पाचवीला पूजलेली परीक्षा

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 23 February 2018

परीक्षा या केवळ शाळा, कॉलेजमध्येच असतात असे नव्हे, तर आयुष्यभर अनेकविध परीक्षांना तोंड द्यावे लागते. जेवढ्या अधिक परीक्षा, तेवढा तो तावून सुलाखून बाहेर येतो. 

‘‘संपल्या परीक्षा, आता पुन्हा कॉलेजचे तोंड पाहायला नको, विद्यापीठात पुन्हा जायला नको’’, अशी वक्‍तव्ये करणारे विद्यार्थी एका तऱ्हेने आयुष्यात खूप मोठी चूक करत असतात. ‘आता यापुढे काही शिकण्याची गरज नाही’ असा त्यांचा भाव तयार झालेला असतो. एका दृष्टीने त्यांचे कौतुकही करायला पाहिजे की ‘मी परीक्षा दिली, मी उत्तीर्ण होणारच’ असा त्यांचा ठाम आत्मविश्वास असतो. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा कॉलेजमध्ये जायला नको असे ठरवून टाकलेले दिसते. 

परीक्षा या केवळ शाळा, कॉलेजमध्येच असतात असे नव्हे. समोर एखादा डोंगर दिसला तर तो कसा चढून जायचा हे ठरवून तो डोंगर चढून जाणे, समोर नदी दिसली तर तिचे पात्र किती खोल असेल, पोहून तिच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायला किती वेळ लागेल, नदीत मगरी वगैरे नाहीत ना याचा अंदाज घेऊन नदी पोहून जाणे, याही परीक्षाच. तसे म्हटले तर आयुष्यभर अनेकविध परीक्षांना तोंड द्यावे लागते. जेवढ्या अधिक परीक्षा, मग त्यात मनुष्य उत्तीर्ण होवो वा न होवो, त्यातूनच तो तावून सुलाखून बाहेर येतो. पुढे अशाच व्यक्‍ती वयस्कर झाल्यावर इतरांना सल्ला देताना छातीठोकपणे म्हणू शकतात, की माझे केस काही उन्हात बसल्याने पांढरे झालेले नाहीत. अशी ही परमपवित्र परीक्षा.

तेव्हा परीक्षेची भीती न बाळगता परीक्षा एक रोज येणारा प्रसंग आहे असे मानावे. आपण करतो आहोत ते बरोबर करतो आहोत की नाही, आपला मेंदू आपल्याला किती साथ देतो आहे, आपले शरीर आपल्याला किती साथ देते आहे यावर लक्ष ठेवण्याचे परीक्षा हे साधन (मीटर) आहे असे म्हणायला हरकत नाही. 

परीक्षेचे अग्निदिव्य
ज्या परीक्षा केवळ पदवी मिळविण्यासाठी दिल्या जातात त्या नोकरी मिळविण्यासाठी, पर्यायाने उपजीविकेसाठी उपयोगाच्या असतात. परंतु सर्टिफिकेट मिळालेल्याला नोकरी मिळेलच असे नसते आणि नोकरी मिळाल्यावर मनुष्य आपले काम नीट व व्यवस्थित करू शकेलच, आपल्या कामात यशस्वी होईलच असेही नसते. कारण तो केवळ परीक्षार्थी झालेला असतो. एखाद्या विषयाच्या अभ्यास करणे, अभ्यासात स्वतःला झोकून देणे असे काही झालेले नसते, विषयातील गर्भितार्थ समजून घेतलेला नसतो. विषयातील गर्भितार्थ समजून घेऊन तो मेंदूत अशा ठिकाणी साठवून ठेवता यायला हवा की आवश्‍यकता असेल तेव्हा त्याचा उपयोग करून घेता येईल. हे ज्याला जमते त्याला परीक्षेची भीती वाटत नाही, त्याला परीक्षा देण्याचे तंत्र जमलेले असते, त्याला परीक्षा देताना आनंद होतो, तो परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होतो आणि पुढे जीवनाच्या परीक्षेतही उत्तीर्णच होत जातो. परीक्षेला अग्निदिव्य म्हणून परीक्षेपासून दूर राहणे हे काही खरे नव्हे. 

परीक्षेला ‘अग्निदिव्य’ का म्हटले असावे? केवळ सीतामाईंना अग्निदिव्य करावे लागले म्हणून त्याला अग्निदिव्य असे नाव पडले  असे नव्हे. तर परीक्षा या शब्दामध्ये सम्यक्‌ ज्ञान अशी संकल्पना असल्यामुळे त्यासाठी लागणारा प्रकाश व अग्नी यातून गेल्याशिवाय आपल्याला परीक्षा उत्तीर्ण होताच येणार नाही. परीक्षेच्या वेळी मानसिक ताण वाढणे अत्यंत साहजिकच असते. अनेक तास एखाद्या यंत्रावर वा संगणकावर काम केल्यास यंत्र गरम होते आणि यंत्र गरम झाल्यामुळे काही वेळ थांबून पुन्हा चालू करावे लागते, तसेच आपल्या मेंदूचे व शरीराचेही आहे. सराव किंवा रियाझ करत राहिले नाही, तर तीन तासापर्यंत मेंदूला शिणवून आपल्याला काही लिहिता येत नाही. परीक्षाच चालू आहे असे समजून जुन्या प्रश्नपत्रिका सलगपणे तीन तास बसून लिहिण्याचा सराव केला पाहिजे. या अग्नीची, या गरमीची ज्यांना सवय झालेली असेल त्यांना प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी त्रास होत नाही.

