फुप्फुसांच्या आरोग्यासाठी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lungs

जिवंतपणाची खूण म्हणजे श्र्वास. श्र्वास चालू आहे तोपर्यंत जीवन आहे आणि ते श्र्वसन व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत आरोग्य अबाधित आहे.

फुप्फुसांच्या आरोग्यासाठी!

- डॉ. भाग्यश्री झोपे

फुप्फुसे जेवढी मोकळी राहतील तेवढा प्राण जास्त आकर्षित होतो, जेवढा प्राण अधिक मिळतो तेवढी ताकद वाढते, वीर्य वाढते आणि मनुष्याचे एक तर रोगापासून संरक्षण होते, रोग असला तर तो बरा होण्याची सुरुवात होते. हे सगळं होण्यासाठी योगशास्त्राने सांगितलेला सोपा उपाय म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणायाम केवळ शरीरापुरता मर्यादित नसून त्यात शरीर, मन, इंद्रिय व आत्मा या सर्वांचं संतुलन साधण्याची क्षमता आहे. सध्या वाढत असलेल्या मधुमेह, हृदयविकार, मानसिक ताण वगैरे रोगांवर प्राणायामासारखा सोपा व प्रभावी उपाय सापडणार नाही.

जिवंतपणाची खूण म्हणजे श्र्वास. श्र्वास चालू आहे तोपर्यंत जीवन आहे आणि ते श्र्वसन व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत आरोग्य अबाधित आहे. २०२०-२०२१ मध्ये कोविडच्या निमित्ताने संपूर्ण जगाने याचा अनुभव घेतला असे म्हणायला हरकत नाही. श्र्वसनसंस्थेतील महत्त्वाचा अवयव म्हणजे फुप्फुसे. फुप्फुसे असंख्य फुग्यासारख्या रचनेतून तयार झालेली असतात. म्हणून रात्रंदिवस श्र्वास घेण्या- सोडण्याची क्रिया फुप्फुसांच्या माध्यमातून होत असते. अशुद्ध हवा शुद्ध करण्याची क्रिया सुद्धा फुप्फुसांच्या योगे होत असतो. आयुर्वेदात तर याच्याही पुढे जाऊन सांगितलेले आहे की गर्भावस्थेत रक्ताच्या फेसापासून फुप्फुसे तयार होतात. फेस म्हणजे छोटे छोटे फुगेच. पण हे रक्तातून तयार झालेले असतात असे सांगितलेले असल्याने फुप्फुसांच्या आरोग्यासाठी रक्त शुद्ध व संपन्न असणे आवश्यक असते आणि निरोगी फुप्फुसांच्या योगे रक्त शुद्ध होण्याचे काम चांगल्या प्रकारे होऊ शकते. अशा प्रकारे फुप्फुसे आणि रक्ताचा घनिष्ठ संबंध असतो. प्रत्यक्ष रुग्ण तपासताना याचा अनुभव अनेकदा येतो की धूम्रपान, प्रदूषणाच्या योगे फुप्फुसे अशक्त झाली तर त्याचा परिणाम रक्तावर होते आणि व्यक्तीची त्वचा काळवंडते, त्वचारोगांना सुरुवात होते. एखाद्याला दम्याचा त्रास असला आणि त्याने दम्यावर फक्त लक्षणे कमी करणारे उपचार घेतले तर तो दाबला गेलेला दोष रक्तामार्फत त्वचेवर प्रत्यक्ष होतो व परिणामतः त्वचेवर ॲलर्जी, रॅशेस किंवा एक्झिमा, सोरायसिससारखे रोगही होताना दिसतात. आणि त्वचारोग असताना त्यावर खाज, डाग, वगैरे कमी करणारी औषधे घेतली तर श्र्वसनाचा त्रास सुरू होतो. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने रक्ताद्वारा किंवा फुप्फुसांद्वारा दोष किंवा विषद्रव्ये शरीरात तयार होणार नाहीत यासाठी काळजी घ्यायलाच हवी.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे म्हणतात, ‘‘फुप्फुसे जेवढी मोकळी राहतील तेवढा प्राण जास्त आकर्षित होतो, जेवढा प्राण अधिक मिळतो तेवढी ताकद वाढते, वीर्य वाढते आणि मनुष्याचे एक तर रोगापासून संरक्षण होते, रोग असला तर तो बरा होण्याची सुरुवात होते.’’ हे सगळं होण्यासाठी योगशास्त्राने सांगितलेला सोपा उपाय म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणायाम हे केवळ शरीरापुरता मर्यादित नसून त्यात शरीर, मन, इंद्रिय व आत्मा या सर्वांचे संतुलन साधण्याची क्षमता आहे.

सध्या वाढत असलेल्या मधुमेह, हृदयविकार, मानसिक ताण वगैरे रोगांवर प्राणायामासारखा सोपा व प्रभावी उपाय सापडणार नाही. हवेतील प्रदूषण, वाढता जंतुसंसर्ग यापासून रक्षण होण्यासाठी इतकेच नाही तर नैराश्य, कंटाळा, भीती, असुरक्षितता वगैरे मानसिक विकारांवर सुद्धा प्राणायामाचा उत्तम उपयोग होतो. अनुलोम-विलोम हा प्राणायामाचा प्रकार सोपा व कोणालाही सहज करता येण्याजोगा असतो. मात्र कुंभकयुक्त म्हणजे श्र्वास आत-बाहेर धरून ठेवून करावयाचा प्राणायाम करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. उचकी, खोकला, दमा हे तीन श्र्वसनसंस्थेशी संबंधित विकार.

