तारुण्य पस्तिशीनंतरचे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारुण्य पस्तिशीनंतरचे !

प्रकृतीकडे लक्ष न दिसल्यास तरुण वयात दुष्परिणाम दिसत नाहीत, परंतु पस्तिशी ओलांडल्यावर शरीरात धातूंचा ऱ्हास झाल्याचे, शरीरात चुकीचे बदल झाल्याचे लक्षात यायला लागते.

तारुण्य पस्तिशीनंतरचे !

- डॉ. मालविका तांबे

‘स्त्री’ म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते एक सुंदर, सशक्त व संवेदनशील प्रतिमा. मुलांचे संगोपन व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतलीच होती. पण गेल्या काही दशकांमध्ये सामाजिक जीवन बऱ्याच प्रमाणात बदलत गेले, त्यामुळे सध्याच्या काळात तिने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक जबाबदारीही स्वीकारलेली आहे.

आज किती तरी क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी असल्याचे दिसते. भारतीय समाजाला स्त्रीचे महत्त्व पूर्वीपासूनच माहिती आहे, आणि सध्या तिच्या कर्तृत्वाला, तिच्या विचारांना, गुणांना व मताला किंमत असल्याचे दिसते. स्त्रीचे कार्यक्षेत्र सध्या व्यापक झालेले असल्यामुळे तिने आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्री-आरोग्य म्हटले की गरोदरपण, बाळंतपण एवढाच विचार डोक्यात येतो. पण स्त्री- आरोग्य हा विषय खूप खोलवर विचार करण्याजोगा आहे.

पाळीतील रक्तस्रावामुळे रक्तक्षय (ॲनिमिया), गर्भावस्थेमुळे हाडे ठिसूळ होणे, वातामुळे सांधेदुखी, कंबरदुखी वगैरे त्रास होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, थायरॉइड, मधुमेह, वजन वाढणे वगैरे विकार तर आजकाल गरोदरपणाची लक्षणे आहेत असे अनेक स्त्रिया समजायला लागल्या आहेत. वाढलेल्या ताणतणावामुळे व स्त्री संवेदनशील असल्यामुळे नैराश्य, अकारण रक्तदाब वाढणे, हृदयाची धडधड वाढणे, रजोनिवृत्ती लवकर येणे, पीसीओएस् सारखे त्रास होणे, हृदयरोग, फायब्रॉइड, कर्करोग वगैरे त्रासही सध्या स्त्रियांमध्ये वाढताना दिसत आहेत. स्त्रियांच्या नैसर्गिक स्वभावामुळे त्या स्वतःच्या त्रासांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करताना दिसतात. कुटुंबातील इतर सदस्य, त्यातल्या त्यात नवरा व मुले, यांची काळजी आधी घेणे तिला महत्त्वाचे वाटते, परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे हे तिने लक्षात ठेवायला हवेच.

प्रकृतीकडे लक्ष न दिसल्यास तरुण वयात दुष्परिणाम दिसत नाहीत, परंतु पस्तिशी ओलांडल्यावर शरीरात धातूंचा ऱ्हास झाल्याचे, शरीरात चुकीचे बदल झाल्याचे लक्षात यायला लागते. त्यामुळे स्त्रियांनी वेळेवर आपल्या प्रकृतीची काळजी घेतली तर त्यांचे तारुण्य व स्वास्थ्य टिकून राहायला मिळते. यासाठी काही उपाय आपण पाहू.

१. व्यायाम व प्राणायाम : सकाळची वेळ नेहमी घाईची असते. मुलांचे डबे भरणे व ऑफिसला जाण्याची घाई या सगळ्यामध्ये स्त्रीला वेळ मिळत नाही. परंतु पस्तिशी आली की आठवड्यातून किमान तीन वेळा योगासनांसाठी वेळ काढणे आवश्यक. सकाळच्या वेळी संतुलन फुलपाखरू, संतुलन अमृत क्रिया, वृक्षासन, हलासन, भुजंगासन वगैरे योगासने, आवडीनुसार हलके जिम वर्कआउट, किंवी डान्स वर्कआउट केलेले उत्तम. जमेल तसे रोज चालणे उत्तम. यामुळे

  • मन शांत उत्साही राहायला मदत मिळते,

  • हृदयाची ताकद वाढते,

  • स्नायू नीट राहिल्यामुळे शरीरबांधा नीट राहतो,

  • चयापचयक्रिया सुधारते,

  • मधुमेह-थायरॉइडसारख्या आजारांना प्रतिबंध होतो किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास कमी होतो.

