स्तन्यपान समज-गैरसमज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breastfeeding

आईचे दूध हे नवजात बालकाकरता अमृत आहे, असे आपल्याकडे म्हटले जाते. नवजात बालकाच्या सर्व गरजांचा विचार करून निसर्गाचे हे वरदान दिलेले आहे.

स्तन्यपान समज-गैरसमज!

- डॉ. मालविका तांबे

आईचे दूध हे नवजात बालकाकरता अमृत आहे, असे आपल्याकडे म्हटले जाते. नवजात बालकाच्या सर्व गरजांचा विचार करून निसर्गाचे हे वरदान दिलेले आहे. काश्यपसंहितेमध्ये म्हटलेले आहे की, स्तन्यपान करणारे बालक दीर्घायु असते, ताकद व्यवस्थित असते, ते आनंदी असते, सर्व आजारांपासून लांब राहते. बालकाच्या सर्वांगीण विकासाकरिता स्तन्यपानाचा फायदा होत असतो. आईचे स्तन्य हे बाळासाठी पूर्णान्न तर असतेच, बरोबरीने स्तन्यपान करणाऱ्या बालकाला संक्रमण होण्याची शक्यता जवळजवळ नसते, बाळाचे पचन व्यवस्थित राहते, जुलाब-उलट्यांचा त्रास सहसा होत नाही, आईच्या दुधामध्ये प्रतिजैविके असल्यामुळे स्तन्यपान करणाऱ्या बाळाची एकूणच प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहायला मदत मिळते व ॲलर्जीचे त्रासही कमी होतात. स्तन्यपानामुळे आई बालकाचे नाते घट्ट व सुदृढ व्हायला मदत मिळते. गर्भधारणा, गरोदरपण आणि त्यानंतरची प्रसूती यामुळे स्त्रीमध्येही अनेक बदल झालेले असतात. तिच्या शरीरात झालेले हॉर्मोन्सचे संतुलन पूर्ववत होण्यासाठी, तिच्या आरोग्यासाठी स्तन्यपान करवणे हितावह असते. तिचे वजन पूर्ववत व्हायला, प्रसूतीनंतर पाळी योग्य वेळी यावी यासाठी मदत होते. बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये काही प्रमाणात नैराश्य आलेले दिसते. स्तन्यपान करवणाऱ्या स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असते. स्तन्यपानाचे महत्त्व सर्वांना पटलेलेच आहे. पण स्तन्यपानासंबंधित बऱ्याच शंका अनेकांच्या मनात असतात. आज आपण या शंकांची उत्तरे पाहण्याचा प्रयत्न करू.

1) स्तन्यपान की स्तनपान? – आयुर्वेदात मातेच्या स्तनात उत्पन्न होणाऱ्या दुधाला स्तन्य म्हटलेले आहे. त्यामुळे जे आपण बाळाला पाजतो ते स्तन्य. त्यामुळे स्तन्यपान हा शब्द बरोबर आहे.

2) बाळाचा जन्म झाल्या झाल्या बालकाला स्तन्यपान करवावे असे सांगितले जाते, परंतु आयुर्वेदात तत्पूर्वी बालकाला मधात सोने उगाळून चाटवायला सांगितलेले आहे. यामुळे बालकाची प्रतिकारशक्ती वाढते, बालक दीर्घायुषी होते, त्याची बुद्धिमत्ता वाढते, चुकीच्या गोष्टींपासून त्याचे संरक्षण होते. यामुळे बालकाचा जंतुसंक्रमण होईल का, आईच्या दुधाच्याही आधी असे सोने उगाळून बालकाला दिल्यास त्याची भूक कमी हेईल का, अशी भीती काहींच्या मनात असलेली दिसते. तेव्हा सोने केवळ २-३ थेंब मधात उगाळलेले असते त्यामुळे बालकाची भूक वगैरे कमी होते नाही, यानंतरही बाळ व्यवस्थित स्तन्यपान करू शकते. दुसरे म्हणजे मधाद्वारा कुठल्याही प्रकारे संक्रमण होण्याची शक्यता नसते.

3) बालकाला दिवसातून किती वेळा स्तन्यपान करावे? - प्रत्येक बाळाची पचनक्षमता, भूक वेगवेगळी असते. साधारणपणे प्रत्येक बाळ २-३ तासांनी दूध पिते. म्हणजे दिवसातून ८ ते १० वेळा दूध पाजायची गरज पडते. पण बाळ झोपलेले असेल तर त्याला झोपेतून उठवून दूध पाजायलाच पाहिजे असे नसते. किंबहुना असा आग्रह धरला की बाळाची पचनक्षमता कमी होत जाते. मुळात झोपेतून उठवणे हे बाळाच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. बाळाला भूक लागली की त्याला दूध पाजणे हेच इष्ट.

4) बाळाला पाणी पाजावे का? – आपल्याला ज्याप्रकारे तहान व भूक असे दोन्ही लागतात त्याप्रमाणे बाळालाही जन्मापासूनच तहान व भूक या दोन्ही भावना असतात. बाळाला पाणी पाजले तर त्याची भूक कमी होते व कमी दूध प्यायल्यामुळे त्याचे वजन नीट वाढत नाही असा गैरसमज असलेला दिसतो. पण ऋतुनुसार, बाळाच्या प्रकृतीनुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे लागते. बाळ मध्ये मध्ये २-२ घोट दूध घेत असले तर याचाच अर्थ असा की त्याला तहान लागते आहे असे समजून दोन फीडमध्ये व्यवस्थित उकळून निर्जंतुक केलेले पाणी थोडे थोडे बाळाला द्यायला हरकत नाही.

