आयुर्वेद हाच प्रथम उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurved

आरोग्य ही जीवन जगण्यासाठी, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट. ‘आरोग्यं धनसम्पदा’ ही प्रार्थना रोज म्हटली जाते.

आयुर्वेद हाच प्रथम उपचार

- डॉ. भाग्यश्री झोपे

आयुर्वेदातील सर्वांत मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना म्हणजे समत्व अर्थात संतुलन! शरीरातील वात-पित्त-कफ हे त्रिदोष असोत, सप्तधातू असोत, अग्नी असो, मन- इंद्रिये वगैरे न दिसणारी तत्त्वे असोत, आयुर्वेदाने यात समत्व असण्याला प्राधान्य दिले. मात्र आरोग्यातील समत्व आणि गणितातील समत्व एका तराजूत तोलता येत नाही.

आरोग्य ही जीवन जगण्यासाठी, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट. ‘आरोग्यं धनसम्पदा’ ही प्रार्थना रोज म्हटली जाते. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात, ‘आरोग्य हीच खरी धनसंपदा!’ पण पैशाच्या बाबतीत, जमीनजुमल्याच्या बाबतीत आपण जेवढे दक्ष असतो त्याच्या एक दशांश तरी आरोग्याच्या बाबतीत असतो का? अडीअडचणीला गाठीशी असावेत म्हणून पैसे जर आपण साठवू शकत असलो तर अचानक, एकाएकी रोगाचे आक्रमण होऊ नये म्हणून आरोग्य टिकविण्यात मागे का राहतो? भारतीय ऋषिमुनींनी आयुर्वेदशास्त्राचे पहिले उद्दिष्ट सांगितले, ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्’ अर्थात आरोग्य टिकवणे हे आयुर्वेदशास्त्राचे आद्य प्रयोजन. म्हणूनच आपण आयुर्वेदाकडे केवळ वैद्यकशास्त्र म्हणून पाहत नाही तर निरोगी जीवन जगण्याचे, जगण्याचा आनंद घेण्याची क्षमता देणारी जीवनपद्धती म्हणून पाहतो. पण हे सगळे नुसते माहिती असून चालणार नाही, तर प्रत्येकाने या अमृतोपम ज्ञानाचा उपयोग आरोग्य टिकविण्यासाठी, रोग झाला तर तो मुळापासून बरा करण्यासाठी करून घ्यायला हवा. आयुर्वेदातील सर्वांत मूलभूत व महत्त्वाची संकल्पना म्हणजे समत्व अर्थात संतुलन. शरीरातील वात-पित्त-कफ हे त्रिदोष असोत, सप्तधातू असोत, अग्नी असो, मन- इंद्रिये वगैरे न दिसणारी तत्त्वे असोत, आयुर्वेदाने यात समत्व असण्याला प्राधान्य दिले.

मात्र आरोग्यातील समत्व आणि गणितातील समत्व एका तराजूत तोलता येत नाही. उदा. त्रिदोषातील संतुलन म्हणजे एक तृतीयांश वात, एक तृतीयांश पित्त व एक तृतीयांश कफ हा गणितातील नियम येथे लावता येत नाही. मग प्रश्र्न पडतो तो कशाच्या आधारावर समानता समजून घ्यायची? यासाठी आयुर्वेदाने प्रकृती ही संकल्पना मांडली. व्यक्ती जन्माला येताना, किंबहुना जिवाचे अस्तित्व सुरू होताना प्रत्येकाची प्रकृती ठरत असते. कशाच्या आधारावर? तर गर्भधारणा झाली त्यावेळचे ऋतुमान, वेळ, माता-पित्याने घेतलेला आहार, त्यांची मानसिकता, त्यांची प्रकृती आणि श्रीगुरुजी सांगतात त्याप्रमाणे जीव बरोबर घेऊन आलेला प्रोग्रॅम/संकल्पना यावर व्यक्तीच्या प्रकृतीला कारणीभूत असणाऱ्या पंचमहाभूतांचे एकत्रीकरण ठरते आणि ती त्या व्यक्तीची प्रकृती असते. म्हणूनच गर्भसंस्कारांचे योगदान खूप मोलाचे असते. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार ही गोष्ट फक्त मनुष्यापुरतीच सीमित नाही तर विश्र्वातील प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्ट पंचतत्त्वांच्या वेगवेगळ्या एकत्रीकरणातून घडत असते.

