हाताच्या दुखापती

डॉ. अल्ताफ वारिद, डॉ. पराग संचेती
Friday, 13 April 2018

हात किंवा बोटांना होणाऱ्या दुखापतींवर उपचार करणे हे आव्हान असते. नसांची संवेदनक्षमता टिकवणे व हालचाली पूर्ववत करणे हे अशा दुखापतीत खूप महत्त्वाचे असते.

दैनंदिन जीवनात आपले हात सतत अनेक प्रकारची कामे करत असतात. ‘ग्रॉस मोटर मूव्हमेंट्‌स’ आणि ‘फाईन मोटर मूव्हमेंट्‌स’ या दोन प्रकारांमध्ये आपण या हालचालींचे वर्गीकरण करतो. ग्रॉस मोटर मूव्हमेंट्‌समध्ये जड वस्तू उचलणे किंवा कष्टाची कामे करणे याचा समावेश होतो. फाईन मोटर मूव्हमेंट्‌समध्ये नाजूक गोष्टींचा समावेश होतो. उदा : हलक्‍या वस्तू उचलणे, लेखन इत्यादी. 

आपल्या रोजच्या कामांमध्ये अनेक ठिकाणी हाताचा वापर आपण करत असतो. त्यामुळे दुखापत होण्याची शक्‍यताही जास्त असते. उच्च क्षमतेच्या औद्योगिक ठिकाणी होणाऱ्या जखमा सर्वात हानिकारक असतात. तरुण व मध्यम वयाच्या लोकांना या दुखापती होतात. लहान मुलांमध्ये बोटांच्या टोकाला (फिंगरटीप) होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण अधिक असते. अशा प्रकारच्या दुखापती विशेषतः दरवाजामध्ये बोट अडकून होतात. 

हातांच्या दुखापतींवर योग्य उपचार करणे, हे डॉक्‍टरांसाठी आव्हानच असते. तज्ज्ञ डॉक्‍टर व सर्व सुविधा असणारे रुग्णालय या गोष्टी अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी गरजेच्या असतात. तरच आपण शस्त्रक्रियेनंतर अनुकूल परिणामांची अपेक्षा करू शकतो.

हाताच्या दुखापतीबाबतीत ‘सर्वसाधारण गरजेपेक्षा कमी उपचार’ आणि ‘सर्वसाधारण गरजेपेक्षा जास्त उपचार’ या दोन्ही संकल्पना समजून घेणे अतिशय आवश्‍यक आहे. याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढू शकतात. हाताला आघात झालेल्या दुखापतींवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असते. ‘इमर्जन्सी रूम’मध्ये बोटाचे साद्यंत परीक्षण केले जाते. बोटाची त्वचा, नख, रक्त प्रवाह, स्नायुबंध व संवेदना याचे दृश्‍य मूल्यांकन (व्हिजुअल असेसमेंट) केले जाते. बोटाची त्वचा अखंड असेल तर आतील गंभीर जखमाही लपवता येतात. नसांची संवेदनक्षमता जाणून घेण्यासाठी बोटाच्या सर्व बाजूंना हलकेच स्पर्श केला जातो. रुग्णाला बोटांची हालचाल करायला सांगून स्नायुबंधाचे परीक्षण केले जाते. हे नेहमीच शक्‍य होते असे नाही. काही वेळा वेदना कमी होण्यासाठी बोट बधिर केले जाते. हाड ‘फ्रॅक्‍चर’ असल्यास ते एक्‍स-रे द्वारे समजते. काही घटनांमध्ये तुटलेल्या बोटांना शस्त्रक्रियेची आवश्‍यकता नसते. अशा वेळी इजा झालेले हाड  पूर्वावस्थेत येण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांसाठी भारदस्त प्लास्टर करण्यात येते. जेणेकरून ते हाड लवकर आपल्या जागी स्थिर होईल व पूर्वावस्थेत येईल. 

