अंगदुखीवर उपचार

‘वेदना नास्ति विना वातात्’ म्हणजे ‘वाताशिवाय वेदना नसतात’ हे आयुर्वेदातील एक प्रसिद्ध सूत्र होय.
body pain
body painsakal
Summary

‘वेदना नास्ति विना वातात्’ म्हणजे ‘वाताशिवाय वेदना नसतात’ हे आयुर्वेदातील एक प्रसिद्ध सूत्र होय.

- डॉ. भाग्यश्री झोपे

‘वेदना नास्ति विना वातात्’ म्हणजे ‘वाताशिवाय वेदना नसतात’ हे आयुर्वेदातील एक प्रसिद्ध सूत्र होय. यावरून सांधे दुखतात तेव्हा सांध्यात, कंबर-पाठ दुखते तेव्हा पाठीच्या कण्यात वात वाढलेला असतो, तर अंग दुखते तेव्हा संपूर्ण शरीरात वात वाढलेला असतो. अंगदुखी म्हटले की सर्वप्रथम तापाची आठवण येते. प्रत्येकाला कधी ना कधी ताप येऊन अंग दुखलेले असते पण रोजची अंगदुखी हे एक खूप कष्टदायक लक्षण होय. यात अनुत्साह, कंटाळा, थकवा, नैराश्य ही सगळी लक्षणे येऊ शकतात. खूप प्रवास झाला, झोप कमी पडली, सातत्याने खूप परिश्रम झाले, वेळेवर विश्रांती घेता आली नाही की शरीरात वातदोष वाढणे व त्यामुळे अंग दुखायला लागणे हे पाठोपाठ येते.

उलट्या-जुलाबांमुळे शरीरातील रसधातू कमी झाला, डिहायड्रेशन झाले तरी अंग दुखू शकते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले, कॅल्शियम कमी प्रमाणात मिळत असले तरी त्यामुळे अंगदुखी उद्‌भवू शकते.

अंगदुखी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कधी कधी अंग असे दुखते की दाबून घेतले तर बरे वाटते, कधी कधी अंग ठणकल्यासारखे दुखते, कधी शरीरातील अमुक भाग पिळवटून निघाल्यासारखा दुखतो (याला आपण व्यवहारात पेटके येणे असे म्हणतो. सहसा पायाच्या पोटऱ्यांमध्ये पेटके येण्याचे प्रमाण जास्ती असते), कधी अंग अगदी आतून म्हणजे हाडांपासून दुखते असे जाणवते तर कधी अंग असे दुखते की साधा स्पर्शसुद्धा सहन होत नाही.

आयुर्वेदात अंगदुखीचे एकूण एक मुख्य कारण सांगितले ते म्हणजे शरीरात आमदोष तयार होणे. सेवन केलेले अन्न व्यवस्थित पचले नाही की आमदोषात रूपांतरित होते व त्यामुळे आळस, अपचन, तोंडाला चव नसणे, काम न करताही थकवा जाणवणे, गुंगी येणे या लक्षणांच्या बरोबरीने अंग दुखणे हे लक्षण उद्‌भवते. अर्थातच आमदोषामुळे अंग दुखत असले तर सर्वप्रथम पचन सुधारणे, आहारावर नियंत्रण ठेवणे, हे महत्त्वाचे उपाय असतात.

अति मानसिक ताण असणे, मन कायम अस्वस्थ, अशांत राहणे हे सुद्धा वातप्रकोपाचे व पर्यायाने अंगदुखीचे कारण ठरू शकते. अंगात ताप मुरला असला म्हणजे ताप मोजला तर दिसत नसला पण अंगात कसकस वाटत असली तरी त्यामुळे अंग दुखू शकते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जात असले, पाळीमध्ये शरीरातील उपयुक्त धातू निघून जात असला तर त्यातूनही वातप्रकोप होऊन अंग दुखू शकते.

थोडक्यात, अंगदुखीची कारणे अनेक असतात, त्यामुळे केवळ वेदनाशामक औषधाची मदत न घेता, अंग दुखण्यामागचे नेमके कारण शोधून काढले आणि त्यानुसार नेमके उपचार केले तर त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. अंगदुखी हा रोग नाही, तर शरीर अस्वास्थ्याचे सूचक लक्षण आहे. ज्याच्या माध्यमातून शरीर काहीतरी चुकत असल्याचे, आपल्याला सांगत असते. तेव्हा अंगदुखीकडे वेळीच लक्ष देणे चांगले होय.