अर्थात जशी आपल्या प्रत्येकाची निसर्गदत्त प्रकृती असते तशीच अन्न- धान्य, लता-वनस्पती, फळे-फुले, पशू-पक्षी वगैरे सर्वांची मूलभूत प्रकृती असते, ठराविक स्वभाव असतो, विशिष्ट गुण असतात. आयुर्वेदाने प्रत्येक प्राणिमात्रांच्या हितासाठी या सर्वांचे ‘डिकोडिंग’ करून ठेवले. व्यक्तीची प्रकृती कशी ओळखायची हे सुद्धा समजावले आणि त्या व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या अन्नाची सुद्धा प्रकृती सांगितली. ज्या वातावरणात व्यक्ती राहते त्यातील प्रत्येक गोष्टीची प्रकृती समजावली. मित्रामित्रांमध्ये जशी एकरूपता असते, एकातील उणीव दुसरा भरूनकाढतो, दुसऱ्यातील चांगल्या गुणाला पहिला दुजोरा देतो त्याप्रमाणे मुळात आपली प्रकृती काय आहे हे शोधून काढले आणि ती संतुलनात ठेवण्यासाठी अनुकूल गोष्टींचा योग्य वापर केला व प्रतिकूल गोष्टींपासून दूर राहिले तर प्रकृती समत्वात ठेवणे, पर्यायाने आरोग्य टिकवणे शक्य असते. यासाठी एकदा वैद्यांकडे जाऊन स्वतःची प्रकृती समजून घेणे, काय खावे, काय टाळावे याची माहिती करून घेणे सर्वोत्तम. तरीही काही गोष्टी अशा असतात की ज्या सर्व प्रकृतीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असतात.

आयुर्वेदात दिलेली नित्य हितकर द्रव्ये या प्रमाणे – साठेसाळीचे तांदूळ, साळीच्या लाह्या, मूग, सैंधव, आवळा, जव, दूध, गहू (खपली), मनुका, पडवळ, खडीसाखर, साजूक तूप, डाळिंब या गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य नीट राहते व रोग होत नाहीत असेही या ठिकाणी सांगितलेले आहे. साळीच्या लाह्यांप्रमाणे ज्वारीच्या लाह्या सुद्धा हितकर असतात. तुरीची डाळ (पित्त वाढत असेल तर तो अपवाद समजावा); गावरान चवळी, मटकी, मसूर ही कडधान्ये मोड न आणता, वाफवून व लिंबू, आले वगैरे पाचक द्रव्ये टाकून सेवन केली असता; वेलीवर येणाऱ्या सर्व फळभाज्या; ज्वारी, नाचणी, राजगिरा ही धान्ये; मोसंबी, द्राक्षे, अंजीर, पपई, पेअर, सफरचंद वगैरे भारतीय व ऋतुमानापरत्वे मिळणारी गोड फळे; जिरे, हळद, धणे, कढीपत्ता, दालचिनी, वेलची, लवंग, लाल सुकलेली मिरची, लिंबू, कोकम वा आमसूल हे मसाल्याचे पदार्थ; भिजवलेले बदाम, अंजीर, जर्दाळू असा सुका मेवा हे सर्व पथ्यकर असते, सर्वांना मानवणारे असते. बरोबरीने अन्न ताजे असणे, मनापासून खाणे, भोजन वेळेवर म्हणजे दुपारचे जेवण १२ ते १ दरम्यान व संध्याकाळचे जेवण सूर्यास्तानंतर लवकरत लवकर किमान आठ-साडे आठपर्यंत घेणे हे नियम सांभाळणे सुद्धा गरजेचे असते.

रोज थोडा तरी वेळ योगासनांसाठी, चालण्यासाठी काढणे; प्राणायाम किंवा सर्वांत उत्तम असे ॐकार गूंजन करणे, ज्योतिध्यान करणे हे सर्व अग्निसंतुलनासाठी पर्यायाने संप्रेरकांच्या संतुलनासाठी महत्त्वाचे असते. ज्या वातावरणात आपण राहतो त्याची शुद्धता राखणे हे सुद्धा आपल्या स्वतःच्या, प्रियजनांच्या आणि भावी पिढीच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यादृष्टीने कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालणे, घरगुती वापरासाठी, स्नानासाठी नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेली उत्पादने वापरणे, पाण्याचा वापर जपून करणे, रासायनिक खते, फवारे यांच्या वापरापासून दूर राहणे वगैरे गोष्टी महत्त्वाच्या असतात. संतुलन अभ्यंग तीळ तेलासारखे तेल अंगाला नियमित तेल लावणे; सकाळी इरिमेदादी किंवा सुमुख तेलाचा गंडूष करणे; डोळ्यांत नियमित अंजन घालणे; कानात श्रुती तेलासारखे तेल टाकणे; हेडफोन्स-ब्लू टूथचा अतिवापर टाळणे; शांत झोप लागावी, ताण कमी व्हावा यासाठी टाळूवर ब्रह्मलीन तेल लावणे; च्यवनप्राश, आत्नमप्राशसारखे, धात्री रसायन, सॅन रोझसारखे रसायन सेवन करणे; हे सुद्धा आरोग्य टिकविण्यासाठी सहायक उपचार होत. आयुर्वेदातील हे नियम सांभाळले तर रोग होणारच नाहीत पण तरीही वंशपरंपरेने, चुकीच्या आहार-आचरणामुळे, ताण-तणावामुळे, वाढत्या प्रदूषणामुळे काही त्रास होऊ लागला तर सर्वप्रथम आयुर्वेदाचे मार्गदर्शन घेऊन, नैसर्गिक साधनांच्या मदतीने पुन्हा संतुलन प्रस्थापित करणे, रोगाची केवळ लक्षणे दबवणारी औषधे न घेता रोग मुळापासून बरा करणारे उपचार करणे हे श्रेयस्कर.

Web Title: Dr Bhagyashri Zope Writes Ayurved Is First Treatment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..