#FamilyDoctor प्रथिने

#FamilyDoctor प्रथिने

प्रथिने (प्रोटीन्स) प्रत्येक जिवंत पेशीला अत्यावश्‍यक असतात. ‘प्रोटीन’ हा शब्द ‘प्रोटॉस’ या ग्रीक शब्दावरून आला आहे. प्रोटॉस म्हणजे ‘पहिला.’ जीवंत पेशीच्या रासायनिक पायाचे स्वरूप प्रथिनांत आहे. जीवनास आवश्‍यक असणारा आहार, जिवात होणारी वाढ आणि दुरुस्ती यासाठी प्रथिने जरूर असतात. प्रथिनांचे आहारातील महत्त्व प्रथिनात असणाऱ्या ‘अमायनो ॲसिड्‌स’वर अवलंबून असते. आपल्या शरीराच्या वजनापैकी पंधरा टक्के वजन प्रथिनांचे बनलेले असते. आपल्या रक्तातील द्रव पदार्थांत (प्लाझ्मा) वेगवेगळी शंभर प्रथिने असतात.

अमायनो ॲसिड्‌स ही लहान लहान एकके (युनिट्‌स) असतात. या अमायनो ॲसिड्‌सपासून प्रथिने बनतात. जमिनीतून मिळणाऱ्या  नायट्रोजेन, सल्फर आणि पाणी, हवेतून मिळणारा कार्बन डायऑक्‍साइड यापासून झाडे अमायनो ॲसिड्‌स तयार करू शकतात. या वनस्पतीतून अथवा इतर प्राण्यांतून अमायनो ॲसिड्‌स मिळतात. याचा अर्थ, सर्व प्रथिनांचा मूळ स्रोत वनस्पती आहेत. सर्व अमायनो ॲसिड्‌समध्ये नायट्रोजनचा अणू असतोच. त्याचप्रमाणे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्‍सिजन हे देखील प्रत्येक अमायनो ॲसिडच्या रचनेत असतातच. शरीरात असणाऱ्या कर्बोदकांच्या आणि मेदाच्या निर्मितीसाठी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्‍सिजन लागतात. प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन आवश्‍यक असते. प्रथिनांमध्ये चौदा ते वीस टक्के नायट्रोजन असतो. आपल्या शरीरातील प्रथिने सतत विभाजन पावत असतात आणि परत बांधली जात असतात. या क्रियांना चयापचय (मेटाबॉलिझम) म्हणतात. चयापचय या शब्दात ‘चय’ आणि ‘अपचय’ असे दोन भाग आहेत. ‘चय’ म्हणजे गोळा करणे, एकत्र जमवणे. संचय हा शब्द अधिक परिचयाचा आहे. जसे ः श्रीमंत व्यक्तीकडे धनाचा संचय असतो. अपचय म्हणजे विघटन करणे. या क्रिया घडताना काही नायट्रोजन असणाऱ्या रेणूंचे निर्माल्य होते. हे निर्माल्य मूत्रातून. मलावाटे शौच्यातून आणि काही प्रमाणात घामातून शरीराच्या बाहेर टाकले जाते. जेव्हा माणसाच्या आहारात बाहेर टाकल्या जाण्याऱ्या नायट्रोजनपेक्षा जास्त नायट्रोजन येतो (प्रथिनयुक्त आहार घेतला जातो) तेव्हा ती व्यक्ती नायट्रोजनच्या बाबतीत सकारात्मक स्थितीत आहे असे म्हटले जाते. उलटपक्षी (उपासमार होताना, आजारपणात) प्रथिनांची आहारात कमतरता झाल्यास त्या चयापचयाच्या स्थितीला नायट्रोजेनच्या दृष्टिकोनातून नकारात्मक म्हटले जाते.

