झळा उन्हाळ्याच्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heat Summer

चैत्र प्रतिपदा गुढी उभारून घरोघरी साजरी केली जाते न जाते तोच वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात होते.

झळा उन्हाळ्याच्या...

- डॉ. भाग्यश्री झोपे

चैत्र प्रतिपदा गुढी उभारून घरोघरी साजरी केली जाते न जाते तोच वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात छत्री, हिवाळ्यात उबदार कपडे वापरता येतात, पण उन्हाळ्यात पंखा-एसीची कितीही वापर केला तरी उन्हाचा चटका जाणवल्यावाचून राहत नाही. ऋतुमान बदलते त्यानुसार आपण आपल्या आहार-आचरणात बदल केले तर आरोग्य बिघडणार नाही हे आयुर्वेदातील वचन पडताळायचे असेल तर चला, उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी काय करावे, काय टाळावे याची माहिती करून घेऊ या.

आहार

वातावरणात जसजशी उष्णता वाढते, तसतशी भूक कमी होत जाते. त्यामुळे हिवाळ्याच्या तुलनेत कमी प्रमाणात व पचायला सोपे अन्न सेवन करणे हे उन्हाळ्यात आवश्यक असते. हिवाळ्यातील थंडीमुळे शरीरात साठलेला कफ उन्हाळ्यातील उष्णतेमुळे विरघळायला लागला की जाठराग्नी मंदावतो आणि त्यामुळे भूक कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळी साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या घेणे, दुपारी १२ ते १ च्या दरम्यान वरण-भात, आमटी, पोळी-भाजी असा आहार घेणे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर साडेआठच्या दरम्यान हलके अन्न घेणे हे उत्तम होय. उन्हाळ्यामध्ये वेलवर्गीय फलभाज्यांवर भर द्यावा. गोड खायची इच्छा झाली तर तांदळाची खीर, गव्हाची खीर दुपारच्या जेवणात घेणे चांगले. संध्याकाळी ओल्या खोबऱ्याच्या दुधापासून बनविलेली सोलकढी, तांदळाचे घावन, मुगाची मऊ खिचडी-तूप, तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी व फळभाजी असे साधे पदार्थ सेवन करणे उत्तम. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये दही आवर्जून खाल्ले जाते. दही थंड असते हा त्यामागचा समज, खरे तर गैरसमजच म्हणायला लागेल. कारण दही स्पर्शाला थंड असते, खाताना जिभेला-घशाला थंड लागते, पण पोटात गेल्यावर मात्र उष्णवीर्याचे असल्यामुळे उष्णता वाढण्यास कारण ठरते. गोड दह्याचे भरपूर पाणी घालून केलेले पातळ ताक दुपारच्या जेवणानंतर घेण्यास हरकत नाही. आवडत असल्यास त्यात थोडी खडीसाखर, धण्याची पूड टाकली तर अजूनच चांगले.

उन्हाळ्यात काही तरी थंड पिण्याची इच्छा होणे स्वाभाविक असले तरी कोल्ड्रिंक किंवा फ्रिजमधले थंड पाणी पिणे टाळणेच श्रेयस्कर. प्रत्यक्षातही थंड पाणी पिण्याने क्षणभर बरे वाटले तरी तहान शमत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. या अतिप्रमाणात घेतल्या गेलेल्या पाण्याचा शरीरावर, पचनावर ताण न आला तरच नवल. वाळा-चंदन, अनंतमूळ यासारख्या शरीरात थंडावा निर्माणकरणाऱ्या, सुगंधी द्रव्यांचा संस्कार केलेले म्हणजे पाणी उकळताना त्यात २-३ चिमूट जलसंतुलन मिश्रण टाकून तयार झालेले संस्कारित पाणी मातीच्या मडक्यात भरून ठेवले व असे थंडगार पाणी प्यायले तर घोटभर पाण्यानेही समाधान होते, जीभ-घसाच नाही तर शरीरातील कण न् कण तृप्त झाल्याची अनुभूती येते. उन्हाळ्यात जेव्हा कैरी मिळण्यास सुरुवात होते तेव्हा पन्हे घेणे, द्राक्षांचे सरबत घेणे, लिंबू सरबत वा कोकम सरबत घेणे हे सुद्धा उत्तम होय. दूध, साजूक तूप, घरचे ताजे लोणी यांचा आहारात अवश्‍य समावेश करावा. उष्णतेमुळे वाढणारी रुक्षता कमी व्हावी व ताकद कायम राहावी यासाठी या सर्व गोष्टी उन्हाळ्यात वरदान होत. ओल्या नारळाचा वापर स्वयंपाकात अवश्‍य करावा. चिंचेऐवजी कोकम, लिंबू वगैरे आंबट पदार्थ वापरावेत. जिरे, धणे, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, दालचिनी, वेलची, वगैरे मसाले वापरून रुचकर भाज्या बनवाव्यात.

