लहान मुलांच्या पचनाच्या समस्या !

बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात सर्व अवयव, सर्व संस्था जरी अस्तित्वात असल्या तरी त्यांचा संपूर्ण विकास होणे, त्यांना बळकटी येणे बाकी असते आणि म्हणूनच लहान बाळाला प्राणपणाने जपावे लागते.
Child
ChildSakal

आपल्या घरातील लहान मूल हा घरातील सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पण बाळाची काळजी देखील घेणे खूप महत्वाचे असते. त्यादृष्टीने आज आपण बाळाच्या पचनसंस्थेची काळजी कशी घ्यावी, पचनाच्या समस्यांचे निराकरण कसे करावे या विषयी माहिती घेणार आहोत.

बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात सर्व अवयव, सर्व संस्था जरी अस्तित्वात असल्या तरी त्यांचा संपूर्ण विकास होणे, त्यांना बळकटी येणे बाकी असते आणि म्हणूनच लहान बाळाला प्राणपणाने जपावे लागते. अगदी तान्ह्या बाळाचा स्तन्यपान हाच आहार असतो. किमान सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध मिळालेल्या मुलांचे आरोग्य अधिक चांगले असते हे आज सिद्ध झालेले आहे. मात्र यासाठी स्तन्य शुद्ध व पोषक गुणांनी युक्त असावे लागते. बाळंतिणीने काय खावे, काय प्यावे यासारखे नियम यासाठीच सांगून ठेवलेले असतात. स्तन्यपान करणाऱ्या बालकाला तर वारंवार उलटी होणे, शौचाला खडा होणे किंवा जुलाब होणे, पोट दुखणे यासारखे त्रास होत असतील तर मुख्य उपचार आईवर करावे लागतात. स्तन्य शुद्ध राहावे यासाठी मेथीचे लाडू, संतुलन बाळंत काढे, जीरकाद्यासव वगैरे घेणे तर पोषक तत्त्वे वाढावीत यासाठी शतावरी कल्प, डिंकाचे लाडू, सॅन रोझसारखे रसायन घेणे परिणामकारक असते. ओवा, बाळंतशोपा, बडीशोप, हळद, कढीपत्ता, सुंठ, केशर वगैरे गोष्टी बाळंतिणीच्या आहारात असणे या दृष्टीने चांगले असते.

लहान बाळ अचानक रडायला लागले तर सहसा त्यामागे पोटदुखी हे कारण असते. तेल लावून पोट शेकणे हा पोटदुखीवरचा उत्तम घरगुती उपाय. संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल यादृष्टीने उत्तम होय. हलक्या हाताने अगोदर तेल लावून वरून ओव्याच्या पुरचुंडीने किंवा सुती कापडाच्या घडीने हलका शेक करण्याने, चिमूटभर हिंग नाभीभोवती लावण्यानेही वायू सरून पाण्यास व पोट दुखणे बंद होण्यास मदत मिळते. बाळ शी करताना रडत असेल, मळ कडक किंवा खड्याप्रमाणे होत असेल तर पोटावर तसेच गुदभागी एरंडेल लावण्याचा उपयोग होतो. तसेच ४-५ काळ्या मनुका पाण्यात भिजत घालून, ४-५ तासांनी कुस्करून व गाळून मिळालेले पाणी बाळाला रात्री झोपण्यापूर्वी देण्याचाही फायदा होतो. सहा महिन्यांनंतर बालकाला जेव्हा पेज, कण्हेर, खीर वगैरे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते तेव्हा थोडया प्रमाणात घरच्या साजूक तुपाचा समावेश करणे उत्तम असते. यामुळे पोट साफ होण्यापासून ते प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यापर्यंत अनेक फायदे होतात.

बाळाला जुलाब होऊ लागले तर भूक लागेल त्या प्रमाणात मुगाचे कढण किंवा ताक-मऊ भात देणे, मीठ-साखर-पाणी देत राहणे आवश्यक असते. सुंठ, जायफळ, काकडशिंगी उगाळून तयार केलेल्या एक अष्टमांश चमचा चाटणात थोडी साखर व तूप मिसळून देण्याचा उपयोग होतो. पाव चमचा बिल्वसॅन देण्यानेही बरे वाटते. एखाद्या वेळी बाळाला उलटी झाली पण त्यानंतर बाळ नेहमीसारखे हसू-खेळू लागले तर फारशी चिंता करण्याची गरज नसते, मात्र वारंवार उलटी होत असली, उलटीनंतर बाळ थकत असले तर त्यावर उपचार करणे गरजेचे असते. साळीच्या लाह्या टाकून उकळलेले पाणी थोडे थोडे देण्याचा उपयोग होतो. कामदुधा गोळी सहाणेवर उगाळून बाळाला चाटवण्याचा उपयोग होतो, मात्र जास्ती उलट्या होत असल्या तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.

पोटात जंत होणे ही लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी समस्या. भूक लागत नाही, खाल्लेले अंगी लागत नाही, सतत सर्दी होते, कारण नसताना पोट दुखते, चेहऱ्यावर पांढरट डाग येतात, गुदभागी खाज येते अशी लक्षणे असल्यास त्यामागे सहसा जंत हे कारण असते. सकाळ उठल्यावर पाव चमचा वावडिंगाचे चूर्ण मधात मिसळून चाटवण्याने जंत कमी होतात. जेवणानंतर विडंगारिष्ट देणे, सकाळ-संध्याकाळ बाल हर्बल सिरप देणे हे सुद्धा जंतांची प्रवृत्ती मुळापासून नाहीशी होण्यासाठी हितावह असते. जंत तसेच इतर पचनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास असला तर त्यामध्ये आहाराचे योगदान महत्त्वाचे असते. यादृष्टीने लहान मुलांना चीज, पनीर, केळी, दही, बिस्कीट, पिझ्झा-पास्ता यासारखे पदार्थ देणे शक्य तितके टाळणे चांगले असते. भारतीय पद्धतीच्या आहाराची सुरुवातीपासून सवय ठेवली उदा. मऊ भात, मूग किंवा तुरीचे वरण, साजूक तूप, मऊ खिचडी, पोळी-भाकरी, वेलावर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक, खडीसाखर, रव्याची-तांदळाची खीर, उकडलेले सफरचंद, डाळिंब, पपई, अंजीर, पेअरसारखी फळे, भिजवलेले बदाम, जर्दाळू वगैरे दिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.

- डॉ. भाग्यश्री झोपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com