#FamilyDoctor अकार ते ॐकार

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 14 September 2018

सर्व इंद्रिये व नाड्या यांच्यातून येणारी स्पंदने व त्यांचे अनुभव श्‍वासाच्या व प्राणाच्या माध्यमातून प्रकट होतात. प्राण आणतो शक्‍ती, श्‍वास आणतो गती आणि स्वरयंत्रातून बाहेर आल्यावर तोंडाच्या विशिष्ट भागांना स्पर्श करून हवा जेव्हा बाहेर येते तेव्हा वेगवेगळे उच्चार तयार होतात. अर्थात, त्या त्या अनुभवाचा, नाडीचा स्पर्श करणे आवश्‍यक असतेच. उच्चारांचे महत्त्व कळले व उच्चार कसे तयार झाले हे लक्षात घेतले की मंत्रसामर्थ्याच्या कथा, वाचाशक्‍ती, जिभेवरची सरस्वती, एखाद्याच्या शब्दाला असलेली शक्‍ती समजणे शक्‍य होईल.

‘उच्चार’ म्हणजे एखाद्या गोष्टीचा बोध घेण्यासाठी ध्वनीने त्या वस्तूविषयी माहिती सुचवणे. जन्माला आलेल्या लहान मुलाजवळ म्हणजेच नुकतेच या पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवाजवळ परमेश्‍वरी भेटीशिवाय दुसरा काहीच अनुभव नसतो. लहान बाळ एकच उच्चार करू शकतो, तो म्हणजे ‘अ’. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘अक्षराणां अकारोऽस्मि’. मी तो ‘अ’कार आहे. हा ‘अ’ कसा उच्चारायचा हे शिकवावे लागत नाही, ते साहजिकच असते. ‘अ’ हा स्वर आहे, तो सूर आहे. परमतत्त्वाचा आविष्कार असलेला हा मूळ स्वर. त्याचाच होतो ॐकार.

‘अ’ हा स्वर कंठ्य असला तरी उरात भरून येणारा असा हा उच्चार. तेव्हा ‘अ’ चा ‘आ’ झाला की एक थोडीशी अनुभूती यावी लागते. या बाह्य विश्‍वाचे जे काही अनुभव आले, जे काही आश्‍चर्य वाटले त्या आश्‍चर्याचा हा ‘आ’! आजूबाजूला एवढी मंडळी असताना ही एकच स्त्री आपली काळजी का घेते, रक्‍ताचे पाणी करून आपल्याला का पाजते याची अनुभूती आल्यावर ‘आई’ असा उच्चार सहजपणे उमटतो. बऱ्याच वेळी अ, आ, इ या नैसर्गिक उच्चारांना अनुशासन लावण्याचा प्रयत्न केला व संस्कार केले,  तर त्यामुळे अनुनासिक तयार होते. ‘म’ हा ध्वनी व त्यातून तयार होतो ‘मा’. याच ‘मा’ला थोडे नटवले थटवले की बनते ‘ममा वा ममी’. संस्कृतमध्ये शब्द आहे मातृ किंवा माता म्हणजे धारण करणारी व रक्षण करणारी. आई आपल्या अपत्याला जन्म देऊन, बोट धरून या विश्‍वामध्ये कसे जगायचे याचे मार्गदर्शन करून बोट धरून या विश्‍वामध्ये कसे जगायचे याचे मार्गदर्शन करून संरक्षण देणार आहे ती. यावरून माता शब्द झाला. सांगायचा मथितार्थ हे सर्व अंतरानुभूतीचे शब्द आहेत.

आपल्या ऋषीमुनींनी उच्चाराचे एक शास्त्र तयार केले. स्वरयंत्रावर श्‍वासाचा आघात झाला की जो ध्वनी उत्पन्न होईल, त्यातून सर्व उच्चार होणार असतील तर ध्वनीची शुद्धता सर्वांत महत्त्वाची असते. म्हणून ध्वनी कसे तयार व्हावेत याचे शास्त्र तयार झाले. आपणा सर्वांना कल्पना असते की अग्नीचे बीज आहे ‘रं’. हे शक्‍तीचे बीज असल्याने, लहान मुलांची शक्‍ती एकंदरीतच कमी असल्याने त्यांना ‘र’चा उच्चार करता येणे अवघड जाते. स्पंदने होण्यासाठी द्यावी लागणारी शक्‍ती यांच्याजवळ नसल्याने त्यांना ‘र’चा उच्चार करणे जड जाते. म्हणून लहान मुलांकडून ‘राम’ हा उच्चार ‘लाम’ असा प्रकट होतो. काही जणांना ‘स’ चा उच्चार करणे कठीण वाटते म्हणून ते ‘स्टेशन’चा उच्चार ‘इस्टेशन’ करत असावेत. मला तर असे वाटते की नेपाळचे ‘लामा’ मूळचे ‘रामा’ असावेत. 

शरीरात असलेली सर्व इंद्रिये व नाड्या यांच्यातून येणारी स्पंदने व त्यांचे अनुभव श्‍वासाच्या व प्राणाच्या माध्यमातून प्रकट होतात. प्राण आणतो शक्‍ती, श्‍वास आणतो गती आणि स्वरयंत्रातून बाहेर आल्यावर तोंडाच्या विशिष्ट भागांना स्पर्श करून हवा जेव्हा बाहेर येते तेव्हा वेगवेगळे उच्चार तयार होतात. अर्थात त्या त्या अनुभवाचा, नाडीचा स्पर्श करणे आवश्‍यक असतेच. 

