esakal | गर्भारपणातील काळजी....
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnancy

गर्भारपणातील काळजी....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे गरोदरपणात घेण्याची काळजी याबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे गर्भवती माता आणि कुटुंबीय चिंतेत असणे स्वाभाविक आहे. त्याच अनुषंगाने गरोदरपणात आपण काय काळजी घ्यावी हे या लेखात पाहूया.

मातृत्व हे देवाने स्त्रीला दिलेले वरदान आहे. हा ९ महिन्यांचा काळ स्त्रीसाठी अत्यंत आनंदाचा असतो. गरोदरपणात आणि गर्भारपणानंतर मातेने स्वतःची आणि नंतर बाळाची विशेष घेणे आवश्यक असते. तज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपासण्या, उपचार घेणे महत्वाचे असते. गरोदरपणात पुढील तपासण्या करणे आवश्यक असते. यातील शारीरीक तपासणी मध्ये वजन, उंची, रक्तदाब याचे मोजमाप केले जाते. गरोदरपणात वजन योग्य पध्दतीने वाढणे गरजेचे असते. यामुळे गर्भाची वाढ नीटपणे होत आहे की नाही हे समजते. एकंदरीत ९ महिन्याच्या काळात पहिल्या ३ महिन्यात वजन वाढणे अपेक्षीत नसते, परंतु वजन कमी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते.

त्यामूळे राहीलेल्या ६ महिन्यात साधारपणे १० ते १२ किलो वजन वाढले पाहिजे. ज्या स्त्रीया अंडर वेट असतात त्यामध्ये १३ ते १५ किलो वजन वाढले पाहिजे. ज्या स्त्रीयांचे वजन गर्भारपणाआधी जास्त असते अशांमध्ये १० किलोपर्यंत वजन वाढणे अपेक्षीत असते. तसेच मातेची उंची ४ फूट १० इंचापेक्षा कमी असेल तर बाळंतपणाचा मार्ग हा अरुंद असण्याची शक्यता असते, त्यामुळे बाळंतपण अवघड होऊ शकते.

रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते. यात रक्तगट हा महत्वाचा भाग आहे. त्यात आईचा रक्तगट आरएच निगेटीव्ह असेल आणि पतीचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे असते. गरोदरपणाच्या पहील्या काही आठवड्यात लघवीची तपासणी आवश्यक असते. लघवीत साखर आहे का, प्रथिनांचे प्रमाण किती आहे तसेच स्त्रीला थायरॉईडचा त्रास आहे का नाही ते तपासणे महत्वाचे असते. थायरॉईडची पातळी असंतुलीत झाल्यास आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर गरोदरपणात रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त असल्यास त्याचा आई आणि बाळाला धोका होऊ शकतो. वेळीच जर काळजी घेतली नाही तर ह्याचे रुपांतर टाईप-2 डायबिटीस मध्ये होऊ शकते.

तसेच गरोदरपणात नियमीत रक्तदाब तपासणे हे गरजेचे असते. हल्लीच्या धकाधकीच्या काळात गरोदर स्त्रीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे असे दिसते. त्यामुळे गर्भपात, अकाली प्रसूती सारखे धोके उद्भवू शकतात. म्हणून प्रत्येक तपासणीच्या वेळीस रक्तदाब घेणे योग्य असते. पोटाच्या तपासणी मध्ये पोटाच्या आकारावरुन आणि आईच्या वजनावरून बाळाची व्यवस्थीत वाढ होत आहे की नाही हे समजते. गर्भाची वाढ किती झाली आहे, बाळ आडवे आहे का, उभे आहे. तसेच बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थीत आहेत की नाही हे समजते. सोनाग्राफी ही एक महत्वाची तपासणी गर्भारपणात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पाळी चुकल्यानंतर गरोदरपणाचे निदान निश्चीत होते. गर्भ हा गर्भाशयाच्या पिशवीत आहे का गर्भनलिकेमध्ये हे समजते. गर्भनलिकेत जर गर्भ असेल तर ते फार धोकादायक आहे.