रक्तातील द्रव पदार्थांतील प्रथिनांचे प्रकार आणि प्रमाण तीन गोष्टींवर अवलंबून असते. १) आहार, २) यकृताचे कार्य आणि ३) काही आजार. निरामय स्थितीत रक्तातील पदार्थांत तीन प्रकारची प्रथिने असतात. १) आल्बुमिन, २) ग्लोब्युलिन (अल्फा, बिटा आणि गॅमा उपप्रकार) आणि ३) फायाकिनोजेन. यापैकी आल्बुमिन प्रकारची प्रथिने यकृतात बांधली जातात. थंड हवेत आल्बुमिन प्रथिनांच्या बांधणीला उत्तेजन मिळते. प्लाझ्मामध्ये आल्बुमिन अनेक रेणूंशी बांधलेले असते. उदाहरणार्थ, पित्तरसातील बिलिरुबीन, कॉर्टिकॉल, अनेक संप्रेरके (हार्मोन्स) इत्यादी. या रेणूंना बांधून ते रेणू संपूर्ण शरीरात रक्ताबरोबर नेले जातात. सामान्यतः एक तृतीयांश आल्बुमिन प्लाझ्मामध्ये असते आणि दोन तृतीयांश पेशींच्या बाहेरील पेशीजलात असते. थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य न झाल्यास (हायपो थॉयरॉयडिस्ड) रक्तातून पेशीजलात जास्त प्रमाणात आल्बुमिन स्रवले जाते.

आल्बुमिनचा आकार व वजन कमी असल्याने मूत्रपिंडांच्या आजारात, आल्बुमिन मोठ्या प्रमाणात मूत्रातून टाकले जाते. शरीर भाजले गेले, तर आल्बुमिन शिरेतून दिले जाते. गॅमा ग्लॉबुलिनचे कार्य प्रतिकार शक्‍तीचे असते. शरीरात प्रतिपिंडे गॅमा ग्लॉबुलिनपासून तयार होतात. रक्तातील लिम्फोसाइट्‌स आणि प्लाझ्मासेलस ही प्रतिपिंडे तयार करतात. यांना इम्यूनोग्लॉब्युलिस म्हणतात. एकूण पाच प्रकारची इम्यूनोग्लॅब्युलिस तयार होतात. आयजीए, आयजीडी, आयजीई आणि आयजीएम. रक्तात आयजीएचे प्रमाण वीस टक्के असते. तथापि, आतड्यात आयजीए हे सर्वांत महत्त्वाचे इम्यूनोग्लॅब्युलिस असते. शरीरातील स्रवणाऱ्या ग्रंथीतील प्लाझ्मापेशीत आयजीए तयार होते व स्रवले जाते. अश्रूंमध्ये आणि लाळेत आयजीए असते. तोंडाने जाणाऱ्या (आहाराबरोबर) जीवाणू व विषाणूंना आयजीए बांधत व शरीरात प्रवेश करून देत नाही. आयजीई श्‍वासनलिका आणि आतड्याच्या अस्तरातील प्लाझ्मा पेशीत तयार होते. शिवाय नाका-घशातील टॉन्सिलस आणि ॲडिनॉईडस या ग्रंथीतही असते. त्या व्यक्तींना अस्थमा असतो. ॲलर्जीमुळे सर्दी होत राहते किंवा ज्यांच्या पोटात (आतड्यात) जंत असतात, त्यांच्या रक्तात आयजीईचे प्रमाण वाढलेले असते. आयजीजी हे सर्वांत महत्त्वाचे इम्यूनोग्लॅब्युलिस आहे. विविध संसर्गात विशिष्ट प्रकारचे आयजीजी उपचारासाठी किंवा आजाराच्या प्रतिबंधनासाठी वापरले जाते. आयजीएममुळे जीवाणू-विषाणू यांचा नाश केला जातो. या कार्यासाठी कॉम्प्लिमेंट नावाचे प्रथिन आवश्‍यक असते.

