स्मरणशक्ती....

संस्कृत भाषा आणि मेंदूचा विकास यावर आधुनिक शास्त्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन होते आहे. भारतीय ऋषिमुनींनी तर याचा हजारो वर्षांपासून कल्पकतेने उपयोग करून घेतलेला आहे.
Memory
MemorySakal

- डॉ. भाग्यश्री झोपे

संस्कृत भाषा आणि मेंदूचा विकास यावर आधुनिक शास्त्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन होते आहे. भारतीय ऋषिमुनींनी तर याचा हजारो वर्षांपासून कल्पकतेने उपयोग करून घेतलेला आहे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे सांगतात, ‘संस्कृतची विशेषता अशी की अर्थ समजला नाही तरी संस्कृत मंत्र, स्तोत्रे संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे मेंदूवर काम करतात, स्पंदनांमार्फत संपूर्ण शरीरावर काम करू शकतात’. म्हणूनच रोज संस्कृत भाषेतील एखादे तरी स्तोत्र ऐकावे, शुद्ध उच्चारात म्हणावे, ॐकार म्हणावा.

सर्वांगीण आरोग्यासाठी जसे शरीर बलवान, धडधाकट असावे लागते तसेच मन, बुद्धी,अहंकार ही सूक्ष्म तत्त्वे सुद्धा शुद्ध व संपन्न अवस्थेत राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयुर्वेदात जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केलेला असल्याने या विषयावरही मार्गदर्शन केलेले आहे. ‘स्मर्तृगामी स माऽवतु’ म्हणजे स्मरण करताच जे भक्तरक्षणासाठी प्रकट होतात अशा सद्‌गुरु श्रीदत्तात्रेयजयंतीच्या निमित्ताने स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी काय प्रयत्न करता येतात याची माहिती करून घेऊ या. स्मृती हा बुद्धीचाच एक भाव. पूर्वी पाहिलेले, अनुभवलेले किंवा ऐकलेले लक्षात राहण्यासाठी स्मृती चांगली असावी लागते. बऱ्याचदा असे वाटू शकते की स्मरणशक्ती फक्त अभ्यासासाठी, परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक आहे. पण दैनंदिन जीवन जगण्यासाठी स्मृती खूप महत्त्वाची असते, प्रज्ञापराध न होता, म्हणजेच अनैसर्गिक गोष्टी हातून न घडता, आरोग्य टिकून राहण्यासाठी स्मृती अत्यावश्‍यक असते आणि त्याच्याही पलीकडे सृष्टीतील सर्व तत्त्वांचे यथार्थ स्वरूप काय आहे याचे स्मरण करून देणारी तत्त्वस्मृती ही आत्मज्ञान होण्यासाठी गरजेची असते. थोडक्यात, स्मृतीसंपन्नतेसाठी सर्वांनीच जागरूक राहायला हवे, आवश्‍यक ते प्रयत्न करायला हवेत. स्मृतीमध्ये विकृती आली की स्मृतिभ्रंश, अपस्मार, अतत्त्वाभिनिवेश (स्मृतिविभ्रम) वगैरे मानसरोग उत्पन्न होतात असेही आयुर्वेद सांगतो. स्मृतीमध्ये बिघाड होऊ शकतो हे जसे आयुर्वेदाला मान्य आहे तसेच स्मृती संपन्न करण्याचे उपायही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत.

केशर, सुवर्ण, शतावरी वगैरे द्रव्ये आयुर्वेदात बुद्धी-स्मृतीवर्धक सांगितलेली आहेत. रोज सकाळी पंचामृतयुक्त अमृतशर्करा घेण्याने लक्षात न राहणे, मन एकाग्र होऊ न शकणे, शब्द न आठवणे वगैरे तक्रारींवर उत्तम परिणाम मिळताना दिसतात. हे त्रास होऊ नयेत यासाठी आधीपासूनच रोज सकाळी दिवसाची सुरुवात अशा पंचामृताने करणे उत्तम. शतावरी गर्भारपणात तसेच बाळंतपणात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. शतावरी फक्त स्त्रियांनीच घ्यायची असते का, असा प्रश्र्न सध्या अनेकदा विचारला जातो, पण खरे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कोणालाही , स्त्री-पुरुष दोघांनाही शतावरी कल्प घेता येतो. शतावरी कल्प शरीरातील उष्णता कमी करतो, मेंदू शांत ठेवतो, शक्ती वाढवतो, प्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत करतो. ए२ गाईच्या दुधात घालून रोज सकाळी १-२ चमचे शतावरी कल्प घेण्याची सवय उत्तम होय. सुवर्ण सुद्धा बुद्धी-स्मृतीसाठी एक उत्तम रसायनद्रव्य आहे. प्रत्येकाच्या घरी थोडे तर सोने असतेच. २४ कॅरट शुद्ध सोने पाण्यात टाकून २० मिनिटांसाठी उकळलेल्या पाण्याला सुवर्णसिद्धजल म्हणतात. घरातील सर्वांसाठी हे संस्कारित पाणी आरोग्यकारक असते. मेंदू, स्मृती, बुद्धी, एकाग्रता या सर्वांसाठी पोषक असते.

