मुतखड्यावर उपचार

पोटात एकाएकी आणि तीव्र स्वरूपाच्या वेदना सुरू झाल्या की सहसा मुतखडा तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.
Kidney Stones
Kidney Stonessakal
Summary

पोटात एकाएकी आणि तीव्र स्वरूपाच्या वेदना सुरू झाल्या की सहसा मुतखडा तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

- डॉ. भाग्यश्री झोपे

पोटात एकाएकी आणि तीव्र स्वरूपाच्या वेदना सुरू झाल्या की सहसा मुतखडा तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. क्वचित इतर काही कारणासाठी सोनोग्राफी करावी लागली तर त्यात मुतखडा असल्याचे दिसून येते. आयुर्वेदात मुतखडा होण्यामागे तिन्ही दोष, विशेषतः वात आणि कफ दोषांचा सहभाग असतो असे सांगितलेले आहे. सध्या दिवसेंदिवस मुतखडा होण्याचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक असते असेही दिसून येते. मुतखडा मूत्रसंस्थेमध्ये कुठेही असू शकतो. मूत्रपिंडात असणाऱ्या मूतखड्यामुळे वेदना होत नाहीत, मात्र खडे मूत्रवाहिनीमध्ये आले तर वेदना होऊ शकतात.

फार लहान मुतखडा असेल तर तो लघवीबरोबर सहजपणे निघूनही जाऊ शकतो. मात्र आकाराने मोठा सहसा तीन मिलीमीटरपेक्षा मोठा) असणारा मुतखडा मूत्रवाहिनीमध्ये अडकून वेदनेस कारणीभूत ठरतो. मूत्राद्वारापाशी अडकून राहिलेला मुतखडा मुद्धा त्रासदायक ठरू शकतो. मुतखडा झाला असता त्याची सामान्य लक्षणे म्हणजे मूत्रपिंडाच्या ठिकाणी किंवा मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंत असलेल्या नळ्यांच्या ठिकाणी तसेच मूत्राशयामध्ये वेदना होतात, मूत्रमार्गात अडलेल्या मूतखड्यामुळे लघवीची धार एकसंध न राहता २-३ धारांत विभाजित हेते. मूतखड्यामुळे आत कुठेही जखम झाली असता लाल रंगाची अर्थात रक्तासहित मत्रप्रवृत्ती होते, मूत्रप्रवृत्तीच्या वेळी कुंथावे लागते, मूत्रप्रवृत्तीच्या वेळेस असह्य वेदना होतात.

मुतखड्याचा एक उपप्रकार म्हणजे खर पडणे. याला आयुर्वेदात ‘मूत्रशर्करा’ असे म्हणतात. वायू अनुलोम झाला अर्थात त्याच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे शरीराबाहेर जाण्यास प्रवृत्त झाला तर शर्करा वा खर मूत्रावाटे पडून जाते पण वायू प्रतिलोम राहिला तर ही खर मूत्रमार्गात चिकटून राहते, रुतते. अर्थातच त्यामुळे शरीर गळून जाणे, थकवा जाणवणे, वजन घटणे, कुशीमध्ये वेदना होणे, तोंडाला चव नसणे, अंगकांति निस्तेज होणे, लघवी करताना त्रास होणे वगैरे लक्षणे दिसतात.

मुतखडा का होतो याचेही उत्तर आयुर्वेदामध्ये दिलेले आहे, "तत्र असंशोधनशीलस्य अपथ्यकारिणः । सुश्रुतसंहिता." वेळच्या वेळी शरीरशुद्धी (यात मलमूत्रप्रवर्तनाबरोबरच विरेचन, बस्ती वगैरे शरीरशुद्धीचाही अंतर्भाव होतो) न करणाऱ्या व्यक्तीने अपथ्यकर आहार-विहार चालू ठेवला तर मुतखडा होऊ शकतो. तेव्हा मुतखडा झाल्याचे लक्षात आल्यावर केवळ शस्त्रकर्म करणे आणि त्यानंतर सगळे रिपोर्ट व्यवस्थित आले आहेत असे म्हणून शांत बसणे हे योग्य नाही तर त्यासाठी आहार आचरणामध्ये बदल करणे, शास्त्रशुद्ध पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे हे महत्त्वाचे होय. मूत्रसंस्था, विशेषतः मूत्रपिंड हे त्रिमर्मांपैकी एक महत्त्वाचे मर्म असल्याने मुतखड्यावर मुळापासून आणि योग्य उपचार करायला हवेत. योग्य उपचारांच्या अभावी मूतखड्यामुळे किडनीची कार्यक्षमता सुद्धा कमी होऊ शकते.

