संसर्गापासून रक्षणासाठी कवचकुंडले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Security
संसर्गापासून रक्षणासाठी कवचकुंडले...

संसर्गापासून रक्षणासाठी कवचकुंडले...

- डॉ. भाग्यश्री झोपे

एक डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून ओळखला जातो. एड्‌स या रोगाभोवतीचे भीतिवलय कमी होत नाही, कारण याला कारणीभूत असणारा विषाणू एकदा शरीरात प्रवेशित झाला की कधीही साथ सोडत नाही. एचआयव्हीची बाधा झाली की सध्याची प्रचलित उपचारपद्धती ‘इतर आजारांपासून रुग्णाचे रक्षण करणे’ एवढ्या एकाच गोष्टीभोवती फिरते. आयुर्वेदाच्या मदतीने मात्र या रोगावर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करता येतात.

एड्सचा एचआयव्ही विषाणू असो, सध्याचा कोविड १९ हा विषाणू असो किंवा इतर कोणताही जिवाणू-विषाणू असो, मुळात संसर्ग होऊ नये आणि झाला तरी शरीराला घातक ठरू नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. एड्स, कोरोना वगैरे रोगांची नावे वेगवेगळी असली तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यामुळे उत्पन्न होणारी लक्षणे, शरीरशक्तीवर होणारा परिणाम, आहार-आचरण या गोष्टी लक्षात घेऊन प्रकृतिनुरूप उपचार केले तर त्याचा उत्तम परिणाम होताना दिसतो. मुळात रोगाची, जिवाणू-विषाणूची बाधा होऊ नये यासाठी अग्नी, शुक्रधातू व ओज या तीन शरीरघटकांकडे लक्ष देणे आवश्यक असते. चुकून रोग झाला, संसर्ग झाला तरी मुळात या तीन गोष्टी चांगल्या असल्या तर त्यातून बरे होणे हेसुद्धा सुकर असते. ‘रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ’ म्हणजे मंदावलेला अग्नी सर्व रोगांचे कारण असतो हे आयुर्वेदातील वचन कायम लक्षात ठेवावे असे आहे.

निसर्गात ज्याप्रमाणे अग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी योग्य इंधन द्यावे लागते, युक्तीपूर्वक वारा द्यावा लागतो, अग्नीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी लागते त्याचप्रमाणे शरीरातील अग्नीला अन्नरूपी इंधन योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात, योग्य वेळी द्यावे लागते. म्हणजे भूक लागल्यावरच जेवणे, भुकेच्या निम्म्या प्रमाणात (स-अवकाश) जेवणे, अन्न शिजवलेले, ताजे, गरम, साजूक तुपाच्या स्निग्धतेने युक्त असणे याकडे लक्ष द्यावे लागते. जेव्हा आकाशात सूर्य सर्वाधिक प्रखर असतो म्हणजे दुपारी बाराच्या आसपास आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर लवकरात लवकर जेवावे. नाश्ता केला तरी तो हलका व इतक्याच प्रमाणात असावा की दुपारी वेळेवर व व्यवस्थित भूक लागावी. जेवणामध्ये लिंबू, आले, आवळ्याची चटणी यासारख्या रुचिवर्धक व पचनाला मदत करणाऱ्या गोष्टी असणे, जेवणाच्या शेवटी जिरे-सैंधवयुक्त ताक पिणे, जेवणानंतर लवणभास्कर चूर्ण किंवा संतुलन अन्नयोग गोळ्या घेणे, अपचन, जळजळ, गॅसेस वगैरे तक्रारी असल्यास अविपत्तिकर किंवा सॅनकूल चूर्ण घेणे हेसुद्धा उत्तम.