उचकी

उचकीकडे सहसा रोग यादृष्टीने बघितले जात नाही, पण कधी उचकी थांबत नसली तर खूप त्रास होतो. साध्या उचकीवर पाणी पिणे, किंवा थोडासा मध चाटणे पुरेसे असते. मात्र या उपायांनी उचकी थांबली नाही तर त्यावर खालील उपाय करता येतात.

 • सैंधव मीठ विरघळवलेले पाण्याचे थेंब नाकात घालण्याने उचकी थांबते.

 • अख्खा वेलदोडा जाळून तयार केलेली राख किंवा मोराची पिसे जाळून तयार केलेली राख मधासह मिसळून थोडी थोडी चाटल्यासही उचकी थांबू शकते.

 • वेखंडाची धुरी घेतल्यास उचकी थांबण्यासाठी फायदा होऊ शकतो.

 • कित्येकदा मृदु विरेचन किंवा बस्ती देऊनही उचकी थांबवावी लागते.

खोकला

खोकला ज्या कारणामुळे झाला असेल त्यानुसार उपाय बदलता येतात. तरीही सामान्यतः छाती-पोटाला-पाठीला तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, सीतोपलादि चूर्ण, तालिसादि चूर्ण, ब्राँकोसॅन सिरप, प्राणसॅन योगसारखी औषधे घेणे, ढास लागत असता लवंगादि वटी, खदिरादि वटी, द्राक्षादि वटी सारख्या गोळ्या चघळणे, बराच कफ असल्यास चित्रकादि वटी, अभ्रक भस्म, श्र्वासकासचिंतामणी वगैरे औषधेही घेता येतात. अगोदर छातीला तेल लावून, यासाठी संतुलन अभ्यंग सिद्ध तेल लावणे सर्वांत चांगले, तव्यावर गरम केलेल्या रुईच्या पानांनी छाती-पाठीवर शेकण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. दम्याच्या त्रासातही या उपायाचा उत्तम अनुभव येतो. दोन कप पाण्यात करंगळीच्या आकाराचे ज्येष्ठमध, अर्धा बेहडा , २-३ अडुळशाची पिकलेली पाने टाकून अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत उकळवून तयार केलेला काढा खोकल्यावर अप्रतिम उपयोगी पडताना दिसतो.

दमा

दम्याचा त्रास वात व कफ या दोघांच्या असंतुलनामुळे होतो. दमा बहुधा थंड वातावरणात, ढगाळ-दमट वातावरणात वाढतो, तसेच रात्रीच्या अंतिम प्रहरी म्हणजेच सूर्योदयाच्या अगोदर एक-दोन असताना होतो. दमा बऱ्याच वर्षांचा असला किंवा अतिशय वाढलेल्या स्थितीत असला तर मात्र कधीही त्रास होऊ शकतो. दम्याचा त्रास असणाऱ्यांना खालील उपायांची योजना करता येईल.

 • दम्याचा वेग येईल असे वाटत असल्यास लगेच अभ्यंग तेलासारखे औषधांनी सिद्ध तिळाचे तेल कोमट करणे, त्यातच थोडेसे मीठ घालावे व छातीला-पाठीला हलक्या हाताने चोळणे, वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करणे किंवा उकळत्या पाण्यात तुळशी, ओवा, पुदिना, लवंग, कापूर, निलगिरीचे तेल यातील मिळतील त्या गोष्टी टाकून वाफारा घेणे.

 • संतुलन फॉर्म्युला के २ पासून बनविलेला काढा काही दिवस नियमाने घेणे.

 • लहान मुलांना छातीत कफ भरल्याने दम लागत असल्यास वरील पद्धतीनेच अगोदर तेल लावून वरून ओव्याच्या पुरचुंडीने शेक करणे. श्र्वास नीट चालावा, श्र्वसनसंस्थेचे आरोग्य नीट राहावे यासाठी खालील उपाय करता येतील.

 • रोज सकाळी किंचित कोमट पाण्यात चमचाभर मध घालून घेणे.

 • दिवसातून एक वेळ आले, पुदिन्याची पाने, गवती चहा टाकून तयार केलेला हर्बल चहा पिणे किंवा सॅन अमृत हर्बल ब्रू पासून बनविलेला हर्बल चहा पिणे.

 • स्वयंपाक करताना दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ, लसूण अशा गोष्टींचा वापर करणे.

 • नेहमीच्या चहात थोडेसे किसलेले आले व तुळशीची २-३ पाने टाकणे.

दीर्घश्र्वसनाची सवय आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली. वरचेवर किंवा भराभर श्र्वास न घेता श्र्वासावर लक्ष ठेवून श्र्वास जणू पोटापर्यंत जातो आहे, श्र्वासाच्या माध्यमातून मिळालेला प्राण शरीरातील अणुरेणूपर्यंत पोचतो आहे भाव ठेवला तर तो आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतो.