esakal | ‘मन करा रे प्रसन्न’
sakal

बोलून बातमी शोधा

Mind

‘मन करा रे प्रसन्न’

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. मनामुळेच माणसाचे अस्तित्व पशूपासून वेगळे आहे. म्हणजे मनुष्य म्हणून या ठिकाणी जो जगण्याचा अधिकार आहे तो मनामुळेच आहे.

मानव किंवा मनुष्य असे म्हणताना त्यात मन हा शब्द पहिल्यांदा येतो. मनुष्यमात्राला हवे तरी काय ? मनुष्याची घडपड कशासाठी आहे ? तर सुखासाठी आहे. खायला चांगले चटकदार अन्न, राहावयास मोठा राजवाडा, चांगला जीवनसाथी, मुले-बाळे, मित्र-मैत्रिणी, प्रवास, कमी श्रमात अधिक मोबदला, ही सर्व सुखाची साधने. अन्न जरी भौतिक सुखासाठी-पोटासाठी असले तरी सुख मात्र मनच भोगते. सर्वच वस्तूंचे असेच आहे. शरीर हे केवळ साधन, पण सुख मात्र मनासच मिळते ‘मनूचा वंशज मनुष्य’ असे म्हणण्यापेक्षा ‘मनामुळे मनुष्य’ असे म्हणणे अधिक बरोबर आहे. पूर्ण उत्क्रांत मन हेच मनुष्यास पशूंपेक्षा वेगळेपणा व उच्च दर्जा देते.

चरकसंहितेत जीवनाचे तीन मुख्य आधार सांगतांना शरीर व आत्मा यांना जोडणारे मन हा पहिला आधार सांगितला आहे. शरीर ही जड वस्तू व आत्मा ही चेतनशक्ती असून ह्या दोघांना जोडणारा मन हा दुवा आहे. मन स्वच्छ पाण्यासारखे असते परंतु त्यात चुकीच्या सवयीमुळे गढुळता उत्पन्न होते. माती, घाण, जंतू असलेले पाणी कितीही तहान लागली तरी काय उपयोगाचे? अशा पाण्याच्या सेवनाने कल्याणापेक्षा अकल्याणच होईल अर्थात रोगच उत्पन्न होतील. रोग मनापासूनच उत्पन्न होतात. जसे अशुद्ध पाणी प्यायल्यानंतर रोग होतात तसेच अशुद्ध मन शरीराला पूर्ण बिघडवून टाकते. तेव्हा मनातील अशुद्धता काढणे म्हणजेच मनोरोग दूर करणे.

मन दूषित होणे म्हणजे मनामध्ये शंका येणे, मनामध्ये संशय उत्पन्न होणे. खोटारडेपणा व संशयी वृत्ती हे मनाच्या व मेंदूच्या रोगांचे कारण असलेले सर्वांत मोठे दोन व्हायरस (विषाणू) आहेत. भल्याभल्यांना हे विष पचवता आलेले नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीतेही म्हटले आहे - ‘संशयात्मा विनश्‍यति।’ मनात संशय उत्पन्न झाला की मन व मनाचा संबंध येणारे शरीर, व्यवहार, संपूर्ण संसार उध्वस्त होतो व नाश पावतो. आदि शंकराचार्यांनी तर मनाला आठवण करून दिली आहे - ‘चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहम्‌ ।’ हे मना, तुझे मूळ स्वरूप सत्‌ चित्‌ आनंद आहे. '' धीधैर्यात्मादिविज्ञानं मनोदोषौषधं परम्‌ ''।.....वाग्भट ज्याअर्थी बुद्धी, धीर आणि आत्मविज्ञान हे मनावरचे परम औषध सांगितले आहे त्याअर्थी मनास समजून घेऊन शांतपणे स्वतःची ओळख करून घेणे हेच मनाचे औषध आहे. वयाबरोबर वाढत जाणारी सवय जरी शारीरिक वाटली तरी त्यात मनाचाच संबंध अधिक असतो. मनाला बरं वाटावं म्हणून शरीराकडून करवून घेतलेली एखादी गोष्ट हलके हलके शरीरावर सोपवून देऊन सर्व इंद्रियांवर देखरेख करण्याचे काम मन सोडून देते त्यावेळेस सवय सुटणे अवघड होते.

आपणा सर्वांनाच माहीत आहे की धूम्रपान चांगले नाही, पण अनेकांना ही गोष्ट कळते पण वळत नाही. यात वळत काय नाही ? तर मन वळत नाही. अशा वेळी मनाला न सांगता शरीरावरच प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. शरीराला असे नियम लावून घेतले की मन आपोआप शुद्ध होत जाते. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. मनामुळेच माणसाचे अस्तित्व पशूपासून वेगळे आहे. म्हणजे मनुष्य म्हणून या ठिकाणी जो जगण्याचा अधिकार आहे तो मनामुळेच आहे. सर्व ठिकाणी चांगले सौंदर्य पाहण्याची क्षमता असणारे प्रसन्न म्हणजे आनंदित व उल्हसित मनच आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार देते व असे प्रसन्न मनच सर्व तऱ्हेच्या सिद्धी उपलब्ध करून देऊन जीवन आनंदमय बनवू शकते. पुढच्याच ओळीत तुकाराम महाराज म्हणतात - ‘मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते’. सर्व जगभर अनेक ठिकाणी स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ व क्रांती झालेली दिसते. पण वास्तविक पाहता परकीयांच्या सत्तेपासून व आक्रमणापासून स्वातंत्र्य मिळवणे दुय्यम आहे. कारण खरे बंधन हे तर मनाचे बंधन आहे. मनच माणसाला मनुष्यत्व देते आणि बांधूनही टाकू शकते. पण मोक्षप्राप्ती देण्याची शक्ती सुद्धा मनातच आहे.

धर्मार्थकाममोक्षाणां आरोग्यं मूलमूत्तमम्‌ । रोगाः तस्यापहर्तारः ।....चरक. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्तीसाठी शरीराची तसेच आरोग्याचीही आवश्‍यकता आहे तर रोग याला अडथळा आणतात. रोगांमुळे आपले कुठलेही साध्य सिद्ध होऊ शकत नाही, मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली. पण रोग फक्त शरीराचे नसून मनाचे रोग सर्वांत महत्वाचे आहेत. लहानपणी जेव्हा मुले हट्ट करतात तेव्हाच त्यांच्या मनाला लावलेले वळण जेव्हा मन पोक्त अवस्थेत येते तेव्हा उपयोगी ठरू शकते. आपल्याजवळ मनःशक्ती आहे खरी, पण ही मनःशक्ती चांगल्या सवयीने, निरनिराळ्या योग्य अनुशासनाने, आहार-विहारावर बंधन ठेवून मनाला सवय लावल्यानेच मिळते. म्हणूनच आज सर्वांनाच गरज आहे लक्षात ठेवण्याची ‘मन करा रे प्रसन्न’.

loading image
go to top