हातावर उघड्या दुखापती असतील तर त्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासते. या वेळी जखमेची संपूर्ण स्वच्छता केली जाते आणि इजा झालेल्या अवयवातील मृत पेशींना बाहेर काढले जाते. त्यानंतर तुटलेले हाड स्थिर राहण्यासाठी त्यामध्ये के-वायर (धातूची वायर जी हाडामध्ये जाऊन त्याला पूर्वपरिस्थितीत आणते) बसवली जाते. हाडांची संरचना पूर्वस्थितीत आणल्यावर मग दुखापत तपासण्यासाठी पूर्ण पेशींचे परीक्षण केले जाते. स्नायू, शिरा व स्नायुबंध, नसा तसेच रक्तवाहिन्या यांचा या परीक्षणात समावेश होतो. हे परीक्षण मायक्रोस्कोपचा वापर करून केले जाते. कारण याद्वारे सर्जनाला अगदी सूक्ष्म इजासुद्धा समजते. त्यामुळे दुखापत झालेल्या अवयवाच्या आतील छोटी इजासुद्धा उपचारांविना राहिली नाही, याची सर्जनाला खात्री राहते. हातामधील प्रत्येक छोटी संरचना अतिशय नाजूक असते आणि प्रत्येकाला स्वतंत्र काम असते. त्यामुळे सर्व सूक्ष्म इजांवर तसेच आतील संरचनेवरसुद्धा योग्य प्रकारे उपचार करावा लागतो. तरच शस्त्रक्रियेनंतर सकारात्मक परिणाम दिसून येतात. 

आघात झाल्यावर अवयवाचे छेदन आणि त्याचा प्रवास जाणून घ्यायला हवा.

‘ट्रॉमॅटिक ॲम्प्युटेशन’ म्हणजे शरीराचा एखादा अवयव गमावणे. एखाद्या अपघात किंवा दुखापतीनंतर बोट, अंगठा, खांदा किंवा पाय हे अवयव गमावले जाण्याची जास्त शक्‍यता असते. 

गमावलेला अवयव योग्य प्रकारे जपला गेला तर तो पुन्हा आपल्या शरीराला जोडता येऊ शकतो. अपघातानंतर जर तो अवयव शरीराला जोडलेला असेल तर तो निर्जंतुक सलाईनने (पाणी) स्वच्छ करावा. इजा झालेली त्वचा अतिशय हलक्‍या हातांनी पूर्वावस्थेत ठेवावी. रक्त स्राव नियंत्रित करावा. आणि सगळ्यात शेवट दुखावलेल्या अवयवाला आधार द्यावा. 

जर तो अवयव शरीरापासून संपूर्णपणे विभक्त झाला असेल, तर त्याच्या यशस्वी जोडणीसाठी पुढील गोष्टी करणे आवश्‍यक आहे.

दुखापत झालेल्या अवयवावर साचलेली घाण स्वच्छ करावी.

विभक्त झालेला/ झालेले अवयव ओलसर स्वच्छ कापडाच्या तुकड्यात गुंडाळावा.

हवाबंद व स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशवीत अवयव ठेवावा.

अवयव असलेली हवाबंद पिशवी पाण्यात किंवा बर्फाच्या तुकड्यांमध्ये ठेवावी.

जेथे आपल्याला वैद्यकीय सेवा मिळणार आहे, तेथे रुग्णासोबत अवयव पाठवावा. त्या ठिकाणी आधी सूचित करण्यात यावे म्हणजे रुग्णाला वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकेल.

अवयव पुनर्जुळणीची शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णालयामध्ये रुग्ण आणि अवयव वेळेत पोचणेही तेवढेच महत्त्वाचे असते. हा कालावधी सहा ते आठ तासांपेक्षा जास्त असू नये. जर रुग्ण वेळेत पोचला तर शस्त्रक्रियेनंतर सकारात्मक परिणाम दिसण्याचे प्रमाणही जास्त असते. 

आघात झालेल्या बोटाचे शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन होणेही तेवढेच महत्त्वाचे असते. हॅंड थेरपी तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट) शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हाताच्या पुनर्वसनासाठी त्याला मदत करतात. जेणेकरून दुखापत झालेल्या हाताची सर्व कार्ये सुरळीतपणे चालू होतील. या उपचारांमध्ये हाताची हालचाल होण्यासाठी व्यायाम, ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार, लिहिण्यासाठी आणि पकड घट्ट होण्यासाठी व्यायाम, हातावरील जखमांची काळजी, तसेच दैनंदिन आयुष्यात कराव्या लागणाऱ्या कामांसाठी योग्य प्रशिक्षण यांचा समावेश होतो. हे सर्व व्यायामप्रकार संपूर्ण हाताचे काम समोर ठेऊन ठरवले जातात. कारण जेव्हा दुखापतीदरम्यान हाताची हालचाल होत नाही, तेव्हा स्नायू आखडलेले असतात. त्यांचे कार्य पूर्ववत होण्यासाठी या व्यायाम प्रकारांची गरज पडते. दुखापतीनंतर काही महिने ही ‘थेरपी’ रुग्णाला घ्यावी लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Parag Sancheti Dr. Altaf Warid article Hand injuries