प्रभावी लसीकरण.... काळाची गरज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

प्रभावी लसीकरण.... काळाची गरज!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतात आपल्याला लशींच्या अतिरिक्त बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. त्याचप्रमाणे शासनाने हे सुनिश्चित केले पाहिजे, की जेव्हा नवीन आणि अधिक प्रभावी लस बाजारात येईल, तेव्हा ती सर्वसामान्य लोकांसाठी जलद गतीने उपलब्ध होईल.

कोविड -19 विरोधाची लस ही डेल्टा या प्रकाराविरुद्ध कितपत प्रभावशाली आहे? डेल्टा या विषाणूच्या प्रकारात, कोरोनाची लस घेतलेली व्यक्ती ८ पट अधिक संक्रमित होण्याची आणि वुहान विषाणुमुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झालेले रुग्ण ६ पट अधिक पुन्हा संक्रमित होण्याची शक्यता आहे, असे भारताच्या आकडेवारीवर आधारित अभ्यासात आढळले आहे. तरीही, तज्ज्ञांच्या मते लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. डेल्टा व्हेरिएंट किंवा B.1.617.2 चा वंश, जो महाराष्ट्रात प्रथम शोधला गेला, तो भारतातसह इतर अनेक देशांमध्ये सध्या प्रभावी ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डेल्टा प्रकार आता किमान १७० देशांमध्ये पसरलेला आहे. मूळ वुहान विषाणूच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंट कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्रतिपिंडांसाठी (antibodies) ६ पट कमी संवेदनशील आहे आणि लस-प्रेरित प्रतिपिंडांसाठी ८ पट कमी संवेदनशील आहे.

दुसऱ्या शब्दांत, मूळ विषाणूच्या तुलनेत, डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारात, लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संक्रमण होण्याची ८ पट अधिक शक्यता आहे आणि पूर्वीच्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांना पुन्हा संक्रमित होण्याची ६ पट अधिक शक्यता आहे. B.1.617.1 वंशाच्या तुलनेत डेल्टा प्रकारात मानवी शरीरात संसर्ग आणि पुनरावृत्ती करण्याची अधिक क्षमता होती. एका अभ्यासात दिल्लीच्या तीन रुग्णालयांमध्ये पूर्णपणे लसीकरण झालेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या १३० प्रकरणांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये डेल्टा प्रकाराविरुद्ध लसीचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले. या अभ्यासाचे परिणाम दर्शवितात की डेल्टा प्रकार वेगाने पसरतो आणि मागील संक्रमण किंवा लसींपासून मिळालेले संरक्षण कमी करतो असे दिल्लीमधील या अभ्यासाचे संयुक्त लेखक डॉ.अनुराग अग्रवाल यांचे मत आहे. परंतु चांगली बातमी अशी आहे की लसीकरणामुळे डेल्टा प्रकारामुळे होणाऱ्या रोगाची तीव्रता कमी होते.

डेल्टा प्रकाराविरुद्ध लसींच्या प्रभावाविषयी इतर कोणते पुरावे उपलब्ध आहेत? अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने चार अभ्यासांचा हवाला दिला - दोन अमेरिकेत, एक इंग्लंडमध्ये आणि दुसरे कतारमध्ये . या संशोधनांनी डेल्टा प्रकाराविरूद्ध लसींच्या कमी प्रभावाचे पुरावे सादर केले आहेत. म्हणजेच इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरिएंट हा प्रकार वेगाने पसरत असताना एस्ट्राझेनेका या लसीचा प्रभाव कमी झाला. त्याचप्रमाणे अल्फा प्रकार प्रामुख्याने पसरत असताना लसीचा परिणाम चांगला होता. म्हणजेच देशात डेल्टा व्हेरिएंट अत्यंत प्रभावी असताना एस्ट्राझेनेका या लसीची परिणामकारकता कमी झाली. या परिस्थितीत लसी किती महत्त्वाच्या आहेत? पुण्यातील ‘आयआयएसईआर’ च्या इम्युनोलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ यांनी आपले असे मत नोंदविले की ‘नेचर’ नियतकालिकातील संशोधन प्रयोगशाळेच्या वातावरणात केले गेले. यामुळे लोकांनी डेल्टा प्रकारात लस उपयुक्तच नाही, असे मत करून नये. या अभ्यासामध्ये मिळालेली माहिती शरीराच्या आत काय घडते याऐवजी कृत्रिम मूल्यांकन आहे. मर्यादा अशी आहे की विषाणूं विरुद्ध कार्य करणारी प्रतिपिंडे संपूर्ण उत्तर प्रदान करत नाही. तसेच प्रतिपिंडे शरीरातील ‘टी’ नावाच्या पेशींच्या प्रतिसादावर रोग प्रतिकारक शक्ती अवलंबून असते. लसीकरण केलेल्या किंवा पूर्वी संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये, प्रतिपिंडे आणि टी- पेशी दोन्ही संरक्षणासाठी योगदान देतात.

