दीपावली व आरोग्यरक्षण!

दिवाळीच्या तेजाने आपण अंतर्बाह्य प्रसन्न होतो, तेजस्वी होतो, असे जे म्हटले जाते त्याला उटणे लावणे पूरकच होय. शिवाय उटण्याने स्नान करण्याने त्वचारंध्र स्वच्छ होतात, अतिरिक्त कफदोष कमी होतो.
दीपावली व आरोग्यरक्षण!
दीपावली व आरोग्यरक्षण!sakal

-: डॉ. भाग्यश्री झोपे

दिवाळीत सुगंधी द्रव्यांचा लेप लावण्याने तसेच सुगंधी फुलांच्या अर्काने शरीर सुगंधी होते, शुक्रधातूचे पोषण होते, आयुष्य वाढते, शरीराची ताकद वाढते व दुर्भाग्याचा नाश होतो. दिवाळीच्या तेजाने आपण अंतर्बाह्य प्रसन्न होतो, तेजस्वी होतो, असे जे म्हटले जाते त्याला उटणे लावणे पूरकच होय. शिवाय उटण्याने स्नान करण्याने त्वचारंध्र स्वच्छ होतात, अतिरिक्त कफदोष कमी होतो.

भारतीय संस्कृती आणि आरोग्यरक्षण या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी. दीपावली हा तर भारतीयांचा सर्वांत मोठा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण. तेलाचे दिवे, रांगोळ्या, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, फटाके, किल्ला, खरेदी, पूजा वगैरे अनेक प्रकारांनी दीपावली साजरी होत असते. आनंदाच्या अनुभवासाठी आरोग्य लागतेच. आनंद घेता घेता आरोग्य मिळविण्याची सुवर्णसंधी म्हणजे दीपावली असे म्हणणे सयुक्तिक ठरावे. दीपावली आणि अभ्यंगस्नान यांचा अजोड संबंध असतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील बाल-गोपाळांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच पहाटे लवकर उठतात, अंगाला तेल लावून उटण्याने स्नान करतात, पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची प्रार्थना करत पतीला अभ्यंग करते, भाऊबिजेला बहीण भावाच्या आरोग्याची, समर्थतेची कामना करत त्याला अभ्यंग करते. दीपावलीच्या निमित्ताने सुरू केलेला अभ्यंग नंतरही कायम केला तर त्यामुळे आरोग्य उत्तम राहील, रोगांना प्रतिबंध होईल.

सुस्पर्शोपचिताङ्गश्र्च बलवान्‌ प्रियदर्शनः।

भवत्यभ्यङ्गनित्यत्वात्‌ नरोऽल्पजर एव च॥ ... चरक सूत्रस्थान

नियमित अभ्यंगाने त्वचा कोमल होते, सर्व अंगप्रत्यंग उचित म्हणजे हवे तसे, सौष्ठवपूर्ण होतात, ताकद वाढते व ती व्यक्ती सुंदर, दर्शनीय होते. नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्तीचे वय वाढले तरी वृद्धत्वाची लक्षणे अल्प मात्रेतच प्रकट होतात. अर्थातच, वृद्धत्वापाठोपाठ येणारे कष्ट, त्रास यांना प्रतिबंध होतो.

