esakal | शांत झोप!
sakal

बोलून बातमी शोधा

Sleeping

शांत झोप!

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

उत्साह, ताकद, काम करण्यासाठी लागणारे कौशल्य, मनाची प्रसन्नता अशा अनेक गोष्टी झोपेवर अवलंबून असतात. कमी झोप, चुकीच्या वेळी घेतलेली झोप आणि अति प्रमाणात झोप हे तिन्ही प्रकार अनारोग्याचे कारण ठरू शकतात.

भारतीय संस्कृतीमध्ये झोपेला निद्रादेवी असेही एक संबोधन आहे. खरोखरच, निद्रादेवीची कृपा असणे म्हणजेच शांत आणि पुरेशा वेळेसाठी झोप येणे, हे आरोग्याच्या दृष्टीने एक प्रकारचे वरदानच असते. जीवनाचे जे तीन आधारस्तंभ, आहार, निद्रा आणि संयमित वैवाहिक जीवन, यातील निद्रा या स्तंभाची आज आपण माहिती करून घेऊ या.

यदा तु मनसे क्लान्ते कर्मात्मानः क्लमान्विताः ।

विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिति मानवः ।।....चरक सूत्रस्थान

कामकाजानंतर जेव्हा मन थकते, सर्व इंद्रिये थकतात आणि आपापल्या विषयांपासून निवृत्त होतात तेव्हा मनुष्य झोपतो. जेव्हा मन व इंद्रिये श्रमपरिहारासाठी विश्रांती घेतात, त्याला निद्रा म्हणतात. शांत व पुरेशी झोप ही शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहण्यासाठी अनिवार्य असते. उत्साह, ताकद, काम करण्यासाठी लागणारे कौशल्य, मनाची प्रसन्नता अशा अनेक गोष्टी झोपेवर अवलंबून असतात. कमी झोप, चुकीच्या वेळी घेतलेली झोप आणि अति प्रमाणात झोप हे तिन्ही प्रकार अनारोग्याचे कारण ठरू शकतात. सरासरी विचार करता सात ते आठ तास झोप गरजेची असते. कधी झोपावे या प्रश्र्नाचे उत्तर पुढील सूत्रातून मिळते.

रात्रीः स्वप्नाय भूतानां चैष्टाकर्मणाः अहः ।

...मनुस्मृती

रात्र सर्व प्राणिमात्रांना झोपण्यासाठी तर दिवस कामकाजासाठी असतो.

दिवसा झोपण्याने शरीरात अतिरिक्त स्निग्धता वाढते, कफदोष वाढतो तर रात्री जागरण करण्याने कोरडेपणा अर्थात वातदोष वाढतो. तेव्हा रात्री ११ ते ७ या वेळात जितक्या वेळासाठी झोप गरजेची आहे, तितक्या वेळासाठी झोपणे हे प्रत्येकासाठी हितावह होय. सकाळी उशिरा उठण्याने वजन वाढणे, पोट साफ न होणे, अग्नी मंदावणे, कोलेस्टेरॉल वाढणे यासारख्या समस्या, तर रात्री जागरण करण्यावे त्वचा, शरीरावयव कोरडे पडणे, शरीरातील उष्णता वाढणे, सांधे दुखणे, अंग दुखणे यासारखे त्रास मागे लागताना दिसतात. सध्याच्या संगणकयुगात रात्री उशिरापर्यंत काहीतरी करत राहणे, सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे हा ट्रेंड पडत असला तरी ते आरोग्याच्या दृष्टीने श्रेयस्कर नव्हे. ७-८ तासापेक्षा जास्ती किंवा दुपारी जेवणानंतर पुन्हा झोपणे यामुले शरीर जड पडणे, मधुमेहासारख्या रोगांना आमंत्रण मिळणे, शरीरातील मेद वाढणे, सांधे जखडणे, सुस्ती वाटणे, वारंवार सर्दी-खोकला होणे, अशा अनेक तक्रारी उद्भवू शकतात. तेव्हा वेळेवर व योग्य प्रमाणात, ना कमी, ना अधिक, झोपणे आवश्यक होय. आता प्रश्र्न येतो तो झोप न येण्याचा. वेळेवर झोपायला गेले पण झोप आलीच नाही तर काय करायचे?

सुश्रुतसंहितेत शांत झोपेसाठी याप्रमाणे उपाय सांगितलेले आहेत.

अभ्यंगो मूर्ध्नि तैलनिषेवणं गात्रस्योद्वर्तनं संवाहनानि शालिगोधूमादिनिर्मितं स्निग्धं मधुरं भोजने बिलेशयानां विष्किराणां मांसरसा द्राक्षादिफलोपयोगो मनोज्ञशयनासनयानानि च ।

... सुश्रुत शारीरस्थान

  • अंगाला वातशामक व शरीराचा थकवा दूर करू शकणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग करण्याने शांत झोप यायला मदत मिळते.

  • डोक्याला तेल लावल्याने, विशेषतः टाळूवर ब्राह्मी, जास्वंद वगैरे शीतल व शामक द्रव्यांनी संस्कारित केलेले ब्रह्मलीन तेल लावल्यास शांत झोप यायला मदत मिळते.

  • कानात श्रुती तेल टाकण्याचा तसेच नाकात पातळ केलेल्या साजूक तुपाचे थेंब टाकण्याचाही फायदा होतो.

  • अंघोळीच्या अगोदर अंगाला उटणे लावण्याने व अंग तेल लावून चोळून घेतल्यानेही रात्री झोप यायला मदत मिळते.

  • गहू, तांदूळ यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणामध्ये केल्याने, नियमित दूध घेतल्याने, उचित प्रमाणात साखर खाल्ल्याने, प्राकृत कफ संतुलित राहून शांत झोप यायला मदत मिळते.

  • द्राक्षे, बदाम, जर्दाळू यासारख्या फळांचे सेवन करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शांत झोप यायला मदत मिळते.

  • मनाला आवडेल, प्रिय वाटेल असे अंथरूण, पांघरूण वापरल्याने व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मन आनंदी, समाधानी ठेवण्याने शांत झोप यायला मदत मिळते.

मनाला शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. मनाला शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरप किंवा निद्रासॅन गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते.

loading image