सौंदर्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty
सौंदर्य...

सौंदर्य...

- डॉ. भाग्यश्री झोपे

सौंदर्याची आराधना करणे कोणाला आवडणार नाही? सौंदर्य हे फक्त शारीरिक नसावे, त्याला मनाच्या औदार्याची जोड मिळाली तर ते कालातीत ठरू शकते. भारतीय साहित्यात देवदेवतांपासून, राजेरजवाड्यांपासून ते एखाद्या ऋषिकन्यापर्यंत सर्वांनीच सौंदर्यप्राप्तीसाठी प्रयत्न केल्याची उदाहरणे दिलेली दिसतात. आजच्या २१व्या शतकातही स्त्री असो वा पुरुष, गरीब असो वा श्रीमंत, सौंदर्याची ओढ सर्वांनाच असते. जन्मजात सौंदर्याची देणगी सर्वश्रेष्ठ असतेच. पण सौंदर्य टिकविण्यासाठी आरोग्य जपणे, वृद्धिंगत करणे हेसुद्धा तितकेच गरजेचे असते आणि म्हणूनच सौंदर्यउपचार आरोग्याला बाधक ठरणार नाहीत याकडे लक्ष देणे आवश्यक असते आणि म्हणूनच आयुर्वेदाच्या मदतीने आणि निसर्गातील सहज उपलब्ध द्रव्यांच्या साहाय्याने सौंदर्य सहज टिकवता येते. वाढवता येते. नितळ त्वचा, सतेजता, रेशमी लांब केस, चेहऱ्याचा रेखीवपणा, उत्तम बांधा तसेच ओठ कोरडे नसणे, घाम अति प्रमाणात न येणे, उंची व बांधा यांचे प्रमाण योग्य असणे, शरीराला आवश्‍यक घट्टपणा, कणखरपणा असणे अशा अनेक गोष्टी सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत. आज आपण त्वचा, डोळे, केस यांच्या सौंदर्यवर्धनाचे काही महत्त्वाचे उपचार जाणून घेऊ या.

त्वचा - त्वचा हा व्यक्तीचा खरा दागिना समजला जातो. ‘क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवति । ...सुश्रुत शारीरस्थान.’ ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे शरीर तयार होताना, धातूंचे पचन होत असताना त्वचा तयार होते. म्हणूनच सतेज त्वचेसाठी एकंदर आरोग्य चांगले राहणे, सर्व धातूंचे व्यवस्थित पोषण होणे हेसुद्धा महत्त्वाचे होय. निरोगी त्वचेसाठी पुढील प्रयत्न करता येतात.

  • धातूंचे पोषण व्हावे, शरीराला तसेच त्वचेलाही आवश्‍यक स्निग्धता मिळावी आणि नितळ, सतेज त्वचा मिळावी म्हणून नियमित अभ्यंग करणे उत्तम होय. रक्तशुद्धिकर व वात-पित्तशामक औषधांचा संस्कार करून तयार केलेले संतुलन अभ्यंग सिद्ध तेलासारखे तेल अंगाला लावणे उत्तम असते.

  • त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे हे त्वचेला घातक ठरू शकते. यावरही नियमित अभ्यंग करण्याचा आणि स्नानाच्या वेळी मसुराच्या पिठात हळद, धणे पूड, दही किंवा दूध मिसळून तयार केलेले उटणे किंवा तयार सॅन मसाज पावडरसारखे उटणे लावण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

  • गुलाबपाण्यात चंदन, दालचिनी, हळकुंड उगाळून तयार केलेले गंध चेहऱ्यावर लावण्याने सुरकुत्यांना प्रतिबंध होतो तसेच त्वचा नितळ व सतेज राहण्यास मदत होते.

  • चेहरा किंवा दंड-पाठीवर पिंपल्स येणेसुद्धा सौंदर्याला बाधक असते. यावर महामंजिष्ठादी काढा, पंचतिक्त घृत, संतुलन पित्तशांती गोळ्या वगैरे रक्तशुद्धिकर औषधे घेण्याचा उपयोग होतो. वर्ण्य द्रव्यांनी सिद्ध केलेले संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल लावण्याचा, सॅन पित्त फेस पॅकसारखा पॅक लावण्याचाही उपयोग होतो.

  • चेहरा व हातापायाच्या पंजांची त्वचा अधिकच नाजूक व संवेदनशील असते. शिवाय पाणी, धूळ, धूर, उन्हाच्या संपर्कात हे भाग अधिक प्रमाणात येत असल्याने या ठिकाणच्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने आठवड्यातून १-२ वेळा चेहऱ्यावर, पंजांवर साय लावून ठेवणे उत्तम असते. रात्री झोपण्यापूर्वी संतुलन क्रेम रोझ हे क्रीम लावण्यानेही या ठिकाणच्या नाजूक त्वचेचे संरक्षण होऊ शकते.

डोळे - सौंदर्याचा विचार करताना डोळे महत्त्वाचे होत. डोळ्यांमधली चमक व सतेजता आरोग्याशिवाय मिळू शकत नाही. डोळे सुंदर दिसावेत म्हणून वापरलेली प्रसाधने नैसर्गिक नसल्याने डोळ्यांच्या आरोग्याला व सौंदर्याला बऱ्याचदा घातक ठरू शकतात. त्याऐवजी सर्व नैसर्गिक, शुद्ध व उत्तम प्रतीच्या द्रव्यांपासून आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले अंजन (उदा. सॅन अंजन काळे, ग्रे किंवा क्लिअर) वापरण्याने डोळ्यांचे आरोग्यही उत्तम राहते, शिवाय डोळ्यांचे प्रसाधनही होते. संगणक, प्रदूषण वगैरेंमुळे थकलेल्या डोळ्यांना पुन्हा स्फूर्ती यावी यासाठी बंद डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या किंवा निरशा थंड दुधाच्या घड्या ठेवता येतात.

केस - केस मऊ व रेशमी होण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना नारळाचे दूध लावून नंतर केस शिकेकाई, रिठा वगैरे मिश्रणाने धुण्याचा उपयोग होतो. यामुळे केस गळणे, दुभंगणे या तक्रारीही दूर होतात. केस गळू नयेत, अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी केसांच्या मुळाशी केश्य द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे आवश्यक असते. यादृष्टीने संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल उत्तम होय. या तेलाची विशेषता अशी की हे अग्निसंस्कारातून तयार केलेले असल्याने केसांना तेलकट करत नाही, हलक्या हाताने जिरवले असता पूर्ण जिरून जाते आणि नंतर शिकेकाई, रिठा वगैरे मिश्रणाने धुण्याने केस स्वच्छ होतात, पण कोरडे पडत नाहीत. जास्वंदीची फुले, कळ्या, पाने बारीक करून तयार केलेला लेप लावण्याने केसांचे कंडिशनिंग करता येते. आजकाल केस काळे दिसण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध असतात, मात्र रासायनिक द्रव्यांनी तयार केलेला रंग वापरण्याऐवजी मेंदी, नीलिका या द्रव्यांचा वापर करता येतो. आयुर्वेदातील सौंदर्योपचारांचा फायदा असे की याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, सौंदर्य तर खुलतेच, पण बरोबरीने आरोग्यही वृद्धिंगत होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :beautyDr Bhagyashri Zope
loading image
go to top