सर्वोत्तम पथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 9 March 2018

पथ्य काय आणि कुपथ्य काय, याचा विचार नीट केला पाहिजे. स्वभावतः हितकर-अहितकर पदार्थ कोणते हे समजावून घेतले पाहिजेत. कोणत्या कार्यासाठी कोणते द्रव्य सर्वोत्तम हे जाणून घेऊन पथ्यापथ्य सांभाळायला हवे.

पथ्य म्हणजे काय, अपथ्य किंवा कुपथ्य म्हणजे काय, स्वभावतः हितकर पदार्थ कोणते असतात, तसेच अहितकर पदार्थ कोणते असतात वगैरे आरोग्यरक्षण करणाऱ्या गोष्टी समजावल्यानंतर चरकसंहितेमध्ये ‘अग्रसंग्रह’ नावाचा एक विभाग आलेला आहे. अग्र म्हणजे सर्वप्रथम. एकच काम करणाऱ्या अनेक गोष्टी असतात; पण अनेकांमध्ये एक गोष्ट अशी असते की, ती ते काम सर्वोत्तम प्रकारे करू शकते. म्हणजेच ती गोष्ट इतर सर्वांच्या अग्रणी असते. 

समानकारिणो येऽर्थास्तेषां श्रेष्ठस्य लक्षणम्‌ ।
ज्यायस्त्वं कार्यकर्तृत्वे वरत्वं चाप्यदाहृतम्‌ ।।
....चरक सूत्रस्थान

एकसमान कार्य करणारे जे काही भावपदार्थ असतात, त्यातील जो श्रेष्ठ असतो, तो ते काम करण्यासाठी उत्तम असतो. तसेच अपथ्याच्या दृष्टिकोनातून काही भावपदार्थ सर्वाधिक अयोग्य असतात. हे श्रेष्ठत्व किंवा अश्रेष्ठत्व अग्रसंग्रहात समजावलेले आहे. उपचार करताना, पथ्यापथ्य समजावताना या गोष्टी लक्षात घेतल्या तर गुण चांगला येतो, अपेक्षित परिणाम हवे असले तर कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवे हेसुद्धा समजू शकते.  अग्रसंग्रहात असा अनेक गोष्टींची यादी दिलेली आहे, त्यातील पहिले येते ते अन्न. 

 ‘अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठम्‌’ म्हणजे शरीराचे धारण करणाऱ्या पदार्थांत अन्न सर्वश्रेष्ठ असते. जिवंत राहण्यासाठी, शरीराचे भरणपोषण होण्यासाठी अन्न लागतेच.

जन्माला आल्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत प्रत्येक मनुष्यप्राणी, एवढेच नव्हे, तर पक्षी, वनस्पती, अगदी एवढीशी किडा-मुंगीही अन्नाचाच शोध घेत असतात, अन्नासाठीच धडपड करत असतात. कारण प्राण हे आहाराधीन आहेत. अन्न फक्‍त पोट भरण्यासाठी नसते, तर त्यामुळे अनेक गोष्टींचा लाभ होत असतो. 

आहारः प्रीणनः सद्योबलवृद्धिकृद्‌ देहधारणः ।
स्मृत्यायुः शक्‍तिवर्णौजः सत्त्वशोभाविवर्धनम्‌ ।।
...निघण्टुरत्नाकर

आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो, शरीरधारणासाठी आवश्‍यक असतो, ताबडतोब बलवृद्धी करतो, तसेच स्मरणशक्‍ती, शरीरशक्‍ती, तेजस्विता, ओज, आयुष्य या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात. शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हेसुद्धा आहारातूनच वाढत असते. 

 ‘उदकम्‌ आश्वासकारणम्‌’ म्हणजे आश्वस्त करणाऱ्या, तृप्ती करणाऱ्या पदार्थांत पाणी सर्वश्रेष्ठ असते. तहान लागली की जे समाधान पाणी पिण्याने मिळते ते दुसऱ्या कोणत्याही पेयाने मिळत नाही, हा सर्वांचा अनुभव असतो. 