सध्या, बहुतांशी संक्रमण डेल्टा प्रकारामुळे होत आहेत आणि हे आश्चर्यकारक नाही की पुन्हा संसर्ग झालेल्या प्रकरणांमध्ये किंवा लसीकरणानंतरच्या प्रकरणांमध्ये आढळणारा हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा विषाणू आहे. कोणतेही लसीकरण १००% संरक्षण देत नाही. एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा होणारे संक्रमण असामान्य किंवा ऐकलेले नाही, असे नाही. तथापि, लसीकरण नसलेल्या गटांच्या तुलनेत पूर्ण लसीकरण झालेले अथवा आधी लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये गंभीर रोग आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. पुण्यातील शास्त्रज्ञ अनु रघुनाथन यांच्या मते, या अभ्यासाचा सरळ अर्थ असा आहे की डेल्टा व्हेरिएंटला प्रतिकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडांची आवश्यकता आहे. लस अजूनही प्रभावी आहेच. डेल्टा प्रकार (Variant) निष्क्रिय करण्यासाठी प्रतिपिंडे कमी संवेदनशील आहेत. याचा अर्थ असा की डेल्टा व्हेरिएंटला प्रतिकार करण्यासाठी पहिल्या लाटेच्या वेळी मूळ विषाणूंच्या विरोधातील प्रतिकारशक्ती डेल्टा प्रकाराच्या विरोधात निर्माण करण्यासाठी ५ ते ८ पट अधिक प्रतिपिंडे आवश्यक असतील, असे संशोधकांचे मत आहे.

नवीन रूपे हाताळण्यासाठी पुढे कोणता मार्ग आहे? मूळ वुहान विषाणू अधिक धोकादायक अश्या अल्फा, बीटा, कप्पा आणि डेल्टा या प्रकारांमध्ये बदलला. विषाणू वारंवार नवीन स्वरूपात बदलत राहील. परंतु सर्व उत्परिवर्तनांचा (Mutations) अर्थ असा नाही की ते सर्व अधिक हानिकारक आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की नवीन प्रकारांमुळे संक्रमण कमी करण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण किंवा ‘कोविड योग्य वर्तनाचे’ पालन करणे. यासारख्या उपायांद्वारे कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी होऊ शकेल. या अभ्यासाप्रमाणे, नवीन रूपांविरूद्ध, प्रतिपिंडांच्या प्रतिसादाच्या प्रभावाची सतत देखरेख ठेवण्याची आणि बूस्टर लसीचे डोस आवश्यक आहेत का किंवा लशी सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे की नाही याची तपासणी वारंवार करणे आवश्यक आहे. असे करण्याने लसी सुधारण्यात आणि अधिक प्रभावी लसी बनवण्यात मदत करेल.

या सर्व संशोधनाचा अर्थ असा आहे की, डेल्टा प्रकारामुळे होणाऱ्या रोगाची तीव्रता, त्यामुळे होणारे संक्रमण हे पूर्वी केलेल्या लसीकरणामुळे कमी होते. पूर्वी लसीकरण केलेल्या १०,००० व्यक्तींमध्ये केवळ ६ जणांमध्ये कोरोनाची बाधा झाली. परंतु त्याची तीव्रता अतिशय कमी होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनुसार कोरोना विषाणूने आपल्यामध्ये सातत्याने बदल केले तरी लसीकरणामुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे बदलत्या स्वरूपातील कोरोना विषाणूंविरुद्ध उपयोगी आहेतच. त्यामुळे पूर्ण लसीकरण करणे अतिशय जरूरीचे आहे. सध्या भारतात लसीचा एक किंवा दोन मात्रा (डोस) घेतलेल्या व्यक्तींची संख्या ८२ कोटींवर पोचलेली आहे. याबद्दल आपल्या मा.पंतप्रधानांचे, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानावे लागतील.

- प्रा. डॉ. गजानन रमाकांत एकबोटे, M.S., M.N.A.M.S, पुणे

loading image
go to top