संक्रांत आणि आयुर्वेद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Til
संक्रांत आणि आयुर्वेद!

संक्रांत आणि आयुर्वेद!

- डॉ. मालविका तांबे

संक्रांतीत तिळाला खूप महत्त्व असते. तिळाचा उपयोग औषधांत तसेच स्वयंपाकघरातही केला जातो. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे वगैरे अनेक मिनरल्स असतात आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन ‘ई’मुळे ते उत्तम अँटिऑक्सिडंट समजले जातात. त्यामुळे तीळ त्वचेच्या व हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतात.

जानेवारी महिना म्हणजे मस्त गुलाबी थंडी, सकाळचं धुकं आणि स्वेटर, मफलर व पायमोजांची ऊब. खरे तर हा हेमंत- शिशिर ऋतूचा काळ. या काळात सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता कमी प्रमाणात येत असते, तसेच शरीरातील अग्नी प्रदीप्त झाल्यामुळे शरीरातील कोरडेपणा वाढलेला असतो. या काळात बाजारातील दुकाने मटार, गाजर, पालक, मेथी, सरसों, सुरती हिरवी पापडी, वालपापडी, पावटा वगैरे भाज्या; सुरण, गोराडू, रताळे वगैरे कंदमुळे; आवळा, ऊस, संत्री, मोसंबी, पेरू, कवठ, बोरे वगैरे फळे यांनी सजलेली असतात. निसर्गाची ही समृद्धी जणू शरीरात प्रदीप्त झालेल्या पाचनाग्नीला मदत करण्यासाठीच असते. अशा वेळी नवीन वर्षातील पहिला सण येतो तो संक्रांत. मकरसंक्रांत म्हटली की तिळगूळ, हलव्याचे दागिने, तिळाच्या रेवड्या व काळी वस्त्रे या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. काळ्या वस्त्राला महत्त्व देणारा आपल्या संस्कृतीतील हा एकमेव सण असावा. या काळात सूर्यकिरण प्रखर नसल्यामुळे गडद कपडे घातल्यास सूर्यकिरणांची उष्णता संपूर्णपणे शोषण करायला मदत मिळते. नववधू व तान्ह्या बाळांनी तर काळ्या रंगाची वस्त्रे घातलीच पाहिजेत, पण इतरांनाही या काळात गडद वा काळ्या रंगाचे कपडे घालणे उत्तम. या काळात थोडा वेळ उन्हात घालवणे उत्तम, जेणेकरून शरीराला अधिक प्रमाणात उष्णता मिळायला, हाडांना ताकद मिळायला तसेच ‘डी’ व्हिटॅमिन मिळायला मदत मिळते. त्यामुळेही कदाचित आपल्याकडे या काळात पतंग उडवण्याची पद्धत रूढ झाली असावी. पतंग उडवण्याची आवड वा शक्यता नसेल तर थोडा वेळ गच्चीवर घालवणे उत्तम.

या काळात आयुर्वेदाने स्निग्ध, उष्ण व मधुर आहार घेण्यास सुचवले आहे, ज्यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळते, तसेच वातावरणातील थंडीशी मुकाबला करण्यास मदत मिळते. तीळ व गूळ हे दोन्ही उष्णवीर्याचे असल्यामुळे या काळात सेवन करण्याची परंपरा आहे. आयुर्वेदात तिळाला खूप महत्त्व दिलेले आहे. तिळाचा उपयोग औषधांत तसेच स्वयंपाकघरातही केला जातो. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे वगैरे अनेक मिनरल्स असतात आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन ‘ई’मुळे ते उत्तम अँटिऑक्सिडंट समजले जातात. त्यामुळे तीळ त्वचेच्या व हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते भोगी, त्या दिवशी न चुकता भिजवलेले तीळ वाटून केलेली पेस्ट अंगाला लावली जाते. तीळ त्वचेला चांगले असतातच, पण ते केसांना, हाडांनाही बल्य असतात. आपल्या दिनचर्येत तिळाचा समावेश केल्यास बऱ्याच त्रासांमध्ये लाभदायक ठरते. दात वा हिरड्या सळसळत असल्यास, त्यातून रक्त किंवा पू येत असल्यास काळे किंवा पांढरे तीळ तोंडात ठेवून चावल्यास फायदा होतो. आवडत असल्यास चावून बारीक झाल्यावर खाऊन टाकावे, आवडत नसल्यास थुंकून टाकता येतात. दुखऱ्या दातावर तिळापासून केलेले वाटण लावल्यास फायदा होतो.

तिळाच्या तेलाचा गंडूष केल्यासही अशा प्रकारचे त्रास कमी होण्यास मदत मिळते. तिळाचे तेल उपलब्ध नसल्यास वाटलेले तीळ पाण्यात मिसळून त्याचाही गंडूष करता येतो. तीळ मंद आचेवर भाजून पूड करून ठेवल्यास स्वयंपाकात वापरता येते. मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास अर्धा चमचा तिळाची पूड घरचे लोणी व खडीसाखरेत मिसळून घेतल्यास मदत मिळते. अपचन, भूक न लागणे असे त्रास असताना तीळ टाकून मुगाची खिचडी करून, त्यात तूप घालून सेवन करण्याचा लाभ होतो. तिळाच्या तेलाची फोडणी देऊन केलेली आमटी, भाजी सेवन केल्यास अपचनाच्या त्रासात लाभ होताना दिसतो.

तीळ वातशमनासाठी अत्यंत उत्तम समजले जातात. संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारख्या तेलाचा अभ्यंग वातशमनासाठी अत्यंत श्रेयस्कर असतो.

संधिवाताचा त्रास असताना तीळ व सुंठ चूर्ण (समप्रमाणात) तुपात मिसळून सेवन केल्यास लाभ होतो. वातरोगांमध्ये तीळ व गूळ एकत्र करून खाणे औषधासारखे काम करते. म्हणूनच कदाचित संक्रांतीला गुळाची पोळी, तिळगूळ यांना महत्त्व दिलेले असावे. तीळ, गूळ व दूध एकत्र घेतल्याने शरीराची ताकद वाढण्यास मदत मिळते. पित्तप्रकृतीच्या किंवा नाजूक प्रकृती असणाऱ्यांनी तीळ व गूळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास उष्णतेचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तिळाबरोबर गुळाऐवजी साखरेचा वापर करावा. आपल्याकडे हलव्याच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. तसेच लहान मुलांचे बोरन्हाण करताना साखरेच्या बोरे, ऊस व रेवड्यांना महत्त्व दिलेले आहे. सुकुमार व्यक्तींनी रेवडी खाणे अधिक ठीक ठरते.

या काळात येणारी कंदमुळे शरीराला अत्यंत पोषक असतात. यांचे पचन नीट होण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात तेल मसाले घालून निखाऱ्यांवर व अग्नीवर शिजवण्याची पद्धत आहे. म्हणूनच या काळात आपल्याकडे उंधियो, पोपटी यासारख्या भाज्या केल्या जातात. आपल्या आहार-आचरणात आणलेल्या प्रथांचा स्वास्थ्याशी कसा संबंध आहे याचे प्रमाण आपल्याला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये मिळू शकते. जुन्या प्रथेनुसार घरोघरी जाऊन ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून मोठ्यांचा आशीर्वाद घेताना, किंवा सध्याच्या आधुनिक स्टाइलनुसार ‘हॅपी मकरसंक्रांत’ असा मेसेज पोस्ट करून जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न करताना आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टींचा युक्तिपूर्वक वापर केल्यास येणारे संपूर्ण वर्ष आरोग्याने परिपूर्ण असू शकेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top