ध्वनीचा अभ्यास करताना लक्षात आले की काही ध्वनी कंठ्य असतात. ते उच्चारताना कंठाचा स्पर्श होणे आवश्‍यक असते. तो करताना कुठल्याही प्रकारे जिभेची व तोंडाची हालचाल करवी लागत नाही. नुसते तोंड उघडे ठेवून अ, क, ख, ग, घ हे वर्ण म्हणता येतात. तोंडातल्या ज्या वेगळ्या भागांचा सहभाग घेऊन केलेल्या उच्चारांना तालव्य, कंठ्य, ओष्ठ्य दंत्य अशी नावे मिळत गेली. म्हणजे असे लक्षात आले की अमुक ध्वनी अमुक ठिकाणचा आहे. त्या ठिकाणची अनुभूती आत आणल्याशिवाय उच्चार होऊच शकत नाही. अशा तऱ्हेने शरीरातील सर्व नाड्यांचा म्हणजे मेरिडिअन्सची विभागणी झालेली आहे आणि यावरच ध्वनीचे शास्त्र निर्माण झालेले आहे.

आता वेगवेगळ्या वर्णांचे उच्चार करताना भेद कुठे असतो? उच्चार करताना श्‍वास व प्राण वापरायचा असतो. ती शक्‍ती कमी-जास्त करण्याने, श्‍वासाची गती वाढविल्याने किंवा श्‍वास वाढविल्याने फरक होतो. उदा. ‘क’ म्हणताना कमी शक्‍ती वापरली जाते, त्यासाठी श्‍वासही जास्ती लागत नाही. कंठाच्या ठिकाणी स्पर्श करून हवा आली की ‘क’ उच्चारला जातो. दुसरा कोणताही बदल न करता, तशाच पद्धतीने बाहेर पडणाऱ्या हवेला आवळून जर दाब दिला तर ‘ख’ तयार होतो. त्याचप्रमाणे शक्‍ती वाढवून ‘ग’ आणि ‘घ’ तयार होतो. याप्रमाणे चार प्रकार तयार झाले. एकात श्‍वास कमी, दुसऱ्यात श्‍वास जास्ती, तिसऱ्यात श्‍वास कमी व शक्‍ती कमी आणि चवथ्यात श्‍वास जास्ती व शक्‍ती जास्ती. 

श्‍वास जर मेंदूकडे वळवला म्हणजे श्‍वासाची गती जर ऊर्ध्व केली तर सगळे अनुनासिक वर्ण तयार होतात. कंठ्य असलेला अनुनासिक वर्ण ‘ङ्‌’, ओष्ठ्य असलेला ‘म’, तालव्य असलेला ‘न’ असे सर्व उच्चार तयार झाले. 

आदि शंकराचार्यांसारखे महाद्रष्ट्यांनी या उच्चारांमधली संगीतातली जाण ठेवून असे सुंदर श्‍लोक लिहिले आहेत की, ज्याला वेगवेगळ्या ठिकाणी तोडल्याने शब्द तेच, परंतु अर्थ वेगळे ध्वनित होतात. ज्याला उच्चार कळलेत व ज्याचे उच्चार आचारावरून आलेत तो द्रष्टाच असे काम करू शकतो.

जीभ हा उच्चाराचा महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळा जीभ जड असणे, जिभेला टोक नसणे, जीभ तोंडात दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जखडलेली असणे, यामुळे माणसे तोतरी बोलतात, अडखळतात. ‘सतरंजी’च्या ऐवजी ‘फतरंजी’ म्हणणारी माणसेही आढळतात. असे दोष जर वाणीमध्ये उत्पन्न झाले तर उच्चारामध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून जीभ शुद्ध राहाणे खूप महत्त्वाचे असते. कंठ, जो शक्‍ती मिसळणार आहे, फुप्फुसे जी हवा देणार आहेत, जीभ जी शरीराच्या नाड्यांचे अनुभव उच्चारात मिसळणार आहे, अशा तिघांचे आरोग्य उच्चारासाठी आवश्‍यक असते.

मध्ये मध्ये दहा वेळा श्‍वास घ्यावा लागला, एक वाक्‍य बोलता बोलता जर फुप्फुसांची फासफूस झाली तर नीट बोलता येत नाही. तसेच अति गोड खाण्याने, अति कफवृद्धी होणारे जेवण घेण्याने, अति तामसिक आहार घेण्याने जीभ जड होऊ शकते. अगदी मंत्रोच्चार नाही, पण स्पष्ट उच्चार हवे असणाऱ्यांनी मद्यपान, मांसाहार करू नये, सुपारीसारखे पदार्थ खाऊ नयेत. 

वरील सर्व विवेचनावरून उच्चाराचे महत्त्व कळू शकेल. एकदा का उच्चारांचे महत्त्व कळले व उच्चार कसे तयार झाले हे लक्षात घेतले की मंत्रसामर्थ्याच्या कथा, वाचाशक्‍ती, जिभेवरची सरस्वती, एखाद्याच्या शब्दाला असलेली शक्‍ती समजणे शक्‍य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr balaji tameb article