#FamilyDoctor कावीळ

#FamilyDoctor कावीळ

कावीळ झालेल्याला सारे जग पिवळे दिसू लागते, असे म्हणतात. त्या रुग्णाला जग खरेच पिवळे दिसते की नाही, याविषयी खात्रीने सांगता येणार नाही; मात्र कावीळ झालेल्या रुग्णाचे डोळे, त्वचा, नखे, लघवी यात पिवळेपण दिसू लागते, हे नक्की. कावीळ हा एकापरीने यकृतावर झालेला हल्लाच असतो आणि यकृत आजारी पडणे म्हणजे आपल्या शरीरातील रासायनिक कारखान्यात दोष निर्माण होणे होय.

विषाणूंचा हल्ला 
हिपॅटायटीस - ए, बी, सी, ई आणि डी या विषाणूंचे यकृताशी विशेष सख्य असते. 
बारीक ताप, अंग दुखी, थकवा, भूक मंदावणे अशी लक्षणांनी सुरुवात होऊन लघवी आणि डोळे पिवळे दिसू लागतात. साधारणत: पाच प्रकारचे विषाणू - हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, हिपॅटायटीस इ आणि हिपॅटायटीस डी यकृताच्या पेशींवर हल्ला करतात. यापैकी हिपॅटायटीस इ आणि ए हे दूषित अन्न आणि दूषित पाण्याच्या सेवनाने शरीरात प्रवेश करतात, तर हिपॅटायटीस बी, सी आणि डी हे रक्‍तसंसर्गामुळे आपल्या शरीरात प्रवेश करतात. या काविळीचे निदान रक्‍ताची तपासणी करून अचूकपणे करता येऊ शकते. ए आणि इ या विषाणूंमुळे होणारी कावीळ बऱ्याचदा काही दिवसांत बरी होते. त्यासाठी योग्य आहार, विश्रांती आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. मुळात यकृत आधी कुठल्या कारणाने कमकुवत असेल, तर मात्र या विषाणूंमुळे आधीच कमकुवत असलेल्या यकृताचे काम आणखी खालावते आणि अशा वेळी आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. रक्‍तातील काविळीचे प्रमाण वाढत जाणे, अन्न मार्गातून रक्‍तस्त्राव होणे आणि त्वचेखाली रक्‍तस्त्राव झाल्याने लाल चट्टे येणे, असंबद्ध बडबडणे अशी लक्षणे दिसू लागल्यास आजाराने गंभीर स्वरूप घेतल्याचे लक्षात घ्यावे. अशा वेळी रुग्णालयात राहून उपचार घेतल्यास या परिस्थितीतून मार्ग काढता येऊ शकतो. 

हिपॅटायटीस - बी, डी आणि सी या विषाणूंमुळे होणारी कावीळ ही अधिक गंभीर असू शकते; कारण हे विषाणू आपल्या शरीरात आणि यकृतात वर्षानुवर्षे तळ ठोकून बसतात. दूषित रक्‍त, सूया, शरीरावर गोंदणे आणि शरीरसंबंधांद्वारे हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. वेळीच तपासण्या आणि उपचार न केल्यास काही वर्षांत ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’सारखा गंभीर आजार होण्याची शक्‍यता असते. त्याचबरोबर हे विषाणू यकृताच्या कर्करोगासाठी देखील कारणीभूत ठरतात. गेल्या काही वर्षांतल्या प्रगतीमुळे या विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराचे उपचार अधिक प्रभावी झाले आहेत. त्याचबरोबर हिपॅटायटीस -बीसाठी प्रभावी लस उपलब्ध असून, ती प्रत्येक जन्माला येणाऱ्या नवजात शिशूला देणे गरजेचे आहे. हीच लस हिपॅटायटीस -बी बाधित व्यक्‍तीच्या कुटुंबीयांनी घेतल्यास या आजाराचा प्रसार रोखता येऊ शकतो. 

सदोष जीवनपद्धती 
सदोष जीवनपद्धती काविळीसाठी कारणीभूत ठरण्यामध्ये मद्यसेवनाचा  क्रमांक सर्वांत वरचा आहे. मद्याचा प्रकार, प्रमाण आणि सेवनाचा कालावधी याबाबी प्रामुख्याने आजार होण्यामागे महत्त्वाच्या ठरतात. परंतु, कोणतेही मद्य कितीही कमी प्रमाणात सुरक्षित नसतेच. यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून या आजाराची सुरुवात होते. कावीळ झाल्यास यकृताची स्थिती अधिकच खालावल्याचे समजावे. वेळीच म्हणजे आजाराची सुरुवातीची लक्षणे दिसताच पूर्णपणे आणि कायमचे मद्यपान सोडणे अत्यावश्‍यक आहे. असे निश्‍चयी रुग्ण पूर्णपणे व्याधीमुक्‍त होऊ शकतात. 

मद्यप्राशन न करतादेखील यकृताचा तितकाच त्रासदायक ठरणारा दुसरा शत्रू म्हणजे स्थूलता. व्यायामाचा अभाव, मेदयुक्‍त अन्नाचे अतिसेवन, उच्च रक्‍तदाब, मधुमेह हे नवे शत्रू यकृतावर चारही बाजूंनी हल्ला चढवत आहेत. आजच्या काळातील असे चरबीयुक्‍त यकृत नकळत ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’च्या स्थितीपर्यंत पोहोचते.

