अत्यावश्‍यक मेदाम्ले

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 8 June 2018

आपल्या शरीरातील पेशींच्या रचनेसाठी आणि कार्यासाठी ही अत्यावश्‍यक मेदाम्ले लागतात. आपल्या आहारातील तृणधान्ये व डाळी अशा शाकाहारातून या अत्यावश्‍यक मेदाम्लांच्या गरजेच्या ५० टक्‍क्‍यांहून जास्त प्रमाणातही मेदाम्ले उपलब्ध होतात. विविध जीवनसत्त्वे शरीरातील चयापचयाच्या कार्यात आवश्‍यक भाग घेतात. 

योग्य आहाराविना जीवन अशक्‍य आहे. वाढ होण्यासाठी, विकास होण्याकरिता आणि निरामय जीवन कंठण्यासाठी माणसाला पुरेशा आणि योग्य आहाराची जरुरी असते. जमिनीतून मिळणारी साधी रसायने, पाणी आणि वातावरणातून प्राप्त होणारा कार्बन डायऑक्‍साइड यांचा वापर करून वनस्पती आपापले अन्न बनवू शकतात. प्राणिमात्रांमध्ये ही किमया नसते. वनस्पती आणि इतर प्राणी हा प्राण्यांच्या अन्नाचा स्रोत असतो. जगण्याकरिता पुरेसे अन्न मिळविणे हेच प्राण्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय असते. अन्न योग्य असावे म्हणजे, जीवनाला आवश्‍यक सर्व अन्न-घटक योग्य प्रमाणात मिळते. कोणत्या प्रकारचे आणि किती प्रमाणात मिळणे इष्ट आहे याचा अभ्यास आहार शास्त्रात केला जातो. शास्रानुसार आपल्या आहाराचे पुढील नऊ पैलू अभ्यासले जाणे आवश्‍यक असते. १) आहारातून प्राप्त होणारी ऊर्जा (उष्मांक) २) कर्बोदके (कार्बोहायड्रेट्‌स) ३) प्रथिने (प्रोटिन्स) ४) स्निग्ध पदार्थ (लिपिड्‌स) ५) विविध खनिजांचे अणू (मिनरल्स) ६) जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) ७) पाणी ८) चघळ किंवा चोथा (फायबर) आणि ९) तृप्ती (चव, समाधान) या प्रत्येक प्रकारात अनेक भाग आणि उपभाग असतात. आजच्या लेखात स्निग्ध पदार्थांच्या एका उपभागांचा, अत्यावश्‍यक मेदाम्लांचा आपण विचार करूया.

आपल्या शरीरात मेद (फॅट) हा एक महत्त्वाचा भाग असतो. थोड्या प्रमाणात मेद बरीच ऊर्जा निर्माण करू शकतो. आहारातील स्निग्धतेमुळे अन्नाला चव येते. आपल्या जठरातून मेदाचे रेणू आतड्यात पुढे संथ गतीने सरकतात. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले असल्याची समाधानाची भावना आपल्याला जाणवते. जीवनसत्त्व ‘अ’, ‘ड’, ‘ई’ व क आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थातून आपल्याला मिळतात. या खेरीज काही वनस्पतिजन्य अन्नातून आपल्याला अत्यावश्‍यक मेदाम्ले (Essential fatty acids) मिळतात. आपल्या शरीरातील पेशींच्या रचनेसाठी आणि कार्यासाठी ही अत्यावश्‍यक मेदाम्ले लागतात. आपल्या आहारातील तृणधान्ये व डाळी अशा शाकाहारातून या अत्यावश्‍यक मेदाम्लांच्या गरजेच्या ५० टक्‍क्‍यांहून जास्त प्रमाणातही मेदाम्ले उपलब्ध होतात. विविध जीवनसत्त्वे शरीरातील चयापचाच्या कार्यात (metabalism) महत्त्वाचा भाग घेतात. त्याचप्रमाणे ही अत्यावश्‍यक मेदाम्ले चयापचयात आवश्‍यक असतात. रक्तातील कोलेस्टेरॉल या रेणूचे प्रमाण वाढू न देण्यात या अत्यावश्‍यक मेदाम्लांचा महत्त्वाचा भाग असतो. या अत्यावश्‍यक मेदाम्लांचा आहारातील अभाव प्रकृतिस्वास्थ्य बिघडण्याकडे परिणामकारक ठरतो. या मेदाम्लांच्या अभावाने त्वचा खरबरीत होते. मांड्या, पृष्ठभाग, गुदद्वार आणि छाती, पोट व पाठ (धड) येथे टाचणीच्या डोक्‍याएवढे पुरळ उठते. जीवनसत्त्व - ब - संकुल आणि जीवनसत्त्व ई यांचा वापर देखील पुरळ घालविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.