तसेच गर्भाशयाच्या पिशवीत जुळी बाळं आहेत का, बाळाची वाढ कशी होत आहे, गर्भात काही जन्मोदोष आहेत का, गर्भाभोवतीचे पाणी कमी अथवा जास्त आहे का, हे देखील पहिले जाते. गरोदर स्त्रीला तिच्या व बाळाच्या पोषणासाठी ३०० कॅलरीजची गरज असते. तरीही गरोदरपणात शरीराला आवश्यक आहार, कॅलरीजची गरज परिस्थितीनुसार कमी व जास्त होऊ शकते. रोजच्या आहारामध्ये भाज्या, फळे, कडध्यान्ये, दूधाचे पदार्थ, अंडी ह्यांचा सामावेश असावा पण जर कुणी शाकाहरी असेल तर अट्टहासाने कॅलरी वाढवण्यासाठी मांसाहार सुरु करु नका. शक्यतो तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. किंबहूना कुठल्याही मासांहारी किंवा शाकाहरी पदार्थांचा अतिरेक टाळावा.

जे पचेल, रुचेल ते घ्यावे. आहारामध्ये समतोल असावा. आजच्या काळात संसाराचा गाडा चालवण्यासाठी नवरा बायको दोघांनाही धावपळ करावी लागते. ऑफिसमधील स्पर्धा, कामाचा ताण, कामातील चढाओढ ही योगायोगानेच येते.

पण ह्याचा फार त्रास करुन घेऊ नये कारण हा आयुष्याचा भागच झालेला आहे. एकाच ठिकाणी फार वेळ बसून काम केल्याने पाठ दूखू लागते, म्हणून छोटा ब्रेक घ्या, थोडसं चालून या, मित्र मैत्रीणींशी गप्पा मारा त्याने कामाचा ताण जाणवणार नाही. कुठलेही असे काम टाळा की ज्यामध्ये फार धावपळ होते. उगाच जिन्यावरून वर खाली करु नका. लीफ्ट असेल तर त्याचा वापर करा. आरामदायक कपडे घाला. उंच टाचेच्या चपला घालून काम करु नका. त्याने घसरून पडण्याचा अधिक धोका असतो.

या काळात औषधे ही डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यावीत. या औषधांमध्ये फोलीक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शीयम, प्रोटीन यांचा सामावेश असतो. ही औषधे योग्य वेळेत योग्य प्रमाणात घ्यावीत, मनाने कुठलीही औषधे घेऊ नयेत. धनुर्वात प्रतिबंधक लसचे दोन डोस डॉक्टरांच्या सल्याने ठराविक वेळेत घ्यावेत. गर्भधारणेपूर्वी जर एखादा आजार असल्यास त्यावरील औषधे सुरु असतील तर ती आधी डॉक्टरांना दाखवावी आणि त्यांच्या सल्यानेच ती घ्यावीत. औषध घेण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट नक्की बघावी. जर थोडासा जरी त्रास जाणवला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज जगभरात कोवीडने थैमान घातले आहे. अशावेळी गरोदर स्त्री आणि तिच्या कुंटूंबियांना कोवीडची चिंता वाटणे स्वभाविक आहे. पण योग्य काळजी घेतल्यास कोरोनाचा धोका कमी करता येऊ शकतो.

गरोदर स्त्रीने करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा, वारंवार डोळ्यांना, नाकाला, तोंडाला हात लावणे टाळावे. आरोग्यदायी, जिवनसत्वयुक्त आहार घ्यावेत, गरज नसताना घराबाहेर जाणे टाळावे. सोशल डिस्टंसिंग पाळा. फोनच्या माध्यमातून डॉक्टरांच्या संपर्कात रहा. जर गरोदर स्त्रीला करोनाचे लक्षणे दिसू लागली तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. मनाने घरगुती उपाय करु नका. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आजाराची लक्षणे सौम्य आहेत की ती वाढत आहेत हे बघीतले जाते. जर लक्षणे सौम्य असतील तर डॉक्टरांच्या सल्याने त्यांच्या देखरेखीखाली घरामध्येच विलगीकरण करता येऊ शकते. पण जर आजाराची लक्षणे वाढत असतील तर रुग्नालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत. कोरोना होऊ नये म्हणून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सर्व प्रतिबंधांचे पालन करणे जरुरी आहे. त्यामध्ये लसीकरणाचाही समावेश आहे. गरोदर स्त्रीने कोवीड व्हॅक्सीन घेणे जरुरी आहे. गरोदरपणामध्ये योग्य निदान, आहार, उपचारांमूळे आई आणि बाळाचे आरोग्य समृद्ध राहते.

- डॉ. सचिन संगमनेरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, पुणे

loading image
go to top