स्त्रीआरोग्याचे नऊ मंत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women health

वर्षा ऋतूत वातावरणात कोंदटपणा, दमटपणा, ओलसरपणा दिसून येतो, तसेच ताकदीमध्ये, उत्साहामध्ये कमतरता जाणवत असते.

स्त्रीआरोग्याचे नऊ मंत्र!

- डॉ. मालविका तांबे

वर्षा ऋतूत वातावरणात कोंदटपणा, दमटपणा, ओलसरपणा दिसून येतो, तसेच ताकदीमध्ये, उत्साहामध्ये कमतरता जाणवत असते. पावसाळ्याच्या शेवटी सूर्यशक्तीचा प्रभाव घेऊन शरद ऋतूचे आगमन होते तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. या ऋतूच्या सुरुवातीला आपण साजरा करतो शारदीय नवरात्र. नवरात्र हा सण असतो शक्तीच्या जागराचा. या नऊ दिवसांत संपूर्ण भारतात देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते. सुख, समृद्धी, समाधान, ऐश्र्वर्य, बुद्धी, स्मरणशक्ती इत्यादींची दाता तसेच सर्वांचे पालन करणाऱ्या देवीच्या उपासनेचे हे दिवस. देवीचा उत्सव हा खरे म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. स्त्रीशक्ती म्हणजे केवळ शारीरिक बल नव्हे तर तिच्यात असलेली सृजनात्मकता, संवेदनशीलता, दुसऱ्यांचा विचार करण्याचा स्वभाव, कुटुंबाची सर्वोपरी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न, त्याग करण्याची वृत्ती या सगळ्यांतून तिच्या शक्तीची जाणीव होत असते. पण कुटुंबाकरता झटत असताना, मुलांना घडविण्याकरता प्रयत्न करत असता ती स्वतःला विसरून जाते, स्वतःकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळे नवरात्राच्या निमित्ताने तिला व तिच्या कुटुंबाला जाणीव करून द्यायची गरज आहे, की तिच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आयुष्यामध्ये किती सोपे असू शकते. आयुर्वेदामध्ये स्त्रीस्वास्थ्यावर सखोल विचार केलेला आहे. त्या मार्गदर्शनानुसार खाली स्वास्थ्याच्या नऊ गोष्टी देलेल्या आहेत, ज्या प्रत्येक स्त्रीने आवर्जून लाक्षात ठेवाव्या.

1) पहिला स्वास्थ्याचा मंत्र आहे, रक्तधातूची काळजी. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पाळीला खूप महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तीन दिवस शरीरातून रक्तस्राव होत असतो. रक्तधातू हा शरीरातील महत्त्वाचा घटक होय. त्यामुळे त्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने खूप विचार केला गेला पाहिजे. त्यासाठी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, भिजविलेल्या मनुका, डाळिंब, सफरचंद, आक्रोड, अंजीर वगैरेंचा समावेश नक्की असावा. अति प्रमाणात रक्तस्राव होणे, कमी प्रमाणात रक्तस्राव होणे, पाळी खूप कमी दिवसांनी वा खूप जास्ती दिवसांनी येणे, पाळीच्या वेळात पोटात दुखणे वगैरे त्रास होत असल्यास त्यावर त्वरित योग्य उपचार करणे आवश्यक असते. आरोग्याचा पाया हॉर्मोन्सच्या संतुलनात असतो हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला पाहिजे, स्त्रियांनी तर या गोष्टीकडे अधिकच लक्ष देणे आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या मते रजप्रवृत्ती व्यवस्थित होण्याकरता तिच्या शरीरातील रक्तधातू संपन्न असणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी सॅनरोझ वा धात्री रसायनसारखे एखादे रसायन स्त्रियांना नियमितपणे घेणे उत्तम.

2) हाडांची काळजी : बाळंतपणामुळे स्त्रियांच्या शरीरातील हाडांची ताकद कमी होताना दिसते. तेव्हा स्त्रियांनी आधीपासूनच हाडांची काळजी घेणे आवश्यक असते. यादृष्टीने आहारात चांगल्या प्रतीचे दूध ठेवणे गरजेचे आहे. संतुलन शतावरी कल्प किंवा स्त्रीसंतुलन कल्प घालून दूध घेणे अधिक फायद्याचे ठरते. आहारात साजूक तूप, लोणी, डिंकाचे लाडू, खारीक वगैरे अस्थिपोषक पदार्थांचा समावेश करणे चांगले. शरीराला रोज संतुलन अभ्यंग (सेसमी) सिद्ध तेलासारख्या अस्थिपोषक तेल लावून किमान ५-१० मिनिटे कोवळ्या उन्हात बसलेले चांगले. आहारात तिळ, नाचणी, गूळ, गव्हाचे सत्त्व यांचा वरचेवर समावेश असावा. हॉर्मोन्सचे बदल होत असल्यास किंवा रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची काळजी घेणे अधिकच गरजेचे असते.