पाण्याला जीवन असेही म्हणतात. आयुर्वेदात पाण्याचे गुण सांगितले आहेत, जीवनं तर्पणं धारणं आश्वासजननं श्रम-क्‍लम-पिपासा-मद-मूर्च्छा-तन्द्रा-निद्रा-दाह-प्रशमनमेकान्ततः पथ्यतमं च ।
...सुश्रुत सूत्रस्थान

पाणी जीवनशक्‍ती प्रदान करते, तृप्ती करवते, शरीरधारणास मदत करते, आधार देते, श्रम, थकवा, तहान, गुंगी, झोप वगैरे गोष्टी दूर करते, जळजळ कमी करते व अतिशय पथ्यकर असते. फक्‍त ते शुद्ध, योग्य ते संस्कार करून आणि योग्य प्रमाणात प्यायले पाहिजे. 

 ‘क्षीरं जीवनीयानम्‌’ म्हणजे जीवन देणाऱ्या, शक्‍ती देणाऱ्या पदार्थांत दूध सर्वश्रेष्ठ असते. दुधाला पूर्णान्न म्हणतात, कारण त्यात सातही धातूंचे पोषण करण्याची क्षमता असते. विशेषतः गाईचे दूध सर्वोत्तम असते, फक्‍त ते भारतीय वंशाच्या गाईचे, कोणत्याही अनैसर्गिक प्रक्रिया न केलेले असायला हवे. दुधाचे सामान्य गुण याप्रमाणे होत,
दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम्‌ ।
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम्‌ ।।
...भावप्रकाश

दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते. दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते.
 ‘मांसं बृंहणीयानाम्‌’ म्हणजे शरीरपुष्टी होण्यासाठी मांस सर्वश्रेष्ठ असते. पुष्टीला कारणीभूत असणारे मुख्य दोन धातू म्हणजे मांसधातू व मेदधातू. समानाने समानाची वृद्धी होते या न्यायाने मांसाने मांसाचे व त्यातून पुढे तयार होणाऱ्या मेदाचे पोषण होणे स्वाभाविक होय. याही ठिकाणी मांसावर अनैसर्गिक प्रक्रिया केलेल्या नाहीत ना याची खात्री केलेली असावी. 

 ‘रसस्तर्पणीयाम्‌’ म्हणजे शरीर तसेच मनाचीही तृप्ती होण्यासाठी रस सर्वश्रेष्ठ असतो. रस या शब्दाने बऱ्याचदा मांसरस म्हणजे विशिष्ट पद्धतीने केलेले मांसाहारी सूप असा घेतला जातो, मात्र फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, सरबत वगैरे गोष्टींमुळेही शरीर, मन तृप्त होतात हा नेहमीचा अनुभव असतो.

 ‘लवणम्‌ अन्नद्रव्यरुचिकारणम्‌’ म्हणजे अन्नपदार्थांना चव देण्यासाठी मीठ सर्वोत्तम असते. एक वेळ स्वयंपाकात तिखट नसले तरी चालते, पण रुची येण्यासाठी मीठ लागतेच. मीठ कमीत कमी खावे किंवा रक्‍तदाब वगैरे विकारात मीठ अजिबात खाऊ नये असा प्रचार सध्या केला जातो. परंतु आयुर्वेदाने आहार षड्रसपूर्ण असावा, असे सांगितले आणि त्यात लवण रसाचा म्हणजेच खारट चवीचा समावेश केला आहे, त्यावरूनच मीठ आरोग्यासाठी आवश्‍यक आहे ही गोष्ट स्पष्ट होते. आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा शरीरातील इलेक्‍ट्रोलाइट्‌चे संतुलन नीट राहण्यासाठी, मांसपेशी आखडू नयेत यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी योग्य प्रमाणात मीठ पोटात जाणे आवश्‍यक असते असे सांगते. जुलाब झाले तर मीठ-साखर-पाणी घ्यायला सांगितले जाते ते याचसाठी.

याप्रमाणे कोणत्या कार्यासाठी कोणते द्रव्य सर्वोत्तम याची मोठी यादी अग्रसंग्रहात दिलेली आहे. त्याची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Balaji Tameb Article On Diet