चेहऱ्याची असह्य वेदना

चेहऱ्याची असह्य वेदना

‘‘डॉक्‍टर, मी वर्गात शिकवताना चेहऱ्यावर कळ आली, तर माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागायचे आणि बोलणे बंद करून असह्य वेदनेने चेहरा धरून मी खुर्चीत बसायचो. हा ‘ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया’चा ॲटॅक बघून वर्गातील मुलें पण रडायला लागायची.’’ एकनाथ जाधव हे माध्यमिक शाळेत शिकवणारे शिक्षक मला ही त्यांची कहाणी सांगत होते. ‘ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया’ (अर्थात टीएन) या आजारात चेहऱ्यावर येणारी कळ किती तीव्र असू शकते याचे हे चालते-बोलते उदाहरण होते.

जाधव सरांना आठ वर्षांपासून टीएनचा त्रास होता. ‘ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया सेंटर‘मध्ये येणाऱ्या बहुसंख्य रूग्णांप्रमाणेच त्यांची कहाणी होती. सुरूवातीला अन्न चावताना त्याचा हिरडीला स्पर्श झाल्यावर ‘करंट’  सारखी कळ येणे, त्यानंतर ओठाला, गालाला किंवा हनुवटीला चेहरा स्वच्छ करताना स्पर्श झाल्यास जीवघेणी कळ येणे हा त्रास सुरू झाला. दाताचे डॉक्‍टर व इतर काही प्रकारच्या डॉक्‍टरांना दाखवून झाले. निश्‍चित निदान न होता काही वर्ष गेली. त्यानंतर वेदना वाढली. ’न्यूरॅल्जिया’वरची औषध सुरू झाली. वेदनेची तीव्रता व औषधांची मात्रा दिवसेंदिवस वाढत गेली. औषधांचे दुष्परिणाम एका बाजूला व वेदनेची टांगती तलवार दुसऱ्या बाजूला याच्या कात्रीत जाधव सर अडकले होते

‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’सारख्या छोटी सुई घालून करण्याचे काही उपाय करून बघितले, पण त्याचाही उपयोग अगदी तात्पुरताच झाला. किंबहुना या उपायांनंतर जेव्हा पुन्हा वेदना सुरू झाली, तेव्हा तिची तीव्रता दुपटीने वाढली. वेदनेशी, औषधांच्या दुष्परिणामांशी व तात्पुरत्या उपायांच्या फोलपणाशी लढून जेंव्हा मनुष्य थकतो, तेंव्हा जीवन नकोसे वाटण्यापर्यंत त्याची मन:स्थिती पोहोचते. या सर्वाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचारही जाधव सरांच्या मनात येऊन गेला.

तब्बल आठ वर्षांनंतर आणि टीएनच्या वेदनेशी दिलेल्या जीवघेण्या लढाईनंतर त्यांना ‘मायक्रो व्हॅस्कुलर डीकॉम्प्रेशन’ (एमव्हीडी) या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळाली. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर औषधे व वेदना या दोन्ही शत्रूंपासून त्यांची सुटका झाल्यानंतर एका वर्षाने ते परत दाखवायाला आले., तेंव्हा त्यांनी त्यांची खंत इतर असंख्य रुग्णांप्रमाणे व्यक्त केली.

‘‘डॉक्‍टर, हा उपाय आठ वर्षांपूर्वीच करता आला नसता का?’’ हा प्रश्‍न दरवेळेला एखाद्या तीक्ष्ण बाणाप्रमाणे घायाळ करतो. काही अपवादात्मक रूग्ण वगळता टीएन या आजाराचे कारण म्हणजे ट्रायजेमिनल नसेवर आलेला रक्तवाहिन्यांचा दाब. या रुग्णांमध्ये, ही नस ज्या भागात स्थित असते, तो भाग जन्मत: चिंचोळा असतो. त्यातच रक्तवाहिन्यांची रचना व वेटोळे या भागात असे असतात, की नसेच्या मेंदूलगतच्या भागावर या रक्तवाहिन्यांचा दाब पडतो. जसजसे वय वाढत जाईल, तसे या दाबामध्ये वाढ होत जाते. त्यातच, रक्तवाहिन्यांच्या स्पंदनामुळे प्रत्येक मिनिटाला साठ ते ऐंशी वेळा हा दाब घण मारल्याप्रमाणे नसेवर प्रहार करत असतो. त्यामुळे नसेच्या आतल्या चेतातंतूवर परिणाम होऊन त्यांच्या संदेशवहनात ‘शॉर्ट सर्किट’ व्हायला लागते आणि स्पार्क उडाल्याप्रमाणे वेदना होतात. एखाद्या करंटप्रमाणे या वेदना येतात व काही सेकंद किंवा मिनिटे टिकतात. हनुवटी, हिरडी, जीभ, गाल, ओठ, नाकपुडी, डोळ्याची पापणी, भुवई अशा भागाला हाताचा, टॉवेलचा, वाऱ्याचा, ब्रशचा, पाण्याचा स्पर्श झाल्यावर या वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला येतात. 

