स्त्री-संतुलन : स्त्री-आरोग्याचा आधार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

शिव-शक्तीमधील शक्ती ही स्त्री-स्वरूप असते. शक्ती हा शब्द ताकद, सामर्थ्य या अर्थानेही वापरला जातो. स्त्रीची खरी शक्ती म्हणजे तिचे स्त्रीत्व, तिचे संतुलन!

स्त्री-संतुलन : स्त्री-आरोग्याचा आधार...

- डॉ. भाग्यश्री झोपे

शिव-शक्तीमधील शक्ती ही स्त्री-स्वरूप असते. शक्ती हा शब्द ताकद, सामर्थ्य या अर्थानेही वापरला जातो. स्त्रीची खरी शक्ती म्हणजे तिचे स्त्रीत्व, तिचे संतुलन! स्त्रियांचे हक्क, स्वातंत्र्य, अधिकार यांची आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे म्हणतात, ‘स्त्री-प्रतिष्ठा सांभाळणे, स्त्री-आरोग्य जपणे, स्त्रीतील स्त्रीत्वाचे रक्षण करणे हा आजची खरी गरज आहे.’ ‘गर्भाशय हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी गमावणार नाही’ असा प्रण प्रत्येक स्त्रीने करावा असे ते एखाद्या आरोग्य-सेनानीप्रमाणे सांगतात आणि याचा अनुभव संतुलन उपचार घेणाऱ्या असंख्य स्त्रियांनी आजवर घेतला आहे.

निसर्गाला थोडे जरी जपले तरी त्याची परतफेड भरभरून होते. १० तांदळाच्या बियांमधून तांदळाचे हजारों नवे दाणे मिळू शकतात, तसेच निसर्गनियमांना घरून स्त्री-आरोग्यासाठी थोडे जरी प्रयत्न केले तरी त्याचे उत्कृष्ट परिणाम मिळताना दिसतात. मुलगी झाली की तिला ‘कन्यारत्न’ संबोधण्याची आपल्याकडे पद्धत असते. एखाद्या बहुमोल रत्नाला जपावे, साजेसे कोंदण योजावे तसेच घरातील मुलीला शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्व स्तरांवर योग्य त्या गोष्टी मिळायला हव्यात. या दृष्टीने अगदी लहान वयात नियमित अभ्यंग, स्नानासाठी सुगंधी व कांतिवर्धक द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरणे, अदृश्य जीवजंतूंचा नाश करणाऱ्या धुपाची धुरी देणे, सुवर्णयुक्त रसायन देणे या सगळ्या गोष्टी मोलाच्या असतात. यासाठी बेबी मसाज पावडर, टेंडरनेस धूप, बालामृत ही संतुलनची रसायने आजवर लाखों घरांत वापरली गेली असल्याने सिद्ध झालेली आहेत. लहानपणापासून मुलींच्या केसांची काळजी घ्यावी, छान केशरचना कराव्यात असे उल्लेख आयुर्वेदात आहेत. यादृष्टीने व्हिलेज हेअर सिद्ध तेल लावणे उत्तम असते. स्त्रियांना कॅल्शियम, लोहाची आयुष्यात अधिक प्रमाणात गरज पडणार असते. यादृष्टीने लहान वयातच दूध पिण्याची सवय लावणे, खारीक-बदाम उगाळून देणे, आहारात मनुका, अंजीर, डाळिंब, मोसंबी, द्राक्ष यासारख्या फळांचे ताजे रस देणे या गोष्टी मदत करणाऱ्या असतात.

आजकाल खूप मुलींना लवकर पाळी येताना दिसते. हे टाळण्यासाठी १० वर्षांनंतर शतावरी कल्प, कामदुधा, अशोक- ॲलो सॅन यासारख्या गोळ्या घेण्याचा उपयोग होताना दिसतो. अर्थात बरोबरीने चुकीची मानसिक उत्तेजना मिळणार नाही, अन्न किंवा औषधांच्या माध्यमांतून कृत्रिम, रासायनिक द्रव्ये शरीरात जाणार नाही याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. वयाच्या १३-१४ व्या वर्षी पाळी सुरू होण्यापूर्वीच मुलीमध्ये अंतर्बाह्य अनेक बदल होत असतात. अशा वेळी तिला सर्व गोष्टी नीट समजावून सांगणे, योगासनांपैकी अनुलोम-विलोम, फुलपाखरू, संतुलन समर्पण क्रिया, सूर्यनमस्कार यांची सवय लावणे चांगले असते. स्त्रीविशिष्ट अवयवांचे आरोग्य टिकविण्यासाठी केले जाणारे फेमिसॅन तेलाचा पिचू, शक्ती धुपाची धुरी, सुहृद तेलाचा वापर हे उपचार स्त्रीसंतुलनासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे असतात. आजकाल मुलींना, स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, मूत्रमार्गाच्या ठिकाणी वारंवार जंतुसंसर्ग होणे अशा प्रकारच्या समस्या असतात. यामागे एकंदर शरीरशक्ती कमी असणे, गर्भाशयादी अवयवांमध्ये अशक्तता असणे ही मुख्य कारणे असतात. यासाठी शतावरी कल्पयुक्त शुद्ध सकस दूध घेणे, धात्री रसायन, सॅन रोझ, च्यवनप्राशसारखी रसायने घेणे, पिचू-धूपन यांसारखे उपाय करणे, पाळीच्या दिवसांत शक्य तेवढी विश्रांती घेणे, अतिश्रम, अतिताण, मन-बुद्धी उत्तेजित करणारे वाचन, दर्शन टाळणे आवश्यक होय.

