शरदातील पित्तसंतुलन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरदातील पित्तसंतुलन...

निसर्गाचा एक अविभाज्य घटक असल्याने आपल्यावर निसर्गातील प्रत्येक बदलाचा परिणाम होत असतो. हा बदल कधी आरोग्यासाठी अनुकूल असतो तर कधी आरोग्यासाठी अवघड ठरणारा असतो.

शरदातील पित्तसंतुलन...

- डॉ. भाग्यश्री झोपे

निसर्गाचा एक अविभाज्य घटक असल्याने आपल्यावर निसर्गातील प्रत्येक बदलाचा परिणाम होत असतो. हा बदल कधी आरोग्यासाठी अनुकूल असतो तर कधी आरोग्यासाठी अवघड ठरणारा असतो. मात्र अशा परिस्थितीत सहसा निसर्गातच उत्तर दडलेले असते. उदा. ग्रीष्म ऋतूत सूर्याची उष्णता वाढल्याने अंगाची काहिली होऊ लागते, शरीरातील रसभाव कमी होऊ लागतो. मात्र यात ग्रीष्म ऋतूत आंबा, द्राक्षे, जाम, कलिंगड यासारखी रसरशीत फळेही निसर्ग देतो. पावसाळ्याच्या अखेरीस येणाऱ्या शरद ऋतूतही हेच घडते. या काळात पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्या ऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून शरीरात पित्तदोष भडकतो, आयुर्वेदात यालाच पित्तप्रकोप असे म्हटले जाते. मात्र याच शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली तरी रात्री तितक्याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी वापरणे, या पाण्याने अवगाहन करणे हे अमृतोपम असते. अशा प्रकारे चंद्राची शीतलता आणि अगस्त्य ताऱ्याची निर्विषता ही शरद ऋतूमध्ये जणू वरदानाप्रमाणे असते.

‘विष’ म्हणजे अचेनत्व, अनुत्साह व असामर्थ्य तर त्याविरुद्ध ‘अमृत’ म्हणजे चैतन्य, स्फूर्ती व समर्थता. शरीरातल्या प्रत्येक अवयवाला व प्रत्येक पेशीला अमृताचा पुरेसा पुरवठा आवश्‍यक असतो. जर काही कारणास्तव तो थांबला किंवा अपुरा पडला व उलट शरीरात विषद्रव्यांचा संचय सुरू झाला तर हळूहळू शरीरावयवांची ताकद कमी होणे स्वाभाविक आहे. पाठोपाठ रोगांचा प्रादूर्भावही साहजिकच आहे. म्हणून सर्वांगीण आरोग्याची इच्छा असणाऱ्याने अधिकाधिक प्रमाणात अमृताची आकांक्षा धरावी व विषतत्त्वापासून शक्य तेवढे दूर राहावे. या ठिकाणी विष म्हणजे विषारी प्राणी चावल्याने रक्तात भिनणारे विष किंवा विषप्रयोगामुळे शरीरात जाणारे विष असा घ्यायचा नाही तर शरीरातील अनावश्‍यक अशा सर्व गोष्टी ज्या वेळेवारी शरीराबाहेर न गेल्यास विषस्वरूप होऊन राहतात, त्या अशुद्धींना विष म्हटलेले आहे. अगस्त्य ताऱ्याच्या उदयामुळे वातावरणातील, पाण्यामधील विषतत्त्व कमी होते तसेच ते शरीरातून काढून टाकण्यासाठी विशेष उपचारांची योजना करणे भाग असते. यादृष्टीने तसेच शरदामध्ये कापलेल्या पित्ताला बाहेर काढून टाकण्यसाठी शरद ऋतूमध्ये विरेचन करणे उत्तम असते. यामुळे पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह,हृद्रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्य असते.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर, वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते, चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते, चांदी सुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधून मधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब,सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हे सुद्धा या ऋतूत पित्तसंतुलनास मदत करते. भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडकी, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीच्या ऐवजी शक्यतो लाल मिरची, आले वापरणे हे सुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते. शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणे सुद्धा अतिशय उपयुक्त असते. शतावरी कल्प, अविपत्तिकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.