अत्यावश्‍यक मेदाम्लांना अत्यावश्‍यक हे विशेषण लावण्याचे कारण, ही मेदाम्ले मानवी शरीरात बांधली जाऊ शकत नाहीत. ती आहारातूनच मिळवावी लागतात. लायनोलिक (Linolic) लायलोनिलिक (Linolinic) आणि काही प्रमाणात ॲरॅकिडॉनिक (Arachidonic) ही ती अत्यावश्‍यक मेदाम्ले आहेत. प्रत्येक पेशीच्या सभोवताली एक पेशीची मर्यादा ठरविणारी पेशीभिंत (Cell-Wall) असते. शिवाय ठिकठिकाणी शरीरात जैविक पडदे (Biolgical membranes) असतात. या पेशींच्या भागांची रचना करण्याकरिता ही अत्यावश्‍यक मेदाम्ले लागतात. कोलेस्टेरॉल या मेदाची योग्य ठिकाणी ने-आण करणे आणि या रेणूचा शरीराला उपयुक्त रेणूत रूपांतर करण्यात भाग घेणे ही महत्त्वाची कार्ये करण्यात ही मेदाम्ले कार्यरत असतात. यकृताच्या पेशी मेदाचे रेणू बांधतात. ते रेणू यकृताच्या पेशीतच राहिले तर यकृताच्या पेशींना त्यांचे कार्य नीट करता येत नाही (Fatfy liver) ही मेदाम्ले यकृताच्या पेशीतील मेदाच्या रेणूंचा निचरा करतात. आपल्या शरीरात प्रोस्टाग्लॅंडिन नावाचे रेणू महत्त्वाची कार्ये करतात. रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढू न देणे, शरीरात दाह होतो तेव्हा तेथे लाली येते, भाग दुखतो, सूज येते इत्यादी. ही लक्षणे प्रोस्टाग्लॅंडिन्समुळे होतात. बाळंतपणाच्या सुरवातीला गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन प्रोस्टाग्लॅंडिन्समुळे होऊ लागते. आपल्याला ताप येतो किंवा ठिकठिकाणी वेदना जाणवते यामागे प्रोस्टाग्लॅंडिन्स कार्यरत असतात. आपल्या जठरातील आम्ल किती प्रमाणात स्रवले जावे हे प्रोस्टाग्लॅंडिन्स ठरवितात. स्वादुपिंडातून स्रवले जाणारे पाचक रसदेखील प्रोस्टाग्लॅंडिन्समुळे स्रवले जातात. मळ ढकलण्याची क्रिया देखील या प्रोस्टाग्लॅंडिन्सवर अवलंबून असते. मळ पुढे ढकलण्याचे कार्य प्रमाणाबाहेर झाल्यास जुलाब होतात. काही प्रोस्टाग्लॅंडिन्स श्‍वासनलिका रुंदावतात तर काहींच्या परिणामामुळे श्‍वासनलिका विस्तारित होतात. या खेरीज देखील प्रोस्टाग्लॅंडिन्स शरीरात महत्त्वाची कार्ये करतात. या प्रोस्टाग्लॅंडिन्सच्या बांधणीला अत्यावश्‍यक मेदाम्ले आवश्‍यक असतात. प्राण्याची वाढ आणि जननक्रिया (reproduction) या महत्त्वाच्या कार्यात ही अत्यावश्‍यक मेदाम्ले आवश्‍यक असतात.

