esakal | #FamilyDoctor काचबिंदू
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor काचबिंदू

चाळिशीनंतर डोळ्यांच्या डॉक्‍टरांकडून नियमितपणे, निदान वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे आवश्‍यक आहे. काचबिंदूचे निदान लवकर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी काही त्रास होत नसला, तरी चाळिशीनंतर सर्वांनी नियमितपणे डोळ्यांचा दाब मोजून घेणे आवश्‍यक आहे.

#FamilyDoctor काचबिंदू

sakal_logo
By
डॉ. माधवी मेहेंदळे

काही रुग्णांना काहीच लक्षणे/ तक्रार नसते. चष्म्याचा नंबर लवकर लवकर बदलणे, अंधारात गेल्यावर कमी दिसणे, बाजूने वाहन/ माणूस गेल्यास तो न दिसणे. रोगाच्या सुरवातीच्या काळात दृष्टिक्षेत्राची व्याप्ती कमी झालेली रुग्णाच्या लक्षात येऊ शकत नाही, तसेच रोग बराच वाढेपर्यंत डोळा दुखतही नाही. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला काही झाले आहे, हेच रुग्णाला कळत नाही आणि म्हणूनच जरी काही त्रास नसेल, तरी चाळिशीनंतर डोळ्यांच्या डॉक्‍टरांकडून नियमितपणे, निदान वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे आवश्‍यक आहे. नुसता चष्म्याचा नंबर काढण्याच्या तपासणीत ही तपासणी होत नाही, त्यामुळे चष्म्याच्या दुकानात चष्म्याचा नंबर काढून घेणे म्हणजे ‘डोळे तपासणी’ नव्हे.

अजून एक मुद्दा येथे लक्षात घेणे जरुरी आहे. ऑप्टिक नर्व्हवर परिणाम झाल्यामुळे काचबिंदूच्या रुग्णास दृष्टिक्षेत्र कमी होणे, दृष्टी जाणे हे सर्व होते. ऑप्टिक नर्व्ह खराब झाल्यामुळे जे असे दृष्टिदोष निर्माण होतात, ते कायमचे असतात. औषधोपचाराने अथवा ऑपरेशननेही ते दोष पूर्ववत बरे करता येत नाहीत. जी नजर शिल्लक आहे ती टिकून राहावी, यासाठी उपाययोजना करता येते. त्यामुळे काचबिंदूचे निदान लवकर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी काही त्रास होत नसला, तरी चाळिशीनंतर सर्वांनी नियमितपणे डोळ्यांचा दाब मोजून घेणे आवश्‍यक आहे. काचबिंदू आनुवंशिक असतो, त्यामुळे ज्या रुग्णाला काचबिंदू आहे, त्या रुग्णाच्या भावा-बहिणींनी, मुला-मुलींनी नियमितपणे काचबिंदूची तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे.

दृष्टिक्षेत्र तपासण्यासाठी पेरीमेट्री नावाची तपासणी करतात. एका पांढऱ्या अर्धगोलात पेशंटचा चेहरा ठेवतात. एक डोळा बंद करून ज्या डोळ्याची तपासणी करणे सुरू आहे, त्याने एक मध्यभागी असलेल्या लाइटकडे बघत राहावे लागते. अशा तऱ्हेने सरळ नजर स्थिर असताना बाजूने लाइट चमकवले जातात. बाजूचा लाइट दिसला, की रुग्णाने एक बटन दाबायचे असते. किती भागात लाइट दिसला नाही, हे एका कागदावर छापले जाते. परत काही कालावधीनंतर (वर्ष - दोन वर्ष) ही तपासणी केल्यास आधीच्या तक्‍त्याशी तुलना करून रोग आटोक्‍यात आहे का खालावला आहे, हे लक्षात येऊ शकते.

डोळ्यांचे डॉक्‍टर एका मशिनच्या साह्याने ऑप्टिक नर्व्ह बघू शकतात. ऑप्टिक नर्व्हची स्थितीपण नियमित तपासणीमध्ये लक्षात येऊ शकते. काचबिंदू झालेल्या रुग्णांनी नियमितपणे व कायमस्वरूपी औषधोपचार करणे जरुरी आहे. त्यामुळे रोग आटोक्‍यात येऊन अंधत्व टाळण्यास मदत होते. डोळ्यात टाकायचे थेंब अथवा पोटातून घ्यायच्या गोळ्या या स्वरूपाचे औषध असते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्यांचे योग्य ते प्रमाण ठरवून घ्यावे. आपल्या मनाने औषधे थांबविल्यास निश्‍चितच अंधत्वाचा धोका असतो.

नियमितपणे औषधे घेत असतानादेखील नियमित तपासणी आवश्‍यक आहे. औषधांचा योग्य तो परिणाम न झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रियेच्या परिणामाबद्दल थोडी अनिश्‍चितता असल्यामुळे शक्‍यतो औषधांवर भर दिला जातो.

हा रोग दोन्ही डोळ्यांना होणारा रोग आहे; पण हे लक्षात घेणे जरुरी आहे, की लवकर निदान झाले आणि नियमित औषधोपचार व तपासणी असली, तर हा काचबिंदू आटोक्‍यात ठेवता येतो आणि त्यामुळे होणारे दृष्टिदोष तथा अंधत्व टाळता येते.

काही वेगळ्या प्रकारचे काचबिंदू -
अँगल क्‍लोझर ग्लॅकोमा (Angle Closure Glaucoma) - यात डोळ्याचा दाब अचानकपणे खूप वाढतो. अंधारात गेल्यावर (उदा. सिनेमा बघायला) हा त्रास जास्त होऊ शकतो. बल्बकडे पाहिल्यास त्याभोवती इंद्रधनुष्यासारखे रंग दिसतात. दाब खूप वाढल्यास डोळा प्रचंड दुखतो. दृष्टी खूप कमी होते. उलट्या (वांत्या) होऊ लागतात. तातडीने उपचार करावे लागतात. तसे न झाल्यास दृष्टी कायमची अधू होऊ शकते. औषधांनी दाब कमी करून त्यानंतर लेझर उपचार अथवा शस्त्रक्रिया करावी लागते.

मोतीबिंदूमुळे होणारा काचबिंदू -
मोतीबिंदू झाल्यावर योग्य कालावधीत शस्त्रक्रिया करून घेणे गरजेचे असते. तसे न झाल्यास मोतीबिंदू जास्त पिकतो व तो आतल्या आत फुटतो. त्यातून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे चाळणीसारखी असलेली छिद्रे बंद होतात व डोळ्याचा दाब वाढतो. डोळा लाल होऊन प्रचंड दुखू लागतो. अशा वेळेस तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागते, हे टाळण्यासाठी मोतीबिंदू फार पिकायच्या आतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यावी. थोडक्‍यात, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वागल्यावर काचबिंदूसारख्या रोगांचाही समर्थपणे प्रतिकार करता येतो.