‘हेमिफेशियल स्पाझम’ आजार! | hemifacial spasm | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemifacial spasm
‘हेमिफेशियल स्पाझम’ आजार!

‘हेमिफेशियल स्पाझम’ आजार!

sakal_logo
By
डॉ. जयदेव पंचवाघ

‘डॉक्टर,.. हा माझा मुलगा. याचं वय आता २९ आहे. हा आजार असाच वाढत गेला तर लग्न होणं अशक्यच आहे ’ ‘डॉक्टर, मी बँकेत सिनियर मॅनेजर. आता मला सांगा, की मी लोकांशी ‘कोणत्या तोंडाने बोलू’ ‘नोकरी मिळवण्यासाठी मी इंटरव्ह्यूलासुद्धा जाऊ शकत नाही’ अशा प्रकारची वाक्य दररोज जवळजवळ रोजच मी हेमिफेशियल स्पाझम सेंटरमध्ये ऐकतो. हा आजार रुग्णांसाठी अत्यंत क्लेशदायक आणि गंभीर ठरू शकतो.

या आजाराच्या प्रारंभी एका डोळ्या भोवतीचे स्नायू वारंवार आणि अनियंत्रित पद्धतीने आकुंचन पावायला लागतात. या वारंवार आणि तीव्र वेगाने होणाऱ्या आकुंचनांनाच ‘स्पाझम’ म्हणतात. जसे दिवस, आठवडे, महिने जातील तशी या स्पाझमची तीव्रता वाढत जाते आणि हे स्पाझम त्या बाजूच्या चेहऱ्याच्या इतर भागात पसरतात. डोळा आणि त्या बाजूच्या गालात हे स्पाझम पसरतात. मात्र हे चेहऱ्याच्या एकाच भागात सीमित राहतात. हळूहळू तर चेहऱ्याचा एक अर्धा भागच वारंवार, अतिवेगाने, अनियंत्रितपणे आकुंचन पावू लागतो. अशा रुग्णाकडे पाहिले असता हे चेहऱ्याचा एक भाग विचित्र पद्धतीने हलवत आहेत किंवा वारंवार ‘डोळा मारत आहेत’...असं वाटण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरंतर या हालचाली आपोआप व अनियंत्रित पद्धतीनेच होत असतात, परंतु त्यामुळे अशा रुग्णांना समाजात मिसळणे, नोकरीच्या ठिकाणी इतर लोकांशी व्यवस्थित बोलणे अशा अगदी साध्या आणि नेहमीच्या गोष्टी सुद्धा अवघड होऊ लागतात. नोकरी मिळणे, लग्न जमणे,समाजात आत्मविश्वासाने वावरणे अशा गोष्टी गोष्टीच अशक्यप्राय वाटू लागतात.

हेमिफेशियल स्पाझम सेंटरमध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये ‘डिप्रेशन’ ची सुरुवात झालेली दिसते. हा आजार जसा वाढत जातो, तसं वाचन करणे, कॉम्प्युटरवर काम करणे, गाडी चालवण्या सारख्या गोष्टी सुद्धा अवघड होतात. या आजाराचं नेमकं कारण काय? हा आजार बरा होऊ शकतो का? याबद्दलची माहिती अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा पूर्णपणे नाही आणि म्हणूनच हे रुग्ण अनेक दिवस यावरचा उपाय शोधत फिरतात.

आजाराची कारणे...

१) आपल्या चेहऱ्याचे स्नायू हलवण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला एक एक स्वतंत्र नस असते. याला फशियल नर्व्ह म्हणतात.

२) ज्या लोकांना हा आजार होतो त्यांच्यात एका बाजूच्या फेशियल नर्व्हला अगदी लागूनच किंवा जवळ जवळ चिकटूनच, जन्मापासूनच एक रक्तवहिनी असते. तसेच, कवटीच्या आतील त्या भागातील रचनाच अशी असते, की ही नस आणि रक्त वाहिन्यांना अगदी दाटीवाटीने राहावे लागेल.

३) आपलं वय जसं वाढत जातं, तशा मेंदूतल्या रक्तवाहिन्या लांब होत जातात आणि प्रसारण पावतात. या रक्तवाहिन्यांची स्पंदन नसतील चेतातंतुंवर आपटायला लागतात आणि यामुळेच चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू वारंवार आकुंचन पावू लागतात. जसे दिवस, आठवडे, महिने पुढे सरकतात तशी ही रक्तवाहिनी आणखीन लांब होत जाऊन नसे मध्ये अधिक खोलवर रुतत जाते. डोळ्याभोवती तील स्नायूंचे स्पाझम मग हळूहळू त्या बाजूच्या गालाच्या स्नायूत सुद्धा पसरतात आणि संपूर्ण चेहराच वारंवार अनियंत्रितपणे आकुंचन पावू लागतो.

MVD शस्त्रक्रिया

हा आजार मुळापासून दूर करण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच MVD. मेंदूच्या ज्या भागामध्ये रक्तवाहिनी फेशियल नसेमध्ये घुसलेली असते तिथपर्यंत एक मार्ग बनवला जातो. न्यूरो मायक्रोस्कोपच्या आणि एनडोस्कोपच्या प्रखर प्रकाश झोतात काळजीपूर्वक आणि नाजूक डिसेक्शन करून ही रक्तवाहिनी नसे पासून दूर केली जाते. ही रक्तवाहिनी त्यानंतर टेफ्लॉन स्पंजनी गुंडाळण्यात येते. त्यामुळे रक्त वाहिनी ची स्पंदनं नसेवर आपटणे बंद होऊन हेमिफेशियल स्पाझम सुद्धा बंद होतात. बोटॉक्स इंजेक्शन ने चेहऱ्याचे स्नायू तात्पुरते बधिर केले जातात. त्याचा परिणाम एक दोन किंवा तीन महिने टिकतो आणि स्पाझम परत सुरु होतात. आजाराच्या मूळ कारणावर आपण कोणताच इलाज करत नसतो आणि जशी वेळ निघून जाईल तशी रक्तवाहिनी लांब होत गेल्यामुळे स्पाझमची तीव्रता मात्र वाढत जाते.

या शस्त्रक्रियेसाठी आणि संशोधनासाठी विशेष प्राविण्य असलेले सेंटर सुरू करावं या विचाराने प्रेरित होऊन २००५ साली पुण्यामध्ये हे कार्य सुरू झालं. हेमिफेशियल स्पाझम सेंटर मध्ये शस्त्रक्रिया होऊन बरे झालेले जवळ जवळ सर्वच रुग्ण म्हणतात, ‘‘या शस्त्रक्रियेने हा आजार मुळापासूनच बरा होऊ शकतो हे जर आम्हाला आधीच कळले असते तर आयुष्यातील काही वर्षे वाया गेली नसती’’ तेव्हा वाईट वाटतं, हीच या लेखा मागची प्रेरणा आहे.

loading image
go to top