अग्नीला संधुक्षित करण्यासाठी रोज चालणे, सूर्यनमस्कारासारखी योगासने करणे, अनुलोम-विलोम, दीर्घश्र्वसनादी श्र्वसनक्रिया करणे हे सुद्धा आवश्यक होय. अग्नीनंतर येतो तो शुक्रधातू. अन्नपचनानंतर तयार होणाऱ्या सात धातूंपैकी अंतिम व म्हणूनच सर्वांत शुद्ध आणि बलवान धातू म्हणजे शुक्रधातू. आरोग्य टिकण्यासाठी, रोगाला दूर ठेवण्यासाठी शुक्रधातूची भूमिका महत्त्वाची असते. शुक्रधातूचे पोषण होण्यासाठी आहारात पंचामृत, साजूक तूप, बदाम, गोडांबी, मनुका वगैरे गोष्टींचा समावेश असणे आवश्यक होय. बीजयुक्त अन्न-धान्य व तेही असे की ज्यात पुनरुत्पादनाची क्षमता आहे, सेवन करणे हेसुद्धा शुक्रधातूसाठी पोषक असते.

आयुर्वेदातील ‘रसायन कल्पना’ मुख्यत्वे शुक्रधातूवर काम करणारी आहे. रोज सकाळी च्यवनप्राश किंवा आत्मप्राशसारखे रसायन, धात्री रसायन, सॅन रोझ, मॅरोसॅन यापैकी १-२ रसायने घेण्याने शरीरशक्ती उत्तम राहते, प्रतिकारशक्ती सुधारते, रोगापासून रक्षण होते आणि रोग झाला असला तर त्यातून लवकरात लवकर बरे होणेही शक्य होते. एड्स किंवा शक्ती क्षीण करणाऱ्या कोणत्याही इतर रोगात शुक्रापेक्षा अधिक महत्त्वाचा घटक लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे ओज. रसधातूपासून ते शुक्रधातूपर्यंतच्या सर्व धातूंचे जे परमसार आहे ते म्हणजे ‘ओज’ होय. ओज म्हणजेच सर्वश्रेष्ठ तेजस्वरूप शक्ति असून त्यालाच ‘बल’ असेही म्हणतात. दोष व धातूपेक्षाही ओज अधिक महत्त्वाचे आहे. त्रिदोष जरी संतुलित असले तरी ते ओजाच्या अभावी यत्किंचितही काम करू शकत नाहीत. ओजामुळेच शरीराचे अस्तित्व आहे. ओजनाश झाला तर शरीराचाही निश्र्चितच नाश होतो. म्हणून ओज ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून प्राणांचा मुख्य आधार आहे. ओज जेवढे उत्तम अवस्थेत असेल तेवढे उत्तम प्रकारे ते रोगाचा प्रतिबंध करू शकते.

मन प्रसन्न, आनंदी असणे हे ओजसंपन्नतेचे एक लक्षण समजले जाते. चिंता न करणे, त्याऐवजी आहे त्या परिस्थितीतून सर्वांच्या कल्याणाचा मार्ग काढणे, हेसुद्धा ओजतत्त्व कमी न होण्यासाठी अनुकूल समजले जाते. सुवर्ण, केशर, औषधी घृत, अमृतशर्करायुक्त पंचामृत यासारख्या गोष्टी, ॐकार गूंजन, ध्यान, योगोपासनासुद्धा ओजतत्त्वासाठी पोषक असते. याव्यतिरिक्त नियमित अभ्यंग करणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे, घरात शुद्ध वनस्पतींपासून बनविलेले धूप करणे, तिळाच्या तेलाचा दिवा तेवत ठेवणे, फुप्फुसांना शक्ती देणारा सॅन अमृत हर्बल ब्रूसारखा चहा पिणे, स्वास्थ्यसंगीत, ध्यान, समाजसेवा यासाठी ठरावीक वेळ देणे, घर परिसराची शुद्धता-स्वच्छता ठेवणे याकडे लक्ष ठेवले तर संसर्गजन्य रोगांवर निश्र्चित मात करता येईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ProtestDr Bhagyashri Zope
loading image
go to top