3) उत्तरबस्ती : स्त्रीस्वास्थ्याचा पाया तिच्या हॉर्मोन्सच्या संतुलनात असतो. शरीरात काही बिघाड होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उत्तरबस्तीची योजना करायला आयुर्वेदात सांगितलेली आहे. उत्तरबस्ती हा पंचकर्माचा एक भाग आहे. यामध्ये द्रव स्वरूपामध्ये औषधे योनिमार्गाद्वारे आत दिली जातात. यात तेल, तूप काढे वगैरेंचा समावेश असतो. उत्तरबस्तीमुळे गर्भाशयात असलेले दोष कमी व्हायला मदत मिळते, तसेच स्त्रीस्वास्थ्यासंबंधी काही आजार असल्यास त्यात सुधारणा होण्यास मदत मिळताना दिसते. उत्तरबस्तीमुळे वारंवार होणारा गर्भपात, पाळीतील अनियमितता, योनीमार्गात असलेले अडथळे, शरीरातील अग्नीच्या असंतुलनामुळे होणारे हॉर्मोन्सचे त्रास, तसेच वारंवार होणारे मूत्रमार्गातील इन्फेक्शन, शिंका, खोकला आल्यास मूत्रप्रवत्ती होणे यासारखे मूत्रमार्गाचे त्रास वगैरेंवर उपयोग होतो. शास्त्रोक्त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेऊन वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तरबस्ती करून घेतल्यास सर्वाधिक फायदा होतो.

4) योनिपिचू : आयुर्वेदात स्वास्थ्यासाठी योनिपिचूलाही खूप महत्त्व दिलेले आहे. यात निर्जंतुक कापसाचा बोळा आयुर्वेदिक औषधांना सिद्ध तेल-तुपात बुडवून योनिमार्गात ठेवला जातो. यामुळे योनिमार्गात असलेला वात संतुलित होतो, योनिमार्गाला बल मिळते, संक्रमणांपासून बचाव होतो, रजोनिवृत्तीच्या काळात येणारी योनिमार्गाची रुक्षता कमी होते, तसेच या जागी काही इजा झालेली असल्यास ती कमी व्हायला मदत होते. नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी पूर्ण नवव्या महिन्यात योनिपिचू हा उपाय करण्यास आयुर्वेदात सांगितलेले आहे. योनीला बल मिळण्यास, तेथील सूज वा संक्रमण कमी होण्यास तसेच वंध्यत्व असल्यास हा उपाय लाभदायक ठरतो. योनिपिचू फेमिसॅन तेलासारख्या सिद्ध तेलाने रोज नियमितपणे करायला हरकत नाही.

5) योनिधूपन : वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांनी किंवा वनस्पतींनी योनिमार्गाचे धूपन करणे म्हणजे योनिधूपन. योनिधूपनामार्फत औषधे सूक्ष्म स्तरावर पोचवता येतात. याचे फायदे साधारण योनिपिचूसारखेच असतात. आठवड्यात एक-दोन वेळा संतुलन शक्ती धूपासारख्या धुपाने योनिधूपन घेतलेले चांगले.

6) स्तनांची काळजी : स्त्रियांच्या आरोग्यासाठी पर्यायाने त्यांच्या हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी स्तनांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. सध्या कर्करोग झाल्यावरच याबद्दलची जागरूकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. परंतु आयुर्वेदात मात्र पहिल्यापासूनच स्त्रीच्या आरोग्यासाठी स्तनांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितलेले आहे. यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे संतुलन सिद्ध सुहृद तेलासारख्या आयुर्वेदिक तेलाने आठवड्यातून २-३ वेळा स्तनांवर हलक्या हाताने मसाज करणे, जेणेकरून तेथील वात कमी व्हायला मदत होते. स्तनांची शारीरिक संरचना ग्रंथींची असते. मसाज केल्यामुळे या ग्रंथींचे कार्य नीट राहायला मदत मिळते. मेदधातू हा स्तनांचा मुख्य भाग आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. वरचेवर तेल लावण्याने मेद धातू. व्यवस्थित राहायला मदत मिळते. पाळी सुरू झाल्यापासून प्रत्येक मुलीने व स्त्रीने संतुलन सिद्ध सुहृद तेल रोज स्नानाच्या पूर्वी स्तनांवर जिरवणे योग्य. दोषांच्या अनुषंगाने बदामाचे तेल, तिळाचे तेल किंवा इसेंशियल तेलाचा उपयोग करता येतो, पण वैद्यांच्या सल्ल्याने. स्तनांमध्ये असलेल्या कुठल्याही गाठीकडे कधीच दुर्लक्ष करू नये, त्यावर योग्य उपचार त्वरित करणेच उत्तम.