5) बाळाला पुरेसे दूध मिळते आहे की नाही अशी चिंता आईला सतत असते. अशी चिंता वाटणे स्वाभाविकही आहे. बाळ किती दूध पिते आहे हे मोजताही येत नाही. त्यामुळे दूध पाजल्यावर २-३ तास बाळ शांत राहत असेल, त्याला अपचनाचा त्रास होत नसेल, बाळ चिडचिड करत नसेल, व्यवस्थित झोपत असेल, त्याचे वजन वाढत असेल तर बाळ थोड्या प्रमाणात उलटी करत असेल तरी चिंतेची गरज नसते.

6) बाळाला किती वयापर्यंत स्तन्यपान करवावे ? पहिले सहा महिने बाळाला पूर्णतः आईच्या दुधावर ठेवणे उत्तम. तसे शक्य नसल्यास चौथ्या महिन्यापासून गाईचे दूध, पाणी, वावडिंग, खडीसाखर एकत्र उकळून बाळाला द्यावे. बाळ वर्ष-सव्वा वर्षाचे होईपर्यंत दूध हा त्याच्या आहाराचा मुख्य भाग असावा. इच्छा असल्यास दोन वर्षांपर्यंत आईचे दूध देता येते, पण असे करणे टाळणेच इष्ट, कारण या वयात बाळाला आईच्या दुधाची सवय लागली की ती सोडवताना त्रास होताना दिसतो. त्यामुळे १५ ते १८ महिने या कालावधीत स्तन्यपान सोडणे उत्तम. असे करणे बाळाच्या आरोग्याकरता व आईच्या झोपेकरता उत्तम ठरते.

7) गाईचे दूध की पावडरचे दूध? – खरे तर आईच्या दुधाला पर्याय नाही. आईचे दूध कमी पडत असले तर मात्र बाळाला गाईचे दूध देणे जास्त श्रेयस्कर. गाईचे दूध वर सांगितल्यानुसार नीट उकळून दिले तर बाळाला पचायला सोपे पडते आणि नैसर्गिक असल्याने त्रासही कमी होतो. दुधाची पावडर गाईच्या दुधावर काही प्रक्रिया करूनच बनवली जाते, यात काही रसायने घातली जातात. आधुनिक शास्त्रानुसार आईच्या दुधामध्ये लॅक्टोज, फॅट, ऑलिगो सॅकराइडस्, व्हिटामिन्स, मिनरल्स, अँटिबॉडिज्, हॉर्मोन्स व वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टिरिया असतात. दुधाची पावडर बनवत असताना या निकषांच्या जवळात जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो. दुधाच्या पावडरमध्ये फॅट वाढविण्याकरता वनस्पतिज तेलही, तसेच वेगवेगळ्या प्रकारची रसायने वापरली जातात. पण असे दूध शरीरात सात्म्य होण्यास योग्य नसते. प्रक्रिया केलेले दूध बाळाचा पचायला त्रास होत नाही असा भास होत असला तरी असे दूध आरोग्यासाठी कितपत योग्य आहे हा वादाचा विषय आहे. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

आयुर्वेदानुसार स्तन्य हे मधुर, कषाय, गुरू, स्निग्ध व शीत असते. समानाने समानाची वृद्धी असा विचार केला तर शरीरात स्निग्धता, कषायता, मधुरता वाढेल अशा प्रकारे पदार्थ आईने सेवन केल्यास स्तन्याचे प्रमाण वाढायला मदत मिळते. स्तन्यपान करवणाऱ्या मातेने रोज संतुलन शतावरी कल्प घालून दिवसातून २-३ कप दूध घेणे, अहळिवाचा लाडू व खीर घेणे, सकाळच्या न्याहारीमध्ये कणकेचा, शिंगाड्याचा गूळ घालून केलेले शिऱ्याचा समावेश करणे, रव्याची खीर, तांदळाची खीर, खसखशीची खीर वगैरेंचा समावेश करणेही उत्तम, लॅक्टोसॅन गोळ्या घेणे वगैरेंचा उपयोग होताना दिसतो. स्तन्य शुद्ध असणे महत्त्वाचे आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. दुधाचा रंग वेगळा असला, वास येत असला, फेस असला, स्निग्धता वा चिकटपणा अधिक असला तर असे दूध बाळाला पचत नाही. असे असल्यास आईच्या आहारात हिंग, हळद, मेथी, जिरे अशा मसाल्यांचा आवर्जून वापर करावा. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणेही उत्तम ठरते.

बाळाच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्तन्यपानाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. स्तन्यपानामुळे बाळाच्या वाढीला आवश्यक तत्वे तर मिळतातच, त्याचबरोबर बाळाची मानसिक व बौद्धिक वाढ होण्यासही हातभार लागतो. तसेच अवाजवी वजन वाढणे, चयापचय क्रियेशी निगडित मधुमेहासारखे आजार सुद्धा कमी आढळतात. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा जागतिक स्तन्यपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या काळात स्तन्यपानाविषयी समाजामध्ये जागरूकता आणणे किती गरजेचे आहे, याचा विचार करायला हवा.