आरोग्य केसांचे...

‘इतके केस गळताहेत की काही केलं नाही तर टक्क्लच पडेल’ किंवा ‘अजून तिशी ओलांडली नाही तरी माझे केस पांढरे व्हायला लागले आहेत’ अशी वाक्ये आजकाल अनेकदा ऐकायला मिळतात.
Hair health
Hair healthsakal
Summary

‘इतके केस गळताहेत की काही केलं नाही तर टक्क्लच पडेल’ किंवा ‘अजून तिशी ओलांडली नाही तरी माझे केस पांढरे व्हायला लागले आहेत’ अशी वाक्ये आजकाल अनेकदा ऐकायला मिळतात.

- डॉ. भाग्यश्री झोपे

‘इतके केस गळताहेत की काही केलं नाही तर टक्क्लच पडेल’ किंवा ‘अजून तिशी ओलांडली नाही तरी माझे केस पांढरे व्हायला लागले आहेत’ अशी वाक्ये आजकाल अनेकदा ऐकायला मिळतात. कधी कधी तर शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींचे केस पांढरे झालेले आढळतात. केस सौंदर्याचे प्रतीक असतातच, पण आरोग्याचेही निदर्शक असतात. आयुर्वेदात केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे. त्यामुळे हाडे मजबूत असली, शरीरशक्ती चांगली असली तर केसांच्या तक्रारी सहसा उद्भवत नाहीत. यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते की केस गळणे, अकाली पांढरे होणे, दुभंगणे वगैरे तक्रारी असतील तर त्यावर मुख्य उपाय आतून करावे लागतात, हाडांची, शरीराची शक्ती वाढवण्यासाठी उपचार करावे लागतात.

आहाराचा विचार करता केसांसाठी सर्वांत हानिकारक गोष्ट म्हणजे कच्चे आणि अति प्रमाणात सेवन केलेले मीठ. मीठ एक तर नैसर्गिक असावे, त्यावर कोणताही प्रक्रिया केलेली नसावी. या दृष्टीने खडा मीठ किंवा त्याहून चांगले म्हणजे सैंधव मीठ वापरणे श्रेयस्कर असते. स्वयंपाक करताना भाजी, आमटी वगैरे पदार्थ शिजवताना चवीपुरते टाकलेले मीठ खाणे पुरेसे असते. ताटात वाढलेल्या पदार्थांवर वरून मीठ घेणे टाळणेच योग्य. याचा अजून एक अर्थ असा होतो की पाणीपुरी, वेफर्ससारखे कच्चे मीठ टाकून तयार केलेले पदार्थ क्वचितच खावे. ताक किंवा सरबत पितानाही त्यात चिमूटभर मीठ, तेही शक्यतो सैंधव मीठ टाकून घेणे चांगले. कच्चे मीठ किंवा पापडखारासारखा क्षार जितका अधिक शरीरात जाईल तितके हाडांचे, पर्यायाने केसांचे नुकसान होत असते हे नक्की.

टोमॅटो, चिंच, कैरी, स्ट्रॉबेरीसारखी फळे अति प्रमाणात खाणे किंवा दह्यासारखे आंबट पदार्थ नियमित सेवन करणे हे सुद्धा हाडांना आतून ठिसूळ करते, पर्यायाने केस गळणे, पांढरे होणे वगैरे तक्रारींना आमंत्रण देणारे असते. आमचूर, चाट मसाल्याचे रोजच्या आहारात वापर करण्याचे प्रमाण सध्या वाढलेले दिसते, त्यावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक होय. शरीरातील उष्णता अधिक होण्यानेही केसांच्या तक्रारी जाणवू लागतात. विशेषतः रात्री १२ नंतरचे जागरण, दुपारी वेळेवर न जेवणे, स्क्रीनचा अति वापर करणे, चमचमीत, मसालेदार गोष्टी सेवन करणे, चीज, दही, अंडी, मांसाहार वगैरे कारणांनी उष्णता वाढली, शरीराचे तर्पण करणारा रसधातू कमकुवत झाला तर त्यामुळेही केसांच्या तक्रारी उद्भवतात. अशा वेळी आहारात, जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणे तर आवश्यक असतेच, बरोबरीने आहारात घरी बनविलेले साजूक तूप, गुलकंद, खारीक, काळ्या मनुका, अंजीर वगैरे गोष्टी समाविष्ट करण्याचा उपयोग होतो. रोज सकाळी शतावरी कल्प घालून दूध घेणे, सॅनरोझ, धात्री रसायनसारखे रसायन घेणे, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पादाभ्यंग करणे उपयुक्त असते. शास्त्रशुद्ध विरेचन करून नंतर अशी शरीरपोषक रसायने सेवन केली तर अजूनच उत्तम उपयोग होताना दिसतो. केसांचे गळणे थांबविण्यासाठी त्रिफळा चूर्ण-मध-तूप हे मिश्रण घेण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. एक चमचा त्रिफळा चूर्ण, एक चमचा तूप व अर्धा चमचा मध याप्रकारे मिश्रण तयार करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचे असते. अकाली वयात केस पांढरे होत असतील तरी हा उपाय करता येतो. हेअरसॅन गोळ्या खास केसांच्या आरोग्यासाठी बनविल्या आहेत. हाडे व केस या दोघांचे पोषण यामुळे होताना दिसते. लहान वयात १-१ गोळी तर मोठ्या वयात २-२ गोळ्या याप्रमाणे स्त्री व पुरुष दोघेही ही गोळी घेऊ शकतात. २-३ आठवडे नियमित सेवनाने याचा उत्तम उपयोगही होताना दिसतो.

