डोकेदुखी!

दुखणं, वेदना कोणालाच नको असतात. पण इतर कोणत्याही दुखण्यापेक्षा डोकेदुखी वेगळी असते, अधिक त्रासदायक असते हा अनेकांचा अनुभव असेल.
Headache
HeadacheSakal
Summary

दुखणं, वेदना कोणालाच नको असतात. पण इतर कोणत्याही दुखण्यापेक्षा डोकेदुखी वेगळी असते, अधिक त्रासदायक असते हा अनेकांचा अनुभव असेल.

- डॉ. भाग्यश्री झोपे

दुखणं, वेदना कोणालाच नको असतात. पण इतर कोणत्याही दुखण्यापेक्षा डोकेदुखी वेगळी असते, अधिक त्रासदायक असते हा अनेकांचा अनुभव असेल. डोकेदुखी हे खरे तर एक लक्षण असते, त्यामुळे ते का उद्‌भवले याचा शोध घेणे आवश्यक. डोके कसे दुखते, कधी दुखते, कुठे दुखते, किती दुखते, डोकेदुखीच्या बरोबरीने इतर कोणती लक्षणे असतात या सर्व गोष्टी विचारात घेतल्या, मूळ कारणावर काम केले तर डोकेदुखीसारखा अवघड विकार बरा होऊ शकतो.

‘ऊर्ध्वमूलमधःशाखं’ म्हणजे शरीराचे मूळ वर असून इतर अंगप्रत्यंग खाली असतात. हे मूळ म्हणजे शिर किंवा मस्तक. त्यामुळे शरीराचे मूळ असणारे डोके दुखत असले तर त्यावर नेमका उपाय योजणे क्रमप्राप्त होय. त्याऐवजी डोके दुखायला लागले की एखादी वेदनाशामक गोळी घेणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे हे वेगळे सांगायला नको. पित्त वाढण्याने, अति मानसिक ताणामुळे, दाताच्या त्रासामुळे, रक्तदाब वाढल्याने, रक्तातील दोषामुळे, सायनोसायटिसमुळे, तापामध्ये, स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या आधी वा पाळीमध्ये, संगणकावर काम केल्याने डोळ्यांवर आलेल्या ताणामुळे, प्रखर प्रकाश वा सतत गोंगाट असणाऱ्या ठिकाणी दीर्घकाळ राहण्याने, जेवणाच्या-झोपेच्या वेळा अनियमित असल्याने, सतत प्रवास करण्याने अशा अनेक कारणांमुळे डोके दुखू शकते. मेंदूत गाठ असणे, मेंदूजलात दोष असणे, मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात एकाएकी बदल होणे अशी कारणेही क्वचित प्रसंगी असू शकतात. यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक असते.

  • साधारणतः डोके जड होऊन दुखत असले, खाली वाकण्याने दुखणे वाढत असले तर त्याचा संबंध कफदोषाशी असतो. यावर आल्याचा रस व मध एकत्र करून तयार केलेले चाटण उपयोगी पडते. दुधात किंवा पाण्यात दालचिनी, जायफळ, लवंग व रक्तचंदन यांचा उगाळून तयार केलेला लेप कपाळावर लावण्याचा उपयोग होतो. निर्गुडी, कडुनिंब, तुळशी यांची पाने पाण्यात घालून वाफारा घेण्याचाही फायदा होतो. दुपारी झोपणाऱ्या किंवा सकाळी उशिरा उठणाऱ्या व्यक्तींमध्ये, नियमितपणे दही, पनीर, थंड दूध, फ्रोजन पदार्थ खाणाऱ्यांमध्ये वारंवार डोके जड होऊन दुखण्याची प्रवृत्ती दिसते.

  • मानेतून डोके दुखण्याची सुरुवात होते तेव्हा त्यामागे मानसिक ताण हे मुख्य कारण असते. यावर मानेवर व दुखणाऱ्या भागावर नारळाचे तेल किंवा संतुलन रोझ ब्युटी तेल लावण्याचा, मन शांत करणारे संगीत ऐकण्याचा व विश्रांती घेण्याचा चांगला उपयोग होतो. अशा व्यक्तींनी नियमित पादाभ्यंग करणे, शिरोधारा घेणे, जटामांसीचा हिम घेणे, संतुलन मानस घृत, ब्रह्मलीन घृत, कोहळेपाक किंवा धात्री रसायन घेणे उपयोगी पडते.

