कावीळ...!

चुकीचे खाणे-पिणे, चुकीचे वागणे यामुळे जेव्हा अवयवांच्या कामामध्ये बिघाड उत्पन्न होतो तेव्हा पचनक्रियेशी संबंधित अनेक रोग उद्भवतात. यातीलच एक काहीसे गंभीर स्वरूप असणारा रोग म्हणजे कावीळ.
Kavil
KavilSakal
Summary

चुकीचे खाणे-पिणे, चुकीचे वागणे यामुळे जेव्हा अवयवांच्या कामामध्ये बिघाड उत्पन्न होतो तेव्हा पचनक्रियेशी संबंधित अनेक रोग उद्भवतात. यातीलच एक काहीसे गंभीर स्वरूप असणारा रोग म्हणजे कावीळ.

- डॉ. भाग्यश्री झोपे

पचनसंस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत. यकृताला लागून असणारा अजून एक छोटा परंतु पचनक्रियेत महत्त्वाचे योगदान देणारा अजून एक अवयव म्हणजे पित्ताशय. चुकीचे खाणे-पिणे, चुकीचे वागणे यामुळे जेव्हा या अवयवांच्या कामामध्ये बिघाड उत्पन्न होतो तेव्हा पचनक्रियेशी संबंधित अनेक रोग उद्भवतात. यातीलच एक काहीसे गंभीर स्वरूप असणारा रोग म्हणजे कावीळ. संस्कृतमध्ये याला ‘कामला’ म्हटले जाते. ‘कामान् लाति इति कामला’ म्हणजे ज्या रोगात सर्व इच्छांचाच लय होते अर्थात काहीही करावेसे वाटत नाही तो रोग म्हणजे कावीळ. प्रत्यक्षात काविळीने ग्रस्त व्यक्ती अतिशय अशक्त झालेली असते आणि तिला औषधोपचारांइतकीच पूर्ण विश्रांतीचीही गरज असते. आयुर्वेदात काविळीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिली शरीरात पित्त वाढल्यामुळे होणारी कावीळ व दुसरी पित्ताशयातून स्रवणारे पित्त पचनमार्गात न येता शरीरात पसरल्यामुळे होणारी कावीळ. या दोन प्रकारातील मुख्य फरक म्हणजे पित्त वाढल्यामुळे होणाऱ्या काविळीत त्वचा, चेहरा, डोळे तर पिवळे होतातच, पण मल-मूत्र प्रवृत्तीसुद्धा पिवळसर होते.

मात्र दुसऱ्या प्रकारात मलप्रवृत्ती तिळाच्या पेंडेप्रमाणे म्हणजे काळपट रंगाची होते. याचे कारण आतड्यात मळ तयार होते तेथपर्यंत पित्त पोचू न शकल्यामुळे मळात पित्ताचा प्राकृत पिवळेपणा नसतो. दूषित अन्न, अस्वच्छ पाणी, उघड्यावरचे खाद्यपदार्थ सेवन करणे; दारू-तंबाखू वगैरे व्यसनांच्या आहारी जाणे; फार तिखट-तेलकट-आंबट खाण्याने शरीरात पित्त फार प्रमाणात वाढणे; अति जागरण; फार कमी खाणे किंवा चुकीचे खाद्यपदार्थ खाऊन भूक मारणे; रासायनिक औषधे, अनैसर्गिक खते, अशुद्ध विषद्रव्ये शरीरात जाणे; चीज, पनीर, अंडी, मांसाहार वगैरे पचण्यास अतिशय जड पदार्थांचा अतिरेकामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होणे वगैरे अनेक कारणे कावीळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काविळीवर उपचार करताना सर्वप्रथम कारण शोधणे व बंद करणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यानंतर वाढलेले पित्त कमी करणे किंवा पित्ताच्या वहनातील अडथळा दूर करणे हे महत्त्वाचे असते. काविळीमुळे यकृताची कमी झालेली ताकद वाढवणे, अग्नीला प्रदीप्त करणे आणि पुन्हा कावीळ होणार नाही यासाठी काळजी घेणेसुद्धा आवश्यक असते. यामध्ये औषधोपचारांच्या बरोबरीने योग्य आहारयोजना आणि विश्रांती घेणे अपरिहार्य असते. काविळीवर औषधोपचारतज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेमके निदान करून सुरू करणे श्रेयस्कर असते. पण बरोबरीने घरच्या घरी खालील उपचार करता येतात.