या अत्यावश्‍यक मेदाम्लांचा (आहारात) अभाव असल्यास त्वचेवर खपले पडू लागतात. विशेषतः हाता-पायांच्या मागच्या व बाहेरच्या भागावर हे पुरळ उठू लागते. पार्श्‍वभागावरील (Buttocks) त्वचेवर देखील पुरळ उठते. या विकाराला फ्रेनोडर्म (phrynoderma) म्हणतात.

स्रोत : 
तेलबियांतून आणि मासळीतून ही अत्यावश्‍यक मेदाम्ले मिळतात. यांना पॉली-अन्‌-सॅच्युरेटेड फॅरी ॲसिड्‌स असेही म्हणतात. सूर्यफुलाचे तेल (Sunflower oil) सरकीचे तेल (Cotton seed oil), मक्‍याचे तेल (Corn oil) सोयाबीनचे तेल यातून ही अत्यावश्‍यक मेदाम्ले मिळतात. प्राणिजन्य स्निग्ध पदार्थांतून (तूप, लोणी, मटण) ही मेदाम्ले फारशी उपलब्ध होत नाही. याला मासळीचा अपवाद आहे.

आहार तज्ज्ञांच्या मते आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थांपैकी ३० टक्के ही अत्यावश्‍यक मेदाम्ले (किंवा पॉलि-अन्‌ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्‌स) असावीत. मात्र या अत्यावश्‍यक मेदाम्लांचा अतिरेक हिताचा नसतो. असा अतिरेक शरीरात फ्री रॅडिकल्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो. ही फ्री रॅडिकल्स शरीरात विविध प्रकारचे अपाय करतात. विविध प्रकारच्या विकारांच्या मुळाशी ही फ्री रॅडिकल्स असतात. यांचा उगम ऑक्‍सिजन (प्राणवायू O२) या अणूतून होतो. ऑक्‍सिजन जीवनासाठी आवश्‍यक असतो हे सर्वविद्‌ आहे. तथापि, कधी कधी O२ मध्ये असणाऱ्या प्राणवायूच्या २ अणूंपैकी एकात एक इलेक्‍ट्रॉन कमी होतो. असा एक इलेक्‍ट्रॉन कमी असणारा अणू शेजारच्या अणूतील एक इलेक्‍ट्रॉन हिसकावून घेतो. त्या अणूतून एक इलेक्‍ट्रॉन हिसकावला जातो तो परत दुसऱ्या अणूतील एक इलेक्‍ट्रॉन हिसकावतो. अशी साखळी चालू राहते. ज्या अणूतील इलेक्‍ट्रॉन हिसकावला जातो तो अणू ज्या रेणूचा भाग असतो तो रेणू अकार्यक्षम बनतो. त्या पेशी व अवयव अकार्यक्षम बनू लागतात. यातून हृदयविकार, कॅन्सर, संधिवात, फुफ्फुसांचे आजार आणि मधुमेह या सर्व आजारात हे फ्री रॅडिकल्स महत्त्वाचा भाग घेतात. ही फ्री रॅडिकल्स अतिरेकाने तयार होणे अपायकारकच असते. प्रत्येक आहार घटकाचे प्रमाण ठरलेले असते. तेव्हाचे प्रमाण आहारात असते. या दृष्टीने तळलेल्या पदार्थांचे देखील प्रमाण मर्यादितच असावे. या दृष्टीने तेलाचा वापर बेताचाच असावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. H v sirdesai article