तांदळाचे धुवण, साळीच्या लाह्यांचे पाणी हे घरच्या घरी करता येण्याजोगे उपाय या दृष्टीने हितकर होत. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे ‘सम-अग्नी’ ही संकल्पना स्त्रीसंतुलनासाठी महत्त्वाची असते. यासाठी योगासने महत्त्वाची तसेच ज्योतिध्यानही उपयोगी पडते. सकाळ-संध्याकाळ ५-७ मिनिटांसाठी ज्योतिध्यान केल्याने म्हणजे तुपाचे निरांजन लावून ज्योतीकडे एकटक पाहण्याने व नंतर डोळे बंद करून भ्रूमध्यात ज्योतीची प्रतिमा बघण्याने अंतस्रावी ग्रंथींवर नियंत्रण ठेवणाऱ्या पिच्युटरी ग्रंथीवर काम करता येते, पर्यायाने थायरॉइड वगैरे अन्य ग्रंथीच्या कामाला चालना मिळू शकते असा अनुभव येतो. या दृष्टीने संध्याकाळच्या वेळी ‘शुभं करोति कल्याणं’ म्हणता म्हणता दिवा लागणे, तुळशीजवळ दिवा लावून प्रदक्षिणा घालणे वगैरे रीतिरिवाज भारतीय संस्कृतीत पडले असणार. लहानपणापासून जर हे अंगी बाणवले तर स्त्री-आरोग्याला नक्कीच मदत मिळेल. स्त्री-संतुलनाच्या दृष्टीने संगीत हेसुद्धा अत्यंत प्रभावी माध्यम होय. विशेष संस्कृत रचना विशिष्ट रागात संगीतबद्ध केल्या व त्या प्रभावी पद्धतीने गायल्या गेल्या तर त्या संगीताचा शरीरातील सूक्ष्म तत्त्वांवर अतिशय उत्तम परिणाम मिळतात. श्रीगुरुजींनी या क्षेत्रात केलेल्या संशोधनातून स्त्री-संतुलन हे संगीत तयार केले व ज्यामुळे स्त्री-आरोग्यावर उत्तम परिणाम मिळताना दिसतात.

स्त्रीसाठी गर्भारपण, बाळाचा जन्म या गोष्टी फार मोलाच्या असतात. गर्भारपणात स्त्रीविशिष्ट शरीरक्रियांमध्ये खूप बदल होत असतात. हे बदल सहजतेने व्हावेत व शरीरासाठी, आतल्या गर्भासाठी अनुकूल असावेत यासाठीही स्त्रीला काळजी घेणे भाग असते. म्हणूनच गर्भसंस्कार हा विषय आयुर्वेदाने अतिशय सविस्तरपणे समजावलेला आहे. गर्भधारणा होण्याअगोदरपासून ते बाळंतपणानंतर बाळ स्तन्यपान करत असेपर्यंत स्त्रीने तिच्या आहार-आचरणाबद्दल काय काय काळजी घ्यायला हवी याविषयी आयुर्वेदाने जे काही सांगितले आहे त्याचा अवलंब करण्याने स्त्रीसंतुलन तर साधले जातेच व भावी पिढीही सुदृढ निपजते. बऱ्याचदा गर्भारपण- बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये वजन वाढणे, उत्साह कमी होणे, केस गळणे, पाळी बिघडणे, थायरॉइड बिघडणे वगैरे त्रास होऊ लागतात. योग्य पद्धतीने गर्भसंस्कार केले असता हे त्रास टाळता येतात. रजोनिवृत्तीच्या काळात पाळीसंबंधी त्रास होत असल्यास घाबरून न जाता पंचकर्म, उत्तरबस्तीसारखे उपचार करून घेण्याने अप्रतिम उपयोग होताना दिसतो. गर्भाशय तर काढावे लागत नाहीत, पण स्त्रीची ताकद, उत्साह, स्वभावातील मृदुता हेसुद्धा टिकून राहण्यात मदत मिळते. थोडक्यात, स्त्रीने स्वतःची व आपल्या मुलीची सुरुवातीपासून नीट काळजी घेतली, आयुर्वेदातील साध्या-सोप्या गोष्टींचा स्वीकार केला, संगीत, ज्योतिध्यान, योगासनांची मदत घेतली तर स्त्री-आरोग्य पर्यायाने भावी पिढीचे भविष्य सुरक्षित होईल.

Web Title: Dr Bhagyashri Zope Writes Women Health Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top