  • ताज्या एरंडाच्या पानांचा पाव कप रस सकाळी अनशापोटी प्यावा व वर कपभर दूध प्यावे. दिवसभर फक्त दूध व लाह्या घ्याव्यात. हा उपाय तीन दिवस करावा.

  • कुटकी म्हणून मुळ्या असतात, नावाप्रमाणे चवीला कडू असतात. पाच ग्रॅम कुटकीच्या मुळ्यांचा दोन कप पाणी टाकून अर्धा कप काढा करून गाळून घ्यावा. थोडा कोमट झाला की चमचाभर मध टाकून घ्यावा. हा उपायसुद्धा ३ ते ५ दिवस करणे चांगले.

  • गुळवेल ही वनस्पती सध्या सर्वपरिचित आहे. ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम (साधारण पाव कप) काढून त्यात चमचाभर खडीसाखर घालून घ्यावा. सात दिवसांसाठी रोज सकाळी असा रस घेणे काविळीवर उपयुक्त असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने यातील एक किंवा दोन उपाय करणे श्रेयस्कर. बरोबरीने पथ्यकारक नियम पाळले तर अधिक चांगला गुण येतो.

  • सर्व कामांचा लय होणारी ती कामला म्हणून काविळीत पूर्ण विश्रांती घ्यावी, शरीर मनावर ताण येऊ देऊ नये.

  • प्यायचे पाणी उकळलेले असावे. उकळी आल्यावर १५-२० मिनिटक व्यवस्थित उकळलेले पाणीच दिवसभर प्यावे.

  • काविळीत सुरुवातीला जेव्हा अजिबात भूक नसते, रुची नसते त्यावेळी फक्त साळीच्या लाह्या व दूध किंवा भाजलेल्या तांदळाचा शिजवलेला मऊ भात व दूध इतकाच आहार असावा.

  • जसजशी भूक लागेल तसतसा आहारात भाजलेल्या तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, मुगाचे कढण, मूग-तांदळाची पातळ खिचडी, अगदी थोड्या तूप-जिऱ्याच्या फोडणीवर केलेल्या दुधी, कोहळा, काकडी, परवर, टिंडा, तोंडली यासारख्या भाज्या यांचा समावेश असावा.

  • ताजे गोमूत्र मिळणे शक्य असल्यास सात वेळा सुती कपड्यातून गाळून, त्यात समभाग पाणी टाकून ४-४ चमचे सकाळ-संध्याकाळ घेणेही उत्तम असते.

  • पोटात गुडगुड होत असल्यास पोटावर रुईची पाने कोमट करून बांधून ठेवण्याचा उपयोग होतो.

  • शोक, क्रोध, भीती वगैरे मानसिक विकारांपासून शक्य तेवढे दूर राहणे इष्ट होय.

  • पित्त वाढून झालेल्या काविळीत अंगाचा, डोळ्यांचा दाह होतो, अशा वेळेला तळहात, तळपायांवर शतधौत घृतासारखे तूप चोळणे, डोळ्यांवर गुलाबपाणी, दूध वगैरेंच्या घड्या ठेवणे उत्तम असते.

  • लघवीची आग होत असल्यास साळीच्या लाह्यांचे पाणी पिण्याचा उपयोग होताना दिसतो.

कावीळ पूर्ण बरी होईपर्यंत या गोष्टी सांभाळणे उत्तम असते. नंतरही किमान सहा- आठ महिने उकळलेले पाणी,पथ्याहार चालू ठेवायचा असतो. कावीळ बरी झाली तरी अग्नीची, यकृताची शक्ती वाढावी यासाठी नंतरही ६-८ महिने पुनर्नवासव, ‘बिल्वसॅन’ यासारखी औषधे घेणे श्रेयस्कर असते. काविळीमुळे क्षीण झालेले शरीरधातू पुन्हा टवटवीत होण्यासाठी दाडिमावलेह, धात्री रसायन, मोरावळा वगैरे योग घेणे हितावह असते. कावीळ उलटणे अतिशय त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे योग्य औषधे, पथ्यपाणी करून पूर्ण बरे वाटेल यासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com