#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) 

#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) 

अग्र्यसंग्रहातील कोणत्या कार्यासाठी काय श्रेष्ठ किंवा काय कनिष्ठ याची माहिती आपण घेतो आहोत. मागच्या वेळी आपण ब्रह्मचर्य म्हणजे नियम सांभाळून मैथुन करणे हे आयुष्य वाढविण्यात श्रेष्ठ असते हे पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ. 

संकल्पे वृष्याणां, दौर्मनस्य अवृष्याणाम्‌ - मनाची इच्छा हे सर्वोत्तम वाजीकरण आणि मन उदास असणे हे वाजीकरणासाठी सर्वांत वाईट होय. 

वाजीकरणामध्ये मैथुनक्षमता, शुक्रधातूवृद्धी, निरोगी अपत्य, उत्तम शरीरसौष्ठव वगैरे बऱ्याच गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सुचविलेले आहेत. किंबहुना, गृहस्थाश्रमी दांपत्याने वाजीकर औषधे, पथ्ये सांभाळायची असतात. यामध्ये मनाचा भाव किती महत्त्वाचा आहे हे या सूत्रातून समजते. शुक्रधातू संपन्न असला तरी वाजीकरणासाठी मनाची इच्छा असणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. या उलट मन उदासीन असणे, मनावर कसला तरी ताण असला तर ते अवृष्यत्वाचे म्हणजेच मैथुन अक्षमतेचे, तसेच वंध्यत्वाचे मोठे कारण ठरू शकते. म्हणून उभयतांचे एकमेकांवर प्रेम, आकर्षण असणे आणि मानसिकता असणे महत्त्वाचे होय. 

अयथाबलमारम्भः प्राणोपरोधिनाम्‌ - आवाक्‍याबाहेरचे कोणतेही काम करणे हे प्राणशक्‍ती कमी करणारे आहे. 

शरीर, मन, इंद्रिये या सर्वांची एक मर्यादा असते हे जगताना लक्षात ठेवणे गरजेचे असते. ही मर्यादा म्हणजेच क्षमता प्रयत्नांनी सरावाने वाढविता येणे शक्‍य असले तरी मर्यादा ओलांडून शक्‍ती खर्च करत राहण्याने प्राण धोक्‍यात येऊ शकतात. आयुर्वेदात यालाच ‘साहस’ असे म्हटले आहे. शक्‍तीचा विचार न करता भलतेच साहस न करणे हे आरोग्यासाठी आवश्‍यक होय. यात व्यायामाचाही अंतर्भाव होतो. 

तृष्णा  क्षयः प्रतमको रक्‍तपित्तं श्रमः क्‍लमः ।
अतिव्यायामतः कासो ज्वरछर्दिश्‍च जायते ।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

अति व्यायामामुळे क्षयरोग (धातुक्षय), श्वास (दमा), रक्‍तपित्त (विविध शरीरमुखांतून रक्‍तस्राव होणे), श्रम, ग्लानी, खोकला, ताप, उलट्या होणे वगैरे त्रास होऊ शकतात. म्हणूनच एक तर व्यायाम स्वशक्‍तीचा विचार करूनच करायला हवा आणि दुसरे म्हणजे व्यायामानंतर विश्रांती घ्यावी, शक्‍य असल्यास सुखावह वाटेल अशा पद्धतीने अंग दाबून घ्यावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

फक्‍त व्यायामच नाही, तर रोजचे जीवन जगताना अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या शरीरशक्‍तीच्या आवाक्‍याबाहेर न करणेच श्रेयस्कर असते.

व्यायामजागराध्वस्त्री-हास्यभाष्यादि साहसम्‌ ।
गजं सिंह इवाकर्षन्‌ भजन्नाति विनश्‍यति ।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान

व्यायाम, जागरण, प्रवास, मैथुन, हसणे आणि मोठ्याने बोलणे (भाषण देणे) या सर्व गोष्टी प्रमाणातच कराव्यात, उचित विश्रांतीची जोड देऊनच कराव्यात, अन्यथा प्रचंड गजराजावर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे मनुष्याचा नाश होऊ शकतो. अर्थात प्रवास, मैथुन, जागरण वगैरेंनंतर पुरेशी विश्रांती घेतली नाही तर त्यातून प्राणशक्‍तीचा ऱ्हास होऊ शकतो. 

वेळेवर शांत व पुरेशी झोप ही मन, मेंदू, हृदय यांसारख्या अवयवांचा थकवा दूर करणारी असते. ‘अर्धरोगहरी निद्रा’ म्हणजे अर्धा रोग बरा करण्याचे सामर्थ्य निद्रेत असते असे म्हटले जाते. 

इंद्रियांवरही अति ताण येणार नाही याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. 

न पीडयेदिन्द्रियाणि न चैतान्यतिलालयेत्‌ ।
...अष्टांग हृदय सूत्रस्थान


इंद्रियांच्या अति आहारी जाणे किंवा इंद्रियांना त्रास होणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. 
पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये ज्या अवयवांच्या माध्यमातून काम करतात त्या अवयवांची काळजी घेणे, त्यांचे आरोग्य नीट राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते. तसेच इंद्रियांना विश्रांतीची सवय लावणेही गरजेचे असते. जागे असतानाही डोळे मिटून शांत बसणे, मन श्वासाच्या गतीवर एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे, आपापल्या विषयांकडे धावणाऱ्या इंद्रियांना अनुशासित पद्धतीने काम करण्याची सवय लावणे वगैरे उपायांनी इंद्रियांना विश्रांती मिळू शकते. अन्यथा, इंद्रिये भरकटली तर त्यामुळे प्राणशक्‍तीचा ऱ्हास होऊ शकतो. 
अग्र्यसंग्रहातील युाढचा भाग पुढच्या आठवड्यात पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com