आरोग्य हेच स्वातंत्र्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health is freedom

या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आपण सर्वजण खरोखरच भाग्यवान आहोत.

आरोग्य हेच स्वातंत्र्य!

- डॉ. भाग्यश्री झोपे

या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आपण सर्वजण खरोखरच भाग्यवान आहोत. पण स्वातंत्र्य हे फक्त देशापुरते सीमित असते का? स्वातंत्र्य म्हणजे कोणावरही अवलंबून नसणे, मनात कशाचाही भीती नसणे, मनात असणाऱ्या चांगल्या गोष्टींना प्रत्यक्षात आणण्याची मोकळीक असणे. जरा विचार केला तर लक्षात येईल की भारतीय म्हणून, समाज म्हणून जरी आपण स्वतंत्र असलो तरी ती स्वतंत्रता व्यक्तिगत पातळीवर अनुभवण्यासाठी आरोग्य हे लागतेच आणि ते फक्त स्वतःपुरते मर्यादित असून चालत नाही तर आपला परिवार, ज्यांच्या समवेत आपण राहतो तो समाज आणि सर्वांत महत्त्वाचे पर्यावरण, निसर्ग या सर्वांच्या आरोग्यावर आपले आरोग्य अवलंबून असते. कोविड-१९ या पॅन्डेमिकच्या निमित्ताने आपण सर्वजण एकमेकांवर, पर्यावरणावर किती अवलंबून आहोत याचा अनुभव घेतला आहेच. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वतःच्या सुखाची, कैक वेळा जिवाचीही पर्वा न करता अनेक अनेक स्वातंत्र्यवीरांना अखंड काम केले, ज्याची परतफेड करणे अश्ररशः अशक्य आहे, पण फूल ना फुलाची पाकळी या स्वरूपात जर आपण सर्वांगीण आरोग्यासाठी दक्ष राहिलो तर भारतदेशाच्या विकासाला हातभार लावू शकू. सुरुवात करू या, पर्यावरणाच्या आरोग्यापासून.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात, ‘निसर्गाला आपली गरज नाही, आपण मात्र पदोपदी निसर्गावर अवलंबून आहोत.’ अन्न असो, घर बांधण्यासाठी लागणारे लाकूड असो, वाळू असो, कपड्यांसाठी लागणारा कापूस असो, श्र्वास घेण्यासाठी लागणारी हवा असो, यासारख्या सर्वच गोष्टींसाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. जरासा ऋतुबदल झाला तर त्याचा मोठा फटका आपल्याला बसू शकते. पूर, भूकंपादी नैसर्गिक संकटांमुळे अख्खे संसार उध्वस्त होऊ शकतात. पण निसर्गाचा कोप उगाचच होतो का? आपणच केलेले प्रदूषण, वाटेल तेथे कचरा टाकणे, सरकारने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातलेली असली तरी हट्टाने भाजीवाल्याला पिशवी देण्यास भाग पाडणे, श्रेयसाचा विचार व करता फक्त क्षणिक सुखांचा, स्वतःच्या फायद्याचा विचार करून रासायनिक द्रव्यांचा वारेमाप वापर करणे आणि अशा कितीतरी कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्यातून व्यक्तिगतच नाही तर संपूर्ण समाजाचे, भावी पिढीचे मोठे नुकसान होत असते. हे टाळायचे असेल तर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

सरकार, समाज आणि समाजातील एक घटक म्हणून आपण सर्व अशा सर्वांच्या सहकार्याने पर्यावरणाचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करता येईल. यासाठी घरातील कचऱ्याची नीट विल्हेवाट लावणे, प्लॅस्टिकऐवजी कागदाचा किंवा कापडाचा वापर करणे, एकदा वापरले आणि फेकून दिले अशी उत्पादने न वापरता दीर्घकाळासाठी टिकणाऱ्या गोष्टी वापरणे आवश्यक ठरेल. यात लिहायच्या पेनपासून ते स्टीलच्या बादलीपर्यंत, लाकडी टूथब्रशपासून ते कापडी पिशवीपर्यंत अशा अनेक बाबींचा समावेश होतो. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी सकाळ- संध्याकाळ घरात तसेच ज्या हॉलमध्ये किंवा मंदिरात चार लोक जमतात तेथे विशिष्ट औषधी वनस्पतींचा धूप करण्याचा उपयोग होतो. यासाठी कापूर, कडुनिंब, तूप, वावडिंग, गुग्गुळ वगैरे द्रव्ये किंवा तयार संतुलन प्युरिफायर धूप वापरता येतो. विजेचा वापर जपून करणे, घरात एखादा तिळतेलाचा दिवा तेवत ठेवणे, सकाळ-संध्याकाळ तुपाचे निरांजन लावणे हे सुद्धा पर्यावरणाच्या शुद्धीसाठी सहायक असते. पाण्याचा वापर जपून करणे, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेल्या साबण, शांपू वगैरे उत्पादनांऐवजी आयुर्वेदिक उटणे, शिकेकाई, रिठा वगैरे द्रव्यांचा वापर करणे हे जलप्रदूषणाला आळा घालण्यास मदत करू शकते. ध्वनिप्रदूषणासाठी मंत्रजागर, वेदपठण, श्रीमद्‌भगवद्‌गीता श्रवण या गोष्टींची मदत होऊ शकते.

सामाजिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील सद्‌वृत्तपालनाचा उपयोग होतो. उदा.,

  • न पन्थानमवमूत्रयेत्‌ - रस्त्यावर मूत्रत्याग करू नये.

  • जनवति श्‍लेष्मसिङ्घाणकं मुञ्चेत्‌ - ज्या ठिकाणी जनसमूह एकत्र आला आहे, त्या ठिकाणी नाक शिंकरू नये किंवा घशातून कफ काढू नये.

  • नासंवृतमुखः कुर्यात्सभायां सुविचक्षणाः । कासं हासं तथोद्गारं जृम्भणं क्षवथुं तथा ॥ - सभेमध्ये, लोक एकत्र जमलेल्या ठिकाणी तोंड झाकल्याशिवाय खोकू नये, हसू नये, ढेकर, जांभई किंवा शिंक देऊ नये.

  • न नियमं भिन्द्यात्‌ - स्वतःचा किंवा एखाद्या संस्थेचा नियम मोडू नये.

  • न मद्यद्यूतवेश्‍याप्रसङ्गरुचिः स्यात्‌ - मद्यपानाची, द्यूत खेळण्याची व वेश्यागमनाची इच्छा ठेवू नये.

  • दुसऱ्या व्यक्तीचे कपडे घालू नयेत.

  • दुसऱ्या व्यक्तीने घातलेली फुले, गजरा वगैरे घालू नये.

याबरोबरीने घरामध्ये किंवा घराबाहेर पाणी साठून राहणार नाही याकडे लक्ष ठेवणे, घराच्या आसपास तुळशी, कडुनिंब, करंज, कदंब वगैरे झाडे लावणे, पिण्याच्या पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ करणे या गोष्टी सांभाळणेसुद्धा चांगले. वैयक्तिक आरोग्य सर्वांत महत्त्वाचे. वय वाढले तरी सर्व इंद्रियांनी, सर्व अवयवांनी आपापले काम चोखपणे करत राहावे यासाठी मार्गदर्शन करणारे आयुर्वेदशास्त्र हे यासाठी उत्तम होय. मुळात रोग होऊच नये म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या यांचे पालन करणे, स्वतःची प्रकृती जाणून त्यानुसार आहारयोजना करणे, ऋतुबदलानुसार आहार-आचरणात बदल करणे, प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी रसायनसेवन करणे, नियमित चालणे, योगासने करणे हे यादृष्टीने आवश्यक. तरीही रोग झालाच तर तो लवकरात लवकर आणि योग्य औषधांनी बरा करण्याचा प्रयत्न करणे, रोगाची लक्षणे केवळ दबवणारी औषधयोजना मर्यादित काळासाठी वापरली किंवा त्रास सुसह्य करण्यासाठी एखाद्या वेळी वापरली तर गोष्ट वेगळी, मात्र रिपोर्टस् व्यवस्थित येतील पण रोग मात्र आतल्या आत बळावत राहील अशा प्रकारच्या औषधयोजनेपासून दूर राहणे सुद्धा नक्कीच श्रेयस्कर. संपूर्ण भावी पिढीचे आरोग्य आणि भविष्य स्त्रीवर अवलंबून असते. स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन या विषयांवर श्रीगुरुजींनी खूप संशोधन केले, अप्रतिम उपयोगी पडतील अशी औषधे बनवली. ते म्हणत, ‘‘गर्भाशय हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे.’’ आणि खरोखरच गर्भाशय काढून टाकणे हाच एकमेव पर्याय नसल्याचे त्यांनी हजारो केसेसमध्ये सिद्ध करून दाखविले.

आजही संतुलनमध्ये अशा अनेक स्त्रिया येतात, योग्य निदान करून योग्य औषधोपचार सुरू केले, आवश्यकता असल्यास पंचकर्मातील आवश्यक ते उपचार करून घेतले की त्यांचे त्रास कमी होतात, मनातील भीती नाहीशी होते आणि गर्भाशयासारखा अवयव गमवावा लागत नाही. स्त्रीसंतुलन हा विषय आयुर्वेदानेच साध्य करता येतो हा श्रीगुरुजींच्या विश्र्वासाचा प्रत्यय आजही संतुलनमध्ये आम्ही घेत असतो. वयाच्या ३५ ते ४०च्या दरम्यान एकदा पंचकर्म करून घेणे, त्यानंतर जीवनशैलीनुसार दर ३ ते ५ वर्षांनी शरीरशुद्धी करणे, नियमित अभ्यंग, पंचज्ञानेंद्रियांची काळजी या गोष्टी सुद्धा वैयक्तिक आरोग्यात अंतर्भूत होतात. आयुर्वेदाची साथ घेतली तर निरोगी दीर्घायुष्याचा तर लाभ होईलच, पण ते जगत असताना खऱ्या स्वातंत्र्याचाही अनुभव घेता येईल.

Web Title: Dr Bhagyashri Zope Writes Health Is Freedom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..