7) केसांचे आरोग्य : बऱ्याचदा केसांचा संबंध फक्त स्त्रीसौंदर्याशी जोडला जातो. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणत असत, 'स्त्रीच्या हॉर्मोन्सच्या संतुलनाचा वाटा तिच्या केसांच्या आरोग्यात सुद्धा असतो. एकूण आरोग्य चांगले असले तर स्त्रीचे केस स्निग्ध, मृदू, मुलायम, बारीक, स्थिर (पटकन न गळणारे) असतात. तसेच त्यांना फक्त एकच मूळ असते. स्त्रीमध्ये हॉर्मोन्सचे असंतुलन व्हायला लागले की केस गळायला लागतात हे आपण नेहमी पाहतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना टक्कल पडणे हे फारच दुर्मिळ होते, पण सध्या मात्र पन्नाशीच्या वयातील १० स्त्रियांतील २ स्त्रियांमध्ये टक्कल असल्याचे दिसते. केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्याकरता व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे सिद्ध तेल केसांना वरचेवर लावणे, केस धुताना संतुलन सुकेशासारखी नैसर्गिक उत्पादने वापरणे, रोजच्या आहारात दूध, तूप, नारळ, तीळ, खारीक, अंकुरित कडधान्यांचा वापर करणे, सॅन रोझ, संतुलन च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश, धात्री रसायन वगैरेंचा उपयोग करणे उत्तम.

8) व्यायाम : नवरात्रीच्या दिवसांत रात्री गरबा खेळल्यानंतर बऱ्याच स्त्रियांचे पाय व गुडघे दुखायला लागतात. त्यानंतर त्या कार्ला येथे दवाखान्यात येऊन सांगतात, खेळण्याची सवय राहिली नाही, त्यामुळे आता गरबा खेळल्यामुळे पाय खूप दुखत आहेत. खरे तर स्त्रियांकरता नियमित व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. शरीरात हॉर्मोन्सचे संतुलन राहण्याकरता प्रत्येक स्त्रीने आपल्या दिनचर्येत चालणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम, वज्रासनात बसणे, जमत असल्यास संतुलन क्रियायोगापैकी समर्पण, अमृतक्रिया, फुलपाखरू वगैरेंचा समावेश करणे आवश्यक असते.

व्यायामासाठी वेळ नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने सकाळी अर्धा तास तरी व्यायामासाठी काढला पाहिजे. तसेही स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी तसेत वाताचे त्रास पाहायला मिळतात. त्यामुळे रक्ताभिसरणाची काळजी घेतली व नियमितपणे व्यायाम केला तर सुटसुटीत बांधा, व लवचिकता यांचा लाभ होतो. आपला बांधा सुटसुटीत राहावा अशी प्रत्येक वयातील स्त्रीची सुप्त इच्छा असतेच. त्यामुळे व्यायामावर जोर देणे अत्यंत आवश्यक.

9) मंत्रसंगीत, स्वास्थसंगीत : हॉर्मोन्सवर कार्य करणे अत्यंत अवघड असते. हॉर्मोन्स शरीरात सूक्ष्म रीतीने काम करत असतात, म्हणून त्यांच्यावर काम करणे खूप अवघड असते. रक्ततपासणी व्यवस्थित असली तरी वजन वाढणे, सतत मूडस् बदलणे वगैरे त्रास होताना दिसतात. अशा त्रासांवर स्वास्थसंगीत ऐकल्याचा चांगला परिणाम होताना दिसतो. संगीताचा शरीरातील चयापचय क्रियेवर एकूणच सर्व शरीरावर सूक्ष्म स्तरावर परिणाम होताना दिसतो.

बऱ्याच दिवसांत पाळी न आलेल्या स्त्रियांमध्ये कुठल्याही औषधांशिवाय स्त्रीसंतुलन हे स्वास्थ्यसंगीत ऐकून पाळी आली असे अनेक अनुभव आलेले आहेत. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांनी संगीतावर संशोधन करून स्त्रीसंतुलन ही सीडी तयार केलेली आहे व ती ऐकण्याचे खूप चांगले परिणाम दिसतात. हळदीकूंकू, भिशी अशा निमित्ताने स्त्रिया भेटत असतात. माझ्या माहितीत असे काही ग्रुप्स आहेत की भेटल्यावर सर्व जणी मिळून स्वास्थ्यसंगीत ऐकतात, त्याचा त्यांना स्वास्थ्यासाठी उत्तम परिणाम मिळाला आहे. देवीच्या उपासनेच्या या काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःतील शक्ती ओळखून त्याच्या संगक्षणाकरता योग्य ती काळजी घेतली तर या शक्तीच्या जागराला खरा अर्थ लाभेल.