आरोग्यपूर्ण दीपावली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali

भारतीय परंपरेतील सर्व सण-वारांच्या रीतिरिवाजांचा उल्लेख आपल्याला आयुर्वेदात मिळतो. दिवाळीचा काळ हा शरद ऋतूच्या आगमनाचा काळ.

आरोग्यपूर्ण दीपावली!

- डॉ. मालविका तांबे

दीपावली हा भारतवर्षातील सर्वांत मोठा सण. आनंद, उत्साह, लख्ख प्रकाश व तेजाने परिपूर्ण असे हे दिवस असतात. दिवाळी म्हटले की घराला नवीन रंग देणे, साफसफाई करणे, घरात असलेला पसारा आवरणे, नवीन कपडे, दागिने व वस्तू विकत घेणे, रोषणाई करणे, फराळ बनवणे वगैरे गोष्टी डोळ्यांसमोर येतात. एकूणच विचार केला तर अग्नी, प्रकाश व स्वच्छता यांच्या समन्वयातून जीवनातील आनंद, समृद्धी, स्वास्थ मिळावे हा या सणामागील उद्देश आहे. सध्या बदलत्या काळानुसार पणत्यांची जागा विजेच्या दिव्यांनी घेतली आहे, संपूर्ण परिवाराने एकत्र बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी ऑन लाईन खरेदी सुरू झाली आहे, वातावरणातील प्रदूषण वाढेल या भीतीमुळे फटाके फोडावे की नाही अशी शंका मनात निर्माण होताना दिसते आहे, चकली, कडबोळी, चिरोटा, लाडू, करंजी, शंकरपाळे अशा अनेक पदार्थांनी भरलेली ताटे सोशल मिडियाच्या स्टेटसवर दिसतात पण हे पदार्थ खावे की नाही असा प्रश्र्न मनात येऊ लागलेला आहे. दिवाळी जवळ आली की काही लोकांच्या मनात कॅलरीमीटर सुरू होतो. त्यांना वाटते, हा दिवाळीचा फराळ खाल्ला तर माझी तब्येत बरी राहील की नाही. आजच्या बदललेल्या परिस्थितीत हा सण का व कसा साजरा करावा हे पाहू या.

भारतीय परंपरेतील सर्व सण-वारांच्या रीतिरिवाजांचा उल्लेख आपल्याला आयुर्वेदात मिळतो. दिवाळीचा काळ हा शरद ऋतूच्या आगमनाचा काळ. या काळात शरीरात अग्नी (पित्त) प्रकुपित होण्याची खूप शक्यता असते. शरीरात प्रकुपित झालेल्या पित्ताच्या संतुलनाकरता दिवाळी हा सण साजरा केला जातो. या काळात शरीरातील पित्त कमी होण्याकरता आयुर्वेदात विरेचनाला खूप महत्त्व दिले आहे. पित्ताचे संतुलन होण्याकरता सौम्य विरेचन होण्यासाठी पूर्वी या काळात लहान-मोठ्यांना एरंडेल तेल दिले जात असे. सध्या चवीला महत्त्व दिले जात असल्याने घरातील एरंडेल तेल हद्दपार झालेले आहे. ८-१० दिवसांतून एकदा आल्याच्या चहाबरोबर दोन चमचे एरंडेल तेल रात्री झोपण्यापूर्वी घेणे खरे तर उत्तम. हे जमत नसल्यास कोमट पाण्यातून २ चमचे साजूक तूप किंवा त्रिफळा चूर्ण वा सॅनकूल चूर्ण घेण्याने पोट साफ व्हायला मदत मिळते. आपण जशी घरात साफसफाई करतो तसेच या काळात अशा प्रकारे सौम्य विरेचन घेतलेले चांगले. दिवाळीच्या काळात सकाळी लवकर उठून शरीराला अभ्यंग करण्याला महत्त्व असते. संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे आयुर्वेदिक सिद्ध तेल शरीराला लावले तर या काळात त्वचेला येणारा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळते, तसेच शरीरात अग्नीचे संतुलन व्हायलाही मदत मिळते. शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले तेल शरीरात आतपर्यंत जिरण्यास समर्थ असते. असे तेल केवळ त्वचेचेच नव्हे तर मेदधातू, मांसधातू तसेच मज्जाधातूचे पोषण करते, वातदोष संतुलन करण्यास मदत करते. अशा तेलाच्या नियमित वापराने शरीरबांधा (फिगर) नीट राहण्यास मदत मिळते, थकवा कमी होतो, झोप शांत लागण्यास मदत होते, वय वाढल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, कोरडेपणा कमी होतो, असे तेल नियमित वापरणारी व्यक्ती म्हातारपणापासून दूर राहते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

