
ऋतुचक्रानुसार दरवर्षी वेगवेगळे ऋतू येतात आणि जातात. त्यात सर्वांत कठीण असतो तो हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होणारा प्रवास.
खा- प्या- संतुलित राहा!
- डॉ. मालविका सुनील तांबे
ऋतुचक्रानुसार दरवर्षी वेगवेगळे ऋतू येतात आणि जातात. त्यात सर्वांत कठीण असतो तो हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होणारा प्रवास. वातावरणातील थंडपणा कमी होत जातो, तापमान वाढायला लागते, हळू हळू घामाघूम व्हायला लागते, चिकटपणा यायला लागतो, वातावरणात उष्णता वाढल्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि हलके हलके खायची-प्यायची इच्छा कमी होत जाते. या काळात शरीरात वाढत असलेला वातदोष आणि कमी होत असलेला कफदोष यांच्यात समन्वय साधणे अत्यंत गरजेचे असते. या कठीण काळात जर आयुर्वेदिक मार्गदर्शनानुसार आहार व आचरण ठेवले तर आरोग्य टिकवून ठेवणे सोपे होते. आहारात स्निग्ध, द्रव, शीतल व पचायला हलके पदार्थ ठेवणे चांगले. शीतल म्हणजे फ्रिजमध्ये ठेवून गार केलेले पदार्थ नव्हेत, तर येथे शीत वीर्याचे पदार्थ अपेक्षित आहेत. लिंबाचे सरबत, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी हे शीतवीर्याचे पदार्थ आपल्याला माहिती असतात, पण पिण्याचे पाणी वाळा, चंदन, नागरमोथा वगैरे वनस्पती (जलसंतुलन) टाकून उकळलेले असले तर ते उत्तम ठरते. उकळलेले पाणी सामान्य तापमानाला आल्यावर मातीच्या माठात ठेवून गार केले तर पित्ताचा त्रास कमी व्हायला तसेच लघवी साफ व्हायलाही मदत होते. उन्हाळ्यात दूध नक्की घ्यावे. गाईचे, म्हशीचे दूध शीत गुणधर्माचे व वीर्यवर्धक असते. या काळात मिल्कशेक घेण्याची पद्धत आपल्याकडे रुजू होत चाललेली दिसते आहे.
फळे टाकलेले मिल्कशेक घेण्यापेक्षा खडीसाखर, बदाम, वेलची, केशर वगैरे घालून तयार केलेले केशरी दूध गार करून घेणे उत्तम. चॉकलेट, कोको पावडर, गुलकंद, चैतन्य कल्प, शतावरी कल्प वगैरे घालूनही मिल्कशेक बनविता येऊ शकतात. असे शेक चवीला तर उत्तम असल्यामुळे मुलेही अशी पेये आनंदाने घेतात, ज्याचा उपयोग स्वास्थ्य टिकून राहायलाही होतो. दुधाचा दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे आइस्क्रीम. यात दुधाची स्निग्धता व आइस्क्रीमचा थंडपणा असल्यामुळे पोटात गार वाटते, परंतु आइस्क्रीम खाताना लक्षात घेण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आइस्क्रीम नक्की दुधापासूनच तयार केलेले आहे की वनस्पती तुपापासून हे तपासून घ्यावे. बाजारातील तयार आइस्क्रीम खाण्यापेक्षा घरी केलेलेच आइस्क्रीम खाणे श्रेयस्कर ठरते. आइस्क्रीममध्ये फळे घातलेली नसावीत. रात्रीच्या वेळी आइस्क्रीम खाणे टाळणे इष्ट ठरते. गार पदार्थ वा आइस्क्रीम खाल्ल्यावर ज्यांना घसा धरणे, सर्दी होणे असे त्रास होण्याची प्रवृत्ती असते त्यांनी आइस्क्रीम खाल्ल्यावर दोन घोट गरम पाणी किंवा चहा-कॉफी घेणे उत्तम. या काळात आहारात भाताचा समावेश नक्की असावा. न्याहारीमध्ये मऊ भात, जेवणात तांदळाची खीर, ताक-भात खाणे उत्तम. काही लोक या काळात थंडपणा राहावा म्हणून दही-भात खातात. परंतु या काळात दही टाळणे उत्तम. त्याऐवजी दह्यात पाणी टाकून घुसळून केलेले ताक घेणे उत्तम ठरते. जेवण्याच्या शेवटी ताक-भात घेणे किंवा जिरे पूड-सैंधव मीठ, आवडत असल्यास खडीसाखर घालून ताक पिणे चांगले. दही फारच आवडत असले तर त्याचा वापर कोशिंबिरीसाठी करावा. दही नुसते खायचे झाल्यास त्यात सैंधव मीठ किंवा खडीसाखर टाकून खावे मात्र कमी प्रमाणातच. उन्हाळ्यात लोणी खाणे उत्तम असते. हातापायांची जळजळ, पोटात गरम वाटणे, तळपायाची भगभग, डोळे-डोके गरम वाटणे, चक्कर-ग्लानी येणे वगैरे त्रास जाणवणाऱ्यांनी रोज अंदाजे वीस ग्रॅम लोणी खडीसाखर घालून खावे.
शीत गुणधर्माचे असल्याने या काळात डाळी व कडधान्यांतील मूग वापरणे उत्तम असते. मुगाची डाळ, मोड आणलेल्या मुगाची उसळ, मुगाची धिरडी वगैरे पाककृतींचा आहारात समावेश असावा. तूर, मटकी, मसूर यांचाही वापर करता येतो.
आमटी किंवा भाजी करत असताना जिरे, धणे, कोकम, वेलची, दालचिनी, हळद वगैरे मसाले वापरणे चांगले. या काळात ओला नारळ, कांदा, पुदिना, कोथिंबीर यांचाही वापर करता येतो. आहारात दुधी, कोहळा, लाल भोपळा, घोसाळी, टिंडा, काकडी, तोंडली, भेंडी वगैरे फळभाज्यांचा समावेश करणे उत्तम. या काळात अनेक मोसमी फळे मिळतात. बाजारातून तयार सरबत सिरप आणणे टाळणेच इष्ट, कारण त्यात कृत्रिम रंग, कृत्रिम रासायनिक पदार्थ, प्रिझर्वेट्व्हज वगैरे टाकलेले असतात. घरीच फळांचा ताजा रस काढून घ्यावा. फळांच्या गरात थोडे गार पाणी, वेलची पूड, जिरे पूड, चवीनुसार मिरे पूड घालून तयार केलेले आयुर्वेदात सांगितलेले पानक घेणेही उत्तम. आंबा, कैरी, खजूर, मनुका, डाळिंब, फालसा, आवळा, चिंच वगैरे पानक तयार करण्यासाठी वापरता येतात. तयार केलेले पानक साधारण ८-१० तास चांगले राहते. त्यामुळे बाहेरून आल्यावर थकवा वाटत असला, डोळ्यांची आग होत असली, तहान लागली असली तर असे थंड पानक घेणे उत्तम. अशा प्रकारे या काळात निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टींचा वापर योग्य प्रकारे केला तर तापदायक उन्हाळा सुखदायी व्हायला मदत होऊ शकेल. त्यामुळे खा..प्या... संतुलित राहा...स्वस्थ राहा....मजेत राहा.