परीक्षा

परीक्षा

परीक्षा या शब्दाशी आपल्या सगळ्यांचे एक अनोखे नाते असते. शाळा-कॉलेज संपून अनेक वर्षे झाली असली, तरी परीक्षा शब्दाभोवतीचे वलय वेगळे ते वेगळेच राहते. पुढे मुला-बाळांच्या परीक्षा, शेजाऱ्यांच्या, ओळखीच्या मुलांच्या परीक्षा या निमित्ताने परीक्षेशी आपला संबंध कायम जोडलेला राहतो. परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या विद्यार्थ्याने आणि घरातील इतर सदस्यांनी थोडी काळजी घेतली तर हे कठीण दिवसही बघता बघता पार पडू शकतात.  

साधा आहार
आहार साधा, पचायला हलका तरीही पोषक असण्यावर भर देणे, बाहेरचे पदार्थ किंवा घरातही वारंवार फॅन्सी पदार्थ खाणे टाळणे, प्यायचे पाणी शक्‍यतो उकळून पिण्यावरच भर ठेवणे चांगले होय. संतुलित आहार मनाची एकाग्रता साधण्याच्या दृष्टीने, बुद्धी, तसेच स्मरणशक्‍तीला ताकद देण्याच्या, तसेच  प्रतिकारशक्‍ती टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने उत्तम असतो. उदाहरणार्थ दूध, पंचामृत, भिजवलेले बदाम यांची योजना करणे, वरण-भात-तूप, मुगाची खिचडी व तूप, लोणी-साखर, तूप-साखर, फार झणझणीत व तेलकट नाहीत, पण तरीही चविष्ट भाज्या, फुलका, भाकरी, मुगाची वा तुरीची आमटी असा साधा आहार, जेवणाच्या शेवटी ताजे, गोड ताक, अधूनमधून नारळाची बर्फी, पेठा, रव्याचा शिरा वगैरे गोड पदार्थ असा आहार काही दिवस घरातील सर्वच जण घेऊ शकतात. 

परीक्षेच्या आधी व परीक्षा चालू असताना अभ्यासात व्यस्त राहण्याने व्यायाम, योगासने, चालायला जाणे वगैरेकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक असते, परंतु याचा परिणाम पचनावर होऊ शकतो. त्यामुळे भूक व्यवस्थित लागते आहे, रोजच्या रोज पोट साफ होते आहे याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. कारण अपचनामुळे कित्येकदा शरीर व मन आळसावते, अभ्यास करावासा वाटत नाही. म्हणून या दिवसात जेवणाच्या आधी आल्याचा छोटा तुकडा सैंधवासह खाणे, रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेणे, अधूनमधून अविपत्तिकर, सॅनकूल सारखे चूर्ण घेणे चांगले होय.  

परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या दिवसात बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे जेवणासाठी वेळ काढत नाहीत किंवा फार उशीर करतात. पण वेळच्या वेळी केलेले जेवण अभ्यासाला पूरकच असते. 

रात्री झोपा, पुरेसे झोपा
रात्रंदिवस अभ्यास करायचे ठरविले तरी स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे काही तास  झोपणे, त्यातही योग्य वेळी झोपणे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते. पहाटेपर्यंत जागरण केले आणि नंतर दुपारपर्यंत झोपले तर त्यामुळे झोपेचे सर्व फायदे मिळत नाहीत, शिवाय शरीरात उष्णता वाढणे, डोके जड होणे वगैरे नुकसानही सोसावे लागते. 

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सकाळी लवकर उठून अभ्यास करणे ही लक्षात राहण्याच्या दृष्टीने सर्वांत चांगली गोष्ट आहे. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी सव्वा-दीड तास उठल्यास मेंदूची ग्रहणशक्‍ती, लक्षात ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते हे प्रत्यक्ष प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे. तेव्हा रात्री डुलक्‍या घेत कसाबसा अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर उठून ताज्यातवान्या मानसिक स्थितीत अभ्यास करणे केव्हाही चांगले. मात्र हा बदल अगदी ऐन परीक्षेच्या वेळी करून चालणार नाही. शरीराची व मेंदूची सवय एकाएकी मोडणे प्रत्येकाला सोसवेलच असे नाही, तेव्हा अगोदरपासून अशी सवय असलेली चांगली. परीक्षेच्या ताणामुळे अधिकाधिक वाचण्याची इच्छा स्वाभाविक असली तरी वाचलेले लक्षात राहण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती देणे आवश्‍यक असते. तेव्हा मेंदू थकून जाईल, जागरणे कर-करून शरीर-मन थकून जाईल, असा अतिरेकी अभ्यास न करणे चांगले. अर्थात सुरुवातीपासूनच मनापासून अभ्यास केलेला असला तर शेवटच्या घडीला अभ्यासाचा असा अतिरेक करण्याची पाळीच येणार नाही.

