वनस्पतिज) असावे असा एक मुद्दा मांडण्यात आला.
Milk Drinking
Milk DrinkingSakal

गाईला त्रास होत असल्याने गाईचे दूध पिऊ नये असा प्रचार सुरू होतो. परंतु गाईचे दूध काढल्याने ती मरत नाही किंवा तिला त्रासही होत नाही. खरे तर आपल्याला जगण्यासाठी गाईच्या दुधाची मदत होते आणि गाय आपल्याला मदत करते म्हणून आपण तिला जगवतो. तेव्हा ‘जगा व जगू द्या’ हा संदेश गाईला चपखलपणे लागू पडतो.

कुटुंब म्हटले की डोक्यावरच्या आसऱ्याची आवश्यकता असते व यासाठी घराची आवश्यकता असते. घरात स्वयंपाकघर सर्वांत महत्त्वाचे असते. खाणे-पिणे सर्वांना अनुकूल असलेले असावे लागते. घरातील प्रत्येकाच्या आरोग्यस्वभावामध्ये म्हणजे त्यांच्या गुणसूत्रांमध्ये साधर्म्य असल्यामुळे त्यांच्या अन्नातही साधर्म्य असणे आवश्यक असते. दूध हा अन्नातील महत्त्वाचा घटक. जन्मतः बालक त्याच्या आईच्या स्तन्यावर अवलंबून असते. आईचे स्तन्य बालकाला पचतेच. सहा महिन्यांचे होईपर्यंत बालकाचे पूर्ण पोषण स्तन्यामार्फत होऊ शकते. या काळात त्याच्या आयुष्यभराच्या आरोग्याची योजना केली जाते. गेल्या आठवड्यात दुग्धदिन साजरा झाला. ज्या विषयात कळत नाही अशांनी कुठली तरी उठाठेव करून, काहीतरी भलतेच बदल करून, कदाचित काही वस्तूच्या विक्रीच्या लोभाने, राजकारण करण्यासाठी किंवा नतद्रष्टपणा म्हणून या विशेष दिवशी लोकांना भलत्याच गोष्टी सांगून संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

दुग्धदिनाच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत आईच्या दुधाचा विसर पडलेला दिसतो. दूध व्हेजिटेरियन (वनस्पतिज) असावे असा एक मुद्दा मांडण्यात आला. प्राण्यांना दिला जाणार त्रास, प्राण्यांचा होणारा छळ वगैरे भलत्याच गोष्टींची चर्चा करून प्राणिज दूध म्हणजे गाई-म्हशीचे दूध पिऊ नये तर बदाम, काजू, सोयाबीन वगैंरेंचे दूध व्यवहारात आणावे अशी सूचना केली. गाईचे दूध प्राणिज असले तर आईचे दूध कसे काय व्हेजिटेरियन असेल?

आईचे दूध मिळावे या हेतूने तिच्यावर काही कष्टदायक संस्कार करावे लागतात का? बाळ दूध प्यायले नाही तर वैद्यकीय सल्ल्याने पंप वगैरे लावून दूध काढून टाकावे लागते. आईचे दूध देण्यात कसा नॉन व्हेजचा मुद्दा उपस्थित झाला नाही? ज्या वस्तूत रक्तांश नसतो ती वस्तू मांसाहारात मोडत नाही. हाडे कालांतराने व केस हे नॉन व्हेजिटेरियन या संज्ञेत मोडत नाहीत. म्हणून दुधाबद्दल बोलत असताना शाकाहार, मांसाहार, प्राण्यांवर होणारे अत्याचार वगैरे मुद्दे मांडून भारतीय संस्कृती तोडण्याचा प्रयत्न करू नये. दूध हे अमृतासमान आहे. त्यावर आपले जेनेटिक आधार ठरलेले असतात, स्तन्य मांसाहार या संज्ञेत मोडत नाही. जोपर्यंत जगातील मांसाहारी पदार्थांवर लोक बंधने आणत नाहीत, मांसाहार बंद करत नाहीत, तोपर्यंत त्यांना प्राणीदया, अहिंसा वगैरे विषयांवर बोलण्याचा अधिकार नाही. बकरी, बोकड, कोंबडी, बदक, हरिण, डुक्कर वगैरेंना मारून मांसाहार करतात त्यावेळी प्राणीदया कोठे जाते? मध्येच कुणीतरी या सगळ्याला धर्माशी जोडतो व म्हणतो. ‘जगा व जगू द्या’ असे महावीर मुनींनी सांगितले आहे, त्यामुळे गाईचे दूध पिऊ नये असा प्रचार सुरू होतो. परंतु गाईचे दूध काढल्याने ती मरत नाही, तिला त्रासही होत नाही. खरे तर आपल्याला जगण्यासाठी गाईच्या दुधाची मदत होते आणि गाय आपल्याला मदत करते म्हणून आपण तिला जगवतो. तेव्हा जगा व जगू द्या हा संदेश गाईला चपखलपणे लागू पडतो. खूप वर्षांपूर्वी आत्मसंतुलनमध्ये एक मोठे जैन मुनी पंचकर्मासाठी राहायला आले होते. ते फक्त भिक्षान्न स्वीकारत असत.

पंचकर्मादरम्यान देण्यात येणारे तूप त्यांना भिक्षान्न म्हणून द्यावे लागे. दुपारचे भोजनही एका वाडग्यामध्ये एकत्र करून द्यावे लागत असे. त्यांना मी रोज सकाळी तुपाची भिक्षा घालत असे. त्यांनी मला नंतर एक गोष्ट सांगितली ती अशी – ‘महावीरांनी त्यांच्या मागच्या जन्मात कुणाला तरी तुपाची भिक्षा घातल्यामुळे त्यांना महावीरांसारख्या मोठ्या योग्यतेच्या व्यक्तीचा जन्म मिळाला. तुम्ही मला तुपाची भिक्षा दिलेली असल्यामुळे तुमचे खूप कल्याण होऊ शकेल असा आमचा जैन पंथ सांगतो.’ हे मुनी तुपाची भिक्षा स्वीकारत होते म्हणजे तो मांसाहार नव्हताच. मंदिरातील चवऱ्यांचे केस हा काय मांसाहारी पदार्थ आहे? ज्यांनी कधी शेती केली नाही, ज्यांनी कधी शेळ्या-गाई-म्हशी पाळल्या नाहीत त्यांनी अचानक उठून भलताच सल्ला द्यावा हे बरोबर आहे का? दूध हे अमृत आहे.

''दूध हे विष आहे, दुग्धजन्य पदार्थ बंद करा'' असे गेल्या ५०-६० वर्षांत सांगितले गेले, पण ते होमोजिनाईज्ड दुधाबद्दल बोलत होते. लोणी म्हणजे कच्च्या दुधातून काढलेला स्निग्ध पदार्थ होता, साहजिकच या लोण्यापासून बनविलेले तूप हे खरे तूप नव्हते. योग्य प्रक्रियेने बनविलेल्या तुपाने किमया साधता येते, कायाकल्प करता येतो, नाना प्रकारचे मेंदूचे विकार बरे करता येतात. कुणाला दूध पचत नसल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा. पण सर्वांनी दूध-दही-लोणी-तूप घेणे आवश्यक आहेच. अन्नात दूध-तुपाचा समावेश असणे महत्त्वाचे आहेच. दूध-तूप घरातल्या घरात बनविणे हे प्रत्येक घरात एक व्यक्ती असल्यास सहसा शक्य होणार नाही. त्यासाठी कुटुंबव्यवस्था शाबूत असणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com