 ऋचा-परवचा
नुसते मनगटाचे व्यायाम करून लिहिता येत नाही, बोटे लवचिक असल्याने पेन्सिल धरता येते म्हणून तीन तास लिहिता येईलच असे नाही, कारण लिहिण्यासाठी लागणारी शक्‍ती मेंदूतून येणार असते. मेंदू दोन प्रकारे काम करतो, पहिले म्हणजे मेंदूत योग्य ती माहिती साठविलेली असावी लागते व दुसरे म्हणजे ज्ञानतंतूंना योग्य ती संवेदना द्यावी लागते. या दोन्ही क्रिया यथायोग्य झाल्यास परीक्षेत व्यवस्थित लिहिले जाते. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून नेहमी रियाझ करावाच लागतो. अशा प्रकारे मेंदूला दिलेल्या सवयीमुळे आपल्या स्मृतीत असलेले ज्ञान वाहते करत असताना, ते लिहून काढत असताना त्याची गती वाढते. रोज पाढे म्हणण्याचा सराव ठेवण्याने, बे एके बे, बे दुणे चार किंवा एक औटं औटं, बे औटं सात, तीन औटं साडेदहा असे परवचे किंवा एखादे स्तोत्र रोज म्हणण्याने, अगदी मोठेपणीसुद्धा, मेंदूतल्या अंतर्व्यवस्थेचे पुनर्व्यवस्थापन (रिस्ट्रक्‍चरिंग) बरोबर होते, जेणेकरून स्मृतीचा ओघ सतत उपलब्ध होऊ शकतो, स्मृतीला बुद्धीची जोड मिळते. 

आकडेमोडीचे गणित किंवा भूमितीसारखा विषय असला तरी त्याला प्रवाहित करण्यासाठी शब्दांची आवश्‍यकता असते. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मेंदूच्या वेगवेगळ्या भागात साठवलेले असते. त्रिज्या म्हटल्यावर वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून परिघापर्यंत जाणारी रेघ ही कल्पना डोळ्यांसमोर उभी राहिली तरी लिहिताना त्रिज्या हा शब्द आठवावाच लागेल. अशा कल्पनेला शब्दांकित करण्यासाठी मेंदूचे संतुलन नीट राहावे लागेल. स्तोत्रपाठांमुळे किंवा परवचे घोकल्यामुळे मेंदूचे सुसूत्रीकरण नीट होत जाते, म्हणून असा रियाझ करणे आवश्‍यक आहे. परीक्षेच्या वेळेला तीन तास नुसते लिहिता येणे एवढेच आवश्‍यक असते असे नव्हे, तर त्या वेळी स्मृती व बुद्धी एकत्र होऊन त्यांचे शब्दांकन होऊन जलद गतीने बाहेर आले पाहिजे. 

लिहिण्याचा रियाझ
अशा तऱ्हेने परीक्षेच्या अग्नीला तोंड द्यायची आधीपासूनच सवय करावी लागते. अभ्यास ही एक तपस्या आहे व ज्यांनी तपस्या केली नाही त्यांना सिद्धी कोठून मिळणार? दरवर्षी येणारी परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे देता यावी त्यात उत्तीर्ण होता यावे या हेतूने आपण काय खावे, काय खाऊ नये, काय प्यावे, काय करावे, काय करू नये, कसे वागावे अशा मुद्द्यांवर परीक्षेच्या आधी मार्गदर्शन केलेले आहेच. पण परीक्षा दरवर्षी येणार असते. ज्यांनी ‘फॅमिली डॉक्‍टर’ व्यवस्थित वाचलेले आहे त्यांना आधीच्या वर्षी सांगितलेलेही लक्षात असतेच. नियमित अभ्यास करण्याची सवय असणाऱ्यांना परीक्षेची भीती वाटत नाही. जे विद्यार्थी वरवरचे वाचतात, त्यांना दरवर्षी परीक्षेच्या शुभेच्छा द्याव्या लागतात, पण नुसत्या शुभेच्छांचा उपयोग होत नाही. इच्छांना आचाराची, शुभेच्छांना सुविचाराची साथ द्यावी लागते, मग आपण केलेला संकल्प तडीला नेऊ असतो. 

तेव्हा या नेहमीच येणाऱ्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी अजूनही जे काही दिवस उरलेले आहेत त्या महिन्या-दोन महिन्यांत रोज रियाझ सुरू केला पाहिजे. नुसते वाचून उपयोग नाही, तर हाताने लिहून काढणे आवश्‍यक असते. ज्या वेळी मेंदू आत असलेल्या संकल्पना कागदावर लिहिण्यासाठी हुकूम सोडतो, त्या वेळी त्यातून होणारी फलनिष्पत्ती वेगळी असते. जप करणारे लोकही नुसता तोंडाने जप करत नाहीत, तर कागदावर लिहून काढतात. नंतर असा जप लिहिलेले कागद मारुतीच्या अंगावर चिकटवतात, हा मात्र एक विनोदच आहे. पण लिहून काढण्याने शरीराच्या सर्व पेशींना, चेतातंतूंना एक वेगळी संवेदना मिळते व त्याचा एक वेगळा फायदा होतो हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr balaji tameb article life multiple exams