अशा रुग्णांमध्ये काविळीची लक्षणे काहीशी उशिरा दिसतात. म्हणून वर उल्लेखलेले शत्रू (रिस्क फॅक्‍टर्स) पैकी कोणी आपल्या शरीरामध्ये उपस्थित असल्यास साध्या पोटाच्या सोनोग्राफीद्वारे यकृत चरबीयुक्‍त आहे किंवा नाही, हे तपासता येते. तसे असल्यास ‘लिव्हर फंक्‍शन टेस्ट’, ‘फायब्रोस्कॅन’ आणि गरज पडल्यास यकृताचा तुकडा काढून त्याची तपासणी करून या आजाराचे पक्के निदान करता येते. जीवनशैलीतील योग्य बदलांनी वजन कमी करणे, आहार नियंत्रित करणे आणि नियमित व्यायाम चालू ठेवणे, अशा सहज शक्‍य असणाऱ्या उपायांनी भविष्यात होणारी यकृताची हानी टाळता येऊ शकते.

 काही दुर्मीळ कारणे
काविळीच्या दुर्मीळ कारणांचा विचार करू. शरीरात तांबे या धातूचे योग्य नियमन न झाल्यास तांब्याचे अणू यकृताला इजा पोचवतात. याला ‘विल्सन डिसीज’ म्हणतात. लहान आणि तरुण वयात वारंवार काविळीची लक्षणे आढळल्यास रक्‍त आणि लघवीच्या तपासण्या करून या आजाराचे निदान करता येते. वेळेत उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. ‘ऑटोइम्युन हिपॅटायटीस’ या आजारामध्ये यकृताच्या पेशींविरुद्ध शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. विशेष करून महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात  आढळतो. आजाराला आटोक्‍यात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपचार लागू शकतात. बऱ्याच लोकांचे डोळे अधूनमधून पिवळे दिसतात. तपासणी केल्यास केवळ रक्‍तातील ‘इनडायरेक्‍ट बिलीरुबीन’ वाढल्याचे कळते. वारंवार चाचण्या केल्या जातात आणि यकृत खराब झाल्याचे जाहीर केले जाते. परंतु, बऱ्याच वेळी हा अत्यंत साधा रक्‍तातील जन्मत: दोष असू शकतो आणि अशा लोकांचे यकृत ठणठणीत असते. अशा आजाराला ‘गिल्बर्ट सिंड्रोम’ असे म्हणतात. या आजारांसाठी उपचारांची गरज नसते.

इनडायरेक्‍ट बिलीरुबीन वाढण्याचे एक कारण म्हणजे रक्‍त पेशींचे आजार. हिमोग्लोबिन आणि अशाच साध्या तपासण्या करून हा आजार नाहीना याची खात्री करावी.

अडथळ्यांची कावीळ 
यकृतामध्ये तयार होणारे पित्त पिताशयात साठवले जाते. तिथून ते एका बारीक नलिकेद्वारे आतड्यांमध्ये नेले जाते. या मार्गात पित्ताच्या प्रवाहास कुठेही अडथळा आल्यास कावीळ होते.

पोटात दुखणे, अंगाला खाज, लघवीचा  आणि डोळ्यांचा रंग पिवळा होणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणे जाणवतात. पित्ताचे खडे, यकृत, पित्ताशय, पित्ताची नलिका अथवा स्वादुपिंडाच्या गाठींमुळे सामान्यत: पित्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो. पोटाच्या सोनोग्राफी , सी. टी. स्कॅन किंवा अलीकडे एन्डोस्कोपीक अल्ट्रासांउंड या अत्याधुनिक तपासणीद्वारे काविळीचे अचूक निदान करता येते. पित्ताच्या मार्गातील अडथळा इआरसीपी या एन्डोस्कोपीच्या शस्त्रक्रियेने दूर करता येतो.

गैरसमज
आतापर्यंत आपल्या लक्षात आले असेलच, की कावीळ हे लक्षण असून, त्यामागील आजार हे विविध आहेत. आपल्या समाजात कावीळ हा आजार मानला जातो आणि हाच सर्वांत मोठा गैरसमज आहे. काविळीची कारणमीमांसा न करता कावीळ हा आजार समजून बरे करण्याचे उपाय केले जातात. बऱ्याच रुग्णांमध्ये कावीळ बळावल्यावर कारणांचा शोध सुरू होतो. मग अशा वेळी गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होऊन बसतात. म्हणूनच कावीळ होण्यामागील आजाराचे निदान ताबडतोब करून त्याचे उपचार करणे महत्त्वाचे आहे. 

 आहार 
कावीळ झाल्याचे कळताच पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे व्यक्‍तीचा आहार निम्म्याहून कमी केला जातो. हळद, तेल, काही भाज्या वर्ज्य केल्या जातात. केवळ उकडलेल्या गोष्टींचा भडिमार होतो. बाजारातून आणलेले उसाचे रस पाजले जातात. ज्यातून जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. परंतु, या सगळ्याची गरज नसते. कमी तेलाचे पण चव असलेले, पौष्टिक अन्न रुग्णास देणे महत्त्वाचे असते. सुरुवातीला भूक मंदावल्यास जास्तीत जास्त स्वच्छ फळांचा वापर आहारात करावा. भूक पूर्ववत झाल्यावर नेहमीप्रमाणे आहार देणे महत्त्वाचे आहे. वारंवार उलट्या होत असल्यास मात्र रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार करणे अधिक योग्य.

औषधे
काविळीचे निदान झाल्यावर काही पूर्वीपासून चालू असलेल्या औषधांच्या डोसमध्ये बदल करावे लागू शकतात. तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असे बदल करावेत. त्याचबरोबर कोणतेही नवीन औषध त्याचे दुष्परिणाम समजावून घेतल्याशिवाय काविळीच्या रुग्णाने घेऊ नये. कावीळ बरी करण्याच्या दृष्टीने असे औषधोपचार केले जातात; परंतु त्या औषधाचे घटक जाणून घेतल्याशिवाय त्याचे सेवन केल्यास कावीळ बळावण्याचा धोका असतो. अशी औषधे यकृतासाठी विषमय असू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com