मुतखड्यावर औषधोपचारांचा उत्तम परिणाम होतोच, पण बरोबरीने रोजचे प्यायचे पाणी हे उकळून घेणे आणि विशिष्ट औषधी द्रव्यांनी संस्कारित करणे हे सुद्धा आवश्यक होय. सध्या घराघरांमध्ये फिल्टर असतो पण पाण्यातले सगळे दोष किंवा अशुद्धी ही केवळ फिल्टरमुळे निघून जात नाही. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे पाणी हे अत्यंत संस्कारक्षम असते. विचारांचाही पाण्यावर प्रभाव होतो आणि पाण्याच्या स्ट्रक्चरवर म्हणजे पाण्यात भौतिक पातळीवर बदल होताना दिसून येतो, तर मग जलप्रदूषण, जलस्रोतांपर्यंत पोहोचलेली रासायनिक द्रव्ये, कृत्रिम हॉर्मोन्स, खते यांचा पाण्यावर किती परिणाम होत असेल! हा चुकीचा संस्कार दूर करण्यासाठी सहायक असतो तो फक्त अग्नी. त्यामुळे फिल्टर केलेले पाणी एका पातेल्यात घेऊन, त्यात दोन चिमूट जलसंतुलन मिश्रण टाकून वीस मिनिटांसाठी उकळणे व नंतर जाडसर सुती कापडातून गाळून भरून ठेवणे हे उपयुक्त असते. मूतखड्याची प्रवृत्ती दूर करण्यासाठी हा एक उपाय उत्तम असतो. औषधांच्या बरोबरीने मूतखड्यावर घरच्या घरी खालील उपाय योजना येतात,

1) आठवड्यातून २-३ वेळा कुळथाचे सूप सेवन करणे, कारण कुळीथ हे मुतखड्यावर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

2) अर्धा कप कोहळ्याच्या ताज्या रसात दोन चिमूट यवक्षार व अर्धा चमचा गूळ टाकून घेणे.

3) मुतखड्यामुळे वेदना होत असल्यास सागरगोट्याची पाने, शेवग्याची पाने, पळसाची फुले यांचा काढा त्याचे कटिस्नान करण्याचा म्हणजे बसता येऊन अशा टबमध्ये गरम पाणी भरून त्यात हा काढा टाकून कमरेपर्यंतचा भाग बुडेल अशा पद्धतीने बसण्याचा उपयोग होतो. आठवड्यातून दोन-तीन वेळा असे कटिस्नान घेता येते.

4) वायवर्णा, गोखरू, पुनर्नवा, पाषाणभेद यांचे समभाग मिश्रण करून त्यातील दोन चमचे चार कप पाण्यात उकळून एक कप उरेपर्यंत केलेला काढा गाळून घेऊन त्यात दोन चिमूट यवक्षार व अर्धा चमचा गूळ घालून रोज सकाळी घेण्याचा उपयोग होतो.

5) मका, वरई वगैरे रुक्ष धान्ये, तांबडा भोपळा, सिमला मिरची, अति प्रमाणात टोमॅटो, वाल, पावटा, चवळी, वाटाणा, उडीद, मांसाहार, अंडी, जांभूळ, अननस, तेलकट व चमचमीत पदार्थ न उकळलेले पाणी, फ्रिजमधील थंड पाणी वगैरे आहारातून टाळणेसुद्धा श्रेयस्कर.

6) औषधात महावरुणादी काढा, वरुणादी घृत, गोक्षुरादी गुग्गुळ, पुनर्नवासव वगैरे औषधांचाही मुतखड्यावर उपयोग होतो. कधी कधी प्रकृतीनुसार बस्ती, घृतपान, कटिस्नान वगैरे उपायांचीही योजना करावी लागते, मात्र या गोष्टी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे चांगले.

थोडक्यात मूतखड्यावर योग्य औषधे घेतली, खाण्यापिण्यात प्रकृतीनुसार आवश्यक बदल केले, पंचकर्म करून घेतले तर नक्कीच गुण येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com