चांगला अभ्यास झालेला असला, सगळे माहिती असले तरी ऐन परीक्षेच्या वेळेला मनावर अवाजवी ताण आल्याने निम्मेच लिहिता आले, प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही शिक्षकांच्या समोर काहीच उत्तर देता आले नाही, असे होताना दिसते. याचे कारण असते अकारण घेतलेला मानसिक ताण. जसे खूप वेळ चालल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर विश्रांती घ्यावी लागते तसेच सतत खूप वेळ अभ्यास केल्यानंतर मनाला ताजेतवाने करण्यासाठी मध्ये थोडे थांबणे आवश्‍यक असते. यासाठी कुणी फिरायला जाणे पसंत करते, कुणाला गप्पा माराव्याशा वाटतात. आपापल्या स्वभावानुसार मन कशात रिलॅक्‍स होईल हे ज्याने त्यानेच शोधून काढणे चांगले. ऐन परीक्षेच्या वेळेला ताण येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांला आधीपासूनच थोडे प्रयत्न करता येतात. उदा. सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे डोळे बंद करून शांतपणे बसणे, ॐकार म्हणणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाच-दहा मिनिटे मन शांत करणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे वगैरे. 

मन रमवा, ताण पळवा
अभ्यासाच्या ताणामुळे शरीरात उष्णता वाढली की डोळ्यांची आग होणे, तोंड येणे, डोके दुखणे वगैरे त्रास उद्भवतात. यावर अध्ये मध्ये डोळ्यावर थंड पाणी मारणे, सकाळी उठल्यावर तोंडावर थंड पाण्याचे हबके मारणे, डोळ्यांवर दुधाच्या वा गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवरचा ताण नाहीसा करणारे ‘सॅन अंजन’सारखे अंजन घालणे, अति चमचमीत, अतितिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळणे, औषधी तुपाचे दोन-तीन थेंब रात्री झोपण्यापूर्वी नाकात व कानात घालणे, दिवसभर नाही तर निदान रात्री झोपण्यापूर्वी ‘ब्रह्मलीन तेला’सारखे तेल टाळूवर चोळणे वगैरे सोपे सोपे इलाजही असतात. 

परीक्षेच्या आधीपासूनच मेंदूची ताकद वाढावी, केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहावा, एकाग्रता वाढावी यासाठी काही आयुर्वेदिक औषधे व काही साध्या आयुर्वेदिक पाककृती उपयोगी पडू शकतात. उदा. ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड वगैरे बुद्धी-स्मृतिवर्धक वनस्पतींपासून बनविलेले ‘ब्रह्मलीन सिरप’ किंवा ‘ब्रह्मलीन घृत’ परीक्षेच्या अगोदरपासून घेण्याचा चांगला उपयोग होतो. बरोबरीने रोज सकाळी पंचामृत, बदाम-केशर दूध, ‘संतुलन शतदाम’ घेण्याचाही चांगला उपयोग होतो.

घरातील सर्वच सदस्यांनी परीक्षांच्या दिवसात घरात अकारण वाद, ताण-तणाव तयार होणार नाहीत याचे भान ठेवणे, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढेल, त्याच्या मनातील भीती कमी होईल, असे मोकळे वातावरण घरात असणे चांगले. 

वर्षाच्या शेवटी परीक्षा येणार हे सर्वांनाच माहिती असते. तेव्हा त्यादृष्टीने आधीपासून कितीही प्रयत्न केले तरी ऐन परीक्षेच्या वेळी ताण येणे हे सुद्धा स्वाभाविक असते. मात्र या ताणामुळे आजारपण येईल किंवा मानसिकता बिघडून जाईल, असे होता कामा नये. यासाठी येथे सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की मत करतील. सर्वांना परीक्षेसाठी ‘ऑल द बेस्ट!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com