
हाडांचे आरोग्य म्हटले की, सामान्य ज्ञान एवढेच सांगते, आहारामध्ये कॅल्शिअमची पूर्तता व्यवस्थित व्हायला हवी.
- डॉ. मालविका तांबे
हाडांचे आरोग्य म्हटले की, सामान्य ज्ञान एवढेच सांगते, आहारामध्ये कॅल्शिअमची पूर्तता व्यवस्थित व्हायला हवी. खरेच का हे इतके सोपे आहे? आयुर्वेदामध्ये अस्थिधातू हा सप्तधातूंपैकी एक आहे. हा धातू आरोग्यासाठी महत्त्वाचा असून स्थिरत्व आणणारा आहे, तो शरीराला धारण करतो तसेच कठीण असतो असे सांगितलेले आहे. शरीराला आकार देणे, हालचालींना मदत करणे, तसेच शरीरातील अवयवांचे रक्षण करणे, मज्जाधातूचे (Bone Marrow) पोषण करणे एवढेच नव्हे तर दात, केस, शरीरावर असलेले रोम, दाढी, नखे इत्यादींचेही निर्माण व आरोग्याचा आधार हा अस्थिधातूच असतो. हाडांसाठी काय गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची रचना समजून घेणे आवश्यक आहे.
आ धुनिक व आयुर्वेद शास्त्र दोन्ही म्हणतात की, अस्थिधातू कठीण असला तरी तो घन (solid) नसतो. त्यामध्ये छिद्र असतात, तसेच अस्थीमध्ये पोकळीही असते, ज्यामध्ये मज्जाधातुही असतो. अस्थिधातू तयार होताना त्यामध्ये मुख्यत्वे पृथ्वी व वायू महाभूते यांची मदत होते. पृथ्वी, महाभुतामुळे कठिणत्व व घनता अर्थात (solidness) आणि वायू महाभुतामुळे हाडांमध्ये सछिद्रता व पोकळी तयार होते. या सछिद्रतेमुळे किंवा पोकळीमुळे रक्तसंवहन होतेच त्याशिवाय हाडे लवचिक असतात. हाडे पूर्णपणे घन असतील तर त्यांच्या कडकपणामुळे ते पटकन मोडतील किंवा आपल्याला हालचाल करताना कदाचित कडकपणा जाणवू शकेल. पोकळी नसेल तर हाडांचे वजनपण फार जास्त होईल त्यामुळे हालचालही कठीण होऊ शकते. त्यामुळे एकूणच हालचाली व लवचिकतेच्यादृष्टीने हाडांमध्ये छिद्रता असणे गरजेचे असते. ही छिद्रता जास्त वाढल्यास हाडांची ताकद कमी, घनता कमी होते. त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर, ऑस्टिओपोरोसीस किंवा सांध्यांचे दुखणे वगैरेसारखे त्रास आपल्याला जाणवू लागतात. त्यामुळेच सर्वांगीण स्वास्थ्याच्यादृष्टीने विचार केल्यास पृथ्वी व वायू महाभुते म्हणजे घनता व छिद्रता यामध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. म्हणून फक्त कॅल्शिअमचा म्हणजे पृथ्वीतत्त्वाचा विचार केल्यास तो कधीतरी त्रासदायकही ठरू शकतो.
अस्थिधातूंशी संबंधित विकार
शरीरामध्ये रोज नवीन अस्थिधातूंची निर्मिती होत असते. आपण योग्य काळजी घेतल्यास अस्थिधातूशी संबंधित होणारे त्रास कमी करता येऊ शकतात. सामान्यपणे पाहिल्यास कंबरदुखी, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, गाऊट, ऑस्टिओपोरोसिस, फ्रॅक्चर्स अशा कित्येक आजारांचा अस्थिधातुशी संबंध असतो. अस्थिधातुमध्ये विकार उत्पन्न होण्याची काही सामान्य कारणे असतात,
चौरस आहार न घेणे किंवा चुकीचा आहार घेणे.
अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास खूप प्रमाणात असणे. ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये पोषक द्रव्ये पचन होऊन मिळायला पाहिजेत ती कमी पडतात.
स्त्रियांमध्ये विचार केल्यास हार्मोन्सचे असंतुलन किंवा मेनोपॉजचा काळ, पाळीमध्ये होणारा रक्तस्राव, गरोदरपणात न घेतलेली काळजी यामुळे हाडांचे विकार होताना दिसतात.
कोणताही दीर्घ आजार शरीरामध्ये असल्यास हाडांमध्ये कमकुवतपणा येतो.
अतिप्रमाणात धूम्रपान/मद्यपान, केमिकलयुक्त औषधांनीही हाडांमध्ये कमकुवतपणा येतो उदाहरणार्थ स्टिरॉईडस्.
मुळातच कुटुंबामध्येच हाडांचा कमकुवतपणा असल्यास अशाप्रकारचे त्रास होताना दिसतात.
