कशी होत आहे बाळाची वाढ ! Born Baby | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Born Baby
कशी होत आहे बाळाची वाढ !

कशी होत आहे बाळाची वाढ !

- डॉ. मालविका तांबे

आपल्या बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीची तुलना कुठल्याही बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीशी न करता त्याच्या मूळ वजनाशी करणे आवश्यक असते, हे लक्षात घ्यायला हवे. बाळाचे वजन प्रत्येक महिन्यात वाढणे आवश्यक असले तरी ही वाढ प्रत्येकात सारखीच असेल असे नसते.

बाळ जन्मल्यावर इतरांकडून अनेक प्रश्र्न विचारले जातात. बाळ कुणावर गेले आहे, बाळाचे केस कसे आहेत, त्याचे डोळे कसे आहेत, बाळ किती वेळ झोपते, बाळसं कसं आहे..? नशिबाने त्या इवल्याशा जिवाला यातील काही समजत नाही. नाही तर जन्म झाल्या झाल्या त्याच्यावर अपेक्षांचे ओझे यायचे! सगळ्यात भेडसावणारा प्रश्र्न असतो तो म्हणजे, वजन किती आहे? केवळ जन्माच्या वेळीच नव्हे तर कमीत कमी पुढची पाच वर्षे बाळाचे वजन हा चर्चेचा एक विषय असतो. ‘‘डॉक्टर, याच्या आजी-आजोबांनी सांगितले आहे, वजन वाढण्यासाठी काही तरी चांगले औषध द्या. जाहिरातीत असते तसे गोबऱ्या गालांचे गुटगुटीत बाळ त्यांना हवे आहे,’’ असे सांगत किती तरी दांपत्ये कार्ला येथील क्लिनिकमध्ये येत असतात. वजनात होणारी वाढ ही बाळाच्या आरोग्याचे व विकासाचे एक महत्त्वाचे लक्षण असते, हे खरे असले तरी त्याच्या आरोग्याचा व विकासाचा हा एकमेव निकष नाही हे सांगताना आम्हा डॉक्टरांची दमछाक होते. सध्याच्या काळात डॉक्टरांकडे बाळाच्या वजनाच्या चार्टमध्ये दर महिन्याला बाळाच्या वजनाची नोंद केली जाते. ही गोष्ट चांगली आहेच, पण वजनात होणारी वाढ प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असते हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीची तुलना कुठल्याही बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीशी न करता त्याच्या मूळ वजनाशी करणे आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. बाळाचे वजन प्रत्येक महिन्यात वाढणे आवश्यक असले तरी ही वाढ प्रत्येकात सारखीच असेल असे नसते.

मुलांची योग्य वाढ व्हावी यासाठी आयुर्वेदाने आहार-विहाराबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. पहिले ४ ते ६ महिने बाळाला स्तन्यपान देणे त्याच्या आरोग्याच्या व एकंदर विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. या काळात प्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळे बाळाला सर्दी, ताप, खोकला वगैरे आजार झाले तर बाळाचे वजन लगेच कमी होताना दिसते. बाळाची प्रतिकारशक्ती व शारीरिक शक्ती टिकून राहावी यासाठी बाळाच्या अंगाला तेल लावणे आवश्यक असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. याचबरोबर काही रसायने बाळाला देण्यास सुचविले आहे. यात सुवर्णप्राशन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलनचे बालामृत व बाळगुटी नियमित देण्याचा खूप उपयोग होतो. साधारण सहा महिन्यांनंतर बाळाला पूरक आहार सुरू केला जातो, त्याचीही खूप विचारपूर्वक योजना करावी लागते. सध्या बाळाचे फूड चार्ट याचा खूप प्रचार होतो आहे. परंतु बाळाच्या नाजूक पचनसंस्थेचा विचार न करता अशा प्रकारच्या चार्टस्‌चे पालन करणे योग्य नाही. बाळाच्या पचनसंस्थेचा विचार करून क्रमाक्रमाने आहार वाढवणेच योग्य ठरते. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात केलेले आहे.

बाळाचे किंवा मुलांचे वजन योग्य प्रमाणात वाढत नसेल तर काही गोष्टींचा विचार करायला हरकत नाही.

  • पोट रोज नीट साफ होते आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. अपचन, गॅसेस वा बद्धकोष्ठाचा त्रास होत असल्यास अन्न अंगी लागत नाही. पचनासाठी सॅन अग्नी सिरप, बाल हर्बल सिरपसारखे सिरप देणे योग्य. पोट साफ होत नसल्यास आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. २-३ दिवस बाळाचे पोट साफ झाले नाही तरी चालते हा गैरसमज आहे.

  • बाळाला आहार देताना स्वच्छता ठेवणे खूप आवश्यक असते, अन्यथा जंतुसंसर्ग आणि कृमीसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. बाळाला विडंग घालून उकळलेले दूध/पाणी किंवा थोड्या मोठ्या मुलांना विडंगारिष्ट देणे योग्य असते.

  • उकळून बनविलेले सुवर्णसिद्ध जल बाळाला ऋतुमानाप्रमाणे देणे उत्तम. बाळाला पाणी देऊ नये असा सल्ला दिला जातो, परंतु अशामुळे बाळाच्या पचनसंस्थेत कोरडेपणा येऊन मलबद्धतेचा त्रास होऊ शकतो.

  • स्तन्यपान करवताना आईने मोबाईल वापरणे, गप्पा मारणे किंवा बाळाला भरवताना मोबाईलवर वा टीव्हीवर काहीतरी दाखवणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. याचा नकळत पचनावर परिणाम होताना दिसतो.

  • सोबतीला इतर लहान मुले असल्यास मुले नीट जेवतात असा अनुभव आहे, त्यामुळे इमारतीतील मुलांना आळीपाळीने आपल्या घरात जेवणासाठी बोलावणे उत्तम.

  • बाळाच्या आहारात साजूक तूप, दूध, लोणी, खडीसाखर, संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत, सुका मेवा वगैरेंचा समावेश वयानुसार अवश्य करावा.

  • लघवीच्या वेळी त्रास होणे, शूची जागा लाल असणे वगैरेंकडे दुर्लक्ष करू नये. अशा त्रासांमुळेही बाळाच्या विकासात बाधा येते. यासाठी आयुर्वेदिक उपचारांची मदत होऊ शकते.

  • बाळाच्या विकासाचे टप्पे (माइल स्टोन्स) हे महत्त्वाचे निकष असतात हे लक्षात ठेवावे.

  • बाळाची प्रकृती आई-वडिलांच्या प्रकृतीवर व वातावरणावर अवलंबून असते, त्यामुळे गर्भधारणा होतानाच बालकाची मूळ प्रकृती ठरलेली असते. सर्वसाधारणपणे वातप्रकृतीचे बाळ बारीक अंगकाठीचे, तुडतुडीत असेल; पित्तप्रकृतीचे बाळ चुणचुणीत, चपळ व मध्यम अंगकाठीचे असेल आणि कफप्रकृतीचे बाळ शांत व गुटगुटीत असेल. थोडक्यात, सांगायचे झाले तर बाळाच्या विकासाचा विचार करताना वजनाबरोबर, शांत झोप, खेळकरपणा, शू-शी व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहेच, बरोबरीने त्याने विकासाचे टप्पे व्यवस्थित गाठले तर त्याची वाढ व्यवस्थित होत आहे असे समजता येते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dr Malvika Tambe
loading image
go to top