भ्रम

डॉ. ह. वि. सरदेसाई 
Friday, 24 November 2017

मेंदूच्या काही विकारात आणि काही रायासनिक द्रव्यांच्या परिणामामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड होतो. मेंदूच्या विकारात वितर्क निर्माण होणे अनपेक्षित नाही. विशेषतः वयाच्या पस्तीस वर्षांनंतर प्रथमच एखाद्या व्यक्तीला ‘भ्रम’ झाला तर त्याचे कारण शारीरिक व्याधीत असण्याची शक्‍यता मोठी असते.

वास्तवाचे यथायोग्य ज्ञान असणे कोणत्याही सुसूत्र निर्णयाला आवश्‍यक असते. जेव्हा वास्तवाचे ‘चुकीचे ज्ञान’ होते, गैरसमज पक्का होतो, तेव्हा त्याला वितर्क किंवा डिल्युजन म्हणतात. स्वतःबद्दल, परिसराबद्दल, समाजाबद्दल, इतरांच्या विचारांबद्दल अशा साफ चुकीच्या कल्पना मनात पक्‍क्‍या होतात. माणसाच्या शिक्षणाने त्याची आकलनशक्ती अधिकाधिक वास्तव जाणणारी व्हावी, अशी अपेक्षा असते. ज्या कुटुंबातून अथवा समाजातून एखादी व्यक्ती येते त्यावर त्या व्यक्तीची सांस्कृतिक पातळी ठरते. शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळी माणसाची मूल्ये ठरवितात. या मूल्यांवर माणसाचे निर्णय ठरतात. वास्तवाच्या जाणण्यातच चुका झाल्या तर विचार आणि आचार चमत्कारिक होऊ लागतात. आपले विचार वास्तवाला धरून नाहीत याची कल्पना रुग्णाला नसते. रुग्णाचे नातेवाईक, कुटुंबीय किंवा हितचिंतक रुग्णाच्या विचार आणि आचारात झालेल्या बदलाची दखल घेतात व रुग्णाला उपचारासाठी (बहुतेक वेळा रुग्णाच्या इच्छेविरुद्ध!) मानसोपचार तज्ज्ञाकडे आणतात. असे वितर्क शारीरिक व्याधीमुळे अथवा मानसिक व्याधीमुळे होऊ शकतात. शारीरिक कारणांमध्ये रसायनिक द्रव्ये आणि औषधांचे दुष्परिणामही गणले जातात. 

चुकीच्या कल्पना आणि विचार मेंदूच्या आणि शरीरातील व्याधीमुळे होतात याची जाणीव उपचार करणाऱ्या भिषग्‌वर्यांना आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना असणे आवश्‍यक आहे. माणसाच्या विचारांचे स्थान त्याच्या मनात असते आणि मन हे मानवी मेंदूच्या विशिष्ट कार्यकारणी पद्धतीचे नाव आहे. शरीराच्या आतून आणि परिसरातून मेंदूकडे विविध ‘संवेदना’ (स्पर्श, दृष्टी, आवाज, चव, वास इत्यादी) जातात. दोन किंवा अधिक संवदेना मिळून मेंदूत ‘परिचय’ निर्माण होतो; किंवा ओळख पटली की त्याबद्दल स्मृती जागृत होते. त्यातून ‘सुखदायी’ किंवा ‘नकारात्मक’ भावना निर्माण होतात. त्या भावनांमुळे ‘विचारांना’ चालना मिळते. संवेदना-परिचय-स्मृती-भावना-विचार ही सारी कार्ये मेंदूतच होत असतात. अशा सगळ्यांना मिळून ‘मन’ अशी संज्ञा वापरली जाते. मेंदू हा आपल्या शरीराचाच एक भाग आहे. शरीरात घडणाऱ्या अनेक घटनांचे परिणाम मेंदूवर होतात. मेंदूचे काम होण्याकरता मेंदूला ऊर्जा लागते, प्राणवायू लागतो, जीवनसत्त्वे लागतात, आघात आणि विकार यापासून मुक्तता लागते. मेंदूच्या काही विकारात आणि काही रायासनिक द्रव्यांच्या परिणामामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड होतो. मेंदूच्या विकारात वितर्क निर्माण होणे अनपेक्षित नाही. विशेषतः वयाच्या पस्तीस वर्षांनंतर प्रथमच एखाद्या व्यक्तीला ‘भ्रम’ झाला तर त्याचे कारण शारीरिक व्याधीत असण्याची शक्‍यता मोठी असते. 