आचरण

उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेने शरीरशक्ती कमी झालेली असते. थोड्याही कष्टांनी थकवा येऊ शकतो. त्यामुळे अति व्यायाम, अति मैथुन, रात्रीचे जागरण, अति शरीरश्रम टाळणे चांगले. सकाळी किंवा संध्याकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालणे, दीर्घश्र्वसन तसेच संतुलन अमृत क्रिया, शीतली-सित्कारी प्राणायाम करणे, थकवा येणार नाही अशी योगासने करणे चांगले. उन्हाळ्यात तळपायांची आग, डोळे लाल होणे वगैरे तक्रारी असल्यास आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करणे, झोपताना बंद पापण्यांवर गुलाब पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या ठेवणे, अधून मधून तळपायांना मेंदी लावणे हे उपयुक्त असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात नस्यसॅन घृताचे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे २-२ थेंब टाकण्याने मस्तक शांत राहू शकते, डोकेदुखीला प्रतिबंध होऊ होऊ शकतो. उन्हाळ्यात येणारी मरगळ, थकवा दूर करण्याचे सामर्थ्य नैसर्गिक सुगंधातही असते.

यामुळेच निसर्गात मोगरा, सुगंधी गुलाब, सायली, चाफा यासारखी सुगंधी फुले भरभरून फुलत असतात. त्यामुळे घरात, अंगणात या फुलांच्या सान्निध्यात राहणे, ताजी फुले मिळणे अगदीच शक्य नसल्यास या फुलांपासून तयार केलेले १०० टक्के शुद्ध अत्तर वापरण्यासही हरकत नाही. औषधे व रसायने उन्हाळ्यात रोज सकाळी देशी गुलाबापासून बनविलेला गुलकंद सेवन करणे, उत्तम प्रतीच्या शतावरीपासून तयार केलेला शतावरी कल्प घातलेले दूध घेणे हे उत्तम होय. यामुळे उष्णता कमी होते, शरीरशक्ती टिकून राहते. कोहळा, मनुका वगैरे द्रव्यांपासून बनविलेले धात्री रसायन रोज सकाळ-संध्याकाळ घेणे हे सुद्धा उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरते. ऊन लागल्याने उन्हाळ लागत असल्यास सॅन यूरिकूल चूर्ण, सारिवाद्यासव, पुनर्नवासव घेणे उत्तम. लहान मुलांचा घोळणा फुटत असल्यास कामदुधा, मौक्तिक पिष्टीसारखी औषधे घेणे हितावह असते. शरीरात उष्णता साठून राहू नये यासाठी अविपत्तीकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण घेणे, १०-१५ दिवसांतून एरंडल तेलाचा जुलाब घेणे उपयोगी पडते. अशा प्रकारे प्रकृतीनुरूप व उष्णतानिवारक आहार, शक्तिक्षय होणार नाही असे आचरण आणि शीतल द्रव्यांपासून बनविलेली औषधे व रसायने यांचा युक्तिपूर्वक वापर केल्यास उन्हाळ्याच्या झळांपासून आपण प्रियजनांचे संरक्षण करू शकू.

Web Title: Dr Bhagyashri Zope Writes Summer Heat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top