आला हिवाळा, आरोग्य सुधारा!

हिवाळ्यात आहाराचे विचारपूर्वक नियोजन केले तर पुढचे वर्षभर शरीर व्यवस्थित राहू शकते. त्या अनुषंगाने आपण एक पाककृती पाहणार आहोत.
Family health Care
Family health CareSakal

- डॉ. मालविका तांबे

हिवाळ्यात आहाराचे विचारपूर्वक नियोजन केले तर पुढचे वर्षभर शरीर व्यवस्थित राहू शकते. त्या अनुषंगाने आपण एक पाककृती पाहणार आहोत. आहारात अशा प्रकारच्या पाककृतीचा हिवाळ्यात संपूर्ण कुटुंबाने समावेश केला, तर उत्तम उपयोग होताना दिसतो.

हिवाळा ऋतू म्हणजे शारीरिक शक्ती व प्रतिकारशक्ती वाढविण्यास अनुकूल असलेला ऋतू. या काळात शरीरातील जाठराग्नी प्रदीप्त असल्यामुळे खाल्लेले अन्न अंगी लागते. अंगी लागणे म्हणजे वजन वाढणे नव्हे, तर अंगी लागणे म्हणजे शरीरपोषणाला मदत होणे. जाठराग्नीला समिधारूप आपण जो आहार देणार असतो त्याची विचारपूर्वक योजना करणे आवश्यक असते. या ऋतू आहारात दूध, लोणी, तूप, तिळाचे तेल यांचा समावेश नक्की करावा. आपल्या प्रकृतीला मानवतील व सोसवतील एवढ्या प्रमाणात खडीसाखर किंवा गूळ घालून केलेले पदार्थ नक्की घ्यावेत. गव्हाचा शिरा, लापशी, उडदाचे वडे - खीर, शिंगाड्याची खीर वगैरे पदार्थ घेणे योग्य ठरते. सुका मेवा, डिंक वगैरेंचाही आहारात समावेश असावा. या ऋतूत येणाऱ्या फळांचा वापर नक्की करावा. या ऋतूत गोड मोसंबी, संत्री उपलब्ध असतात. यांचा रस घेतल्याने शरीरातील रसधातू वाढायला मदत मिळते. थोडक्यात सांगायचे तर मधुर, आंबट व खारट गोष्टी आहारात अवश्य असाव्यात. शरीरातील अग्नीला मंदावणाऱ्या काही गोष्टी टाळणेही अपेक्षित असते. उदा. थंड पाणी, आइस्क्रीम, शीतपेये टाळणे हितावह ठरते. वजन कमी करण्याच्या हेतूने नुसते सॅलड खाणे वगैरे गोष्टी या काळात थांबवणेच योग्य ठरते. या काळात थंड वातावरणामुळेही शरीरात वातवृद्धी होत असते, या काळात शरीराला योग्य प्रमाणात आहार न दिल्यास शरीरातील रसधातू कमी होऊन वात वाढतो व त्रास होतो. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणत असत, ‘आहाराचे नियोजन विचारपूर्वक केला तर घेतलेला आहार औषधासारखेच काम करतो’. हिवाळ्यात आहाराचे विचारपूर्वक नियोजन केले तर पुढचे वर्षभर शरीर व्यवस्थित राहू शकते. आज श्रीगुरुजींची एक आवडती पाककृती पाहणार आहोत. आहारात अशा प्रकारच्या पाककृतीचा हिवाळ्यात संपूर्ण कुटुंबाने समावेश केला तर उत्तम उपयोग होताना दिसतो.

अडदिया पाक – उडदाचा पाक

  • सुंठ – १० ग्रॅम

  • वेलची, लवंग, पिंपळी मूळ, काळी मुसळी, सफेद मुसळी, काळी मिरी, पांढरी मिरी,

  • पिंपळी व जायपत्री – प्रत्येकी ५ ग्रॅम

  • केशर, जायफळ व दालचिनी – प्रत्येकी ३ ग्रॅम

सर्व मसाल्याचे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यावे, मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे व गरजेनुसार वापरावे.