कोकेन, ॲस्फिरॅमीन अशा द्रव्यांचे माणसाला व्यसन लागते. हे रेणू प्रथम शरीरात जातात तेव्हा घेणाऱ्या व्यक्तीला ‘खूप बरे वाटते’ आणि ‘आत्मविश्‍वास’ वाढतो. ही भावना पुन्हापुन्हा अनुभवावी या प्रेरणेने माणसे व्यसनी बनतात. या औषधांचा डोस वाढत जातो. जास्त डोस घेतल्यावर विविध प्रकारचे भास होऊ लागतात. आवाज ऐकू येतात. दृश्‍ये दिसू लागतात आणि विविध प्रकारच्या ‘स्पर्शा’च्या संवेदना जाणवू लागतात. व्यसनाधीन व्यक्तीचे बोलणे स्पष्ट नसते, विचार गोंधळलेले असतात आणि रुग्णाला कशा ना कशाची चिंता जाणवत असते. अशा व्यसनातून सुटका अपवादानेच होते.

मेंदूत अनेक भाग असतात. त्यातील एक भागाला टेंपोरल लोब हे नाव आहे. आपली कालकल्पना, ‘स्व’ची जाणीव, स्मृती, अहंकार, स्त्री-पुरुषांतील लैंगिक संबंधावर ताबा या कार्याचे हे स्थान असते. टेंपोरल लोबमधील विकारांचा परिणाम या कार्यावर होऊ लागतो. कालकल्पनेतील विकृतीमुळे प्रथम आणि नंतर घडलेल्या घटनांमध्ये गोंधळ होऊ लागतो. प्रथमच घडणारी घटना ही पूर्वी घडलेली होती असे वाटू लागते. याला ‘देजा व्हू’ या प्रकारात घडलेली गोष्ट कधीच घडली नव्हती याची खात्री पटते. कवी कुलगुरू कालिदासकृत ‘अभिज्ञात शांकुतल’ या नाटकात दुष्यंत हा शकुंतलेला पूर्ण विसरतो ही गोष्ट सर्वविद्‌ आहेच. दैनंदिन जीवनातदेखील आपण काही गोष्टी ‘विसरतो’ तर काहींबद्दल वास्तवाला सोडून गोष्टी घडल्या असे आपल्याला ‘आठवते’! या गोष्टी टेंपोरल लोबमधील पेशीच्या कार्यात आलेल्या घोटाळ्याचे परिणाम असतात. मेंदूला मार लागणे, मेंदूला गाठ होणे, मेंदूला संसर्ग होणे अशा विकारांमुळे हे भ्रम होऊ शकतात. 