बरोबरीने केसांच्या पोषणासाठी काही स्थानिक उपाय योजता येतात. केस धुण्यापूर्वी अर्ध्या तासासाठी डोक्याला ओल्या नारळाचे दूध लावून ठेवण्याने केस गलणे कमी होते. जास्वंद, माका, मेंदी वगैरे उत्तमोत्तम केश्य द्रव्यांचा संस्कार करून बनविलेले संतुलन व्हिलेज हेअर तेल हे सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. आठवड्यातून २-३ वेळा हलक्या हाताने हे तेल केसांच्या मुळाशी तसेच केस लांब असल्यासे संपूर्ण केसांना लागण्याचा उपयोग होताना दिसतो. यामुळे केस निस्तेज दिसणे, दुभंगणे, पटकन तुटणे वगैरे इतरही तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्या पूर्वी हे तेल लावले तर शांत झोप यायलाही मदत मिळते. केसांच्या आरोग्याबाबत तसेच सौंदर्याबाबत बोलत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे कृत्रिम रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या उत्पादनांपासून केसांना सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे होय. सध्या बाजारात तऱ्हेतऱ्हेचे शांपू, कंडिशनर, हेअर हाय, हेअर कलर वगैरे अनेक उत्पादने उपलब्ध असतात. त्यामुळे तात्पुरता गुण येत असला तरी त्याचे केसावर, त्वचेवर इतकेच नाही तर एकंदर आरोग्यावर अनेक दूरगामी दुष्परिणाम होत असतात. कधीतरी एखाद्या प्रसंगासाठी या गोष्टी वापरणे वेगळे, पण सातत्याने अशा रासायनिक उत्पादनांची सवय लावून घेणे जाणीवपूर्वक टाळायला हवे. रिठा, शिकेकाई, आवळा, कापूरकाचरी वगैरे द्रव्यांच्या मिश्रणाने किंवा तयार संतुलन सुकेशाने केस धुता येतात. कोरफड, जास्वंदीची फुले यांच्या मदतीने केसांचे कंडिशनिंग करता येते. मेंदी, नीलिका या वनस्पतींच्या मदतीने केस काळे करता येतात. आणि हे सगळे करताना आरोग्य पणाला लागत नाही, उलट सौंदर्य व आरोग्य दोघांचा एकत्रित लाभ करून घेता येतो.

केसांच्या आरोग्यासाठी काही अनुभवसिद्ध टिप्स पुढीलप्रमाणे -

  • स्त्री-पुरुष दोघांनीही रोज निदान एकदा तरी केस नीट विंचरावेत. लांब केस असल्यास हळुवार हाताने आणि केसांच्या टोकापासून ते वर अशा पद्धतीने गुंता काढावा.

  • केस ओले असताना विंचरू नयेत किंवा कोरडे करण्यासाठी टॉवेलने जोर लावून पुसू-झटकू नयेत.

  • डोक्याला तेल लावताने हळुवार हाताने, शक्यतो बोटाच्या टोकांनी लावावे. टाळूवर थोडे तेल नक्की जिरवावे.

  • केस गळत असले, अकाली पांढरे होत असले तर रात्री झोपण्यापूर्वी नाकात नस्यसॅन घृताचे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे २-३ थेंब टाकण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com