थंड तापमानात आयजीएमचे रेणू एकमेकांना चिकटतात. संधिवाताच्या ऱ्हुमॅटॉईड आर्थायर्थाटस या प्रकारात रक्तात ऱ्हुमॅटॉईज फॅक्‍टर असतो. त्यात आयजीएम असते. शरीरात विषाणूंनी प्रवेश केल्याबरोबर आयजीएमची पातळी वाढते. परंतु, काही महिन्यानंतर आयजीजी (गॅमा ग्लॉबुलिन्स) ची पातळी वाढते. अनेक (किमान पस्तीस) आजारांत इम्यूनोग्लॅब्युलिस शिरेतून उपचार म्हणून दिली जातात. परंतु, लहान मुलांना ॲक्‍यूट ऑटोइम्यून थ्रॉम्बोसायटिक पर्पुरा आणि कावासाकीय डिसीस या लहान (पाच वर्षांच्या आत) मुलांना होणाऱ्या गंभीर आजारात अशा उपचाराचा विशेष फायदा होतो. सध्या जगभर पसरलेल्या घातक एड्‌स या विकारात रुग्णाची पेशीमार्फत होणारी प्रतिकारशक्ती कमजोर होत जाते व अखेर रुग्ण मृत्युमुखी पडतो. अद्ययावत संशोधनाने आजार रोखता येतो. परंतु बरा होईल असा उपचार अद्याप सापडलेला नाही.

रक्त गोठते तेव्हा रक्तातील फायब्रिनोजेन या विरघळणाऱ्या प्रथिनाचे रूपांतर न विरघळणाऱ्या फायक्रिनमध्ये होते. अपुरा आहार किंवा फायब्रिनोजेन हा रेणू तयार न होण्याने या रेणूचा तुटवडा होतो.

आहारातून घेतलेले प्रथिन जठरातील स्रावात असणाऱ्या पेप्सिन या विकाराच्या परिणामामुळे विघटित होते. पुढे लहान आतड्यांतील विकारांमुळे आणखी विघटन होऊन अमायनो ॲसिड्‌स मोकळी केली जातात. जी अमायनो आम्ले लहान आतड्यांतून शोषली जात नाहीत, ती मोठ्या आतड्यांत जातात. तेथील जीवाणूंमुळे या अमायनो ॲसिड्‌सचे विघटन होते. परिणामी, हायड्रोजन सल्फाइडसारखे दुर्गंधीयुक्त वायू सरतात.

अमायनो ॲसिड्‌सपैकी (एकूण वीसपैकी) नऊ अमायनो ॲसिड्‌स शरीरात तयार होऊ शकत नाहीत. त्यांना अत्यावश्‍यक (आहारातूनच मिळू शकणारी) अमायनो ॲसिड्‌स म्हणतात. भारतीय शाकाहार तृणधान्यावर अवलंबून असतो. तृणधान्यात लायसीन व मेथिओनिन ही अत्यावश्‍यक अमायमो ॲसिड कमी पडतात. त्यामुळे आहार संतुलित व्हावा याकरता तृणधान्यांच्या बरोबरीने ‘पूरक’ अन्न घेणे जरुरीचे असते. तांदळात लायसीन हे अमायनो ॲसिड कमी पडते. यास्तव भाताबरोबर डाळ (वरण) घ्यावे. दुधात मेथिओनिन असते, तेव्हा दूध-भात किंवा दहीभात घ्यावा. मासळी खाणाऱ्या व्यक्तींना मासळीबरोबर ओमेगा ३ प्रकारची मेदाम्ले मिळतात. या ओमेगा ३ मेदाम्लांच्या सेवनाचा रक्तातील मेद घटक कमी करण्याचा परिणाम प्रकृतीला फायदेशीर असतो. शाकाहारातून येणारे लोह फेरस या स्वरुपात आणि फायटेट आणि ऑक्‍सालेट रेणूंशी बांधलेले असते. या लोहाचे शोषण चांगले व्हावे याकरिता वरण-भातावर लिंबू पिळून घ्यावे. शाकाहारी व्यक्तीला संतुलित आहार मिळणे सहज शक्‍य आहे. शाकाहारात दुधाचे महत्त्व जाणले पाहिजे. शुद्ध शाकाहारी व्यक्तीने चोवीस तासांत साडेतीनशे मिलिलीटर दूध घ्यावे म्हणजे उत्कृष्ट प्रतीची प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com