अनेक मानसिक विकारांमध्ये रुग्णांना ‘वितर्क’ किंवा ‘भ्रम’ होतो. त्यात महत्त्वाचा आजार म्हणजे सिझोफ्रेनिया आणि डिल्युजनल डिसॉर्डर, मॅनिया अथवा खिन्नता. ‘आपल्या वाईटावर कोणीतरी आहे’ असा भ्रम पॅरॅनॉईया या प्रकारात होतो. उलटपक्षी ‘माझ्यात शक्ती संचारलेली आहे, मी जगाला तारणार आहे’ अशी कल्पनादेखील ग्रॅण्डिओज डिल्युजनल स्टेटस्‌मध्ये रुग्णांना येते. अडचण येते ती रुग्णाच्या सहकाराची. ‘आपल्यात काही दोष आहे’ हे रुग्णाला पटत नाही. त्यामुळे कोणतेही ‘उपचार’ आवश्‍यकच नाहीत अशी रुग्णांची खात्री असते (हादेखील एक वितर्कच असतो.) सिझोफ्रेनिया या विकारामुळे रुग्णाला त्याचे मन आणि शरीर कोठल्यातरी ‘बाह्य’ शक्तीच्या ताब्यात गेल्याचा भ्रम होतो. आजचे विचार आणि भावना या बाह्य शक्तीच्या इच्छेप्रमाणे चालतात याची रुग्णाला खात्री असते. 

अतिरेकी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराबद्दल संशयाची भावना दृढ होणे हा एक भ्रमाचा प्रकार आढळतो. याचे रूपांतर शारीरिक मारहाणीपासून जीव घेण्यापर्यंत होऊ शकतो. उलटपक्षी एकतर्फी प्रेमाच्या घटनेत रुग्णाला दुसऱ्या व्यक्तीला आपण आवडतो याची खात्री पटू लागते. डी-क्‍लेटाम्बाउल्टच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भ्रमात आपल्या कार्यालयातील एखाद्या मोठ्या अधिकारी व्यक्तीचे आपल्यावर प्रेम आहे असा भ्रम होतो. काही रुग्णांना आपल्या शरीराच्या काही भागांत विकार असण्याबद्दल भ्रम होतात. काहींना आपल्या शरीरात कृमी गेल्याची खात्री होते. काहींना आपल्या शरीराच एखादा भाग विकृत आहे असा भ्रम होतो. या भ्रमाला डिस्‌मॉर्फीफोबिया म्हणतात. आपल्या नाकाचा किंवा उरोजांच्या आकाराबद्दल असा भ्रम समाजात अनेक व्यक्तींना असतो. 

खिन्नता (डिप्रेशन) या विकाराने वितर्क निर्माण होतात. चेहरा, तोंड, दात, हिरड्या येथे भासणारे त्रास खिन्नतेमुळे होतात. या आजारांचा उपचारांना प्रतिसाद क्वचितच समाधानकारक असतो. तत्कालिक वितर्क किंवा भ्रम लागोपाठ बऱ्याच रात्री निद्रानाश आलेल्या कोणत्याही आजार नसलेल्या माणसालादेखील होऊ शकतो.

शस्त्रक्रियेपूर्वीची खातरजमा
आपल्या शरीरांतील तथाकथित ‘विकृती’चे मूल्यमापन रुग्णाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. आपल्या नाकावर आलेल्या लहानशा फुगवट्याकडे पाहण्याचा एखाद्या प्रौढ डॉक्‍टरांचा दृष्टिकोन  आणि एखाद्या पौगंडावस्थेतील बालिक-तरुणीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. रुग्णाचा दृष्टिकोन उपचार करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घेणे इष्ट असते. कधी कधी अगदी नगण्य दोषसुद्धा रुग्णाच्या दृष्टिकोनातून मोठे असू शकतात. तरीदेखील कोणत्याही प्रकारची ‘कॉस्मॅटिक’ सर्जरी करण्यापूर्वी किमान दोन डॉक्‍टरांनी रुग्णाला तपासून शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याबद्दल खात्री करून मगच शस्त्रक्रिया करावी. संबंधित अवयवांचे कार्य नीट होत नसेल तरच शस्त्रक्रियेचा विचार करणे इष्ट असते. रुग्णाची तक्रार ही एकच गोष्ट शस्त्रक्रियेच्या निर्णयाप्रत नेऊ नये. या तक्रारीमागे जर काही शारीरिक क्रियात्मक कारण नसेल, तर रुग्णाचा अपेक्षाभंग होण्याची शक्‍यता मोठी असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr h v Sardesai article on confusion