पाणी उकळताना त्यात घातलेले सोने झिजत नाही, वजनाने कमी होत नाही, मात्र पाण्यावर संस्कार करण्यासाठी सक्षम राहते. ब्राह्मी, वेखंड, शंखपुष्पी वगैरे वनस्पती मुख्यत्वे मेंदूवर काम करतात, बुद्धी- स्मृतीसंपन्नतेसाठी उत्तम असतात. अशा द्रव्यांची पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या साजूक तुपावर संस्कार करून बनविलेले संतुलन ब्राह्मी तुपासारखे आयुर्वेदिक तूप सुद्धा या दृष्टीने उत्तम असते. अल्झायमर्स सारखा गंभीर आजार होऊ नये किंवा झालेला असला तर त्यात सुधारणा व्हावी म्हणून या तुपाचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. लहान मुलांमध्ये पहिल्या पाच वर्षांत जेव्हा मेंदूचा विकास लक्षणीय रीतीने होत असते तेव्हा आणि चाळिशीनंतर जेव्हा लक्षात राहण्याची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा रोज ब्रह्मलीन घृत घेणे उत्तम असते नवजात बालकाला बाळगुटीत तुपाचे १-२ थेंब टाकता येतात. बालक मोठे होईल तसतशी मात्रा क्रमाक्रमाने वाढवत नेता येते. साधारण दोन वर्षांपर्यंतच्या बालकाला एक अष्टमांश चमचा, पाच वर्षांपर्यंतच्या बालकाला पाव चमचा व दहा वर्षांपर्यंतच्या बालकाला अर्धा चमचा या क्रमाने तुपाचे प्रमाण वाढवता येते.

संस्कृत भाषा आणि मेंदूचा विकास यावर आधुनिक शास्त्रांतही मोठ्या प्रमाणावर संशोधन होते आहे. भारतीय ऋषीमुनींनी तर याचा हजारो वर्षांपासून कल्पकतेने उपयोग करून घेतलेला आहे. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात, ‘संस्कृतची विशेषता अशी की अर्थ समजला नाही तरी संस्कृत मंत्र, स्तोत्रे संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे मेंदूवर काम करतात, स्पंदनांमार्फत संपूर्ण शरीरावर काम करू शकतात’. म्हणूनच रोज संस्कृत भाषेतील एखादे तरी स्तोत्र ऐकावे, शुद्ध उच्चारात म्हणावे, ॐकार म्हणावा. यामुळे मेंदूवर, शरीरातील सूक्ष्म तत्त्वांवर अतिशय उत्तम प्रकारे काम करता येते. गर्भसंस्कार, स्त्रीसंतुलन, योगनिद्रा संगीत याच धर्तीवर काम करतात. संस्कृत पाठांतर करत राहण्याने मेंदूची शक्ती वाढते, मेंदूचे कार्य चांगले होत राहते हा अनुभव कायम येतो. शरीरामध्ये प्राणशक्तीचे अभिसरण जेवढे चांगले होईल तेवढी स्मरणशक्ती चांगली राहायला मदत मिळते. त्यासाठी अनुलोम-विलोम, प्राणायाम, ॐकार गूंजन, भस्रिका, दीर्घश्र्वसन वगैरे उत्तम होत. योगासने, विशेषतः शवासन, शीर्षासन, योगनिद्रा हेही स्मृतीसाठी उत्तम असतात. अशा प्रकारे शारीरिक आरोग्य असो, मानसिक वा बौद्धिक आरोग्य असो, त्यासाठी मेंदू, स्मृती, बुद्धी तल्लख राहणे व त्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्याच हातात आहे. श्रीदत्तजयंतीच्या निमित्ताने याचा शुभारंभ करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com