  • जागरण, संगणकावर काम, उन्हात गेल्यामुळे, गाडी लागण्यामुळे जेव्हा डोके दुखते तेव्हा त्यावर पित्तशामक उपचार करावे लागतात. यात पादाभ्यंग करणे, टाळूवर नारळाचे तेल किंवा संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल लावणे, कामदुधा, प्रवाळपंचामृत, सूतशेखर, गुलकंद घेण्याचा उपयोग होतो. गुलाबजलात चंदन उगाळून त्याचा कपाळावर, विशेषतः शंखप्रदेशी लेप लावण्याने, दुधात भिजवलेली आवळकाठी बारीक करून त्याचा लेप टाळूवर लावण्याने बरे वाटते. साळीच्या लाह्या कोरड्या खाण्याचाही अशा डोकेदुखीवर फायदा होतो. पित्तामुळे डोके दुखते तेव्हा सहसा मळमळ, उलट्या किंवा जुलाब होतात आणि त्यानंतर डोके दुखणे कमी होते किंवा थांबते.

  • ठणका लागून डोके दुखते, खूप तीव्र डोकेदुखी असते तेव्हा सहसा वातप्रकोप झालेला असतो. यावर कानात तेल, नाकात नस्यसॅन घृताचे २-३ थेंब, टाळूवर ब्रह्मलीन तेल, नाभीवर व पायाच्या तळव्यांवर संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल लावण्याने बरे वाटते. डोके दाबण्याने जेव्हा बरे वाटते तेव्हा ते वातामुळे दुखत असते. या प्रकारच्या डोकेदुखीवर तिक्त बस्ती घेण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.

  • अर्धशिशी हा डोकेदुखीचा एक प्रकार सर्वपरिचित असतो. यात कपाळाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात, डोक्यातून आग निघत असल्यासारखे वाटते. यावर केशराचा संस्कार केलेले तूप नाकात टाकण्याचा उपयोग होतो. सुपारीच्या झाडाला कधी कधी निसर्गतःच अर्धी सुपारी येते, अशी अर्धी सुपारी पाण्यासह उगाळून तयार केलेला लेप दुखत असणाऱ्या बाजूवर लावण्यानेही अर्धशिशी दूर होते असा वृद्धवैद्याधार आहे.

  • अपचनामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने पोटात-छातीत जळजळ, मलावरोध, गॅसेस यासारखी लक्षणे असतात. यावर त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेणे, आहारात लाह्या, मुगाचे कढण, मऊ भात, साजूक तूप, तांदळाची किंवा ज्वारीचा भाकरी असे पदार्थ घेणे, दर १५ दिवसांनी एरंडेल तेल घेऊन पोट साफ करणे हे उपाय योजता येतात.

  • मासिक पाळीशी संबंधित असणाऱ्या डोकेदुखीवर योनीपिचू, गर्भाशयावर काम करणारे अशोकारिष्ट, शतावरी कल्प, अशोकादी घृत वगैरे औषधे घेण्याचा उपयोग होतो. पाळी वेळेवर येणे, अंगावरून तीन दिवस योग्य प्रमाणात जाणे, पांढरे पाणी न जाणे याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. उत्तरबस्तीसारखे उपचार करणेही चांगले असते.

  • योगशास्त्रातील शीतली, सित्कारी, अनुलोम-विलोम नियमित करणे, रोज थोडा वेळ स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे, ॐकार म्हणणे वा ऐकणे हे उपाय सुद्धा डोकेदुखीला दूर ठेवणारे असतात. पाचही इंद्रियांची मुख्य केंद्रे मस्तकात असल्याने इंद्रियांचे तर्पण-पोषण करण्याकडे लक्ष दिल्यास डोकेदुखीसुद्धा टाळता येते. यादृष्टीने कानात श्रुती तेल, नाकात नस्यसॅन घृत, डोळ्यात अंजन व सुनयन तेल, सकाळी उठल्यावर इरिमेदादी किंवा संतुलन सुमुख तेलाचा गंडूष, पादाभ्यंग, टाळूवर ब्रह्मलीन तेल यांचा आलटून पालटून रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम होय.

वेदनाशामक गोळीची सवय न लावता असे साधे उपचार केले तर हळूहळू डोकेदुखीची प्रवृत्ती निश्र्चित कमी होते. अन्यथा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे, काही तपासण्या करून घेणे हेसुद्धा गरजेचे असते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे सर्व प्रकारची प्रसिद्धी, सर्व प्रकारचा मान, समाजातील स्थान, एकूणच सर्व जीवन ज्या डोक्यावर अवलंबून आहे ते डोके डोकेदुखीने त्रस्त होणार नाही यासाठी दक्ष राहणे हेच श्रेयस्कर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com