वृष्यं सौगन्ध्यमायुष्यं काम्यं पुष्टिबलप्रदम्‌ ।

सौमनस्यमलक्ष्मीघ्नं गन्धमाल्यनिषेवणम् ॥ ...चरक सूत्रस्थान

सुगंधी द्रव्यांचा लेप लावण्याने तसेच सुगंधी फुलांच्या अर्काने शरीर सुगंधी होते, शुक्रधातूचे पोषण होते, आयुष्य वाढते, शरीराची ताकद वाढते व दुर्भाग्याचा नाश होतो. दिवाळीच्या तेजाने आपण अंतर्बाह्य प्रसन्न होतो, तेजस्वी होतो, असे जे म्हटले जाते त्याला उटणे लावणे पूरकच होय. शिवाय उटण्याने स्नान करण्याने त्वचारंध्र स्वच्छ होतात, अतिरिक्त कफदोष कमी होतो, अनावश्‍यक मेद झडायला मदत मिळते व त्वचा सतेज होऊन कांती उजळते. दीपावलीत नवीन कपडे घेण्याची, छोटा का होईना पण एखादा दागिना घेण्याची पद्धत असते. यामुळे आनंद होतो, उत्साह वाढतो, पर्यायाने सर्जनतेला, कल्पकतेला वाव मिळतोच, पण आयुर्वेदात याही गोष्टींमागची आरोग्यकल्पना समजावली आहे.

काम्यं यशस्यमायुष्यमलक्ष्मीघ्नं प्रहर्षणम्‌।

श्रीमत्परिषदं शस्तं निर्मलाम्बरधारणम्‌ ॥ ...चरक सूत्रस्थान

नवीन स्वच्छ वस्त्रे घालण्याने यशवृद्धी होते, आयुष्य वाढते, अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य व दुर्भाग्याचा नाश होतो, मन प्रहर्षित होते, उत्साह वाढतो.

धन्यं मङ्गल्यमायुष्यं श्रीमद्व्यसनसूदनम्‌ ।

हर्षणं काम्यमोजस्यं रत्नाभरणधारणम् ॥ ...चरक सूत्रस्थान

रत्ने तसेच आभूषणे धारण करण्याने सौभाग्याची वृद्धी होते, मंगलाचा लाभ होतो, आयुष्य वाढते, लक्ष्मीप्राप्ती होते, दुःखे दूर होतात, मन प्रसन्न होते व ओजतत्त्वाची शुद्धी होते. दीपावलीचे वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी तेलाचे दिवे लावून घर व परिसर उजळवून टाकणे. तिळाच्या तेलाचा दिवा आसमंतातील जंतुसंसर्गाला थोपवून वातावरणाची शुद्धी करण्यास मदत करत असतो. नकारात्मक विचार, चुकीचे तरंग नाहीसे करून प्रसन्नता व समाधान-शांती अनुभवायची असेल तर दीपांची आवली अर्थात तेलाचे दिवे ओळीत लावायला हवेत. विजेच्या साहाय्याने रोषणाई करायला हरकत नसली तरी पारंपरिक पणत्यासुद्धा लावणे श्रेयस्कर. ऋतुमानानुसार प्रदीप्त झालेल्या जाठराग्नीमुळे सुधारलेल्या पचनशक्तीचा फायदा घेऊन या ऋतूत शरीरपोषक, धातुपोषक पदार्थ करण्याची प्रथा आहे. यात चकली, शेवेसारखे तळलेले, खारट, तिखट पदार्थही असतात. तसेच अनारसा, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात. यालाच जोड म्हणून या दिवसात आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते.

तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते पण पचनशक्ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दिवाळीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, सॅनरोझ, मॅरोसॅन, संतुलन चैतन्य कल्प, शतावरी कल्प वगैरेसारखी रसायने दिवाळीत व दिवाळीनंतरही अवश्‍य सेवन करावीत. दिवाळीत फटाके उडविण्याचाही पद्धत असते, फटाक्याच्या आवाजामुळे साप- विंचवासारखे प्राणी दूर जावेत अशी योजना असावी असे वाटते. मात्र फटाक्यांचा अतिरेक आरोग्याला अपायकारक ठरू शकतो. शेजारी-पाजारी कुणी आजारी व्यक्ती आहे याचे भान ठेवून, फटाक्यामुळे आपल्याला स्वतःला किंवा सभोवतालच्या लोकांना इजा पोचणार नाही याकडे लक्ष ठेवून आणि फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणात प्रदूषण वाढणार नाही याचे तारतम्य बाळगून आतषबाजी करावी. एकंदर पाहता दिवाळीतले सर्व रीतिरिवाज आरोग्याला पोषक ठरतील अशा पद्धतीने पाळल्यास त्यामुळे सण तर साजरा होईलच, पण आरोग्य रक्षणही होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com