esakal | पावसाळ्यात घ्या शरीराची काळजी...!
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking Water

पावसाळ्यात घ्या शरीराची काळजी...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘मंदावलेल्या पचनशक्तीचा विचार करूनच बहुधा आपल्या शास्त्रांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या श्रावणात उपवासाला महत्त्व दिलेले आहे. या काळात शक्य असेल तर एकभुक्त राहणे उत्तम. म्हणजे रात्रीचे जेवण घेऊ नये त्याऐवजी गरम पाणी किंवा गरम पाण्यात लिंबू पिळून घेणे उत्तम असते. असे करणे शक्य नसल्यास रात्रीचा आहार हलका असावा’’

रिमझिम श्रावणाच्या सरी, कोवळे ऊन, थंड वाऱ्याची झुळूक आणि आजूबाजूला बहरलेला निसर्ग हे सर्व पाहिले की सगळ्यांचेच हृदय कवीसारखे कविता करायला लागते. या काळात सृष्टीमध्ये नद्या वाहत असतात, विहिरी, तलाव तुडुंब भरलेले असतात, काळे ढग आकाशाला व्यापून सूर्यप्रकाश मंद करून टाकतात. हे वातावरण हवेहवेसे वाटले तरी या काळात आपल्याला अग्नीचे महत्त्व विसरून चालत नाही. या काळात सूर्यदेवतेच्या लपंडावामुळे शरीरातील अग्नी मंद झालेला असतो. वातावरणात शीतलता असल्याने वातप्रकोपाचे त्रास व्हायला लागतात. तसेही वर्षा ऋतूत शारीरिक शक्ती कमी होते. यामुळे या काळात आरोग्याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक असते, आहारात तसेच आचरणात बरेचसे बदल करावे लागतात. पावसामुळे सगळीकडचे पाणी ढवळून निघालेले असते व त्यामुळे या ऋतूत पाण्यातून येणारे आजार अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे या काळात प्यायचे पाणी निर्जंतुक असणे अतिशय आवश्यक आहे. प्यायचे पाणी उकळलेले असणे उत्तमच, पण दिवसभर शक्यतो गरम वा कोमट पाणीच प्यावे. यामुळे मंदावलेला अग्नी प्रदीप्त व्हायला मदत मिळते, शिवाय कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यास प्रतिबंध होतो. या काळात बऱ्याच लोकांना तहान जाणवत नाही, त्यामुळे पाणी प्यायचे विसरायला होते. पण असे झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जलसंतुलन टाकून उकळलेले पाणी दिवसभरात अधून मधून पिण्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. या काळात सरबत, थंड पेये पिणे टाळणे उत्तम. तसेच स्वच्छतेचा विचार करता बाहेरच्या खाद्यपदार्थांपासूनही या काळात लांब राहिलेले बरे, अन्यथा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते.

पाऊस पडायला लागला की सर्वप्रथम आठवतो तो आलं घालून केलेला वाफाळलेला चहा. असा चहा घेण्याचा उपयोग होतोच. याचबरोबर आठवतात ती गरमागरम भजी. स्वतःच्या पचनाचा विचार करून चार भजी खाल्ली तर चालू शकते, परंतु भज्यांवर ताव मारला तर जुलाब सुरू होऊन पळावे लागते हा अनेकांचा अनुभव आपण जाणतो. श्रावणात जेवण सुपाच्य असणे महत्त्वाचे. धान्ये भाजून वापरणे उत्तम. रक्ती तांदूळ, साठी तांदूळ, गहू, ज्वारी वगैरे धान्ये वापरावीत. मीठ, तिखट, लिंबू लावून मक्याचे कणीस वगैरे पचानाला जड पदार्थ खाण्याआधी स्वतःच्या पोटाचा व भुकेचा विचार नक्की करावा. मूग, मटकी, तूर, मसूर ही कडध्यान्ये आहारात असणे चांगलेच, पण या काळात मोड आणलेल्या कुळथाची उसळ वा कढण, कुळथाचे पिठले आहारात ठेवणे उत्तम. कुळथाचा उपयोग श्र्वसनसंस्थेला होतो, बरोबरीने या काळात होणाऱ्या लघवीची जळजळ वा मूत्रमार्गाचे इन्फेक्शन यासाठीही उत्तम फायदा होताना दिसतो. चणा, मटार, चवळी ही कडधान्ये मात्र या ऋतूत जपूनच वापरावीत, यांच्यामुळे पोटात नगारे तरी वाजतात किंवा मलबंधाचा त्रास होताना दिसतो. तसेच या काळात आलं, हिंग, सुंठ, सैंधव मीठ, मिरची, काळे मीठ, मध इत्यादींचा वापर आहारात आवर्जून करावा. आल्याचा रस अर्धा चमचा व लिंबाचा रस दोन चमचे या मिश्रणात एक चिमूट काळे मीठ टाकून भोजनापूर्वी घेतल्यास किंवा दिवसभर थोडे थोडे घेण्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. तूप, जिरे, हिंग, आल्याची फोडणी दिलेले, त्यात स्वच्छ धुतलेली थोडी कोथिंबीर टाकलेले एक वाटी ताजे ताक जेवणाच्या शेवटी पिणे अत्यंत उत्तम असते.

मंदावलेल्या पचनशक्तीचा विचार करूनच बहुधा आपल्या शास्त्रांमध्ये श्रावणात उपवासाला महत्त्व दिलेले आहे. या काळात शक्य असेल तर एकभुक्त राहणे उत्तम. म्हणजे रात्रीचे जेवण घेऊ नये त्याऐवजी गरम पाणी किंवा गरम पाण्यात लिंबू पिळून घेणे उत्तम असते. असे करणे शक्य नसल्यास रात्रीचा आहार हलका असावा, उदा. भाज्यांचे सूप, साजूक तूप घालून खिचडी, भाकरी, एखादी साधी भाजी; उपवास असल्यास भगर, ताकाची आमटी, उपवासाचे थालीपीठ खाणे उत्तम. भूक लागली तरच आहार घ्यावा. या काळात दिवसातून दोनदाच खाणे उत्तम. दोन वेळचे भोजन सोडून मध्ये मध्ये काहीही खाऊ नये. तळलेले पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ, पनीर, लस्सी, मांसाहार अशा प्रकारच्या गोष्टी आहारात न ठेवणेच उत्तम. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम करणे, बाहेर पाऊस पडत असल्याने बाहेर पडणे शक्य नसल्यास घरातल्या घरात चालणे, शक्य होईल तेव्हा उन्हात बसणे, दिवसाची झोप पूर्णतः टाळणे हे फायद्याचे ठरते. सर्दी-खोकल्याचा वारंवार त्रास होत असल्यास सितोपलादी चूर्ण मधात मिसळून घेणे, सॅन अमृत किंवा फॉर्म्युला के२ सारखा काढा घेणे उत्तम ठरते. सांधेदुखी किंवा वाताचे त्रास होत असल्यास, रोज अभ्यंग करणे, सर्व सांध्यांना संतुलन शांती तेलासारखे तेल लावणे, वातबलसारख्या गोळ्या, प्रशांत चूर्णासारखे चूर्ण घेणे, पोट साफ होत नसल्यास सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण घेणे, अन्नयोगासारख्या गोळ्या घेण्याचा उपयोग होतो. पायात नेहमी चपला घालणे, दमट जागेत फार वेळ न थांबणे वगैरे काळजी घ्यावी. अशा प्रकारे काळजी घेतली तर आरोग्य-अनारोग्याशी लपंडाव खेळण्याची गरज नक्कीच भासणार नाही.

- डॉ. मालविका तांबे

loading image
go to top