कोणत्याही वेदना वाताशिवाय नसतात आणि तेल हे वातावरचे श्रेष्ठ औषध असते. त्यामुळे अंगदुखीवर वातशामक द्रव्यांनी संस्कारित तिळतेलाचा अभ्यंग हा उत्तम उपाय असतो. विशेषतः प्रवास, कमी झोप, अति परिश्रम, अति मैथुन वगैरे कारणांमुळे अंग दुखत असेल तर संपूर्ण शरीराला हलक्या हाताने अभ्यंग करणे उत्तम असते. यालाच स्वेदनाची जोड देता आली तर अधिक चांगला गुण येतो. आठवड्यातून दोन वेळा अगोदर तेल लावून नंतर बाष्पस्वेदन घेण्याने वातदोष संतुलित व्हायला आणि अंगदुखी कमी व्हायला मदत मिळते. स्नेहन-स्वेदनाला अपवाद असतो तो आमदोषाचा.

अंगदुखीचा अपचनाशी, आमदोषाशी संबंध असला तर मात्र तेल लावण्याने बरे वाटत नाही. अशा वेळी लंघन, अग्नी प्रदीप्त करणारे उपचार योजावे लागतात. ‘बस्ती’ हा आयुर्वेदातील उपचार सुद्धा अंगदुखीवर उत्तम असतो. दशमूळ, एरंड मूळ, रास्ना, अश्र्वगंधा वगैरे वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेण्याने अंगदुखी क्रमाक्रमाने कमी होत जाते असा अनुभव आहे. प्रशिक्षित परिचारकाकडून अंग दाबून घेणे, मसाज करून घेणे हासुद्धा अंगदुखीवरचा प्रभावी उपचार असतो. याखेरीज अनुभवाचे आणि घरच्या घरी सहजतेने करता येण्याजोगे काही उपाय याप्रमाणे सांगता येतील.

  • झोप न आल्यामुळे अंग दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा अश्र्वगंधा चूर्ण पाण्याबरोबर घेता येते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते तसेच अंग दुखणे, अंगात चमका येणे, उठणे-बसणे अवघड होणे वगैरे तक्रारी कमी होतात.

  • सर्दी-तापामुळे अंग दुखत असले तर गवती चहाचा संपूर्ण अंगाला वाफारा घेण्याने घाम येतो व ताप उतरतो, पर्यायाने अंगदुखी कमी होते असे दिसते.

  • शुद्ध केलेला गुग्गुळ, तूप व मध यांचे मिश्रण घेतल्यास शरीरातील वातदोष कमी होऊन अंग दुखणे बरे होते.

  • पारिजातकाची पाने अंगदुखी कमी करणारी असतात. ताजी पाने वाटून काढलेल्या एक चमचा रसात चमचाभर आल्याचा रस आणि खडीसाखर मिसळून घेण्याने अंग दुखणे कमी होते.

  • थकव्यामुळे अंग दुखत असेल, विशेषतः कमरेत अशक्तता जाणवत असेल तर खारकेसह उकळलेले दूध, त्यात डिंकाची लाही मिसळून घेण्याचा उपयोग होतो. यासाठी कपभर दुधात चमचाभर खारीक पूड व दोन चमचे पाणी मिसळून मंद आचेवर पाच मिनिटांसाठी उकळावे व त्यात अर्धा चमचा  डिंकलाहीचे चूर्ण मिसळून सकाळी प्यावे.

  • प्रवासानंतर किंवा शारीरिक धावपळीनंतर जर अंग दुखत असेल तर अंगाला तेल लावून गरम पाण्याने स्नान करण्याने बरे वाटते, पण त्या पाण्यात जर निर्गुडी, शेवगा, सागरगोटा यासारख्या वातशामक पानांचा काढा मिसळला तर अजून चांगला परिणाम मिळतो.

  • कधी कधी शांत व पुरेशी झोप न मिळणे हेसुद्धा अंगदुखीचे कारण असते, या दृष्टीने रात्री बाराच्या आत झोपणे, प्रकृतीनुसार ६-७ तास झोपणे आणि शांत झोप लागत नसल्यास झोपण्यापूर्वी जटामांसीचा फांट, रिलॅक्ससॅन सिरप घेणे, श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या आवाजातली योगनिद्रा ऐकणे हेसुद्धा उपयुक्त होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com