कारणे अनेक असली तरी हाडांच्या आरोग्याच्यादृष्टीने काही गोष्टींची काळजी आपण घेतल्यास अनेक त्रास आपण लांब ठेवू शकतो.
शास्त्रोक्त पद्धतीने मसाज
वातशमनाच्यादृष्टीने व हाडांमधील लवचिकता व्यवस्थित राहण्यासाठी नियमितपणे अंगाला रोज शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले तिळाचे तेल लावणे अत्यंत उत्तम असते. असे सिद्ध केलेले तेल शरीरामध्ये आतपर्यंत जिरायला मदत होते, त्यामुळे अस्थिधातुचे पोषण होऊ शकते. वातअसंतुलन झाल्याने तिथला कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. आहारामध्ये दूध, दही, ताक, तूप, लोणी, पनीर इ. आपल्या पचन व प्रकृतीप्रमाणे नियमितपणे घ्यावे. अनेकदा लोकं कॅल्शियमच्यादृष्टीने फक्त ताकच घेतात. मात्र शरीरामध्ये हाडांवर कॅल्शिअमची बांधणी व्यवस्थित करायची असल्यास त्यासाठी स्नेहाची म्हणजे फॅटची आवश्यकता नक्की असते. अन्यथा आपण घर बांधायला गेलो आणि फक्त विटा घेतल्या आणि सिमेंटचा वापर केला नाही तर ते टिकून राहू शकेल का? त्याप्रमाणेच हाडांमध्येही कॅल्शियमसह इतर मिनरल्स व्यवस्थित टिकून राहण्याच्यादृष्टीने त्यांना लिंपन करण्यासाठी फॅटस् अत्यंत गरजेचे आहे.
पूरक आहाराला व्यायामाची जोड
पूरक आहार म्हणून रोज डिंकाचे लाडू, खारकेची पूड घालून उकळविलेले दूध, संतुलनचे मॅरोसॅन, आत्मप्राश, सॅनरोजसारखे रसायनेही घेतलेली उत्तम ठरतात. कॅल्शिअमसोबतच फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॉपर आदी मिनरल्स वा न्युट्रियंटस असतात जे यामध्ये गरजेचे असतात. त्यासाठी पालेभाज्या खाणं, बदाम, अक्रोड, जवस, तीळ, भुईमुगाचे दाणे आहारात असावेत. सध्याच्या काळामध्ये व्हिटॅमिन-डी लोकांमध्ये खूप कमी असल्याचे दिसते. यासाठी अगदी कटाक्षाने रोज सूर्यप्रकाशात बसणे अत्यंत उत्तम. एकूणच शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा. जेणेकरून आपण खाल्लेली पोषक द्रव्ये हाडांपर्यंत व्यवस्थित पोचतील व त्यांची लवचिकताही व्यवस्थित राहील. त्यासाठी रोज किमान २० ते २५ मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार घालणे तसेच नियमित योगासने करणे उत्तम आहे. हे सर्व करण्यापूर्वी सिद्ध केलेले अभ्यंग तिळाचे तेल संपूर्ण अंगाला लावल्यास फायदेशीर ठरते. आहारामध्ये कच्चे मीठ संपूर्णपणे टाळावे. अन्यथा त्यामुळे अस्थिधातुची चयापचय क्रिया बिघडते.
अस्थिरोगांना प्रतिबंध
अस्थिधातूच्या उचित पोषणासाठी संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करवून घेणे उत्तम. कुटुंबामध्ये असा कोणताही अस्थिधातुशी संबंधित त्रास असल्यास तो सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधासाठी किंवा त्रास सुरू झाल्यावर पंचकर्म करवून घ्यावे. अस्थिपोषक बस्ती, स्वेदन, पिंडस्वेदनसारख्या अनेक थेरपी उपयोगी ठरतात. हाडांच्या एकूण आरोग्याच्यादृष्टीने आयुर्वेदामध्ये सांगितलेले मार्गदर्शन आपण पाहिल्यास त्यामध्ये प्रवाळ, मौक्तिक, शौक्तिक आदीपासून बनविलेले नैसर्गिक कॅल्शिअम घ्यायला सांगितले आहे. नैसर्गिक कॅल्शिअम शरीरात व्यवस्थित पचते आणि उष्णताही होत नाही, असा आमचा अनुभव आहे. आयुर्वेदामध्ये अस्थिसार म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये अस्थिधातू व्यवस्थित आहे, अशा व्यक्तींच्या लक्षणांमध्ये सांगितले आहे की त्या उत्साही व क्रियाशील असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा क्लेष सहन होतो. शरीर सृदृढ असते व त्यात स्थिरता असते. ते दीर्घायुषी असतात. हे सर्व गुण हवे असतील तर आपल्याला अस्थिधातूचे शरीरात योग्य प्रमाण ठेवत आरोग्यवान राहण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.