याचबरोबरीने नियमित प्राणायाम केल्याने मानसिक ताकद व सहनशक्ती वाढायला मदत मिळते, ताणतणाव, नैराश्य, सारखा मूड बदलणे वगैरे कमी व्हायला मदत होते.

२. दिनचर्या : वेळेत झोपणे, वेळेत उठणे, किमान सात तास झोपणे अत्यंत आवश्यक. रात्री उशिरापर्यंत जागल्यास शरीरात वात-पित्ताचे असंतुलन होते. आठवड्यातून २-३ वेळा स्नानापूर्वी अर्धा तास पूर्ण शरीराला संतुलनचे अभ्यंग सिद्ध तेलाचा अभ्यंग करण्याचा उपयोग होतो. यामुळे शरीरबांधा नीट राहतो, अवाजवी वजन वाढत नाही. वाढत्या वयात शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. शरीरात कोरडेपणा वाढण्याचे एक लक्षण म्हणजे केस पांढरे होणे. त्यामुळे आठवड्यातून किमान २-३ वेळा संतुलन व्हिलेज हेअर तेलासारखे सिद्ध तेल हलक्या हाताने जिरवण्यामुळे केस गळणे, केस पांढरे होणे वगैरेंना प्रतिबंध होण्यास मदत होते. या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते, त्यामुळे स्त्रियांचा फेशियल करून घेण्याकडे कल असताना दिसतो. परंतु यामुळे त्वचा ढिली होऊ लागते. फेशियल करून घेण्यापेक्षा संतुलन रोझ ब्युटी तेलासारखे तेल चेहऱ्याला लावून हलक्या हाताने वरच्या बाजूला मसाज केल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत मिळते. एकूणच आरोग्य नीट राहण्याच्या दृष्टीने आयुर्वेदात सांगितलेला योनीपिचू व योनीधूपन आठवड्यातून २-३ वेळा करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी अनुक्रमे संतुलन फेमिसॅन सिद्ध तेल व संतुलन शक्ती धूप वापरता येतो.

३. आहार : जेवण ठराविक वेळी करण्याने शरीरातील अग्नी व्यवस्थित राहून पचन नीट होते, अवाजवी वजन वाढत नाही. शरीरात हॉर्मोन्सचे संतुलन ठेवायचे असल्यास शरीरातील पित्त संतुलित असणे आवश्यक असते. यादृष्टीने आहारातून अतितिखट, तेलकट, आंबट पदार्थ, जंक फूड, एरिएटेड शीतपेये टाळणे उत्तम. वाटाणे, चणा वगैरे कडधान्ये, ब्रेड-पाव वगैरे आंबवलेले पदार्थ, कोबी, सिमला मिरची वगैरे गोष्टी आहारात कमीत कमी ठेवाव्या. दूध, तूप, भिजवलेले बदाम, काळ्या मनुका आवर्जून खाण्यात असावे, शक्य झाल्यास दुधात स्त्री संतुलन कल्प किंवा संतुलन शतावरी कल्प घालावा. त्वचेच्या आरोग्याकरता अनंत किंवा शतानंत कल्प घालून दूध घ्यावे. धणे, जिरे, हळद, कढीपत्ता वगैरे मसाल्यांचा वापर आवर्जून करावा. तसेच कोरफड, आवळा, मंजिष्ठा, अनंत यांचाही समावेश करायला हरकत नाही. याचबरोबर च्यवनप्राश, आत्मप्राश, धात्री रसायन, सॅन रोझ, मॅरोसॅन सारखी रसायने घेणेही फायद्याचे ठरते. यामुळे शरीराचे क्षरण होण्याचा वेग कमी होतो.

४. स्वतःसाठी वेळ काढणे : जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी स्वतःसाठी दिवसातून १५-२० मिनिटे वेळ काढून चित्रकला, गाणे, नृत्य, वाचन, लिखाण वगैरे आपल्या आवडीचा छंद जोपासायचा प्रयत्न करावा. मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्याचाही यात समावेश होऊ शकतो. ध्यान, स्वास्थ्यसंगीत ऐकण्याचाही मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी उपयोगी ठरते. महिला दिनाच्या या सप्ताहामध्ये प्रत्येक स्त्रीने स्वतःची व तिच्या कुटुंबाने तिची काळजी घेण्याचा संकल्प घेतला पाहिजे, जेणेकरून तिला कुटुंबाला तसेच समाजाला पूर्णपणे योगदान देता येईल.

Web Title: Dr Malvika Tambe Writes Youth After Thirty Five Age Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top