कोलेस्टेरॉल..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलेस्टेरॉल.....
कोलेस्टेरॉल.....

कोलेस्टेरॉल.....

- डॉ. भाग्यश्री झोपे

कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले असे नसते. या गैरसमजामुळे बरेच लोक एक तर डाएटचा अतिरेक करतात, म्हणजे उकडलेल्या बेचव भाज्या, दुधाऐवजी सोया मिल्क, आहारातून तेल-तुपाचे समूळ उच्चाटन किंवा दीर्घकाळासाठी कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गोळ्या घेत राहतात. पण यामुळे होते असे की... चांगले कोलेस्टेरॉलही कमी कमी होत जाते, ज्याचा शरीरावर, शक्तीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो.

कोलेस्टेरॉल हा शब्द सध्या घराघरांत पोचलेला आहे. खाद्यतेलांच्या जाहिरातीमध्ये तर हमखास कोलेस्टेरॉलचा उल्लेख असतो. चाळिशीनंतर सहसा केल्या जाणाऱ्या तपासण्यांमध्ये कोलेस्टेरॉल नक्की तपासले जाते. हृद्रोगाच्या चर्चेमध्ये तर हा शब्द वारंवार वापरला जातो. या सर्व कारणांमुळे जनमानसात मात्र कोलेस्टेरॉल म्हणजे काहीतरी घातक, काहीतरी वाईट, जितके कमी ठेवता येईल तितके चांगले असा समज दृढ झालेला दिसतो. मात्र, कोलेस्टेरॉल हा मानवी शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. आहारातून आलेल्या चरबीचे पचन करणे, शरीरातील लहानातील लहान घटक म्हणजे पेशी, या पेशीची संरचना प्राकृत ठेवणे, काही विशेष संप्रेरके तयार करणे अशी अनेक शरीरोपयोगी कामे कोलेस्टेरॉल हे शरीरद्रव्य करत असते. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात, ‘कोलेस्टेरॉल हे शरीरशक्ती यथाव्यवस्थित राहण्यासाठी महत्त्वाचे असते. प्रमाणापेक्षा कमी कोलेस्टेरॉल किंवा सामान्य कोलेस्टेरॉल असतानाही ते कमी करण्यासाठी गोळ्या घेत राहणे आरोग्यासाठी अपायकारक होय.’

कोलेस्टेरॉल म्हणजे हृदयाचा विकार असे समीकरणही अनेकांच्या मनात असते. काही अंशी ते खरे असले तरी प्रत्येक हृद्रोग्याचे कोलेस्टेरॉल वाढलेले असतेच असे नाही. शरीराला आवश्यक असणाऱ्या कोलेस्टेरॉलची निर्मिती शरीर करत असतेच. ते प्रमाणापेक्षा वाढू नये यासाठी आपल्या आहाराकडे, पचनाकडे लक्ष देणे आवश्यक असते.

कोलेस्टेरॉलचे प्रमाण सामान्य आहे का अवाजवी आहे हे रक्ताच्या तपासणीवरून समजू शकते. साधारणतः २४० पेक्षा कोलेस्टेरॉलची पातळी कमी असणे, चांगले कोलेस्टेरॉल (एच.डी.एल.) योग्य प्रमाणात म्हणजे ५० पेक्षा जास्ती आणि ट्रायग्लिसेराइड्स १७० पेक्षा कमी असणे चांगले असते. कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले असे नसते. या गैरसमजामुळे बरेच लोक एक तर डाएटचा अतिरेक करतात, म्हणजे उकडलेल्या बेचव भाज्या, दुधाऐवजी सोया मिल्क, आहारातून तेल-तुपाचे समूळ उच्चाटन किंवा दीर्घकाळासाठी कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या गोळ्या घेत राहतात. पण यामुळे होते असे की चांगले कोलेस्टेरॉलही कमी कमी होत जाते, ज्याचा शरीरावर, शक्तीवर, आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे कोणती असतात तर भुकेचा विचार करता अति प्रमाणात खात राहणे; अपचन झालेले असतानाही खाणे; पचावयास जड, शिळे, डीप फ्रोजन अन्न खाणे; आंबवलेले, तेलकट, झणझणीत अन्नाचे अति सेवन करणे; रोज रोज पिझ्झा, चीज बर्गर, पनीर-मसाला सारख्या फॅन्सी डिशेस्‌ खाणे; अवेळी जेवणे; रात्री फार उशिरा जेवणे, दुपारच्या जेवणानंतर झोपणे; व्यायाम न करणे; सतत मानसिक ताणाखाली राहणे व त्यावर उपाय म्हणून मद्य वा धूम्रपानाच्या आहारी जाणे वगैरे कारणांनी पचन बिघडते आणि त्यातून कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स वाढू लागतात. अपचनावर जो सर्वोत्तम उपाय म्हणजे लंघन, तो कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो. लंघनाचे निरनिराळे प्रकार असू शकतात. रात्रीचे जेवण बंद करणे, रात्री फक्त द्रवाहार - सूप घेणे, काही दिवस नियमाने रात्री फक्त मुगाची खिचडी खाणे, गहू खाणे बंद करून ज्वारीची भाकरी घेणे, सकाळी नाश्त्याला तसेच अधेमधे भूक लागल्यास फक्त साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या घेणे, दुपारचे जेवण १२ ते १च्या दरम्यान आणि संध्याकाळचे जेवण साडेआठपर्यंत घेणे हे बदल आवश्यक असतात.

अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळी फुटल्यावर २० मिनिटे मध्यम आचेवर उकळलेले पाणी पिणे, तहान लागेल त्या प्रमाणात पाणी पिणे हे सुद्धा कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य ठेवण्यास चांगले असते. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी हे पाणी गार करून म्हणजे सामान्य तापमानाचे झाले की किंवा मातीच्या माठात ठेवून प्यायले तरी चालते, पण पाण्यावर अग्निसंस्कार होणे महत्त्वाचे होय. आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचे किंवा म्हशीचे ताजे शुद्ध दूध (ज्यावर क्रीम काढणे, घालणे वगैरे प्रक्रिया केलेल्या नाहीत असे दूध) वर येईपर्यंत गरम करून, वर आलेल्या मलईला विरजण लावून तयार झालेले दही घुसळून काढलेल्या लोण्याचे बनवलेले तूप आहारात योग्य प्रमाणात अंतर्भूत करण्याने कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्स वाढत नाहीत. उलट अशा तुपामुळे चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य राहण्यास मदत मिळते. प्रकृतीनुरूप शास्त्रीय पद्धतीने ‘पंचकर्म’ हे तर यासाठी वरदानच होय. डोळे विस्फारतील इतक्या प्रमाणात वाढलेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पंचकर्माने कमी होताना दिसतात. पंचकर्माच्या सुरुवातीला ‘एवढे तूप कसे घेऊ’ अशी शंका बाळगणारे रुग्ण पंचकर्माअखेरीस ‘अख्ख्या वर्षात जेवढे तूप खाऊ शकलो नाही तेवढे तूप या १५-२० दिवसात खाल्ले, तरीही बाकीच्या उपायांनी कमी न झालेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स कमी झाले म्हणजे नवलच आहे’ असे उद््गार काढतात तेव्हा खरोखरच पंचकर्माची महती एकवार पुन्हा प्रत्ययाला येते.

या सर्व उपायांबरोबरच ‘व्यायाम’ हाही एक श्रेष्ठ उपाय आहे. रोज किमान ३५ मिनिटे चालायला जाणे, संतुलन क्रियायोगाचा अभ्यास करणे, प्रकृतीला अनुरूप योगासने करणे, सूर्यनमस्कार घालणे, श्र्वसनावर नियंत्रण ठेवणाऱ्या भस्रिका, दीर्घ श्र्वसनादी क्रिया करणे यामुळेही उत्तम परिणाम मिळताना दिसतात. वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होईल पण बरोबरीने शक्ती कमी होणार नाही किंवा चांगले कोलेस्टेरॉलही कमी होणार नाही यासाठी आयुर्वेदात उत्तमोत्तम औषधे आहेत. वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधे घेतली, दर २-३ महिन्यांनी रक्ततपासणी करून कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर नजर ठेवली तर कोणत्याही दुष्परिणामांना बळी पडावे लागत नाही हा संतुलनचा नेहमीचा अनुभव आहे.

Web Title: Dr Bhagyashri Zope Writes Cholesterol Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top