जसे दिवस, आठवडे व वर्ष जातील, तशा या वेदना अधिक तीव्र होतात. दिवसातून खूप वेळा यां वेदना टिकायला लागतात आणि शेवटी-शेवटी तर जवळ जवळ कायमच असह्य स्वरूपात त्या राहू लागतात. तर, महत्वाचा मुद्दा म्हणजे मेंदूजवळच्या नसेच्या भागावर असलेला दाब  जोपर्यंत टिकून आहे, तो पर्यंत या वेदना कायमच्या बऱ्या होण्याची शक्‍यता नसते. औषधे नसांना तात्पुरती बधीर करतात. पण नसांबरोबर मेंदू व इतर मज्जासंस्थेस सुद्धा बधीर करतात. त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम सुरू होतात. शिवाय औषधांचा परिणाम ओसरला की वेदना परत सुरू होतात. ‘ही कळ परत कधी येईल’ या भीतीच्या दडपणाखाली दिवसेंदिवस रूग्ण राहतो. त्याच्यावर मानसिक परिणाम व्हायला लागतो. 

यावरचा एक उपाय म्हणजे ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’सारख्या सुईने नसेचा काही भाग जाळला जातो किंवा अल्कोहोलसारख्या रसायनांनी भाजला जातो. अर्थात, बऱ्याच वेळेला हे उपाय तात्पुरते तर असतातच, पण या काळात मेंदूजवळचा दाब मात्र क्रमाक्रमाने आत वाढतच असतो. त्यामुळे दुखणे परत सुरू होते, ते दामदुपटीने सुरु होते.

औषधे किंवा इतर छोटे उपाय हे चुकीचे आहेत असे नाही, पण ते दुखण्याचे मूळ कारण दूर करत नाहीत. त्यामुळे ते तसेच राहून दुखण्याची तीव्रता अनेक पटीने वाढते. यावर ‘स्पंदनयुक्त दाब’ दूर करणारी शस्त्रक्रिया (एमव्हीडी) अधिक उपयुक्त ठरते. याद्वारे नसेवर आलेला दाब दूर करण्यात येतो. ही शस्त्रक्रिया ‘न्यूर्रासर्जरी मायक्रोस्कोप’ व ‘एन्डोस्कोप’ या दुर्बिणी वापरून करण्यात येते. यात नसेच्या मेंदूलगतच्या भागातला रक्तवाहिनीचा दाब दूर करण्यात येतो. त्यामुळे या शस्त्रक्रियेने हा आजार कायमचा बरा होऊ शकतो. 

कोणत्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरेल व कोणत्या प्रकारे ती करावी हे ठरवणे हा अनुभवाचा भाग आहे. गेली बारा वर्षे पाचशेच्या वर शस्त्रक्रिया करून व रुग्णांचे अनुभव नोंदवून आम्ही जे संख्याशास्त्रीय विश्‍लेषण केले, त्या प्रमाणे योग्य निवड केली असता व योग्यवेळी शस्त्रक्रिया केली असता ९८ टक्के रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे लक्षात आले. या रुग्णांच्या पुढे दहा वर्षे नोंदी ठेवून हा अभ्यास करण्यात आला आहे. आजार सुरू झाल्यानंतर जेवढ्या लवकर ही शस्त्रक्रिया केली जाते, तेवढी ती परिणामकारक ठरते. शस्त्रक्रिया यशस्वी होणे म्हणजे वेदना व औषधे दोन्ही पासून मुक्ती मिळणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com