  • उडदाची डाळ – २५० ग्रॅम

  • खडीसाखर - २५० ग्रॅम

  • काजू - ५० ग्रॅम (काप करून)

  • बदाम - ५० ग्रॅम (काप करून)

  • डिंक – २५ ग्रॅम

  • तूप – २५० ग्रॅम

  • दूध – पाव कप

कृती - उडदाची डाळ दोन मिनिटे मंद आचेवर भाजून जाडसर दळून घ्यावी. या पिठात तीन चमचे तूप व तीन चमचे दूध घालावे. एकत्र करून एखाद्या वाडग्यात झाकून अर्धा तास बाजूला ठेवावे. कढईत तीन चमचे तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंकाची लाही हातानेच कुस्करून घ्यावी. उडदाचे पीठ चाळणीने चाळून घ्यावे. उरलेले तूप कढईत घेऊन मंद आचेवर गरम करावे. यात उडदाचे पीठ घालून तूप सुटेपर्यंत मंदाग्नीवर हलकेसे परतावे. शेवटी पिठात थोडे थोडे दूध घालून हलके भाजावे. कढई आचेवरून खाली उतरवून भाजलेल्या पिठात डिंक, काजू-बदामाचे काप, बारीक केलेला दोन चमचे मसाला, केशर घालून नीट एकत्र करावे. पाकासाठी पाव किलो खडीसाखरेत अर्धा कप पाणी घालून दीड तारी पाक करून घ्यावा. तयार झालेल्या पाकात वरील मिश्रण घालून, एकत्र करून, थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. मिश्रण कोमट झाल्यावर आवडीप्रमाणे आकार द्यावा. हा उडदाचा पाक करायला सोपा असून त्यात सगळे मसाले वापरल्यामुळे पचायला हलका असतो. नियमित सेवन केल्यास शरीराला ताकद मिळण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते.

शरीरातील सप्तधातू, मुख्यत्वे अस्थीधातू (हाडे) व शुक्रधातू यांच्या पोषणासाठी मदत मिळते. अशा प्रकारचे पदार्थ खाताना सध्याच्या काळाच अनेकांना यामुळे माझे वजन तर वाढणार नाही ना अशी चिंता वाटते. पण अवाजवी वजन वाढयवायचे नसेल तर या काळात आहार कमी ठेवण्यापेक्षा इतर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे. उदा. पिण्याचे पाणी कोमट असावे, अंगाला संतुलन अभ्यंग (सेसमी) सिद्ध तेलासारखे तेल लावल्यास वात कमी होते. त्वचेची रुक्षता कमी होते, वजन आटोक्यात राहते. या काळात नियमित व्यायाम करणे शरीरासौष्ठवाकरता व ताकदीकरता उत्तम असते. केसांना व्हिलेज हेअर तेलासारखे सिद्ध तेलासारखे तेल लावल्यास या काळात सामान्यपणे आढळणारा कोंडा, केस गळणे याचा त्रास कमी होताना दिसतो. हिवाळा सोडून इतर काळात उन्हात बसल्यास त्रास होऊ शकतो, परंतु या काळात उन्हात बसणे सुखावह असते. कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला व्हिटॅमिन डी ची पूर्तता होते, पर्यायाने हाडांची ताकद वाढते, वात कमी व्हायला मदत मिळते. या काळात गरम कपडे घालणे, कानाला मफलर, स्कार्फ वगैरे बांधणे, पायात सुती मोजे, चपला घालणे हितावह ठरते. अशा प्रकारे या ऋतूत आहार-आचरणात काळजी घेतली तर आरोग्याच्या हेतूने हितकर असणाऱ्या हिवाळ्याचा फायदा घेता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com