स्नानाच्या वेळी सॅन मसाज पावरडरसारखे उटणे वापरणेही उत्तम. यातील चंदन, अगरु, अनंत, नागकेशर वगैरेंसारख्या वनस्पती त्वचा कोमल व नितळ बनविण्यासाठी, तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, अतिरिक्त मेदाचे पचन होण्यासाठी उपयोगी आहेत. असे उटणे संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलात मिसळून शरीराला लावल्यास शरीरातील अग्नीचे संवर्धन होते, तसेच शरीराचा बांधा टिकून राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात तसेच पुढे येणाऱ्या हेमंत ऋतूत आठवड्यातून किमान २-३ वेळा उटणेमिश्रित तेल लावणे उपयोगी ठरते. या काळात शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो. पचनशक्ती व्यवस्थित असेल तर खाल्लेला फराळ पचून शरीराचे पोषण करते. म्हणूनच दिवाळीतील फराळाच्या पदार्थांना महत्त्व दिलेले आहे. आपल्या पारंपरिक फराळाचे योग्य मात्रेत सेवन केल्यास शरीराची ताकद वाढते, शरीरातील शुक्रधातू वाढवण्यास मदत होते, शरीरातील वात- पित्तदोषाचे शमन होते. पण सध्या कोणालाही फराळाला बोलावण्याची सोय उरलेली नाही. फराळ खायचा म्हटला की अनेकांच्या मनात येते की या तळलेल्या गोष्टी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढेल, मेद वाढेल, वजन वाढेल. मधुमेह असणाऱ्यांना गोड खायची मनाई असल्यामुळे ते अनेक गोड पदार्थांपासून दूर राहतात. समाजात चुकीची समजूत मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की गोड खाल्ल्यामुळे मधुमेह होतो. फराळ पचायला जड असतो ही आणखी एक समजूत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. फराळ हा दिवाळीतील मुख्य भाग आहे, तो आपण कसा खाऊ शकतो याचा विचार करू या.

  • फराळ घरी बनविलेला असावा, बाहेरचा तयार फराळ खाणे टाळावे.

  • फराळ बनवत असताना घरचे साजूक तूप तसेच प्रक्रिया (प्रोसेस) न केलेले तेल (शेंगदाणा वा तीळ) वापरणे उत्तम. चुकीच्या तेला-तुपात ट्रान्स फॅट असू शकतात, जे शरीरासाठी अहितकर असतात.

  • फराळ सकाळी नाश्त्याच्या वेळी करणे उत्तम, ज्यामुळे केलेला फराळ दिवसभरात व्यवस्थित पचू शकतो. सध्या फराळ तर टाळला जातोच, पण रात्रीची दीपावली डिनर्स आयोजित केली जातात. हे शरीराला जास्त घातक ठरते.

  • फराळातील एक तिखट पदार्थ व एक गोड पदार्थ नाश्त्याच्या वेळी असावा. आवडतात म्हणून चार-पाच चकल्या खाण्यापेक्षा एक चकली व ४-५ शंकरपाळे खाल्ल्यास नीट पचतात व शरीराला ताकद मिळते. त्यामुळे फराळ किती खायचा याचेही भान ठेवणे महत्त्वाचे.

  • गोड पदार्थ बनविताना नैसर्गिक गूळ वा साखर वापरावी, खडीसाखर वापरणे सर्वांत उत्तम.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी गोड खात असताना बेताचे खावे. तसेच आर्टिफिशियल स्वीटनर्स टाकून केलेली मिठाई पूर्णतः टाळावी.

  • नुसता सुका मेवा, डार्क चॉकलेट टाकून केलेल्या मिठाया टाळाव्या.

  • पचनाच्या दृष्टीने मध्ये-मध्ये थोडे कोमट पाणी प्यावे.

  • दिवाळीत सुट्टी आहे म्हणून व्यायामाला सुट्टी देऊ नये. योगासने, प्रणायाम, चालणे वगैरे नित्यनियम सुरू ठेवावेत. दुपारी ताणून देऊ नये.

या काळात धूप करण्याला महत्त्व दिलेले आहे. नुकताच पावसाळा संपलेला असतो, सगळीकडे किडे-कीटक वाढलेले असतात. त्यामुळेच बहुधा या काळात फटाके फोडण्याची पद्धत असावी. मर्यादित प्रमाणात फटाके फोडल्यास तयार झालेला धूर वातावरणाकरता चांगला असतो, पण तो किती प्रमाणात करावा यासाठी मर्यादा असते. ज्याप्रमाणे वातावरणातील प्रदूषण दूर करण्यासाठी कार-पुलिंग राबवत आहोत, त्याचप्रमाणे आत्मसंतुलन मध्ये राहणारे सर्व जण एकत्र जमून फटाके फोडतात, एकत्र आनंद घेतात. त्यामुळे एका परिवारात फोडले गेले असते एवढे फटाके १००-१५० लोकांमध्ये मिळून फोडले जातात.

याचप्रमाणे सोसायट्यांमध्येही प्रत्येक परिवाराने आपापले फटाके फोडण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र येऊन पूर्वनियोजित वेळी थोडे फटाके वाजवले तर सगळ्यांना आनंद लुटता येईल, एकूण कमी फटाके फोडल्यामुळे वातावरणाला, पर्यावरणाला होणारा त्रास कमी होईल. याचबरोबरीने संतुलनचा प्युरिफायर, वरशिप वगैरे धूप संध्याकाळच्या वेळी संपूर्ण घरात फिरवल्यास त्याचाहा स्वास्थ्यासाठी फायदा होतो. सध्या अशा दिवे उपलब्ध आहेत ज्यांत फक्त पाणी घतल्यास लाइट चालू होतो. हे दिवे वापरल्यास तेल-तूप वापरावे लागणार नाही असा प्रचार केला जात आहे. पण खरं तर दीपावली हा तेजाचा उत्सव आहे, त्यासाठी तेल घालून मातीची पणती लावायचे महत्त्व आहे. आज घराघरांत दिवाळीची तयारी सुरू आहे. नवीन कपडे, दागिने, वस्तू विकत घेण्याबरोबरच आपल्या संस्कृतीप्रमाणे अभ्यंग स्नानाचा, उटण्याचा, फराळाच्या मेन्यूचाही व्यवस्थित विचार केला तर आपल्याला ही दीपावली सर्वांनाच आरोग्यदायी ठरेल.